डासरोग व हिवताप
आरोग्यविद्या
Home डासरोग व हिवताप

डासरोग व हिवताप

हिवताप

हा आपल्या देशात फार मोठया प्रमाणावर आढळणारा आजार आहे. ह्या आजाराविरुध्द राष्ट्रीय नियंत्रण योजना 1954 पासून राबवली जात आहे. सुरुवातीची थोडी वर्षे या मोहिमेला मोठे यश मिळाले. हिवतापाचे प्रमाण आता पुष्कळ कमी झाले आहे. तथापि हा रोग शून्यावर आणणे शक्य नाही.

हा आजार विशिष्ट प्रकारच्या एकपेशीयजंतूंमुळे (प्लास्मोडियम) होतो. या जंतूंच्या चार-पाच जाती आहेत. सगळयांत जास्त सापडणारी जात म्हणजे व्हायव्हॅक्स (V)आणि त्या खालोखाल सापडणारी पण घातक जात म्हणजे फॉल्सिपेरम (F). या जाती रक्तनमुन्यामध्ये वेगळया ओळखता येतात. या जंतूंचे जीवनचक्र मनुष्य व डास या दोन्हींमध्ये फिरत असते. जेव्हा डासांचे प्रमाण जास्त तेव्हा हिवतापाचा प्रसार जास्त असतो. डासांचा उपद्रव जुलै ते डिसेंबर (पाणी जास्त असेल तेव्हा) या काळात होतो. हिवतापाने आजारी पडण्याचे प्रमाण याच काळात सर्वात जास्त असते.

डास

डासांचे अनेक प्रकार आहेत. त्यातल्या ऍनाफिलिस डासांच्या माद्यांमार्फत या जंतूंचा प्रसार होतो. हे डास बहुधा स्वच्छ पाण्यात वाढतात. विहिरी, फार घाण नसलेले सांडपाणी, पावसाळयाची डबकी, साठवणीचे पाणी, पाण्याची पिंपे, बागायत शेतीतले साठवलेले पाणी, इ. हे डास दिवसा अडचणीच्या जागेत विश्रांती घेतात व रात्री चावतात. म्हणून कोंदट घरांमध्ये डास असण्याची शक्यता असते. बसताना हे डास पृष्ठभागाशी कोन (तिरके) करतात. यांच्या अळया पाण्याखाली पृष्ठभागाशी समांतर राहतात. (याउलट क्युलेक्स अळी पृष्ठभागाशी तिरकी आणि डास मात्र समांतर, पण कुबड काढून बसतो.) सर्वसाधारणपणे डास आजूबाजूच्या एक कि.मी. परिसरात उपद्रव करू शकतात.

हिवताप जंतूंचे जीवनचक्र

हिवतापाच्या जंतूंचे जीवनचक्र डास- माणूस यात फिरत राहते. समजा, एखाद्या माणसाला हिवताप झाला आहे म्हणून त्याच्या रक्तात हिवतापाचे जंतू आहेत. सुमारे आठ-दहा दिवसांत या जंतूंचे रुपांतर होऊन नर-मादी तयार होतात. जेव्हा डासांची मादी माणसाला चावून रक्त शोषते तेव्हा हे जंतूही डासांच्या पोटात जातात. मात्र आजारी माणसाच्या रक्तात जंतू अगदीच कमी असतील तर डासाने शोषलेल्या रक्तात जंतू विरळच असणार.

यानंतर डासांच्या पोटात या नर-मादी जंतूंपासून लिंगविरहित जंतू तयार होतात. याजंतूंची संख्या वाढत जाते. डास चावल्यापासून ही संख्या वाढेपर्यंत सुमारे दहा दिवस जातात. संख्या वाढल्यानंतर डासाच्या लाळेत जंतू उतरतात. माणसाला हा डास चावताना या जंतूंचाही शरीरात प्रवेश होतो. अशा रितीने जंतूंचे चक्र चालत राहते.

शरीरात जंतूप्रताप

डास चावलेल्या ठिकाणी रक्तात हे जंतू उतरतात. इथे यांची संख्या थोडी वाढते. रक्तावाटे काही वेळातच हे जंतू यकृतात येतात. तिथे सुमारे 10-15 दिवसांत त्यांची संख्या भरपूर वाढते. मग ते रक्तात जातात. रक्तामध्ये तांबडया पेशींवर हल्ला करतात. तांबडया पेशीतील रक्तद्रव्य खाऊन त्यांची संख्या वाढत जाते. 24-48 तासांत त्यांची संख्या इतकी वाढते की पेशी फुटून हे जंतू परत रक्तात पसरतात. 24-48 तासांत परत नव्या तांबडया पेशींवर त्यांचा हल्ला होता. याप्रमाणे रोज किंवा दिवसाआड जंतूंच्या तुकडया तयार होतात. तांबडया पेशी नष्ट होत जातात.

