Health Sciences Icon घर आणि परिसर स्वच्छता आरोग्य विज्ञाान
घरगुती सांडपाण्याची विल्हेवाट

sosakhadda सांडपाणी घराजवळ साचून डबकी तयार होतात. हे दृश्य तसे खेड़यांप्रमाणेच शहरांतही दिसते. खरे तर सांडपाण्याची गटारे, शौचकूप (संडास) इत्यादी सोयी आपल्या देशात चार-पाच हजार वर्षापूर्वीच्या सिंधू संस्कृतीच्या वसाहतीत आढळून आल्या आहेत.

जिथे शोषखड्डा किंवा परसबागेसाठी जागा आहे तिथे त्या घरापुरता सांडपाण्याचा प्रश्न सोडवता येतो. मात्र एखादे गाव मोठे असेल तर दाटीवाटीमुळे शोषखड्डे परसबागेसाठी जागा उरत नाही. अशा ठिकाणी सार्वजनिक स्वरुपाची उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठीही कमी खर्चाच्या व परिणामकारक पध्दती उपलब्ध आहेत. मात्र गावात गटार योजना करायच्या आधी पुरेसा विचार व नियोजन करणे आवश्यक आहे. शक्यतोवर सांडपाण्याची विल्हेवाट घरगुती तत्त्वावर लावता आली तर चांगले असते. यासाठी शोषखड्डा व परसबाग हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. सामूहिक योजना खर्चिक व नंतर उपद्रवी ठरतात.

डास

डासांची निर्मिती पाण्याशिवाय होत नाही. सांडपाण्यावर वाढणा-या डासांमुळे हत्तीरोग, तर स्वच्छ पाण्यावर वाढणा-या डासांमुळे मलेरिया पसरतो. म्हणून शहरापेक्षा ग्रामीण भागातच हिवतापाचे प्रमाण जास्त असते. बागायती शेती, कालवे, तलाव असलेल्या ठिकाणी हिवतापाचे डास साहजिकच जास्त असतात. पावसाळयात हे डास सर्वत्र वाढतात. या उलट शहरी भागात क्युलेक्स व ईडास जास्त असतात

पुरेशी योग्य जागा आणि बांधकाम
पुरेशी योग्य जागा

Adequate Space घराचे स्थान निरोगी असावे. गोंगाट, प्रदूषण यांपासून शक्यतो घर पुरेसे सुरक्षित असावे. घरातल्या माणसांच्या संख्येच्या हिशेबात घरातली जागा, खोल्या, सोयी पुरेशा आहेत काय? कुटुंबाच्या मानाने घर लहान पडत असेल तर अनेक अडचणी निर्माण होतात. लहान घरातही पडदे/पडदी करून थोडी सोय करता येते. खेडयांतील गावठाणात जागांची टंचाई असते. घरे लहान व एकमेकांना लागून असतात. नव्या घरांत मात्र जास्त सोयी करणे शक्य असते.

सर्वसाधारणपणे प्रति माणशी 100 चौ.फूट जागा असावी. घराची उंची निदान 10 फूट असावी म्हणजे हवा खेळती राहते आणि कोंदटपणा जाणवत नाही.

घराची रचना आणि बांधकाम

उंदीर,साप,किडे यांच्यापासून सुरक्षितता, उजेड व हवा खेळण्यासाठी खिडक्यांची आणि दरवाज्यांची रचना, ओल न राहणे, इत्यादी अनेक गोष्टी घरबांधणीत बघाव्यात.

घराचे जोते पुरेसे उंच ठेवले तर उंदीर व इतर प्राण्यांपासून थोडे संरक्षण मिळते. यामुळे पावसाळयात ओलही रहात नाही.

जमीन सारवण्याऐवजी टाईल्स किंवा सिमेट कोबा केल्यास स्वच्छता राहू शकते. सिमेंट कोब्याचा खर्च फार येत नाही. खिडक्या पुरेशा व समोरासमोर असल्यास हवा खेळती राहते आणि घर जास्त तापत नाही. याच दृष्टीने पत्र्याऐवजी कौले असणे फायद्याचे ठरते. मातीच्या भिंतींमुळे घर उन्हाळयात थंड आणि हिवाळयात उबदार राहते. आधुनिक घरबांधणी शास्त्रात यासाठी न भाजलेल्या मातीच्या विटा (थोडे सिमेंट वापरुन) वापरण्याची पध्दत आहे. मात्र अशा मातीच्या विटांच्या भिंतीवर छप्पर पुढे आलेले असले तर पावसापासून संरक्षण मिळते.

घन कचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्ट

Waste Management घनकच-यामध्ये ओला जैविक कचरा, सुका जैविक कचरा व अजैविक म्हणजे न कुजणारा कचरा असे तीन घटक असतात. यापैकी जैविक ओला व सुका कचरा कंपोस्ट करून (कुजवून) झाडांसाठी वापरता येतो. अजैविक कच-यात अनेक घटक आहेत – काच, पत्रा, प्लॅस्टिक इ. यांची वेगळी विल्हेवाट लावावी लागते. हे काम मात्र गावाला सामूदायिक पध्दतीनेच करावे लागेल. यासाठी पुढे स्वतंत्र प्रकरण दिले आहे.

माश्या

माश्या हे कचरा व घाणीचे लक्षण आणि परिणामही आहे. विष्ठेमार्फत होणारे सर्व रोग माशी पसरवते. स्वच्छता राखल्याशिवाय माश्या हटत नाहीत. उघडे अन्न, उघडयावरील विष्ठा, केरकचरा या सर्व गोष्टींचा बंदोबस्त केल्यावरच माश्यांवर नियंत्रण राहू शकते. त्यामुळे हा प्रश्न ब-याच प्रमाणात राहणीमानाशी निगडित आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.