respiratory icon श्वसनसंस्थेचे काही गंभीर आजार श्वसनसंस्थेचे नेहमीचे आजार
दमा

asthma‘दमा’ म्हणजे ‘दम लागणे’ किंवा ‘श्वास लागणे’. लहान मुलांच्या बाबतीत ‘पोट उडणे’, ‘पोटात येणे’ असेही शब्दप्रयोग वापरले जातात. दम लागण्याची कारणे अनेक आहेत.

‘दमा’ या आजारात श्वासनलिका आकुंचनाने अरुंद होऊन श्वासोच्छ्वासाला अडथळा येतो. तसेच नलिकांचे आतील आवरण जाड होऊन त्यात स्त्राव पाझरतो. हा स्त्राव कोरडा व घट्ट होत जातो. त्यामुळे हवेची आतबाहेर ये जा पुरेशा प्रमाणात होत नाही. तसेच फुप्फुसांमध्ये रक्तातल्या वायूंची देवाण घेवाणही होत नाही. त्यामुळे दम लागतो. दमा एक तर पाच वर्षाखालच्या लहान मुलांत येतो. नाही तर विशीनंतर, विशेषतः मध्यमवयात आढळतो. काही मुलांचा दमा तात्पुरता असतो व पाच वर्षानंतर तो बहुधा आपोआप थांबतो. मोठया माणसांचा दमा मात्र हळूहळू वाढत जातो . त्याचे हृदयावरही वाईट परिणाम होतात.

कारणे
  • सामान्यपणे वावडे हे दम्याचे कारण असू शकते.
  • वावडयाची कारणे अनेक असू शकतात. घरातील जुन्या वस्तूंवर वाढणारी बुरशी, घरातील सूक्ष्म कीटक, वनस्पतींचे पराग, रासायनिक प्रदूषण असे अनेक घटक दम्याला कारणीभूत ठरु शकतात.
  • हवामानात बदल (उदा. धूळ, ढगाळ वातावरण, इ.) झाल्यावर ब-याच व्यक्तींना दम्याचा त्रास होतो. वातावरण बदलल्यावर हा दमा कमी होतो.
  • वाढत्या प्रदूषणामुळे शहरांमध्ये दमा विकार वाढत आहे.
  • हृदयविकारामुळे येणारा ‘दमा’ ओळखायला अवघड असतो.
  • आनुवंशिकता- दम्याच्या आजारामध्ये आनुवंशिकता महत्त्वाची असते. बाळदमा असणा-या मुलांचे आईवडील-मामा-काका-आजोबा-आजी यांपैकी कोणास दमा असेल तर हा बाळदमा मोठेपणी टिकण्याची शक्यता असते. तसेच मोठेपणी येणारा दमाही आनुवंशिक असू शकतो.
  • धूम्रपान करणा-या व्यक्तींना दमा जास्त त्रासदायक होतो.
  • काही जणांना आम्लता व अन्ननलिकादाहामुळेही दमा येऊ शकतो.

कारण कसलेही असले तरी दम्यातील मुख्य घटना म्हणजे श्वासनलिका व उपनलिका अरुंद होणे. यामुळे हवेचा पुरवठा कमी होऊन प्राणवायू कमी पडतो. त्यामुळे श्वसनाचे श्रम वाढत जातात आणि श्वसनाचा वेग वाढतो. हवा अरुंद नळयांतून जात असल्याने आवाज (घुंई-घुंई या प्रकारचा) येत राहतो. आवाजनळीने हा आवाज लगेच ओळखू येतो. दम्याचे रोगनिदान यावरच अवलंबून असते.

दम्यामध्ये श्वासनलिका अरुंद होण्याची तीन कारणे घडतात

  • श्वासमार्गातील स्नायू आकसणे.
  • श्वासमार्गातील अस्तर सुजणे,
  • अस्तरातून जास्त स्त्राव पाझरून चिकट बेडके होणे.

यातले स्नायूंचे आकुंचन औषधांनी सैल पडते. तरी इतर दोन कारणे लगेच दूर होऊ शकत नाहीत. म्हणून श्वसनाचा घुंई घुंई आवाज नंतरही तीन-चार दिवस राहतो.

उपचार

आयुष्यात पहिल्यांदाच दमा आला असेल तर फवारा देऊन डॉक्टरकडे पाठवावे. एरवी रुग्णाची अवस्था फार गंभीर नसेल तर गोळयांचा उपचार सुरु करावा. अमिनो किंवा सालमाल या औषधांनी बहुधा दमा कमी होतो. लहान मुलांसाठी याची पातळ औषधे मिळतात. सालमाल औषधाचा श्वासातून घेण्याचा फवारा (स्प्रे) मिळतो. डोस त्यावर लिहिलेला असतो.