हिवतापामुळे रक्तातले रक्तद्रव्याचे प्रमाण कमी होते. यामुळे खूप थकवा येतो. सुमारे 8-10 दिवस असे चालल्यानंतर जंतू यकृतात व पांथरीत स्थिर होतात. आता रक्तावरचे हल्ले थांबतात. यानंतर काही जंतूंचे नर-मादीत रुपांतर होते. या स्थितीत थंडीताप नसतो. या अवस्थेत डासाने रक्त शोषले तरच हिवतापाचा प्रसार होऊ शकतो.

असे काही दिवस शांत गेल्यावर दोन-तीन आठवडयांत हेच चक्र पुन्हा सुरू होऊ शकते. परत थंडीतापाची सुरुवात होते.

परत डासाकडे

हिवतापाचे जंतू एका माणसापासून दुस-यापर्यंत डासांमार्फत जाऊ शकतात. पण त्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे अनेक टप्पे आहेत. एकतर ज्याच्यापासून जंतू जायचे त्या माणसाच्या रक्तात जंतूंची नर-मादी संख्या पुरेशी असणे आवश्यक आहे. दुसरे म्हणजे डास ऍनाफिलिस जातीची मादी असणे आवश्यक आहे. म्हणून एखादा डास या माणसास चावून परत लगेच दुस-याला चावला तर त्याने हिवताप प्रसार होत नाही. नर-मादी जंतुयुक्त रक्त शोषल्यानंतर सुमारे दहा-वीस दिवसांनीच हा डास दुस-या माणसाला हिवतापाचा संसर्ग करू शकतो. डास मात्र मरेपर्यंत कायमचा जंतुभारित राहतो. जंतूंनी डासाला कोणताही आजार होत नाही हे विशेष.

हिवतापाच्या या जंतूंचे हे विशिष्ट जीवनचक्र आहे. हे समजल्यावरच हिवतापाची समस्या कळू शकेल. हिवतापाचा जंतू दोन किल्ल्यांमध्ये (माणूस व डास) राहतो. त्याचा संपूर्ण नाश करायचा असल्यास दोन्ही ठिकाणी एकदम हल्ला चढवावा लागेल, नुसत्या डासांवर किंवा नुसत्या तापाच्या रुग्णांवर लक्ष केंद्रित करून उपयोग नाही.

हिवताप रोगनिदान

संसर्ग झाल्यानंतर सुमारे 12-20 दिवसांनी लक्षणे दिसतात.

व्हायव्हॅक्स (V) आजार प्रकार

हा आजार प्रकार सर्वत्र आढळतो. यात मुख्यतः थंडी वाजून ताप येतो. थंडी वाजण्याचा त्रास सुमारे 15 मिनिटे ते तासभर चालतो. ताप थोडा वेळ टिकतो (दोन-तीन तास) व नंतर घाम येऊन उतरतो. ताप सहसा दुपारनंतर येतो. ताप सहसा दिवसाआड किंवा रोज येतो.

याबरोबर खूप डोकेदुखी,- अंगदुखी, कंबरदुखी, थकवा, इत्यादी लक्षणे जाणवतात. सकाळी, दिवसा फारसा त्रास जाणवत नाही. पण हे वेळापत्रक अगदी पक्के नसते. याबरोबर पाठही दुखते.

सुमारे दहा दिवसात पांथरी मोठी होते. पण लवकर उपचार झाल्यास पांथरी सुजत नाही.

मलेरिया सौम्य असेल किंवा उपचार अर्धवट झाले तर लक्षणे सौम्य असतात. कधीकधी फक्त अंगावर काटा येणे, डोके दुखत राहणे, थकवा जाणवणे एवढीच लक्षणे असतात. अशा तक्रारी खूप असतात. रक्तनमुना तपासल्याखेरीज याचा नक्की निर्णय करणे अवघड असते.

उपचार झालेच नाहीत तर 6-12 आठवडयांनी हिवताप परत डोके वर काढतो.

