digestive system icon पचनसंस्थेचे नेहमीचे आजार पचनसंस्थेचे गंभीर आजार
बद्धकोष्ठ

दिवसातून एकदा नियमित पोट साफ होणे हा निसर्गनियम आहे. अन्नाचा पोटातला मुक्काम एवढाच असतो. एवढया वेळात अन्न पचून त्याचा चोथा टाकायला तयार होतो. पोटात हा मळ जास्त काळ राहिला तर त्याला दुर्गंध येतो. रोज पोट पूर्ण साफ होणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.

आहारातील पदार्थांचे प्रकार व प्रमाण

पोट साफ होण्यासाठी त्यात पालेभाज्या, कोंडा यांचे प्रमाण चांगले पाहिजे. काही पदार्थ जात्याच रुक्ष असतात व पोटात मैदा, मिठाई, बेसन, इ. पदार्थांनी पोट लवकर साफ होत नाही.

आपल्या शरीराला लावलेली सवय व दिनचर्या पोट साफ होणे-न होण्याला कारणीभूत ठरते.

  • बध्दकोष्ठ हा बहुधा चुकीच्या आहार-विहार सवयींचा परिणाम असतो.
  • रुक्ष आहाराने (उदा. फरसाण, चणे, चुरमुरे, फुटाणे) तात्पुरते बध्दकोष्ठ होते.
  • उतारवयात गुदद्वाराच्या कर्करोगाची शक्यता मनात ठेवून एकदा तरी तपासणी केली पाहिजे.
  • कॉफी जास्त पिण्याने आतडी मंदावतात व बध्दकोष्ठ होते.
  • तंबाखूच्या सेवनानेही बध्दकोष्ठता होते.
  • बध्दकोष्ठामुळे मळ कोरडा होऊन खडे तयार होतात यामुळे मळ बाहेर पडायला अवघड जाते.
  • पोटाच्या डाव्या बाजूला हाताने दाबून आपल्याला मोठया आतडयाचा भरीव घट्ट-कडकपणा जाणवतो.
उपचार

constipation लहान मुलांना खडे होणे

लहान मुलांना बध्दकोष्ठ असेल तर एक सोपा उपाय करा.

एक-दोन चमचे तेलकट किंवा बुळबुळीत पदार्थ (उदा. गोडेतेल) गुदद्वारात भरल्यास आतले मळाचे खडे 10-15 मिनिटांत बाहेर पडतात व दुखत नाही. यासाठी एरंडेल तेल, पॅराफिन (एक प्रकारचे पातळ मेण) किंवा साबणाचे पाणी वापरतात. हे फक्त एक-दोन चमचेच वापरायचे असल्याने हा एनिमा नाही. (एनिमामध्ये पावशेर, अर्धा लिटर साबणाचे पाणी वापरतात.) मुलांना एनिमा देऊ नये.
पॅराफिनच्या लांबट गोळया मिळतात. वेष्टन काढून ही गोळी गुदद्वारात सारली की थोडया वेळाने विष्ठा सैल होऊन सरकते.

आयुर्वेद

constipationबध्दकोष्ठाचा त्रास अनेक जणांना होतो. उपायही अनेक आहेत.

  • मळाचे कोरडे खडे झाले असल्यास ते बाहेर पडण्यासाठी तोंडातून औषध देण्यापेक्षा गुदद्वारामार्फत उपाय करणे चांगले. यासाठी जुन्या मऊ सुती कापडाची सुरळी (करंगळीइतकी जाड) करून एरंडेल तेलात भिजवून गुदद्वारातून आत सरकवावी. रुग्णास स्वत:सही ही क्रिया जमू शकेल. यानंतर तीन-चार तास पडून राहण्यास सांगावे (किंवा हा उपाय झोपताना करण्यास सांगावे). यामुळे कोरडे खडे तेलकट होऊन बाहेर पडणे शक्य होते. लहान मुलांसाठी आणि वृध्दांसाठी हा उपाय फार चांगला ठरतो. याऐवजी तेलाची पिचकारीही चालेल.
  • बध्दकोष्ठासाठी पोटातून उपाय करायचा असल्यास 15 ते 40 मि.ली. शेंगदाणा तेल रात्री प्यायला द्यावे. त्यापाठोपाठ गरम पाणी किंवा चहा द्यावा म्हणजे जिभेवर तेलकट चव राहणार नाही. या उपायानेही खडे सुटतात.
  • सौम्य विरेचनासाठी त्रिफळा चूर्ण अर्धा ते दीड चमचा + एक कप गरम पाणी रात्री झोपताना द्यावे. त्रिफळा चूर्ण वारंवार घ्यायची वेळ आल्यास दर वेळेस 4-5 चमचे तेल किंवा तूप या बरोबर घ्यावे.
  • ज्यांना वारंवार मळाचे खडे होतात त्यांनी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. फुटाणे, टोस्ट, फरसाण, पापडीशेव, पिठले, डाळमोठ, चिवडा, इत्यादी मूलत: कोरडे असणारे पदार्थ वर्ज्य करावेत. याऐवजी पालेभाज्या, मूग, मटकी, चवळी, इत्यादी चोथा-सालपटयुक्त पदार्थ घेणे चांगले.
  • जागरण करणे किंवा उशिरा झोपून उशिरा उठणे, हेही खडे होण्याचे कारण आहे. पहाटे उठून मलविसर्जन करणा-यास हा त्रास सहसा होत नाही.
होमिओपथी निवड

ब्रायोनिया, सीना, फेरम फॉस, लायकोपोडियम, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, पल्सेटिला, सिलिशिया

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.