आरोग्यविद्या
Home रोगलक्षणे

रोगलक्षणे

रुग्ण आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल जे सांगतो त्याला रोगलक्षणे म्हणतात. ताप, खोकला, डोकेदुखी, वेदना, जुलाब, उलटी, चक्कर, पोटदुखी, अशक्तपणा ही सर्व लक्षणे आहेत. काही रोगलक्षणे एकेका अवयवाशी संबंधित असतात (उदा. मानदुखी) तर काही लक्षणे एकूण शरीराशी संबंधित असतात (उदा. ताप) काही रोगलक्षणे विशिष्ट संस्थांशी निगडित आहेत (उदा. श्वसनसंस्था-खोकला). अशा रोगलक्षणांची चर्चा त्या त्या संस्थेच्या प्रकरणात केली आहे. ताप हे महत्त्वाचे लक्षण असल्यामुळे त्यासाठी स्वतंत्र प्रकरण दिले आहे. खाली वेदना, दुखी, अशक्तपणा, दम लागणे, पायावर सूज या काही निवडक लक्षणांची माहिती दिली आहे.

वेदना, दुखी

शरीरातल्या कोठल्याही भागात काही बिघाड झाला असेल तर तिथल्या संदेशवाहक चेतातंतूंमार्फत हा बिघाड मेंदूला कळवला जातो. यालाच 'वेदना' किंवा 'दुखी' म्हणता येईल. सर्वसाधारणपणे त्वचा, ऐच्छिक स्नायू, ज्ञानेंद्रिये वगैरेंमध्ये चेतातंतूंचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या भागातील बिघाड कमी प्रमाणात असला तरी मेंदूला कळतो. इतर भागांतला ( आतडी, फुप्फुसे) बिघाड जास्त असेल तेव्हाच कळतो. या वेदनेच्या किंवा दुखण्याच्या जागेवरून निरनिराळी नावे पडली आहेत. (उदा. डोकेदुखी, पोटदुखी, कमरदुखी, इत्यादी.) या वेदनेची जागा व प्रकार यांवरून आतल्या बिघाडाची कल्पना येऊ शकते.

वेदनेचे मुख्य प्रकार

- ठणका : जेव्हा एखाद्या बिघडलेल्या भागाची वेदना नाडीप्रमाणे कमी जास्त होते त्याला ठणका असे म्हणतात. पू झालेल्या भागात बहुधा ठणका लागतो. उदा. दातदुखी, गळू. डोकेदुखीत देखील ठणकू शकते.

- जळजळ : पचनसंस्था, डोळे, योनिमार्ग, मूत्राशय, इत्यादी अवयवांत पातळ त्वचेचे अस्तर असते. अशा अवयवांना जळजळ जाणवू शकते. जळजळीचे मुख्य कारण म्हणजे दाहक किंवा त्रासदायक पदार्थ या अस्तराच्या आवरणाला लागणे. पोटातील जळजळ तिखट, तेलकट, मसाल्याचे पदार्थ यांमुळे येऊ शकते. बहुतेक वेळा दाहक पदार्थ काढून टाकला किंवा सौम्य केला, की जळजळ कमी होते.

- कळ : स्नायू अति आवळण्यामुळे कळ येते. आतडी, मूत्रपिंडातून निघणा-या नळया, लघवीची पिशवी, मूत्रनलिका, हृदय, रक्तवाहिन्या या सर्व अवयवांत 'अनैच्छिक'स्नायूंचा थर असतो. स्नायूंचे धागे एकदम जास्त प्रमाणात आकुंचन पावले, किंवा रक्तप्रवाह अन्य कारणाने कमी पडला की कळ जाणवते. तसेच स्नायूंमधील रक्तप्रवाह कमी झाला की कळ येते. हृदयविकार, आतडयांचे आजार, मूत्रनलिकेचे आजार वगैरेंमध्ये 'कळ' येऊन दुखते. कळ कमी असली, की फक्त 'ओढ' लागून दुखते.

- मंद दुखणे : डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी वगैरेंचे नेमके वर्णन करता येत नाही. मात्र आपण अशा दुखण्यांची कल्पना करू शकतो.

- उसण-लचक : उदा. पाठीत किंवा कमरेत उसण भरणे. हे मुख्यत: स्नायू किंवा स्नायूबंध दुखावल्याने होते.

