आरोग्यविद्या
Home निरोगी-आरोग्यवर्धक आहाराची मूलतत्त्वे.

निरोगी-आरोग्यवर्धक आहाराची मूलतत्त्वे.

1. नैसर्गिक आहार जास्त चांगला

आपला आहार जेवढा नैसर्गिक तेवढा शरीराला तो चांगला. भाजीपाला, फळभाजी जास्त शिजवून खाण्यापेक्षा कमी शिजवलेली चांगले. अर्थात या 'नैसर्गिक' पदार्थांवरचे जंतू नष्ट होणे आवश्यक आहे. यासाठी ते पुरेसे धुतलेले पाहिजे.

2.   'साखर' टाळावी

साखरेने शरीरातल्या पेशींना एक प्रकारचा गंज चढतो. शरीरात भात, साखर, बटाटा हे पदार्थ लगेच ग्लुकोजमध्ये रुपांतरीत होतात. त्यामुळे रक्तातली साखर लगेच वाढते. असा आहार मधुमेहाला निमंत्रण ठरतो. त्यामानाने ज्वारी-बाजरी-गहू-नाचणी, फळे ही हळूहळू आणि उशिरा 'साखर' वाढवणारी असतात. त्यामुळे शरीरात 'साखरपेरणी' करणारे पदार्थ टाळावेत.  मुलांनी मात्र साखर खायला हरकत नाही. त्यामुळे ऊर्जा मिळते.

3. पेशी गंजवणारे पदार्थ नकोत.

आपण सफरचंद सुरीने कापल्यावर थोडया वेळाने त्याला जसा 'गंज' दिसतो. तसा पेशींवरही गंजण्याचा परिणाम होतो. साखर, मसाले, काही तेलघटक, चरबी, धूम्रपान, मांसाहार, मीठ हे सर्व पदार्थ शरीरात विकृत तत्त्वे निर्माण करतात. यामुळे पेशींवर एक  गंजवणारा परिणाम होतो. म्हणून हे पदार्थ कमीत कमी खावेत. शिवाय याला उलट पदार्थ (उतारे) आहारातच असावेत.

लिंबू, आवळा, गाजर, मोड आलेली धान्ये, भाजीपाला, फळे, कांदा, लसूण, हिरवा चहा,हळद, इ. पदार्थांनी हा गंज टळतो, पेशी निरोगी राहतात. या सर्व गोष्टी शक्यतो कच्च्या खाव्यात.

4. चांगले आणि वाईट स्निग्ध पदार्थ

काही स्निग्ध पदार्थ (म्हणजे तेलतूप) आरोग्याला चांगले असतात. मोहरी, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, करडई-जवस तेल, गोडे तेल, खोबरेल तेल वगैरे तेले चांगली असतात. वनस्पती तूप, म्हशीचे तूप हानीकारक असते. गाईच्या तुपाबद्दल आयुर्वेद हमी देतो. चांगली तेले हृदयाला व रक्तवाहिन्यांना मजबूत ठेवतात.

अंडयातले पिवळे बलक आणि मांसाहारातली चरबी ही घातक असते. कोंबडी (पांढरे मांस) व मासे ह्यातले तेल चांगले असते.

5. क्षार व खनिजे

मीठ हा पदार्थ जीवनावश्यक आहे. मात्र जादा मीठ हे रक्तदाबाला आमंत्रण देते.

चुना-कॅल्शियम हा पदार्थ अस्थिसंस्थेला आवश्यक आहे.

लोह खनिज कमी पडले तर रक्तपांढरी होते.

6. भाजीपाला

भाजीपाल्यात पालक, मेथी,अळू. चाकवत, चवळी, माठ, मोहरी , चुका, शेपू, कोथिंबीर, मुळा, करडई, इ. अनेक प्रकार आहेत. सर्व पालेभाज्यांत जीवनसत्त्वे व क्षार भरपूर असतात. थोडया प्रमाणात प्रथिने व पिष्टमय पदार्थही असतात. शिवाय  त्यात तंतूमय चोथा असतो. हा चोथा पोट साफ करतो व घातक विषारी पदार्थ शोषून बाहेर टाकतो. पोट साफ व स्वच्छ होण्यासाठी चोथा आवश्यक असतो.

भाजीपाला फार शिजवला किंवा झाकण न ठेवता शिजवला तर जीवनसत्त्वे नष्ट होतात. भाजी कापून धुतल्यास आतला रस वाहून जातो व जीवनसत्त्वे - क्षार धुऊन जातात. भाजीपाला स्वच्छ धुऊन, चिरून कच्चा खाणे हे सगळयात चांगले. किंवा कमीत कमी शिजवणे चालते.

7. फळभाज्या

भेंडी, वांगी, टमाटे, गवार, काकडी, सुरण, पडवळ, घोसाळे, भोपळा, इ. अनेक फळभाज्या आहारात असायला पाहिजे. प्रत्येक फळभाजीचे गुण वेगवेगळे असतात. जेवणात त्यामुळे चव निर्माण होते. शिवाय अनेक आहारतत्त्वे मिळतात. ज्या फळभाज्या कच्च्या खाता येतात त्या कच्च्या खाव्यात. काकडी, टोमॅटो वगैरे कच्चे खाता येतात. कच्चे खाण्यातून खूप जीवनसत्त्वे मिळतात.

8. फळे

फळांचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. इथे काही फळांची नावे व कंसात गुणधर्म दिलेले आहेत.

लिंबूवर्गीय फळे - लिंबू, संत्रे, मोसंबी (क जीवनसत्त्व)

  आवळा, पेरु (क जीवनसत्त्व)

  आंबा (अ जीवनसत्त्व व उष्मांक), केळे (उष्मांक, पोट साफ होणे)

  सीताफळ (कॅल्शियम)

  चिक्कू

9. कठीण कवचाची फळे

नारळ, बदाम, अक्रोड या फळात अनेक जीवनसत्त्वे असतात.  बदाम, अक्रोड  यातली तेले आरोग्याला चांगली असतात.

10. कांदा- लसूण

कांदा व लसूण हे अत्यंत गुणकारी औषधी कंद आहेत. लसणामुळे हृदयविकाराला प्रतिबंध होतो. लसूण जंतुनाशकाचे काम करते. कांद्यातले रस शरीरात 'गंज' प्रतिबंधक काम करतात. कच्चा कांदा व लसूण खाण्यामुळे तोंडाला वास येतो, पण ही पध्दत जास्त आरोग्यदायक आहे.

11. प्रथिनयुक्त तेलबिया व डाळी

शेंगदाणे, सोयाबिन, डाळी, इत्यादी अन्न पदार्थात प्रथिनांचे प्रमाण 20-40% इतके असते. हे पदार्थ सकस असतात. सोयाबिनचे पीठ गहू-ज्वारीच्या पिठात मिसळून चपाती-भाकरी केल्यास प्रथिनपुरवठा आपोआप वाढतो.

12. मोड आलेली धान्ये

यात जीवनसत्त्व ब आणि ई असते. हे पदार्थ शरीराला अत्यंत उपकारक असतात. परंतु हे मोड कच्चे खाणे आवश्यक असते.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday395
mod_vvisit_counterYesterday1614
mod_vvisit_counterThis week12363
mod_vvisit_counterLast week12806
mod_vvisit_counterThis month30115
mod_vvisit_counterLast month53512
mod_vvisit_counterAll days4656223

We have: 14 guests online
Your IP: 40.77.167.49
Iphone , Mac
Today: मार्च 17, 2018
Bharatswasthya