आरोग्यविद्या
Home रुग्णाची तपासणी

रुग्णाची तपासणी

रुग्णाची तपासणी: रोगचिन्हे

रुग्ण व्यक्तीला पाहिल्याबरोबर काही गोष्टी झटकन लक्षात येतात. अशक्त आहे काय, दम लागला आहे काय, निस्तेज आहे काय, सूज आहे काय, हालचाली व्यवस्थित आहेत काय, वजन कमी झाले आहे काय वगैरे. या माहितीचा खूप उपयोग होतो.

सर्वसाधारण तपासणी

जे आजार लोकांना जास्त प्रमाणात होतात व ज्यांच्यापासून त्रास होण्याची शक्यता आहे असे रोग मनात धरून तपासणी करतात. अशा तपासणीला सर्वसाधारण तपासणी म्हणता येईल. आपल्याकडे सर्वसाधारण तपासणीत खालील गोष्टी येतात :

निस्तेजपणा (रक्तपांढरी) डोळयाच्या पापण्यांच्या आतल्या आवरणावर किंवा जिभेवर किंवा नखांखाली निस्तेजपणा असला तर सहज कळतो.

-  जीवनसत्त्वअभावाच्या,कुपोषणाच्या खुणा- डोळयांमध्ये बुबुळाच्या बाजूला पांढरट डाग पडणे, हिरडयांची सूज व रक्तस्त्राव, ओठांना भेगा पडणे, जीभ लाल व गुळगुळीत दिसणे, वजन कमी असणे वगैरे जीवनसत्त्वांच्या अभावाने झालेल्या कुपोषणाच्या खुणा आहेत.

-  कानातून पू येतो आहे काय? दुर्गंधी आहे काय?

-  दात किडले आहेत काय?

-  डोळयात कावीळ दिसते काय?

-  कातडीवर चट्टा - निरनिराळे त्वचारोग, कुष्ठरोग आपल्या देशामध्ये जास्त प्रमाणावर आहेत म्हणून असे डाग असल्यास लक्षात घ्यावे लागतात.

-  नाडी- नाडी ही हृदयक्रिया पाहण्याची खिडकी आहे. नाडीचा वेग दर मिनिटाला किती आहे, नियमित आहे काय वगैरे गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बहुतेक वेळा नाडी मनगटावर पाहतात. पण तशी ती मानेवर व जांघेत देखील पाह्ता येते. सर्वसाधारणपणे मिनिटाला 60 ते 80 या वेगाने नाडी चालते. नाडी यापेक्षा कमी अथवा जास्त असल्यास आजार संभवतो. घाबरल्यावर, व्यायाम केल्यावर नाडी जोरात चालते हे आपल्या अनुभवाचे असेल. लहान मुलांची नाडी जास्त वेगाने चालते. जन्मलेल्या मुलाची नाडी 100-120 इतकी असते. हळूहळू वयानुसार ती कमी होऊन पाच-सहा वर्षेपर्यत 60-80 इतकी होते.

रक्तदाब

रक्ताभिसरण संस्थेत रक्त खेळवण्यासाठी काही दाब व जोर आवश्यक असतो. यालाच रक्तदाब म्हणतात. हृदय आकुंचन पावते तेव्हा रक्तदाब निर्माण होतो. पण हृदय सैल पडताना तो पूर्णपणे शून्य न होता थोडया कमी पातळीवर राहतो. रक्तवाहिन्यांच्या जाळयात रक्त दाबाने खेळवायचे असते म्हणून  या जाळयातला दाब जेवढा जास्त तेवढा हृदयाला रक्तदाबही वाढवावा लागतो.

म्हातारपणात रक्तवाहिनी जाड झाल्याने कडक लागते. पण चाळिशीआधी ती कडक लागली तर अतिरक्तदाबाची शक्यता असते. हृदयक्रिया नीट चालत नसेल तर नाडी अनियमित व मागेपुढे होते.

-  रोहिण्यांमधला हा रक्तदाब आपल्याला मोजता येतो. (नीलेमध्येही थोडा रक्तदाब असतो, पण तो विशेष महत्त्वाचा नाही). जन्मतः रक्तदाब कमी असतो. दहा-बारा वयानंतर तो शंभरच्या आसपास पोचतो व मग वयाप्रमाणे वाढत जातो. रक्तदाबाचे दोन आकडे असतात. उदा. 120/60, यात 'वरचा' 120 आकडा आहे तो हृदय आकुंचन पावताना व 'खालचा' 60 आकडा हृदय सैल पडतानाचा असतो. हे दोन्ही आकडे महत्त्वाचे असतात.

