Addiction Icon व्यसने
व्यसने
प्रास्ताविक

Addiction सन म्हणजे कोठल्या तरी मादक, उत्तेजक पदार्थाची सवय. याचे सगळयांत मोठे उदाहरण म्हणजे दारू. याशिवाय यात भांग, गांजा, अफू गर्द व तंबाखू येतात.

व्यसने ही पुरातन आहेत. काही लोक त्याला कडाडून विरोध करतात. समाजकंटक आणि सरकारला व्यसनांपासून आर्थिक उत्पन्न मिळते पण अगणित कुटुंबांची दैना होते. कित्येक देशांची अर्थव्यवस्था मादक पदार्थांच्या व्यापारावर अवलंबून आहे. जगातल्या दहशतवादी चळवळीही यावरच पोसतात. व्यसनांना रोखण्यासाठी केलेली अंमलबजावणी यंत्रणा मधल्यामध्ये गबर होऊन जाते असा अनेक देशांमधला अनुभव आहे. व्यसन हे केवळ वैयक्तिक पातळीवरचे संकट नाही. देशच्या देश या समस्येने त्रस्त आहेत. गावातही आपण दारूगुत्त्यांचे साम्राज्य व राजकारणातील त्यांचे वर्चस्व ओळखून असतो.

कारणे

पूर्वी व्यसने नव्हती असे नाही, पण त्यावर काही लगाम होते. पूर्वी सर्व समाज श्रमावर जगणारा होता, काम नसलेल्या व्यक्तींची संख्या कमी होती. आता आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्याने दरडोई-सुबत्तेचे प्रमाण वाढले आहे. दुसरे म्हणजे पूर्वी दारू कुटुंबाने एकत्र बसून घ्यायचा एक विरंगुळा होता. त्याने फारसे झिंगणे किंवा बेलगाम होणे शक्य नव्हते. व्यसने ही अधिक वैयक्तिक होत गेली तशी ती अनियंत्रित होत गेली. अनेक कुटुंबांत एखादा मनुष्य व्यसनी झाल्याचे उशिरा कळते; तोपर्यंत इतरांना कल्पनाही येत नाही.

एखादी व्यक्ती व्यसनांकडे का ओढली जाते? याला अनेक कारणे आहेत. संपन्नता, हलाखी, स्वभाव, दुःखे, निराशा, रिकामपणा, आपली जीवनदृष्टी, संगत वगैरे अनेक कारणे यात येतात. व्यसनांच्या वस्तू जवळपास आणि स्वस्त उपलब्ध असणे हा शेवटी महत्त्वाचा भाग आहे.

व्यसनाधीनता हे मानसिक आजारांचेच अंग आहे. केवळ गंमत किंवा आग्रह म्हणून सुरुवात होते. नंतर ती व्यक्ती त्या व्यसनावर पूर्णपणे अवलंबून राहते. संबंधित पदार्थ मिळाला नाही तर त्या व्यक्तीला मानसिक तसेच शारीरिक त्रास होतो. दीर्घ व्यसनाधीनतेने मानसिक बदलही होतात.

व्यसने केवळ गरिबांमध्ये आहेत असे नाही. नवश्रीमंत वर्गातही दारू वगैरे व्यसने शिष्टसंमत आहेत. अशिक्षितांइतकीच सुशिक्षितांमध्येही व्यसने भरपूर प्रमाणात आहेत.

व्यसनात थोडी आनुवंशिकता असल्याचे दिसते. म्हणजे काही माणसे जन्मतःच थोडी व्यसनाकडे झुकणारी असतात. पण सामाजिक संस्कारांनी यावर मात करता येते.

तंबाखू

Tobacco तंबाखू हा सर्वात प्राचीन व्यसनपदार्थ आहे. त्याचा फार पूर्वी चलन म्हणून वापर होत असे, इतके त्याचे महत्त्व होते. आताही तंबाखू व विडी-सिगारेट हे सर्वात जास्त प्रचलित व्यसन आहे. त्याचा वापरही अवाढव्य आहे. धूर ओढणे, चघळणे, तपकीर वगैरे पध्दतींनी तंबाखू वापरली जाते.

तंबाखू चे शारीरिक दुष्परिणाम

निकोटीन हे तंबाखूतले रसायन अत्यंत विषारी आहे. ते लाळेतून, श्वासातून रक्तात मिसळते. त्याचा परिणाम हृदय, फुप्फुस, जठर आणि रक्तवाहिन्यांवर होतो.

रक्तवाहिन्यांवर होणा-या त्याच्या परिणामांमुळे पुढे अनेक अवयव बिघडतात. (उदा. बोटे काळी पडून झडणे.) निकोटीन जिथे जिथे प्रत्यक्ष लागते (ओठ, जीभ, गाल, श्वासनलिका) तिथे कॅन्सर होऊ शकतो.

श्वसनमार्गातला कॅन्सर आणि धूम्रपानाचा अगदी निकट संबंध आहे .धूम्रपान करणा-यांना कॅन्सर होण्याचे प्रमाण इतरांच्या मानाने खूपच जास्त आहे.