फॉल्सिपेरम (F) आजार प्रका

आता आपण दुस-या जातीचा जंतूप्रताप पाहू या. हा आजार प्रकार तुरळक प्रमाणात आढळतो. फॉल्सिपेरम जातीच्या जंतूंमुळे अनेक प्रकारचे दुष्परिणाम होतात. यात रुग्ण दगावण्याची शक्यता असते. या आजारांमध्ये रक्तात जंतूंची संख्या जास्त असते. आपल्या शरीरातल्या निरनिराळया अवयवांमध्ये रोग शिरायला त्यामुळे सोपे होते. रक्तपेशींचा नाशही वेगाने होतो.

या आजारात सर्वसामान्यपणे सुरुवातीस केवळ ताप येतो. ताप मधूनमधून किंवा सतत राहतो. खूप थकवा येतो. पांथरी सुजते.

या आजाराचे वेगवेगळे उपप्रकार  दिसून येतात.

- मेंदूसूज : यात तापाबरोबर जंतू मेंदूत प्रवेश करतात. यामुळे मेंदूस सूज येते. सुरुवातीस सुस्ती येते. नंतर सुस्ती वाढत जाऊन बेशुध्दीपर्यंत जाते. मेंदूच्या ज्या केंद्रावर जास्त परिणाम होईल त्यासंबंधीची लक्षणे व चिन्हे लवकर दिसतात. विचित्र हालचाली, झटके, नकळत मलमूत्र होणे, इत्यादी त्रास दिसून येतात. असे रुग्ण दगावण्याची मोठी शक्यता असते. अगदी सुरुवातीच्या सुस्तीच्या पायरीवर लवकर उपचार झाले तरच उपयोग होतो. उपचार सुरु करून डॉक्टरकडे पाठवा.

- काळी लघवी : या प्रकारात तापाबरोबर रक्तातील तांबडया पेशींची प्रचंड मोडतोड होते. यामुळे पेशी बाहेर पडलेल्या रक्तद्रव्याची रक्तातली पातळी वाढत जाते. हे रक्तद्रव्य मूत्रपिंडातून लघवीत उतरायला लागते. या रक्तद्रव्यामुळे लघवी काळसर दिसायला लागते. यामुळे मूत्रपिंडात रक्तद्रव्य साठून त्यांचे कामकाज बंद पडून मृत्यू संभवतो. यातही अगदी सुरुवातीस उपचार झाले तरच उपयोग होतो. थंडीताप आणि त्याबरोबर पाठीत वेदना (मूत्रपिंडाच्या जागी), काळसर लघवी, लघवीचे प्रमाण कमी होणे, डोळे पिवळे, इत्यादी दिसल्यावर उपचार सुरु करून ताबडतोब डॉक्टरकडे पाठवून द्या. योग्य उपचाराने रुग्ण वाचू शकेल.

- दमट-कोमट हिवताप : या प्रकारात खूप घाम येतो, पण ताप नसतो. शरीराचे तपमान साधारण असते. (म्हणजे 98 अंश से.) किंवा त्यापेक्षाही खाली जाते. थंडी वाजणे, खूप थकवा, ग्लानी, दम लागणे, लघवी कमी होणे, इत्यादी लक्षणे दिसतात. यामुळे अचानक मृत्यू येतो.

रक्तनमुना तपासणी

हिवतापाच्या आजारात रक्तनमुना तपासणीचे फार महत्त्व आहे. एकतर हिवताप आहे हे या तपासणीत कळते. जंतूंचा प्रकार व्हायवॅक्स आहे की फॉल्सिपेरम आहे हे यातूनच कळते.

रक्तनमुना अगदी तासाभरातच तपासून होऊ शकतो. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात यासाठी तंत्रज्ञ आहेत. फॉल्सिपेरम जंतू असेल तर त्वरित कळवले जाते. यामुळे या रुग्णाच्या बाबतीत ताबडतोब पुढचे उपचार आणि संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना लवकर सुरु करता येते.

रक्तनमुना घेणे अगदी सोपे आहे. डाव्या अनामिकेच्या (अंगठीचे बोट ) टोकावर सुईने टोचून रक्ताचा जाड आणि एक पातळ थर काचपट्टीवर तयार केला जातो. यावर तारीख, क्रमांक, इत्यादी टाकून प्रयोगशाळेत पाठवतात. जंतू असतील तर रक्ताच्या काही तांबडया पेशीमध्ये विशिष्ट रंगाचे आकार दिसतात.

हिवताप झालेल्या प्रत्येक रुग्णाच्या रक्तनमुन्यात जंतू दिसतीलच असे नाही. प्रयोगशाळेत पोचणा-या नमुन्यांपैकी दहा टक्के नमुन्यांतच जंतू दिसून येतात. मात्र रक्तनमुन्यात जंतू नसल्यास हिवताप नाहीच असे म्हणता येत नाही.