-  या दोन्हींपैकी कोठलाही आकडा ठरावीक मर्यादेपेक्षा वर गेला तर रक्तदाब 'जादा' आहे असे म्हणतात. प्रौढ वयात वरचा दाब 140 पेक्षा व खालचा 95 पेक्षा जास्त असेल तर रक्तदाब 'जास्त' म्हणता येईल. 140/90 पर्यंत तो 'ठीक' आहे असे म्हणतात. रक्तदाब 140/95 पेक्षा जास्त असल्यास उपचार करावे हे बरे.

-  रक्तदाबमापक उपकरणाच्या मदतीने रक्तदाब मोजणे अत्यंत सोपे आहे. एक लांबट रबरी पिशवी दंडाभोवती गुंडाळून त्यात फुग्याने हवा भरतात. त्यामुळे रक्तवाहिनी दाबली जाते. ही पिशवी एका पा-याने भरलेल्या काचेच्या नळीला जोडलेली असते. त्या नळीवर आकडे असतात. ज्या आकडयाला पारा चढल्यावर नाडीतून रक्त यायचे थांबते (म्हणजे नाडी थांबते) तिला 'वरचा' रक्तदाब म्हणतात. रक्तदाब नळीतील दाब 'वरच्या' दाबापेक्षा वर चढवून हळूहळू खाली उतरवताना आवाजाच्या साहाय्यानेही मोजतात. दाब असताना नाडीचे ठोके प्रथम पडायला लागतील तो 'वरचा' आणि ठोके बंद पडतील तेव्हाचा आकडा म्हणजे 'खालचा' रक्तदाब. हे सर्व कसे करतात हे प्रत्यक्ष पाहिल्यावर आणि स्वतः केल्यावर खूपच सोपे वाटेल.

-  सूज : अंगावर सूज आहे काय? विशेषतः पायावर सूज आहे काय? बोटाने दाबल्यावर या सुजेत खड्डा पडतो काय? असे असल्यास ही सूज पाणी साठून झालेली आहे असे समजावे. सूज आहे पण खड्डा पडत नाही असे दिसल्यास इतर कारणे संभवतात.

-  शोष : शरीरात शोष असल्याच्या खुणा आहेत काय? जुलाब उलटया इत्यादींमुळे पाणी बाहेर पडून किंवा तापाच्या, दम्याच्या आजारात शरीर शुष्क, कोरडे झाले आहे काय? जीभ व कातडी यांवर हा शुष्कपणा, कोरडेपणा लगेच जाणवतो. कोरडेपणा जास्त असेल तर कातडी चिमटीत धरून सोडल्यास हळूहळू परत पहिल्यासारखी होताना दिसून येईल. (म्हातारपणात मात्र ही खूण पाहणे चूक आहे. कारण उतारवयात त्वचा कोरडी असते व निसर्गतःच त्यावर सुरकुत्या पडण्याची प्रवृत्ती असते.)

-  शरीरावर गाठी किंवा अवधाण आहे काय? (रससंस्था प्रकरण पहा)- गाठीच्या किंवा अवधाणाच्या जागा ठरलेल्या आहेत. गाठी सुजल्या असल्या किंवा दुखत असल्यास आणखीनच काळजी घ्यावी लागेल. या गाठी दगडासारख्या कडक असल्यास शरीरात कोठेतरी कर्करोग (कॅन्सर) आहे असे समजायला हरकत नाही. काही ग्रंथी पोटात आणि छातीतही असतात. पण त्या सुजल्या तरी वरून सहसा कळत नाही.

-  पू, जखम : शरीरावर जखम, पू वगैरे आहे काय?

-  शरीरसंस्था तपासणी: यानंतर श्वसनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था, इत्यादी संस्थांची स्वतंत्र तपासणी करून रोगनिदान करता येते. सोयीसाठी आणि विषय चांगला समजण्यासाठी या संस्थांची तपासणी त्या त्या संस्थांच्या आजारांबरोबर दिली आहे. मात्र प्रत्यक्षात लक्षणांचे स्वरूप लक्षात घेऊन सर्व संबंधित संस्थांची तपासणी करूनच रोगनिदान करता येईल.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday955
mod_vvisit_counterYesterday1940
mod_vvisit_counterThis week2895
mod_vvisit_counterLast week12883
mod_vvisit_counterThis month32360
mod_vvisit_counterLast month52342
mod_vvisit_counterAll days4603058

We have: 29 guests, 1 bots online
Your IP: 54.167.29.208
 , 
Today: फेब्रु 19, 2018
Bharatswasthya