Health Sciences Icon घर आणि परिसर स्वच्छता आरोग्य विज्ञाान
घनकच-याचे प्रकार

(अ) कुजणारे पदार्थ: पालापाचोळा, भाजीपाल्याचा उरलेला अंश, स्वयंपाकातील टाकलेले पदार्थ, जनावरांची विष्ठा, मेलेले प्राणी, लाकूड, इ.

(ब) न कुजणारे पदार्थ: यात दोन उपगट केले जातात.

ब-1 : पुनर्वापरासाठी/प्रक्रियाशील – यात प्लास्टिक, कागद, काच, कपडा, लोखंड, रबर इ. वस्तू येतात. म्हणजेच हा माल ‘भंगार’ म्हणून विकता येईल.

ब-2 : अप्रक्रियाशील : थर्मोकोल, टेट्रापॅक, पाण्याच्या बाटल्या इ. हा भाग कोणी विकत घेत नाही.

घनकच-याचा उगम

1. घरातून निघणारा घनकचरा – भाजीपाला, फळे इ. चे तुकडे, कपडे, प्लास्टिक, घरगुती वापरातील इतर वस्तू.

2. शेतातून निघणारा घनकचरा – पिकांचे अवशेष, सडलेली फळे, पाला, झाडांची खोडं, इ.

3. इतर – कंपन्यामधील टाकाऊ वस्तू, मेलेले प्राणी, काचा, टाकाऊ फर्निचर, कारखान्यातील राख, इ.

घनकचरा व्यवस्थापनामधील महत्त्वाचा भाग म्हणजे घनकच-याचं वर्गीकरण. घनकच-याचे साधारण खालील प्रकारे वर्गीकरण करता येऊ शकते.

1. ओला कचरा/कुजणारा कचरा.

2. सुका कचरा / न कुजणारा कचरा.

3. पुन्हा वापरता येण्यासारखा कचरा

कंपोस्ट पध्दती

compost method कंपोस्ट म्हणजे कुजवणे. कचरा या पध्दतीने कुजवण्यामुळे अनेक फायदे होतात.

  • खत निर्माण होते. त्यामुळे जमिनीचा पोत टिकून राहतो.
  • हवेशीर कुजवण्यामुळे उष्णता निर्माण होऊन जंतू-जंत मरतात.
  • उपद्रवी कीटकांची निर्मिती होत नाही.

कंपोस्टच्या मुख्य तीन पध्दती आहेत.- खड्डापध्दत, ढीगपध्दत आणि गांडुळ खत पध्दत.

घरगुती खत-खड्डे

काही कुटुंबांकडे जनावरे फारशी नसतात. अशा घरांसाठी जैविक कचरा व्यवस्थापनासाठी ही सर्वात सोपी पध्दत आहे. या पध्दतीत –

  • दोन खड्डे करावेत. प्रत्येक खड्डा 1मी.x 1मी. x1मी. आकाराचा असावा.
  • खड्डयाच्या तळाशी वीट-तुकडयांचा एकेरी थर द्यावा.
  • खडडयाच्या भोवती चिखलाने थोडा उंचवटा करून पाणी आत येणे रोखावे. रोजचा जैविक कचरा खड्डयात टाकावा.
  • हा थर 6 इंच जाडीचा झाल्यावर पातळ शेण त्यात टाकून मिसळावे.
  • यावर मातीचा एक पातळ थर द्यावा.
  • या थरावर जैविक कचरा टाकत राहावा. तो 6 इंच झाल्यावर पूर्वीप्रमाणे शेण मिसळून, वरती मातीचा थर द्यावा.
  • याप्रमाणे खड्डा भरून जाईल. याचप्रकारे खड्डा भरून फुटभर थर वर येईल तोपर्यंत कचरा शेण टाकणे चालू ठेवावे.
  • यानंतर वरती चिखलाचा थर देऊन लिंपावे.
  • हा भरलेला खड्डा तसाच ठेवून आता दुसरा खड्डा वापरायला द्यावा. सहा महिन्यांत पहिल्या खड्डयात उत्तम खत तयार होते.
  • हे खत आता वापरायला काढावे. तोपर्यंत दुसराही खड्डा भरलेला असेल.

