आरोग्यविद्या
Home जंतुदोषाने होणारी हाडसूज

जंतुदोषाने होणारी हाडसूज

त्वचेला व इतर अवयवांना ज्याप्रमाणे जंतुदोष होतो त्याचप्रमाणे हाडे व सांधे यांनाही जंतुदोष होऊ शकतो. यात पू निर्माण करणारे जंतू व क्षयरोगाचे जंतू असे दोन प्रमुख प्रकार आहेत. तसेच विषमज्वर, कुष्ठरोग, ,  इत्यादी जंतूंची बाधाही अस्थिसंस्थेस होऊ शकते.

हाडाला जंतुदोष होण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत.

एक म्हणजे शरीरात इतर ठिकाणी असलेला जंतुदोष हाडांमध्ये रक्तावाटे शिरणे.  विशेषतः अंतर्गत अस्थिभंगानंतर असा जंतुदोष होतो. (उदा. विषमज्वराचे जंतू, दाढदुखी चालू असताना येणारी हाडसूज, इ.).

-  दुसरा मार्ग म्हणजे त्वचेवरच्या जखमा, काटा मोडणे, गळू, इत्यादी जंतुदोष हाडापर्यंत चरत जाणे व मग हाडसूज सुरू होणे.

हाडसूज हा अत्यंत चिवट व गंभीर आजार आहे. वेळीच निदान, उपचार न झाल्यास संबंधित अवयव निकामी होतो. जंतुविरोधी औषधे नव्हती तेव्हा या आजाराचे प्रमाण बरेच असायचे.  आता मात्र हे प्रमाण कमी झाले आहे.

हाडसूज म्हणजे हाडाच्या कवचात किंवा हाडाच्या पेशींमध्ये जंतुदोष होऊन त्या ठिकाणी पू होणे. दाह होण्याच्या सर्व खाणाखुणा हाडसुजेत असतात (वरची कातडी लालसर होणे, गरमपणा, सूज, वेदना). हा जंतुदोष हाडात चरत जाऊन हाडाचे बारीक कण (खर) सुटे होतात. यामुळे हाड दुबळे होते व झिजते. पू तयार झाल्यावर तो बाहेरच्या त्वचेपर्यंत वाट काढतो.  या पुवामुळे लवकर न भरून येणारी जखम तयार होते.

यानंतर हळूहळू हाडाचा काही भाग मरतो. हा भाग मोठा असल्यास शस्त्रक्रिया करून काढून टाकावा लागतो.

रोगनिदान

त्वचेवर जखम नसेल तेव्हा हाडसुजेमुळे  लालसरपणा, गरमपणा, वेदना व सूज ही लक्षणे आढळतात. (क्षयरोगाचा जंतुदोष असेल तर मात्र बहुधा फक्त सूज व वेदना आढळतात गरमपणा नाही.) याबरोबरच खूप ताप, थकवा हे असतातच.

पुढच्या अवस्थेत त्वचेवाटे पू, हाडांचे कण येत राहतात. यामुळे व्रण, (जखम) होऊन खूप दिवस राहते. अशा  जुनाट व्रणाचे एक प्रमुख कारण हाडसूज असते हे लक्षात ठेवले पाहिजे. (इतर कारणे : कुष्ठरोग, चेतासंस्थेचे आजार, मधुमेह, नीलावृध्दी, जखमेत काही शरीरबाह्य पदार्थ असणे. उदा. काटा, इ.

क्ष-किरणचित्रात हाडसूज स्पष्टपणे कळून येते. बहुतेक वेळा हाडसुजेचा भाग क्ष-किरण चित्रात इतर निरोगी भागापेक्षा फिकट दिसतो. या हाडाच्या कवचाचा भाग उचललेला आणि छिद्र असलेला आढळतो.

उपचार

हाडसुजेची शंका आल्यास ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवावे. सुरुवातीस जंतुविरोधी औषधांचा मारा करून (उदा. पेनिसिलीन) जंतुदोषाचे नियंत्रण करावे लागते. ब-याच वेळा केवळ एवढयावरच हाडसूज बरी होते. नाहीतर शस्त्रक्रिया करून हाडाचा मृत भाग काढून टाकावा लागतो. मृत भाग लहान असेल आणि योग्य उपचार होत असतील तर निसर्गच तेवढा भाग हळूहळू काढून टाकतो. एकदा आतून येणारा पू-पदार्थ संपला, की त्वचेवरची जखम व पुवाचा मार्ग पूर्णपणे भरून येतो.

क्षयरोग- मणक्याची हाडसूज

हाडसूज क्षयरोगाची असेल तर आजार खूप महिने चालतो. हाडाच्या क्षयरोगाचे सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे मणक्याचा क्षयरोग. बहुतेक वेळा हा आजार सावकाश वाढतो व एखाद्या दिवशी अचानक  मणक्याची वेदना आणि विकृती उमटते. वेळीच निदान व उपचार न झाल्यास मणक्यात किंवा कण्यात कायमची विकृती होते. त्याबरोबर चेतारज्जूवर दाब पडून इतर त्रास होण्याची शक्यता असते. म्हणूनच पाठदुखीची विशेष तक्रार असेल तर प्रत्येक मणक्यावर बोटाने ठोकून तपासले पाहिजे. जो मणका आजारी असेल त्यावर लगेच वेदना जाणवते. ताबडतोब औषधोपचार व विश्रांतीने  पुढचे नुकसान टळू शकते. कधीकधी शस्त्रक्रिया करावी लागते.

टीप : हाडांचा दुखरेपणा हा '' जीवनसत्त्वाच्या अभावानेही येतो. यात हाडसुजेच्या इतर खाणाखुणा असतात पण ताप, लाली, जखम, इत्यादी त्रास नसतो.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday1144
mod_vvisit_counterYesterday1192
mod_vvisit_counterThis week1144
mod_vvisit_counterLast week13160
mod_vvisit_counterThis month32056
mod_vvisit_counterLast month53512
mod_vvisit_counterAll days4658164

We have: 16 guests, 1 bots online
Your IP: 107.22.2.109
 , 
Today: मार्च 18, 2018
Bharatswasthya