Health Service आपल्या शासकीय आरोग्यसेवा आरोग्य सेवा
प्राथमिक आरोग्यकेंद्र

Primary Health Center Umrale आपल्या भागातील एखाद्या मोठया गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असते. आपल्या तालुक्यात 5-10 प्राथमिक आरोग्य केंद्रे असू शकतील. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात 5-6 उपकेंद्रे असतात आणि 25,000-30,000 इतकी लोकसंख्या असते. प्रत्येक गाव कोणत्यातरी केंद्राच्या क्षेत्रात समाविष्ट असतेच. तुम्ही कधी प्राथमिक आरोग्य केंद्रावर गेला आहात काय?

प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 डॉक्टर्स, नर्सेस, कंपाउंडर तसेच इतर सेवक वर्ग असतो. 4-6 उपकेंद्रांच्या मदतीने रोगांचा प्रतिबंध, आरोग्याचा प्रसार आणि आजारांवरचे उपचार करणे हे प्राथमिक आरोग्यकेंद्राचे मुख्य कार्य आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य कामे पुढीलप्रमाणे –

1. स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्याकरता आखलेले राष्ट्रीय कार्यक्रम राबवणे.

2. हिवताप, हत्तीरोग, टी.बी. कुष्ठरोग, अंधत्व, लैंगिक रोग आणि एड्स वगैरे आजारांचे नियंत्रण.

3. सहा रोगांवर लसीकरण करणे.

Attached Primary Health Center 4. गरोदरपण, बाळंतपण आणि बाळंतपणानंतर लागणारी आरोग्य सेवा पुरवणे. हल्ली भारत सरकारने सर्व बाळंतपणे घरी न होता रुग्णालयात व्हावे या दृष्टीने प्रयत्न सुरु केलेले आहेत.

5. शाळेतल्या मुलांची वैद्यकीय तपासणी आणि उपचार करणे.

6. हगवणीसारख्या सांसर्गिक आजारांचा प्रतिबंध व उपचार.

7. निरनिराळया आजारांवर उपचार करणे.

8. संततिनियमनाच्या सेवा, शस्त्रक्रिया तसेच सुरक्षित गर्भपात करणे.

9. आजार रोखण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आरोग्य प्रशिक्षण देणे.

10. रोगांचे निदान,उपचार आणि रोगांच्या प्रतिबंधासाठी मोहीम राबवणे.

11. जत्रांमध्ये आणि आठवडे बाजारांच्या ठिकाणी आरोग्य सेवा पुरवणे.

12. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर ओपीडीत रुग्णांवर उपचार करतात. काही रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखलही केले जाते. उपकेंद्रातील आरोग्यसेवकांच्या सल्ल्याने रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होतात. कधीकधी प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णांना ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात नेले जाते.

13. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर त्यांच्या अखत्यारीतील उपकेंद्रांना व अंगणवाडयांना भेट देतात. नर्सताईच्या कामावर लक्ष ठेवणे, गावक-यांना भेटणे आणि वैद्यकीय सेवा पुरवणे हीदेखील त्यांची कामे आहेत.

14.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांवर इतरही जबाबदा-या असतात. रोगांवर उपचार करणे हा एक भाग झाला. बैठकांना उपस्थित राहणे, शवविच्छेदन करणे व वैद्यक-कायद्याशी संबंधित कामे करणे या त्यांच्या इतर जबाबदा-या आहेत.

गावपातळीवरील आरोग्यसेवा
अंगणवाडी

Anganwadi Weight Machine प्रत्येक गावात 1000 वस्तीला एक अंगणवाडी असते. अंगणवाडीत जरी 3-6 वयोगटातली मुले येत असली तरी त्यापेक्षा लहान बालकांनाही सेवा मिळाव्यात अशी अपेक्षा असते. याचबरोबर गरोदर व स्तनदा माता अंगणवाडीत तपासणीसाठी आणि पोषक आहारासाठी येतात. पोषण, पूर्व प्राथमिक शिक्षण, लसीकरण, आरोग्य शिक्षण आणि आरोग्य तपासणी ही अंगणवाडीची महत्त्वाची कामे आहेत. प्रत्येक महिन्यात एक दिवस हा आरोग्य दिन म्हणून पाळला जातो.

आशा

Hope Volunteer 2007 पासून महाराष्ट्रात आशा योजना लागू केलेली आहे. सुरुवातीस ही योजना फक्त आदिवासी भागात होती. 2009 पासून इतर ग्रामीण भागातही ही योजना लागू झालेली आहे. लवकरच शहरी भागात आरोग्य कार्यकर्त्या नेमल्या जातील. मात्र त्यांना आशा ऐवजी ‘उषा’ असे नाव असेल.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात गावपातळीवर आशा कार्यकर्तीचे खूप महत्त्व आहे. महाराष्ट्रात आशाची निवड ग्रामपंचायत/ग्रामसभेकडून होते. 10वी झालेल्या स्त्रियांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना निरनिराळया कामांसाठी मोबदला मिळतो. त्यातून त्यांना महिन्याला सुमारे 1000 ते 1500 रु. मिळावेत अशी अपेक्षा आहे. त्यांच्याकडून गावाच्या सर्वांगीण आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वाची कामे अपेक्षित आहेत.

आरोग्य उपकेंद्र

Health Sub Center आपण आरोग्य उपकेंद्राची अधिक माहिती करून घेऊ या. कदाचित हेच गावाला सगळयात जवळचे उपचाराची सोय असलेले ठिकाण असेल. आपल्या उपकेंद्रात एक नर्सताई आणि एक बहुउद्देशीय कार्यकर्ता असतो.

त्यांची मुख्य कामे अशी :

  • जीवघेण्या सहा आजारांपासून बाळाचा बचाव करण्याकरता लसीकरण.
  • गरोदर स्त्रियांची तपासणी, सोपी बाळंतपणे आणि बाळंतपणानंतरची योग्य काळजी.
  • जोडप्यांना पाळणा लांबविण्याची आणि कुटुंबनियोजन शस्त्रक्रियांची माहिती देणे.
  • Health Day मलेरिया, टी.बी. कुष्ठरोग यावर उपचार करणे.
  • साध्या-मध्यम आजारांवर उपचार करणे.
  • अंगणवाडया आणि शाळांमध्ये जाऊन वैद्यकीय तपासणी करणे.

हगवण, न्यूमोनिया, यांसारख्या घातक आजारांवर उपचार आणि लहान मुलांची इतर काळजी. स्वच्छता आणि पाणी शुध्दीकरण याबाबत सल्ला देणे.

नर्सताई आणि बहुउद्देशीय कार्यकर्ता यांचे काम कठीण असते. त्यांच्याकडची गावे ही 8-10 कि.मी च्या क्षेत्रात पसरलेली असतात. ब-याचदा त्यांना चालत ठिकठिकाणी पोचावे लागते. ते घरोघर भेटी देऊन काही सेवा देतात तर अंगणवाडीत लसीकरण करतात. ते आरोग्य कार्यक्रमांचा मासिक अहवाल तयार करतात. त्यांना दरमहा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बैठकांना उपस्थित राहावे लागते. आता प्रत्येक उपकेंद्रास आणखी एक नर्सताई नेमलेली असते

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.