- कापल्यासारखी वेदना: अशी वेदना ही जखमा किंवा टोकदार मुतखडयांमुळे जाणवते.

- खुपल्यासारखी वेदना : ही वेदना हृदयविकारात आढळते. हृदयविकारात दाबल्यासारखी वेदनाही आढळते.

- टोचल्यासारखी वेदना : अशी वेदना मुतखडयांच्या संबंधात आढळते, तसेच घसादुखी किंवा जठरव्रणानेही अशी वेदना होते.

- चमकण्यासारखी वेदना : 'अस्थिभंग, हाडांना मार, स्नायू लचकणे, इ. प्रकारांत आढळते.

हरेक माणसाची वेदना सहनशक्ती कमी जास्त असते. काहीजण थोडयाशा डोकेदुखीनेही हैराण होतात, तर काहीजण अस्थिभंगाची वेदनाही सहन करु शकतात. म्हाता-या माणसांमध्ये वेदना-सहनशक्ती थोडी जास्त असते. त्यामुळे म्हातारपणात दुखणी कमी 'दुखतात'. पण यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. यामुळे वृध्द माणसांच्या वेदनांकडे जास्त तातडीने पहावे.

वेदनेवर उपचार

प्रत्येक प्रकारच्या वेदनेचे कारण शोधून उपचार झाला पाहिजे. उदा. गळू ठणकत असेल तर त्या गळवावर उपचार झाला पाहिजे.

- ठणका व मंद दुखणे या दोन्हींवर ऍस्पिरिन किंवा पॅमॉल, आयब्युफेन ही औषधे चांगली गुणकारी आहेत.

जळजळ ज्या भागात असेल त्यावर विशिष्ट उपचार करावे लागतात. उदा. पोटात जळजळ असेल तर आम्लविरोधी पदार्थ, सोडा, ऍंटासिड यांचा उपयोग होतो.

- कळ ज्या अवयवात असेल त्याप्रमाणे वेगवेगळे औषध द्यावे लागते.

अशक्तपणा

अशक्तपणा म्हणजे काम करण्याची शक्ती कमी होणे. याची काही कारणे खाली दिली आहेत.

- कुपोषणामुळे स्नायू दुबळे होणे व अशक्तपणा येणे.

- रक्तामध्ये रक्तद्रव्य कमी असणे, यामुळे रक्ताची प्राणवायू वहनक्षमता कमी असणे.

- केवळ बैठे काम असणे आणि व्यायाम नसणे, यामुळे थोडया श्रमाने दम लागतो.

- निरनिराळया दीर्घ आजारांमुळे येणारा अशक्तपणा. (उदा. क्षयरोग व कॅन्सर).

- अंतरस्त्रावी संस्थांचे आजार - मधुमेह, थॉयरॉइड कमतरता

- हृदयक्रिया मंदावल्यामुळे येणारा अशक्तपणा

- स्नायुसंस्थेमध्ये दुबळेपणा किंवा लुळेपणा येणे.

- चेतासंस्थेच्या आजारांमुळे स्नायुसंस्था दुबळी होणे. उदा. पक्षाघात.

- सतत मानसिक ताण, काळजी असेल तर कुठल्याही कामात उत्साह वाटत नाही. मरगळ वाटते, आजारी असल्यासारखे वाटत राहते.

उपचार म्हणजे टॉनिके नाहीत

अशक्तपणाबद्दल शिकताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे, की अनेक प्रकारची टॉनिके हे काही अशक्तपणावरचे उत्तर नाही. रक्तपांढरीसाठी स्वतंत्रपणे उपचार करावे लागतात. यावर टॉनिकांचा विशेष उपयोग नसतो. उलट, टॉनिके घेत राहिल्याने मूळ आजाराकडे दुर्लक्ष होऊन जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. अशक्तपणा हा आजार नाही, केवळ लक्षण असते.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday1141
mod_vvisit_counterYesterday1192
mod_vvisit_counterThis week1141
mod_vvisit_counterLast week13160
mod_vvisit_counterThis month32053
mod_vvisit_counterLast month53512
mod_vvisit_counterAll days4658161

We have: 14 guests, 1 bots online
Your IP: 107.22.2.109
 , 
Today: मार्च 18, 2018
Bharatswasthya