दूधपित्या मुलांमध्ये ब-याच वेळा एका प्रकारच्या बुरशीमुळे तोंड येते. शाईसारखे एक औषध (जेंशन) यावर गुणकारी आहे. याचा एक थेंब जिभेवर टाकला, की आपोआप तोंडभर पसरतो. या औषधाचा उपयोग तीन-चार दिवस होतो. हे औषध पोटात गेले तरी चालते.
काही वेळा हिरडयांना सूज आल्यामुळे तोंड येते. अशा वेळी दिवसातून तीन-चार वेळा मिठाच्या पाण्याने चुळा भरून टाकाव्यात. जेंशनचे एक-दोन थेंब औषध हिरडयांवर लावावे. लिंबू, पेरू किंवा आवळा अशी ‘क’ जीवनसत्त्वयुक्त फळे खाण्यात असल्यास हिरडया मजबूत व निरोगी राहण्यास मदत होते.
तोंडात किंवा जिभेवर दीर्घकाळ बरी न होणारी जखम किंवा पांढरट चट्टा असल्यास कर्करोगाची भीती असते. यासाठी वेळीच तज्ज्ञाला दाखवा. तसेच आत कोठेही चट्टा खरखरीत भाग, गाठ आल्यास वेळ न घालवता तज्ज्ञाला दाखवा.
वारंवार तोंड येणे, बुरशी होणे हे एड्सच्या आजाराच्या लक्षणांपैकी एक आहे. मात्र याबद्दल डॉक्टरच तपासणी करु शकतील.
मूळ कारण माहीत असल्यास त्यावर उपचार व्हावेत. ‘ब’ जीवनसत्त्वाच्या गोळया रोज एक याप्रमाणे पाच दिवस घेतल्यावर उपयोग होईल. याबरोबरच मेडिकल स्टोअरमध्ये ‘लॅक्टोबॅसिलस’ (पचनसंस्थेतील जिवाणूंच्या गोळया) मिळतात. अशी रोज एक गोळी पाच दिवस द्यावी. या जिवाणूंमुळे पचनसंस्थेतील समतोल साधला जातो. दही खाल्ल्याने देखील हे जंतू आपोआप मिळतात. म्हणून अशा रुग्णांनी दही खावे.
तोंड येण्यावर आयुर्वेदिक उपचार
नायट्रिक ऍसिड, आर्सेनिकम,फेरम फॉस, हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, सिलिशिया, सल्फर
गुटखा म्हणजे तंबाखू, चुना, सुपारी व एक विषारी द्रव्य आणि सुगंधी मसाला, इ. चे मिश्रण असते. अनेक नावांनी गुटखा विकला जातो. पान मसाला, गुटखा, सुपारी, आदी पदार्थ चघळणाच्या सवयीमुळे हा आजार दिसून येतो. या आजारात तोंडातल्या मऊ त्वचेखालील भाग निबर होत जातो. यामुळे तोंडाची हालचाल आखडत जाते. तोंडात पांढरट चट्टे दिसू लागतात. हा चट्टा बोटाने चाचपता येतो. जीभेवरही पांढरट डाग येतात. जीभ ‘संगमरवरी’ पांढरट गुळगुळीत दिसते.
हा आजार हळूहळू काही महिन्यांत वाढतो. दिवसेंदिवस तोंड उघडायला कठीण होऊ लागते. आजार जास्त वाढेपर्यंत त्या व्यक्तीला पुरेसे कळून येत नाही. आणखी एक लक्षण म्हणजे मसाला, तिखट तोंडाला अजिबात लागू देत नाही, खूप झोंबते. या आजारातून पुढे कॅन्सर उद्भवू शकतो.
गुटखा विकण्याला महाराष्ट्रात बंदी आहे. काही राजकीय पक्षांनी याबद्दल मोहीम सुरु केली होती. तरीही बेकायदेशीर रित्या गुटखा निरनिराळया नावाने विकला जात आहे. लोकशिक्षण हा यासाठी जास्त चांगला व टिकाऊ उपाय आहे. संपूर्ण भारतातही आता गुटख्याला बंदी लागू झाली आहे.
गुटखा रोगावरचा उपायही बरेच दिवस करावा लागतो.
पान मसाला, गुटखा, सुपारी, इ. सवयी पूर्णपणे थांबवाव्यात. यासाठी बंदीबरोबरच लोकशिक्षण करावे लागेल.