आरोग्यविद्या
Home खाज

खाज

खाज

खाज (कंड) अनेक कारणांनी सुटते. खरूज, नायटा इतर सूक्ष्मजंतूंमुळे होणारा दाह, घामोळया, ऍलर्जी किंवा वावडे व उवा ही खाज सुटण्याची प्रमुख कारणे आहेत. (वावडे हे सूर्यप्रकाश, धूळ, कपडे, औषधे, मासे, अंडी, काँग्रेस गवत यांपैकी कशाचेही असू शकते.)

वावडे : कारणे

कोठल्याही पदार्थाचे वावडे येऊ शकते. पण नेहमीच्या अनुभवात काँग्रेस गवत (गाजर गवत), खाण्यात एखादा नवीन पदार्थ (उदा. मासे), अंडी, फुलाफळांचे नवीन बहर, बदललेला मोसम अशा अनेक कारणांनी वावडे येऊ शकते. पण ते सर्वांनाच येते असे नाही. एखादा कीटक चावल्यामुळे एखाद्याला गांध येईल तर दुस-याला नाही.

वावडे येण्याचे प्रमाणही वेगवेगळे असते. नुसती थोडी खाज सुटण्यापासून ते सर्व शरीरावरची त्वचा सुजण्यापर्यंत वावडे येऊ शकते.

बहुतेक वेळा वावडयाचे कारण दूर झाले, की खाज व पुरळ आपोआप कमी होतात.

वावडयाचे कारण कायम राहणारे असेल (उदा. गाजर गवत) तर हळूहळू त्वचा खराब होऊन त्वचेला पू होणे, पाणी सुटणे, रक्त येणे असे परिणाम होऊ शकतात. यामुळे त्वचा कायमची जाड काळपट व खरखरीत होते.

खरूज

खरजेचे बारीक किडे असतात ते साध्या डोळयांना दिसत नाहीत, भिंगाखालीच दिसू शकतात. हे किडे कपडयांतून, संपर्कातून एकमेकांकडे जातात. हे किडे कातडीत घरे (बोगदा) करून, अंडी घालतात. ही अंडी फुटून नवीन किडे बाहेर पडतात व नवीन घरे करतात. सुरुवातीला खरजेची घरे नाजूक त्वचेत (उदा. बोटांच्या बेचक्यात, हातावर) आढळतात. हळूहळू ती शरीराच्या इतर भागातही पसरतात. काळजीपूर्वक पाहिल्यास कातडीवर घरांच्या बारीक खुणा दिसतात. ती जागा लालसर दिसते. रात्रीच्या वेळी ही खाज जास्त जाणवते.

उपचार लवकर केला नाही तर या घरांमध्ये इतर सूक्ष्मजंतूंचा शिरकाव होतो. यामुळे पू होतो व ताप येतो. याला ओली खरुज म्हणतात.

खरजेचे किडे खसखस ते मोहरीइतक्याआकाराचे असतात. नर लहान तर मादी मोठी असते. शरीरावर सरासरी 12 किडे आढळतात. मादी कीटक त्वचेमध्ये नागमोडी तयार करून अंडी घालते. हे नागमोडी बीळ ओळखायला सोपे असते. या जागी जेंशन शाईचा एक थेंब टाका व स्पिरीटच्या बोळयाने लगेच पुसून घ्या. तोपर्यंत शाई बिळात जाते व त्यामुळे बिळ निळे-जांभळे उठून दिसते. किडा सापडल्यास साध्या भिंगाखाली व्यवस्थित पाहता येतो.

उपचार

खरजेसाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत. सर्वात स्वस्त व त्यातल्या त्यात निर्धोक औषध म्हणजे बेंझिल द्राव (बीबी) याची 25% द्रावणाची बाटली मिळते. बेंझिल औषध गरोदर स्त्रिया आणि 2 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी वापरायचे नसते. इतर मुलांसाठी हे औषध निम्मे पाणी मिसळून वापरायचे असते. मोठया मुलांमध्ये/माणसांमध्ये सरळ 25% द्रावण वापरावे. हे औषध आंघोळ झाल्यानंतर अंग कोरडे करून शरीरावर सर्वत्र लावावे. यानंतर 8-8 तासांनी परत एकेकदा लावावे. म्हणजे 24 तासांत ते 3 वेळा लावावे लागते. तोपर्यंत आंघोळ करू नये. या औषधाने थोडावेळ अंगाची आग होते.

