आरोग्यविद्या
Home भारतवैद्यक संस्थेविषयी

भारतवैद्यक संस्थेविषयी

भारतवैद्यक हे नाव शरद जोशींच्या भारत : इंडिया द्वैतावरून घेतले आहे. 'भारतात' गरीबीमुळे वैद्यकीय सेवा कमी आहेत. अजूनही ही परिस्थिती आहे, अपवाद काही ग्रामीण भागांचा. या भारताचे वैद्यकीय प्रश्न सोडवायला कार्यकर्ते प्रशिक्षित करावे यासाठी हे पुस्तक आधी आम्ही तयार केले. यासाठी काही संस्था, ट्रस्ट असावा म्हणून 1986 साली आम्ही ही एक संस्था पुण्यात नोंद केली. याचे सुरुवातीचे ट्रस्टी बहुतांशी पुण्यातले होते. 1980 साली आम्ही कायमचे दिंडोरीला आलो आणि संस्थेची छोटीशी जागा माधव गणेश पेठे (वामन हरी पेठे या पेढीचे) यांच्या देणगीमुळे घेता आली. डॉ. चारू आपटे (सह्याद्री हॉस्पिटल पुणे) यांनी त्यांच्या अनेक मित्रांकडून लहान मोठया देणग्या मिळवून कामासाठी निधी जमा करून दिसला. त्यातून आम्ही लहानसे प्रशिक्षण केंद्र बांधले. सुरुवातीस त्यावर गवती छप्पर, नंतर कौले आणि आता सिमेंटचे पत्रे आहेत. सुरुवातीला 2/3 वर्षे आम्ही यात काही शिबीरे घेतली. पण संस्थेला परदेशी देणग्या व कायमचा निधी घेण्याची मानसिक तयारी नसल्याने आम्ही 'प्रशिक्षण संस्था' चालवण्याचा नाद सोडून दिला. 2000 साली आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी नाशिकमध्ये रहायला आलो, त्यावेळी उरलेसुरले प्रशिक्षण वर्गही बंद पडले. सार्वजनिक देणग्या घेऊन आहे ती जागा-इमारत तशीच पडून ठेवण्याची आम्हाला खंत आहे. पण संस्था चालवण्याची प्रचंड सर्कस स्थायी निधीशिवाय शक्य नसते, आणि इतर अनेक संस्था अशा प्रकारचे काम करीत आहेत. त्यांना मदत करावी हे बरे असे आम्ही ठरवले.

1986 ते आजपर्यंत मी मेडिको फ्रेंड सर्कल या आरोग्य चळवळीत सामील आहे. यामुळे भारतभरचे आरोग्य-चिंतक, कार्यकर्ते यांचा संपर्क एकूण खोलवर अनुभव देणारा आहे.

1997-2000 मधे मी मॅकऑर्थर पॉप्युलेशन फेलोशिप मिळाल्यावर चीनमधली आरोग्य-व्यवस्था पाहिली. एकेकाळी ही व्यवस्था आदर्श समजली जायची. (मात्र नवसुधारणांपूर्वीही त्या व्यवस्थेत भ्रष्टाचार होताच) याच फेलोशिपमुळे मी जर्मनी, इंग्लंड, अमेरिका इ. प्रगत देशाची आरोग्यव्यवस्था अभ्यासली. यामुळे माझी एकूण समज ग्रामीण आरोग्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या आरोग्यावर बरेच (सुमारे 100) इंग्रजी-मराठी लेख लिहिले आहेत.

माझा एकूण अभिप्राय असा की प्रगत देशामधे देखील प्राथमिक आरोग्यसेवेचा स्तर महत्त्वाचा असतो-आहे, भारतात मात्र त्याची अक्षम्य हेळसांड होते आहे हे नमूद करायला पाहिजे.

2003 मध्ये नाशिकच्या मुक्त विद्यापीठात आरोग्यविज्ञान विद्याशाखा सुरू करण्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संस्थेचे काम एकाअर्थी विद्यापीठातून करता आले तरी संस्थात्मक कामाला वेळ देता येईनासा झाला. संस्थेला निधीही मिळणे शक्य नव्हते. तरीही वेगवेगळया स्वरुपात मूळ काम चालूच राहिले. या काळात भारतवैद्यक पुस्तकाची दुसरी व तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली. 2001 मध्ये ओरिएन्ट लाँगमन प्रकाशन संस्थेने इंग्रजी आवृत्ती (Health And Healing)काढली. त्याचे भाषांतराचे व प्रूफे वगैरे काम तब्बल 2 वर्षे सुरूच राहिले.

2000 पासून भारतवैद्यक पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे भाषांतराचे काम सुरू झाले, मात्र यात अनेक अडचणी आल्या. दोन वेळा हे काम बंद पडले. यात संस्थेची उरली सुरली शिल्लक संपली आणि कामही परत परत करावे लागले. हे 2010 मधे लिहीत असताना अजूनही हिंदी आवृत्तीचे काम रेंगाळलेच आहे.

2005-06 मध्ये संस्थेतर्फे आम्ही एक अभ्यासगट करून भारत सरकारसाठी 'आशा' पुस्तिका लिहिल्या. मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम लेखन पध्दतीचा नवा अनुभव भारतवैद्यकसाठी कलेले काम, आणि 'आशा' योजनेची एकूण गरज याची सांगड घालून केलेले हे काम माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. या पुस्तिकांवर दिल्लीत थोडेसे 'राजकारण' होऊन पूर्ण काम उपयोगात आले नाही. मात्र तरीही 'आशा' अभ्यासक्रमाची पहिली 2 पुस्तके व एकूण 60 टक्के काम आमच्या हातून झाले आहे. भारतात विविध प्रांतात फिरताना खेडेगावांमध्ये 'आशा' च्या हातात ही पुस्तके पाहून 'भारत' वैद्यकचे काम थोडे फार तरी केले याचा आनंद आहेच. या पुस्तिकांचे अर्थातच निरनिराळया भारतीय भाषांमध्ये रुपांतर झाले आहे. यामुळे 'भारतवैद्यक' संस्थेचे काम एकाअर्थी 'भारतभर' झाले. याच काळात महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याबरोबर 'व्हिजन 2020' बालमृत्यू नियंत्रण समिती, कुपोषण-बालमृत्यू समिती वगैरे समित्यांच्या कामकाजात भाग घेतल्यामुळे महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था मला अधिक जवळून अभ्यासता आली.

महाराष्ट्राचे सध्याचे आरोग्य आणि आरोग्यव्यवस्था ग्राहक-रुगण यांच्या दृष्टीने आणि आरोग्यव्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टीने संकटमय आहेत.

ही ई-पुस्तके किंवा मुद्रित पुस्तके करतानाच, एकूण आरोग्यव्यवस्थेत नवे काही करण्याची गरज आहे. भारतवैद्यकसंस्था आणि व्यक्तिश: मी या कामात माझा वाटा उचलणारच आहे. आमच्या संस्थेकडे साधनसंपत्ती जवळजवळ नगण्य असली, तरी आताच्या नेटवर्कच्या जगात एका खोलीत बसूनही पुष्कळ काम करता येते, आणि ते वाढतच जाईल याची मला खात्री आहे.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday2137
mod_vvisit_counterYesterday1899
mod_vvisit_counterThis week12449
mod_vvisit_counterLast week11187
mod_vvisit_counterThis month37235
mod_vvisit_counterLast month48866
mod_vvisit_counterAll days4304716

We have: 58 guests online
Your IP: 123.252.209.242
Chrome 60.0.3112.113, Windows
Today: सप्टेंबर 23, 2017
Bharatswasthya