ही खड्डा पध्दत जास्त पावसाच्या प्रदेशात उपयुक्त नाही. अशा ठिकाणी ढीग पध्दत वापरावी लागते. काही प्रदेशात जमीन भुसभुशीत असते, त्यामुळे खड्डे टिकत नाहीत. या प्रदेशात खड्डा थोडा मोठा करावा आणि विटांनी आतून बांधून घ्यावा. वीट बांधकाम जमिनीवर 6 इंच असले की खड्डा चांगला टिकतो.

ज्या कुटुंबांकडे जनावरे असतात, त्यांनी शेण वेगळे मिसळण्याची गरज नाही. रोजच्या रोज शेण व कचरा टाकत राहावा.

सार्वजनिक कंपोस्ट खड्डा किंवा हौद

गावपातळीवर कंपोस्टिंगसाठी मोठी जागा करावी लागते. खड्डा करताना 1 मीटर उंची/ किंवा खोली ठेवावी. रुंदी 1.2 मीटर आणि लांबी 3 मीटर इतकी असावी. दोन खड्डयांमध्ये दीड मीटर मोकळी जागा असावी. गरजेप्रमाणे या खड्डयांची /हौदांची संख्या ठेवावी. दर सहा महिन्यांनी पूर्वीचा खड्डा/हौद वापरता येतो. हौदांची उंची मात्र 0.8 मीटर इतकीच असावी.

कचरा-ढिगारा पध्दत

ज्या प्रदेशात पाऊस जास्त पडतो (सह्याद्री घाटमाथा व कोकण) तेथे खड्डा पध्दत फार उपयोगाची नसते. अशा ठिकाणी ढिगारा पध्दतीने कंपोस्ट खत करावे. यासाठी किमान 7 चौ.मी. जागेची गरज असते.

  • आधी योग्य ठिकाणी जमीन धुम्मस करून घ्यावी.
  • या जागेवर जैवकचरा साठवत जावे.
  • थर सहा इंच झाल्यावर त्यात शेण मिसळावे.
  • यावर मातीचा 2/3 इंचाचा थर द्यावा.
  • यावर परत कचरा टाकत राहावे.
  • ढिगारा एकूण 1 मी. उंच होईपर्यंत थरावर थर देत राहावे.
  • यानंतर 3/4 दिवस थांबून वर चिखलाचा थर द्यावा. चिखलाने लिंपून ढिगारा पूर्ण बंद करावा.
  • आता नवीन जागेवर ढिगारा करावा.
  • 3-6 महिन्यांनंतर पहिला ढिगारा काढून त्यातील खत वापरावे.

ज्यांना शक्य आहे त्यांनी ढिगारा करण्यासाठी विटांचा हौद बांधून घ्यावा. चौकोनी हौदापेक्षा गोल हौद जास्त टिकतो. हा हौद अडीच फूट उंचीचा असावा. या हौदासाठी चारशे विटा, अर्धी गोणी सिमेंट, 5 घनफूट वाळू आणि गवंडी-मजुरी लागते. या सर्वांचा खर्च सुमारे 1 हजार रुपये इतका येईल.

गांडुळ खत

earthworms fertilizer कुजणा-या जैविक कच-याचे मूल्यवान खत करण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे गांडुळ प्रक्रिया खत. यात गांडुळे कच-यावर पोसतात आणि त्यांच्या विष्ठेतून उत्तम खत निर्माण होते. गांडळाच्या पोटातले जीवजंतू या प्रक्रियेत फार मोलाची कामगिरी करतात.