या औषधाने खरुज बरी झाली नाही तर परमेथ्रिन 5% हे औषध वापरावे. याचे क्रीम मिळते. हे क्रीम रात्री झोपताना लावावे. पुढच्या आठवडयात परत असेच लावावे. याने आग होत नाही. लहान मुलांना आणि गरोदर स्त्रियांनापण हे औषध चालते.

खरजेच्या काही औषधांमध्ये गॅमा बेंझिन असते. ह्या औषधाने आग होत नाही पण ते त्वचेतून शरीरात शोषले जाते. याचे दुष्परिणाम होऊ शकतात. गरोदर स्त्रिया व 2 वर्षापेक्षा लहान मुलांना तर ते लावूच नये. मोठया मुलां-माणसांमध्ये मर्यादित भागावर खरुज असल्यास ते लावता येईल पण सर्व शरीरावर न लावणे बरे. एकूणच हे औषध टाळलेले बरे. हे औषध खरे म्हणजे फक्त उवांसाठी राखीव ठेवावे.

औषध लावल्यावर खरजेचा किडा मरतो. पण कातडी काही दिवस खाजत राहते. लगेच परत औषध न लावता वावडेविरोधी सी.पी.एम. गोळी सकाळी एक, रात्री एक अशी द्यावी. गरज पडल्यास आठवडयानंतर परत पांढरे औषध लावावे. ही झाली कोरडया खरजेची उपाययोजना.

ओली खरूज असल्यास (म्हणजे पू झाला असल्यास) आधी पाच दिवस कोझालचा डोस देऊन पू घालवावा. कोरडेपणा आल्यावर गॅमा लावावे.

खरजेसाठी 'इव्हरमेक्टिन' हे औषध तोंडाने घेता येते. हे घेतल्यावर वरून औषध लावण्याची गरज नसते.

सर्व कपडे उन्हात वाळवावेत. घरातल्या इतर सर्व व्यक्तींनाही हेच औषध एकदमच लावावे. नाही तर खरूज एकमेकांत फिरत राहील.

खरुज आणि आयुर्वेद

(अ) खरजेसाठी दद्रुहर लेप लावावा किंवा महामारिच्यादी तेल खरजेच्या भागावर कापसाच्या बोळयाने लावावे. याबरोबरच पोटातून दोन वेळा याप्रमाणे 10 दिवस द्यावे. (ब) याबरोबर मंजिष्ठा (लालसर वनस्पती) चूर्ण एक चमचा सकाळी रिकाम्या पोटी द्यावे. त्यानंतर अर्धा तास तोंडाने काहीही घेऊ नये. या औषधाने रक्तशुध्दी होऊन त्वचेचे आरोग्य सांभाळले जाते. (या औषधाने लघवी लाल होते याची रुग्णाला कल्पना द्यावी.)

खरजेसाठी कडूनिंब पाल्याचाही वापर केला जातो.

होमिओपथी निवड

आर्सेनिकम, बेलाडोना, कल्केरिया कार्ब, कॉस्टिकम, हेपार सल्फ, मर्क सॉल, नेट्रम मूर, -हस टॉक्स, सिलिशिया, सल्फर, थूजा

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday1344
mod_vvisit_counterYesterday1294
mod_vvisit_counterThis week11698
mod_vvisit_counterLast week12806
mod_vvisit_counterThis month29450
mod_vvisit_counterLast month53512
mod_vvisit_counterAll days4655558

We have: 9 guests online
Your IP: 40.77.167.3
Iphone , Mac
Today: मार्च 16, 2018
Bharatswasthya