रक्तनमुन्यात जंतू सापडल्यावर हिवताप नक्की आहे आणि कसला प्रकार आहे एवढेच निश्चितपणे सांगता येते. म्हणून सुरुवातीस रक्तनमुना घेऊन उपचारही सुरु करतात. रक्तनमुन्यात जंतू आढळल्यास पुढचे 'समूळ' उपचार केले जातात.

क्लोरोक्वीन (150 मि.ग्रॅ.बेस) उपचाराचा तक्ता (Table) पहा (तीन दिवसाचा उपचार)

सर्व गोळया काहीतरी अन्न खाल्ल्यानंतरच घ्याव्यात

हिवतापावर उपचार

हिवतापावर उपचार करताना दोन उद्देश असतात. (अ) थंडीताप, इत्यादी त्रास थांबवणे, (ब) रक्तातील नर-मादी रुपातल्या जंतूंचा समूळ नाश (रोगप्रसार होऊ नये म्हणून) व यकृतातील जंतूंचा नाश.

प्राथमिक उपचार

फॉल्सिपेरम हिवताप आढळलेल्या भागात विशेष लक्ष ठेवावे लागते. रुग्णाची लक्षणे व चिन्हांवर आपले नीट लक्ष असायला पाहिजे. मूत्रपिंड व मेंदू यांवरचे दुष्परिणाम किंवा इतर कोठलाही गंभीर दुष्परिणाम दिसत असल्यास उपचार सुरु करून ताबडतोब आरोग्य केंद्राकडे पाठवणे आवश्यक आहे.

कोणत्याही हिवतापांवर सुरुवातीस क्लोरोक्वीन हे औषध द्यावे. याचा प्राथमिक डोस तीन दिवसांचा आहे. या गोळयांमुळे जठराचा दाह होतो. म्हणून या गोळया जेवणानंतर लगेच घेणे आवश्यक असते.

गर्भावर या औषधाचा दुष्परिणाम होऊ शकतो. पण हिवतापामुळे गर्भपात होणे किंवा गर्भाची वाढ खुंटणे याची शक्यता असते. म्हणून हिवतापावर गरोदरपणातही उपचार केलेच पाहिजेत.

क्लोरोक्वीनसंबंधी जास्त माहिती औषधांच्या प्रकरणात दिली आहे.

समूळ उपचार : रक्तनमुना तपासणीत जंतू आढळले तर समूळ उपचार करावे लागतात. यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरातील हिवताप जंतूंचा पूर्ण बीमोड होतो. त्यामुळे या जंतूंपासून त्याला स्वतःला परत हिवताप होणे किंवा इतरांना डासांमार्फत संसर्ग होणे या दोन्ही गोष्टी टळतात.

- व्हायवॅक्स हिवताप : क्लोरोक्वीन फक्त पहिल्या दिवशी व प्रिमाक्वीन रोज याप्रमाणे चौदा दिवस.

समूळ उपचारासाठी वयानुसार तक्ता - टेबल

(फॉल्सिपेरम प्रकारात प्रिमाक्वीन गोळी 7.5 मि.ग्रॅ. ची असते. बाकी सर्व तपशील सारखाच)

समूळ उपचारासाठी प्रिमाक्वीन आवश्यक असते. ते आरोग्यपर्यवेक्षक किंवा प्राथमिक आरोग्यकेंद्र यांच्यामार्फत मिळते. प्रिमाक्वीन या नावाने औषधविक्रेत्यांकडेही मिळते.

प्रतिबंधक औषधोपचार

कधीकधी हिवतापाच्या प्रदेशात याची गरज पडते. यासाठी क्लोराक्वीनचा एक डोस आठवडाभर पुरतो. डोस वरीलप्रमाणेच.

हिवतापावर इतर अनेक औषधे दिली जातात. मात्र याचा निर्णय डॉक्टरांनीच घ्यावा.

आयुर्वेद

महासुदर्शन चूर्ण इतर तापांप्रमाणे मलेरियातही उपयोगी पडते. मोठया माणसांना एक ग्रॅम चूर्ण दिवसातून तीन वेळा (म्हणजे तीन ग्रॅम), कोमट पाण्याबरोबर द्यावे. याप्रमाणे रोज हा उपचार आठ दिवस करावा. काडेचिराईत हिवतापासाठी उपयुक्त आहे. यापासून चिराकिन ही गोळी केंद्र सरकारने उपलब्ध केली आहे.