गांडुळ खत ही एक त्रिवेणी पध्दत आहे. यात गांडुळ, जैवकचरा आणि जीवजंतू या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ही थोडी नाजूक प्रक्रिया असते. ओलेपणा, तपमान, प्रकाश, हवा या सगळयांचा समतोल साधायला लागतो. अन्यथा गांडुळखत यशस्वीपणे होत नाही. गांडुळे जिवंत राहिली तरच गांडुळखत होईल. यासाठी गांडुळाच्या दोन जाती जास्त उपयोगी आहेत. सर्व गोष्टी चांगल्या जमून आल्या तर 50 किलो गांडुळांमागे दररोज 50 किलो खत तयार होते. यासाठी खालील गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

  • जैव कचरा बारीक असावा, जाड किंवा मोठा असू नये.
  • सर्वच कचरा नवा/ताजा असून चालत नाही. निम्मा कुजलेला, निम्मा ताजा मिसळून टाकावा.
  • आर्द्रता (ओलावा) 20%-80% इतकी असावी. यापेक्षा कमी ओलावा असेल तर गांडुळ मरून जाते.
  • तपमान 20 ते 40 अंश सेल्सियस इतके असावे. जास्त तपमानात गांडुळे मरतात.

गांडुळखत साध्या खतापेक्षा जास्त गुणवत्तेचे असते. एकूणच गांडुळ खताचे फायदे अनेक आहेत.

  • यात पालापाचोळाही चांगला कुजून जातो.
  • एकूण प्रक्रिया फक्त 40-45 दिवसांत पूर्ण होते.
  • दुर्गंध नसतो.
  • तणाचे बी पूर्णपणे नष्ट होते.
  • यातून वनस्पतींना वाढीसाठी संप्रेरके मिळतात.
  • कीटक- माशा यापासून ही प्रक्रिया मुक्त असते. जागा कमी लागते.
  • सोपे तंत्रज्ञान
गांडुळ खत करण्याची पध्दत
  • गांडुळ खतासाठी जागा करताना दोन पध्दतींचे नमुने वापरता येतात. एक म्हणजे 8 फूट x 3 फूट लांबीरुंदीची जागा घेऊन त्याभोवती एक थर वीट काम करावे. याऐवजी 2 फूट उंचीचे वीटकाम करून हौद बांधला तरी चालते. यातून गांडुळे बाहेर जाऊ शकत नाहीत.
  • जमीन शेणाने सारवून घ्यावी. यानंतर 1 इंच वाळूचा थर पसरावा.
  • यावर 2 इंची जाडीचा जैवकचरा पसरावा.
  • यावर 9 इंच थर शेण + कचरा पसरावा. शेणाच्या पाचपटीत इतर कचरा (पालापाचोळा, स्वयंपाकात उरलेले खरकटे अन्न इ.) हा थर यापूर्वीच थोडा कुजलेला असावा.
  • या थराच्या प्रत्येक चौरस फुटाला 100 ग्रॅम गांडुळे टाकावीत. यानंतर गोणपाटाने सर्व ढिगारा झाकून टाकावा. यामुळे प्रकाशकिरणांपासून गांडळांचे संरक्षण होते. गोणपाटामुळे ओलावाही राखला जातो. दिवसाआड किंवा रोज पाण्याचा शिडकावा करावा.
  • 1 महिन्यानंतर गोणपाट काढून 1 दिवस हवा द्यावी.
  • यानंतर ढिगा-यावरचा 2 इंच थर हलकेच काढावा. गांडुळे दिसायला लागेपर्यंत थर काढावा.
  • ही काढलेली खतमाती मोठया चाळणीतून चाळावी. खाली पडलेले खत वापरण्यायोग्य असते. वर राहिलेला कचरा व गांडुळे परत ढिगा-यात पसरून टाकावीत.
  • झुरळे व मुंग्यांपासून गांडुळांचे संरक्षण करण्यासाठी एक सोपे तंत्र वापरावे. यात हळद+ पीठ मिसळून ढिगा-याभोवती पट्टा तयार करावा.
  • उंदीर, कोंबडी व इतर पक्षी यापासून गांडुळांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.
चार कप्प्याचा हौद

