आरोग्यविद्या
Home बालकाची वाढ आणि विकास

बालकाची वाढ आणि विकास

बालकाचे पहिले वर्ष : पोषण व आहार

पोषण व वाढ

वाढ, विकास व निरोगीपणा या सर्वांसाठी लागणारी प्रमुख गोष्ट म्हणजे योग्य पोषण. एखाद्या समाजाचे आर्थिक, सामाजिक मुल्यमापन करण्याचा एक मार्ग म्हणजे या समाजातील लहान मुलामुलींच्या पोषणाचे मुल्यमापन करणे. योग्य स्वच्छ आणि पुरेशा अन्नाआभावी आज आपल्या देशात अनेक रोग दिसतात.

योग्य अन्न न मिळाल्याने मुलांची वाढ खुरटते. अति कुपोषणामुळे बौध्दिक वाढही खुंटते. रोगाचा मुकाबला करण्याची शक्ती कमी होते. जुलाब, जंत आणि कुपोषण यांचे एकमेकांमध्ये अगदी घट्ट नाते आहे. कारण सर्वसाधारणपणे आर्थिक, सामाजिक परिस्थितीमुळे परिसराची स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची योग्य काळजी राखली जात नाही. अनेक घरातील सर्व मोठी माणसे कामावर जातात व मुलांची जबाबदारी त्याचेच मोठे भावंड घेत असतात.

लहानपणी कुपोषण, खुरटलेली वाढ आणि रोगटपणा ज्या मुलांच्या मागे लागतो, तो मोठेपणातही त्यांची सहसा पाठ सोडत नाही. मोठेपणीही या मुलांची काम करण्याची शक्ती, रोगप्रतिकारशक्ती कमी पडते. म्हणून लहानपणापासून योग्य व समतोल आहार महत्त्वाचा आहे.

स्तनपान महत्त्वाचे

जन्मापासून पहिले सहा महिने बाळाला फक्त स्तनपान द्यावे. या काळात आईचे दूध हा बाळासाठी सर्वोत्तम आहार असतो. बाळ जन्मल्यावर लगेच अर्ध्या तासात पाजण्यासाठी अंगावर घेणे महत्त्वाचे असते. पहिल्या चिकामध्ये भरपूर प्रथिने व रोगप्रतिबंधक घटक (प्रतिघटक) असतात. म्हणून हा चीक वाया जाऊ देऊ नये.

पहिल्या दिवसापासून अंगावर पाजू लागल्याने दूध येण्याची क्रिया लवकर व सुलभ होते. असे केले नाही तर छाती दाटून दुखते व बाळाला अंगावर ओढणे अवघड होते.

तिस-या ते चौथ्या दिवशी चीक संपून नेहमीसारखे दूध येणे सुरू होते. दूध कमी पडल्यास उकळून थंड केलेले पाणी, साखर घालून वाटी-चमच्याने पाजावे. पण प्रत्येक वेळी प्रथम बाळाला पाजायला घेणे आवश्यक आहे.

बाळाला स्तनपानाचे अनेक फायदे आहेत

आईचे दूध हे बाळाच्या आहाराच्या सर्व गरजा पूर्ण करते म्हणून पहिल्या सहा महिन्यांपर्यंत हे पूर्ण अन्न आहे.

बाळाच्या भुकेच्या वेळी ते लगेच उपलब्ध असते, विकत घ्यावे लागत नाही. त्याचे तपमान बाळासाठी सुयोग्य असते.

आईचे दूध शुध्द असते, रोगजंतू बाळाच्या पोटात जात नाहीत.

आईच्या दुधात अनेक रोगप्रतिबंधक द्रव्ये असतात. म्हणूनच आईच्या दुधामुळे बाळाला जुलाब, पोलिओ, गोवर यांसारख्या रोगांचा मुकाबला करण्यास मदत होते.

अंगावर पाजल्याने आई-मुलामधले नाते घट्ट होण्यास मदत होते.

अंगावर पाजण्याचे फायदे आईलाही होतात

गर्भाशयाची पिशवी लवकर आकुंचन पावून रक्तस्राव थांबण्यास, कमी होण्यास मदत होते.

वजन नियंत्रित राहते.

बाळ अंगावरचे दूध पीत असता सहसा आईच्या बीजांड -कोषात स्त्रीबीज तयार होत नाही. त्यामुळे पाळी लवकर सुरू होत नाही व पाळणा लांबण्यास मदत होते. (परंतु पाळणा लांबण्यासाठी हा खात्रीचा मार्ग नाही म्हणून त्यावर अवलंबून राहता येत नाही.)

अंगावर पुरेसे दूध नसणे

अशा आईने भरपूर पाणी प्यावे, पौष्टिक आहार घ्यावा व बाळाच्या प्रत्येक भुकेच्या वेळी स्तन चोखण्यास द्यावे. यामुळे बहुतेक वेळा आपोआप भरपूर दूध येऊ लागते. अंगावरचे दूध वाढण्यासाठी आधुनिक औषधशास्त्रात निश्चित सिध्द अशी औषधे नाहीत. परंतु आयुर्वेदिक औषधे उदा. कडूबोळ, शतावरी यांचा उपयोग होतो. याबद्दल या प्रकरणाच्या शेवटी तपशील दिला आहे.

आईच्या आहारात डाळी, हिरव्या भाज्या, पपई, दूध, अंडी, मासे, इत्यादींचा शक्य तेवढा समावेश करावा.

कधीकधी स्तनाग्रे (बोंडशी) आत वळलेली असतात. त्यामुळे बाळाला स्तन तोंडात धरून चोखता येत नाही. यावर उपाय गरोदरपणापासूनच करावा लागतो. स्तनाग्रे रोज नियमितपणे बोटांनी ओढून बाहेर काढणे व चोळणे याने फायदा होतो. पण त्याचा उपयोग न झाल्यास दूध पिळून काढून वाटी-चमच्याने पाजावे.

स्तनावर बसण्यासाठी वेगळे बूच औषधाच्या दुकानात मिळते (नीपल शील्ड). त्याचाही चांगला उपयोग होतो.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday714
mod_vvisit_counterYesterday2307
mod_vvisit_counterThis week11244
mod_vvisit_counterLast week15782
mod_vvisit_counterThis month51121
mod_vvisit_counterLast month59375
mod_vvisit_counterAll days4428277

We have: 9 guests, 1 bots online
Your IP: 10.20.50.12
Firefox 57.0, Windows
Today: नोव्हेंबर 24, 2017
Bharatswasthya