आरोग्यविद्या
Home मानसिक आरोग्य आणि आजार

मानसिक आरोग्य आणि आजार

प्रास्ताविक

जसे एखाद्याच्या पोटात दुखते तसेच मनाचेही दुखणे असू शकते, पण शारीरिक आजारांपेक्षा मानसिक आजारांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी वेगळी असते. मानसिक आजारांबद्दल गूढतेचे, भीतीचे, करणी-जारणमरण, इत्यादींचे वलय असते. सर्वसाधारण वैद्यकीय वर्तुळातही याबद्दल फार माहिती नसते. त्यामुळे पोटदुखी, कानदुखीकरता जसे आपण चटकन डॉक्टरकडे जातो तसे मानसिक आजाराबद्दल जात नाही. यावरचे वैद्यकीय उपचार म्हणजे विजेचे शॉक, मनोरुग्णालयात दाखल करणे, इत्यादी भीतीदायक कल्पना असतात. त्यामुळे मानसिक आजारांच्या बाबतीत वैद्यकीय सल्ला न घेता काही जण मांत्रिकाकडे जातात. शहरांत आणि खेडयांतही ब-याच किरकोळ मानसिक आजारांमध्ये काही लोक मांत्रिक-गुरु यांची मदत मागतात. आपले दुखणे कोणीतरी 'दैवी' माणूस नीट ऐकून घेतो आहे असे पाहून, थोडाफार फरक पडतो. यामुळे काही जणांना समाधान मिळते. पण मारझोड, बांधून ठेवणे, धुरी देणे, उपाशी ठेवणे, इत्यादी अघोरी प्रकारही केले जातात. अनेकवेळा यात रुग्ण दगावण्याची उदाहरणे आहेत.

घरातल्या, गावातल्या शांत, वडीलधा-या, प्रेमळ माणसाने दुखणे ऐकून घेणे व धीर देत राहणे याने किरकोळ मानसिक दुखण्यांचा विसर पडतो. हा एक प्रकारचा समुपदेशन उपचारच आहे. मात्र गंभीर प्रकारच्या दुखण्यांत वैद्यकीय उपचार आवश्यक असतात. वेळीच उपचार झाले तर इतर शारीरिक आजारांप्रमाणेच काही मानसिक रुग्णही बरे होऊ शकतात.

गंभीर मानसिक आजारांचे प्रमाण आपल्या समाजामध्ये सुमारे एक टक्का इतके आहे. म्हणजेच प्रत्येक गावात पाच-दहा तरी मनोरुग्ण असण्याची शक्यता आहे. याशिवाय सौम्य मनोविकार असलेल्यांची संख्या दहा टक्के इतकी असते. मात्र ब-याच वेळा यावर फार काही उपाय केला जात नाही. ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लवकर निदान, तज्ज्ञांकडून उपचार आणि पाठपुरावा व आधार देणे एवढया गोष्टी आपण करू शकतो.

मानसिक आजाराचे वर्गीकरण अनेक प्रकारे करता येते. या पुस्तकात सोपी पध्दत वापरलेली आहे.

जीवशास्त्रातल्या अनेक गोष्टी आणि घटनांसंबंधी, 'अमुक इथपर्यंत योग्य, तिथून पुढे वाईट' अशा मर्यादा आखता येत नाहीत. उदा. 140 पुढे रक्तदाब असेल तर तो 'अतिरक्तदाब' आहे असा शिक्का मारला जातो, पण 139 असेल तर तो योग्यच आहे आणि 141 असेल तर जास्तच आहे अशी काटेकोर भूमिका घेणे अशक्य असते. तसेच रक्तदाब असणे ही गोष्ट आवश्यक व नैसर्गिक आहे आणि जास्त असणे आजार आहे. मानसिक आजारांच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आहे. योग्यप्रमाणात भावभावना असणे नैसर्गिक आहे. उदा. 'संताप' हा घटक घेऊ या. थोडा संताप असणे संरक्षणासाठी आवश्यक आहे. पण अकारण, अवाजवी संताप हे मानसिक दोषांत मोडेल. आनंदी स्वभाव चांगला खरा, पण सतत 'हवेत असणे' मानसिक दौर्बल्याचे लक्षण आहे. दुःख असणे स्वाभाविक, पण सतत खूप दुःखी असणे 'मनोविकार' म्हणता येईल.

गुणदोषांची थोडी जास्त मात्रा कधीकधी प्रगतीही साधू शकते. उदा. नादिष्ट, छंदिष्टपणातून कलानिर्मिती व शास्त्रीय प्रगती होऊ शकते. सर्वसाधारणपणे टोकाच्या प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून समाजातील बदलाची पावले पडू शकतात. असे असले तरी मानसिक दोष जास्त असेल तर मात्र उपचाराची गरज लागते.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday61
mod_vvisit_counterYesterday1208
mod_vvisit_counterThis week11799
mod_vvisit_counterLast week15782
mod_vvisit_counterThis month51676
mod_vvisit_counterLast month59375
mod_vvisit_counterAll days4428832

We have: 15 guests, 1 bots online
Your IP: 207.46.13.151
Mozilla 5.0, 
Today: नोव्हेंबर 25, 2017
Bharatswasthya