गरोदरपणी धूम्रपान केल्यास गर्भावर प्रतिकूल परिणाम होऊन बाळे कमी वजनाची निपजतात.

हृदयाच्या रक्तवाहिन्या निकोटीनमुळे खराब होऊन हृदयविकार बळावतो हेही सिध्द झाले आहे.

रक्तवाहिन्या कडक झाल्याने रक्तदाबही वाढतो

श्वसनसंस्थेत कफ बळावणे, श्वासनलिका-उपनलिका अरुंद होणे वगैरे परिणाम होऊन श्वसनाचा कायमचा आजार मागे लागतो. त्यामुळे पुढे हृदयही बिघडते.

तंबाखू च्या धुळीत काम करणा-या कामगारांना सतत तंबाखू छातीत जाऊन फुप्फुसाचे आजार जडतात (व्यवसायजन्य आजार). एकाच वेळी जास्त तंबाखू – धूळ छातीत गेली तर अचानक मृत्यूही ओढवू शकतो. अशा वेळी लाळ सुटणे, जुलाब, घाम येणे, पोटात खूप जळजळ, मळमळ, उलटया, चक्कर इ. दुष्परिणाम दिसतात. डोळयाच्या बाहुल्या आधी बारीक व मग मोठया होतात. याबरोबर स्नायूंवर परिणाम होतो (अशक्तपणा, स्नायू उडणे) व शेवटी मृत्यू येऊ शकतो.

आधीच श्वसनाचे रोग, हृदयविकार, अल्सर, आम्लता, रक्तदाब इ. विकार असतील तर तंबाखू ने ते बळावतात.

तंबाखू – धूम्रपानाचे परिणाम हे जास्त लवकर आणि घातक होतात. त्यामानाने तंबाखू चघळणे (कॅन्सर सोडता) कमी धोकादायक आहे.

खरे तर दारूपेक्षा अधिक नुकसान तंबाखू ने (विशेषतः धूम्रपानाने) होते. कुटुंबाचा रोजचा तंबाखू चा खर्च एकदोन रुपयांपासून वीस-पंचवीस रुपयांपर्यंत जाऊ शकतो. गरीब कुटुंबात हे मोठेच संकट असते. सिगारेटपेक्षा विडी स्वस्त असली तरी विडी- जास्त गरीब असल्याने नुकसान होतेच.

तंबाखू ला जर आळा घालता आला तर वैद्यकीय उपचारांचा खर्च मोठया प्रमाणात वाचेल. त्यासाठी तंबाखू पिकविणा-यांना आणि कारखानदारांना दुस-या उत्पन्नाचा शोध घ्यावा लागेल. पण तंबाखू -धूम्रपानावर बंदी घालणे अवघड आहे. तंबाखू चे आर्थिक साम्राज्य फार मोठे आहे.

सिगारेट उद्योगाने एकेकाळी जाहिरातीने प्रचंड प्रसार करून घेतला. यातला धोका लक्षात आल्यावर अनेक देशांच्या सरकारांनी सिगरेटच्या जाहिरातीस बंदी केली. एवढेच नव्हे तर धूम्रपान हे आरोग्यास धोकादायक आहे. हा इशारा पाकिटांवर छापणे भाग पाडले. नव्या कायद्याप्रमाणे आता तंबाखू उत्पादनांवर धोक्याचे चित्र छापणे बंधनकारक झाले आहे.

सरकारी कार्यालयातही धूम्रपानास आता बंदी आहे. बस, रेल्वे वगैरे ठिकाणी धूम्रपानाला बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणच्या धूम्रपानाला आता बंदी आहे.

धूम्रपान करणा-याबरोबर जवळच्या माणसालाही धूम्रपानाचा फुकट तडाखा बसतो, कारण हवेत धूर पसरलेला असतो. प्रत्यक्ष धूम्रपानाप्रमाणे या फुकट धूम्रपानानेही आरोग्यावर दुष्परिणाम झाल्यावाचून राहात नाहीत.

धूम्रपानाची सवय सर्वसाधारणपणे विशीआधी किंवा विशीमध्ये लागते. बहुतेक वेळा इतरांचे पाहून किंवा मित्राचा आग्रह किंवा केवळ गंमत म्हणून सुरुवात होते. हळूहळू सवय लागते. धूम्रपानात इतर मादक पदार्थ मिसळून घेण्याचे प्रमाणही वाढत आहे.

धूम्रपान ही एक गलिच्छ व आजारी करणारी सवय आहे हे लहानपणापासून मनावर ठसवले पाहिजे. धूम्रपानाने दात पिवळे पडतात. तोंडाला दुर्गंधी येते. अनेक आजार होतात, पैसे तर जातातच. हे सर्व मुलांच्या मनावर ठसवणे आवश्यक आहे.

हशीश

हशीश हे गांजाच्या हिरव्या फांद्यांतून काढलेला चीक वाळवून करतात. हशीश तंबाखूत मिसळून ओढले जाते. हे अत्यंत कडक व त्वरित परिणाम करणारे असते. हशीशचा चोरटा व्यापार मोठया प्रमाणावर चालतो. शहरी तरुणांमध्ये याचे व्यसन ब-याच प्रमाणात आढळते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.