mouth dental icon तोंड व दातांचे आरोग्य पचनसंस्थेचे नेहमीचे आजार
हिरडयांना सूज-पू येणे
हिरडयांवर अनेक कारणांनी सूज येते

Healthy Gums

  • तोंडाची स्वच्छता न राखल्यामुळे
  • ‘क’ जीवनसत्त्व (पालेभाज्या, लिंबू, आवळा, संत्री) कमी पडल्यामुळे.
  • हिरडयांवर सूज असेल तर हिरडया सळसळतात, शिवशिवतात, कधीकधी ठणकतात. मात्र हिरडया ठणकणे म्हणजे पू झालेला असतो.
  • मिश्रीची सवय असल्यासही हिरडयांना त्रास होऊ शकतो. गोड पदार्थ, जास्त शिजवलेले पदार्थ व पिठूळ पदार्थ, इत्यादींनी दातांच्या फटीमध्ये अन्नकण राहतात. यामुळे दात व हिरडयांचे रोग लवकर होतात.
  • कीटण चढले असल्यास, तोंडात दुर्गंधी येत असल्यास, हिरडयांतून पू व रक्त येत असल्यास दंतवैद्याकडून वेळीच उपचार करावे.

ब-याच जणांच्या दातांवर एक प्रकारचे कठीण पिवळे कीटण चढते. यामुळे हिरडया व दात यांमध्ये फट तयार होते. अन्नकण यात अडकून कुजतात व दुर्गंध येतो, कीटणामुळे हिरडयांची हानी होते. यामुळे दातांचा मुळाकडचा भाग उघडा पडत जातो. या सर्व घटनाक्रमामुळे हिरडयातून पू व रक्त येते. यामुळे हळूहळू दात दुबळे होऊन पडतात. दातांवर कीटण न चढेल इतकी स्वच्छता रोज पाळणे आवश्यक आहे. ब्रशचा वापर करताना हा उद्देश लक्षात ठेवावा. दातांची योग्य निगा ठेवणे हा सर्वात महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय आहे.

उपचार
  • ‘क’ जीवनसत्त्वाची गोळी रोज एक याप्रमाणे 5 दिवस द्यावी किंवा त्याऐवजी आवळा, लिंबू वगैरे 4-5 दिवस खाण्यात यावे.
  • मिठाच्या पाण्याने चुळा भरून तोंड स्वच्छ ठेवावे. झोपताना देखील चुळा भरून स्वच्छता ठेवावी.
  • चॉकलेट, गोळयांची सवय असलेल्या मुलांचे दात लवकर किडतात, त्यामुळे या सवयीवर नियंत्रण ठेवावे.
होमिओपथी निवड

नायट्रिक ऍसिड, एपिस, आर्सेनिकम, बेलाडोना, कल्केरिया कार्ब, फेरम फॉस, हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर

दातांची व हिरडयांची स्वच्छता
  • दात घासण्यासाठी चांगला ब्रश आणि पेस्ट लागते. ब्रशच्या केसांनी दातांच्या फटीतील घाण व अन्नकण निघू शकतात. ब्रश आडवा धरून खालीवर फिरवणे आवश्यक आहे.
  • ब्रश नसल्यास दात घासण्यासाठी बाभूळ, कडूनिंब, वड, रूई यांचे दातवण चालेल. यांच्या करंगळीएवढया जाड अशा एक वीत लांबीच्या काडया दातवण म्हणून वापराव्यात. प्रथम काडीचा भाग चावून मऊ करावा. मग दातवणाच्या कुंचल्यासारख्या झालेल्या टोकाने दात स्वच्छ करावेत.
  • रात्री जेवणानंतरही दात ब्रश किंवा दातवणाने साफ करणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक जेवणानंतर ताबडतोब खळखळून चूळ भरणे आवश्यक आहे. बोटाने हिरडया चोळाव्यात. शक्यतो अर्ध्या तासाच्या आतच चूळ भरणे आवश्यक आहे.
  • दातावर कीटण चढू न देणे हे महत्त्वाचे आहे.
  • गोड पेस्टपेक्षा तुरट, कडू चवीच्या पेस्टने स्वच्छता चांगली होते.
  • टुथपेस्ट नसल्यास ब्रश व दंतमंजनाचा वापर करता येईल.
कृत्रिम दात व कवळया