होमिओपथी निवड

आर्सेनिकम, बेलाडोना, फेरम मेट, लायकोपोडियम, नेट्रम मूर, पल्सेटिला, सिलिशिया

मलेरिया नियंत्रण योजना

हिवताप हटवण्यासाठी 1955 पासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योजना चालू झाल्या. त्यावेळी दरवर्षी (संपूर्ण वर्षभरात मिळून) हिवतापाने निदान 10 टक्के लोक आजारी असायचे. जेव्हा ही योजना आखली गेली तेव्हा हिवतापाचे प्रचंड प्रमाण हे देशाच्या आर्थिक प्रगतीसमोर मोठेच आव्हान होते. त्यामुळे प्रचंड साधनसामग्री ओतून ही योजना राबविली गेली. सुरुवातीला इतके यश मिळाले, की देशातील हिवतापाच्या रुग्णांची संख्या नगण्य झाली. असे वाटले, की आता आपण नुसत्या हिवताप नियंत्रणाऐवजी निर्मूलनच करू शकू. पण हळूहळू हिवतापाने परत डोके वर काढले. आता जवळजवळ संपूर्ण देशातच हिवतापाचे रुग्ण आढळतात. दरवर्षी देशात सुमारे 25-30 लाख हिवताप रुग्ण आढळतात. या अनुभवानंतर हिवताप निर्मूलन योजनेची पुनर्रचना करण्यात आली आहे. नवीन कार्यक्रमाची उद्दिष्टे आणि आखणी याप्रमाणे आहे.

उद्दिष्टे : हिवतापाने निदान मृत्यू येऊ नये. हिवतापाच्या आजाराचे प्रमाण मर्यादित असावे. जेथे शक्य असेल तेथे आजाराला आळा बसवावा.

अंमलबजावणी : हिवतापाचा प्रादुर्भाव कमी किंवा जास्त असलेल्या भागात वेगवेगळी धोरणे असतात. वर्षभरात घेतलेल्या तापाच्या रक्तनमुन्यांपैकी दर हजार रक्तनमुन्यांत किती जंतू आढळले याचे प्रमाण काढतात. याला आपण वार्षिक जंतूदर म्हणू या. समजा एक हजार लोकवस्तीमागे वर्षभरात 100 रक्तनमुने गोळा झाले, त्यात दोन जंतूदूषित नमुने सापडले तर वार्षिक जंतुदर दोन आहे असे म्हणता येईल . हा दर दोनपेक्षा जास्त असेल तो प्रदेश 'जास्त हिवताप जंतूभार प्रदेश' आणि कमी असेल तर 'अल्प हिवताप जंतूभाराचा प्रदेश' म्हणतात. जास्त हिवताप प्रमाणाच्या प्रदेशात वर्षातून सर्व घरांची कीटकनाशक फवारणी केली जाते. मात्र इतर गोष्टी - तापाची घरोघरी पाहणी, रक्तनमुने, समूळ उपचार, इत्यादी दोन्ही भागांत समानच असतात. मात्र फॉल्सिपेरम जंतू सापडले कमी जंतुभार असला तरी त्या भागापुरती फवारणी केली जाते.

(अ) हिवताप -गृहीत उपचार

कोणताही ताप हा हिवताप असू शकतो. हे गृहीत धरून रक्त नमुना घेतल्यानंतर वयोमानानुसार क्लोरोक्वीन गोळयांचा जो उपचार देण्यात येतो, त्याला गृहीत उपचार म्हणतात.

आरोग्य कर्मचा-याने क्लोरोक्वीन गोळयांचा उपचार रुग्णास जेवणानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर स्वतःच्या समक्ष द्यावा. उपाशीपोटी उपचार देऊ नये.

(ब) एकदिवसीय समूळ उपचार

(1) समस्याग्रस्त विभागातून आलेले लोक, (2) मेंढपाळ, (3) मजूर वर्ग यांना क्लोरोक्वीन गोळयांचा वयोमानानुसार एक दिवसीय उपचार खालीलप्रमाणे देण्यात येतो. त्यामुळे भविष्यात उद्भवणा-या संभाव्य उद्रेकांस वेळीच आळा घालता येतो.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday936
mod_vvisit_counterYesterday1940
mod_vvisit_counterThis week2876
mod_vvisit_counterLast week12883
mod_vvisit_counterThis month32341
mod_vvisit_counterLast month52342
mod_vvisit_counterAll days4603039

We have: 27 guests, 1 bots online
Your IP: 54.167.29.208
 , 
Today: फेब्रु 19, 2018
Bharatswasthya