घरगुती गांडुळ खतासाठी चार कप्प्याचा लहान हौद (1 मीटर x 1मीटर x 1 फूट उंच) जास्त उपयुक्त आहे. चित्रात दाखवल्याप्रमाणे वीटकाम करून चार कप्प्यांचा हौद बांधून घ्यावा. याच्या मधल्या भिंती बांधताना विटांमध्ये फटी ठेवाव्यात. यामुळे गांडुळे योग्यवेळी आपोआप पुढच्या कप्प्यात शिरतात. संपूर्ण हौदावर जाळीचे झाकण असले की उंदीर, पक्षी वगैरेपासून संरक्षण होते. वरती सांगितल्याप्रमाणे पहिल्या कप्प्यात थर टाकावेत. यात 1 किलो गांडुळे सोडावीत. गोणपाट टाकून संरक्षण करावे. दिवसाआड पाणी शिंपडावे. याचबरोबर दुसराही कप्पा हळू हळू भरत जावा. याला महिनाभर लागेल. सुमारे 40-45 दिवसांत पहिल्या कप्प्यातील खत पूर्ण तयार होते. याच सुमारास (खाणे संपल्यामुळे) गांडुळे पुढच्या कप्प्यात जात राहतात. त्यामुळे पुढे गांडुळे टाकावी लागत नाहीत.

या पध्दतीने पाळीपाळीने चारही कप्पे वापरात येतात.

गांडुळखताचा वापर

पूर्ण तयार झालेले गांडुळखत लगेच ओळखू येते. ते दाणेदार दिसते. चहा गाळल्यानंतर पत्ती राहते तसे हे खत दिसते. ते बॅगमध्ये भरून विकता येते.

हौद असेल त्याला खालच्या बाजूला तोटी करणे चांगले. अशा हौदात वरून थोडे पाणी टाकले तर हळूहळू तोटीतून पिवळे तपकिरी पाणी बाहेर पडते. हे पाणी वनस्पतींना खूप चांगले असते.

गांडुळखत हे उत्कृष्ट जैविक खत आहे. पुरेसा प्रसार झाला तर त्याला चांगला भाव मिळतो.

सामूहिक कचरा व्यवस्थापन

कचरा कमी निर्माण करणे आणि त्याची योग्य विल्हेवाट लावणे ही प्रगत नागरी व्यवस्थेची पूर्वअट आहे. ग्रामीण आणि शहरी समाजांनी याची यथायोग्य सोय व सवय करुन घ्यायला पाहिजे. भारतात या दोन्हीही ठिकाणी कच-याचे व्यवस्थापन अभावानेच दिसते. गावाच्या बाहेर किंवा गावातही उकिरडे दिसतात. प्लास्टिक कचरा तर जागोजागी आढळतो कारण तो निसर्गात स्वत:हून नष्ट होत नाही आणि मिसळून जात नाही. यासाठी ‘शून्य कचरा’ धोरण चालवायला पाहिजे. निरनिराळया देशांनी यासाठी वेगवेगळी व्यवस्था केलेली आहे. भारतातही निरनिराळया शहरांनी वेगवेगळी प्रारुपे उपयोगात आणली आहेत.

cowshed
gas fuels

ग्रामपंचायती आणि नगरपालिकांचे कचरा व्यवस्थापन हे प्रथम कर्तव्य आहे आणि नागरिकांचीही प्रथम जबाबदारी आहे. आपण स्वत: स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करतो, मात्र परिसर प्रदूषित करतो. सार्वजनिक स्वच्छता ही सांस्कृतिक मूल्य म्हणून भारतीयांनी स्वीकारण्याची गरज आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.