Artificial Teeth वृध्दापकाळात एक महत्त्वाचा आरोग्याचा प्रश्न म्हणजे दात पडण्याचा. बहुधा पन्नाशीनंतर दात पडायला सुरुवात होऊन 10-20 वर्षात बहुतेक सर्व दात पडून जातात. एकदा अन्न चावण्याची क्रिया बंद पडली की त्याचा पोषणावर वाईट परिणाम होतो. यामुळे माणूस खंगतो; आणि यामुळे 5-10 वर्षांनी तरी आयुष्य कमी होत असावे. दात गेल्याने चेहराही एकदम वेगळा दिसायला लागतो. यासाठी वेळीच कवळी बसवून घ्यावी.

कृत्रिम दात गरजेप्रमाणे दोन-चार दातांऐवजी किंवा सर्व दातांऐवजी बसवता येतात. सर्वसाधारणपणे जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय किंवा खाजगी दंतवैद्याकडे हे काम होते. एकूण लाभाच्या मानाने यास खर्च फारसा नसतो.

  • काही कारणाने एखादा दात काढला असेल तर त्या जागी नवीन दात बसवून घ्यावा.
  • बाजूच्या दोन्ही दातांना धरून ठेवून नवा दात बसवण्याची एक पध्दत आहे, याला ब्रिज असे म्हणतात.
  • दुसरी पध्दत म्हणजे दात काढघाल करण्याच्या दृष्टीने कवळीप्रमाणेही तेवढा दात लावता येतो. थोडक्यात ही छोटी कवळीच असते.
कवळीसाठी दंतरेषा महत्त्वाची

कवळी बसवायची असेल तर एक काळजी घेणे आवश्यक आहे. कवळी बसवण्यासाठी दात धरणा-या जबडयांच्या हाडांची मूळ अस्थिरेषा टिकून राहिली पाहिजे. पण दात पडण्याच्या नैसर्गिक क्रियेस 10-20 वर्षे लागू शकतात. असे झाले तर सुरुवातीला पडलेल्या दातांच्या जागचे हाड इतर जागांच्या मानाने जास्त झिजते. यामुळे अस्थिरेषा वेडीवाकडी आणि उंचसखल होते. अशा अस्थिरेषेवर कवळी बसू शकत नाही. म्हणून दात पडायला आले की 5-6 महिन्यांत सर्वच दात काढून कवळी बसवणे चांगले. मात्र 2-4 दात पडले असतील आणि उरलेले सर्व चांगले असतील तर तेवढयापुरतेच कृत्रिम दात वापरता येतात. यामुळे एकूण झीजही टळते. काही वृध्दांना कवळी 10-20 वर्षेही चांगली चालते. हळूहळू हाडांच्या झिजेमुळे कवळीची बैठक थोडी बदलू शकते. म्हातारपणासाठी कृत्रिम दात हे एक फार मोठे वरदान आहे. सर्व वृध्दांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे.

जबडयाचा अस्थिभंग

खालच्या किंवा वरच्या जबडयाचा अस्थिभंग झाल्यास तिथे वेदना तर होतेच. याचबरोबर जिथे तुटले असेल तिथले दात खालीवर पातळीवर आढळतात. जबडा मिटता येत नाही हेही याचे एक लक्षण असते. असे रुग्ण ताबडतोब दंतवैद्याकडे पाठवावेत. अशा वेळी डॉक्टर तारेने जबडा पक्का करतात. यानंतर सुमारे 6 आठवडे रुग्णाला तोंड उघडता येत नाही. केवल चूळ भरणे व पातळ अन्न पिणे एवढेच शक्य होते. बोलणे देखील खुणेनेच करावे लागते.

तारेने जबडा बांधायला पर्यायी पध्दत म्हणजे शस्त्रक्रिया करून स्क्रूने जबडयांचा भाग फिट करणे. यासाठी योग्य निर्णय दंतवैद्यच घेतील.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.