फवारा औषधे

spray drugs सालमाल (सालब्युटॉमाल) व इतर दमाविरोधी औषधांचे इनहेलर श्वासावाटे घ्यायचे फवारे मिळतात. एका पॅकमध्ये सुमारे 200 डोस असतात. फवा-याचे तोंड आपल्या तोंडात धरून डोस श्वासावाटे आत घ्यायचा असतो. बाटलीची कळ दाबणे व श्वास आत घेणे हे एकाच वेळी करावे लागते. हे थोडया सवयीने जमते.

मात्र हे जमले नाही तर फवारा-डोस वेगळया बाटलीत सोडून त्याची हवा आत घेता येते. (स्पेसर). फवारा डोसच्या पॅकची किंमत जास्त असते. पण त्वरित परिणाम व माफक डोस यामुळे फवारा सोयीचा पडतो.

गोळयांमध्ये भरलेली पावडर फवा-याच्या वेगळया यंत्रात वापरतात. त्याला रोटाहेलर म्हणतात. ज्यांना इनहेलर वापरण्यास अवघड वाटतो त्यांना रोटाहेलर वापरणे जमते.

या औषधांनी दमा कमी झाला नाही तर इंजेक्शन व इतर उपचारांची गरज लागते. अशा वेळी रुग्णालयात दाखल करणे चांगले.

spray drugs दम्याचे कारण माहीत नसल्याने समूळ उपचार शक्य नसतो. म्हणून जेव्हाजेव्हा दम्याचा त्रास होतो तेव्हा औषधे पुन्हा पुन्हा द्यावी लागतात. शक्यतो कोणते औषध त्या रुग्णाला चालते हे ठरल्यानंतर रुग्णाने घरी त्या गोळयांचा 10-15 दिवसांचा साठा ठेवणे चांगले. फवारादेखील ठेवायला पाहिजे.

शरीरोपचार – फुगा फुगविण्याचा व्यायाम केल्यामुळे श्वासनलिका रुंदावतात.

दमा ओळखून उपचार करण्यासाठी दम्याची पायरी किंवा तीव्रता ओळखावी लागते. यासाठी खाली दिलेल्या काही सूचना उपयुक्त ठरतील.

तीव्र दमा ऍटॅक – व्यक्तीला एक वाक्य पूर्ण करायला देखील 2-3 श्वास घ्यावे लागतात. असा रुग्ण असल्यास श्वसनोपचार देऊन ताबडतोब डॉक्टरकडे पाठवावे. सामान्यपणे दम्याचे 5 टप्पे किंवा पाय-या आहेत.

  • सौम्य – दर आठवडयाला न येणारा दमा, काही तास-दिवस राहणारा दमा, मात्र यामध्ये रुग्ण पूर्णपणे ठीक असतो. IEF श्वसन 80% पेक्षा चांगले असते.
  • उपचार – त्यावेळेपुरते सालमाल फवारा/गोळी द्यावी.

  • सौम्य पण टिकणारा दमा – दर आठवडयास एकदा तरी येणारा. कधी रात्री येऊन झोप उडवणारा असू शकतो. श्वसन PEF 60-80% ठीक.
  • मध्यम दमा, रोज येणारा दमा – आठवडयातून एकदा तरी रात्रीही येतो. श्वसन PEF वरीलप्रमाणे 60-80% ठीक.
  • तीव्र टिकाऊ दमा – सतत चालणारा, मधून मधून वाढणारा, रात्री उठवणारा, शारीरिक मर्यादा आणणारा दमा PEF 60% पेक्षा कमी.
  • तीव्र, अचानक दमा – वर सांगितल्याप्रमाणे बोलणे देखील अवघड होते असा दमा.

दम्यात शरीराची श्वसनसंस्थेची एक प्रकारची कोंडी होते. बरीच हवा श्वसनसंस्थेत – फुप्फुसात अडकून राहते. त्यामुळे फुप्फुसे नीट रिकामी होऊ शकत नाहीत. यामुळे श्वास घेतांना थोडया जागेतच मावणारा श्वास घ्यावा लागतो. परिणामी श्वास व उच्छ्वास (हवा घेणे व टाकणे) खूपच मर्यादित मापाचे होते. या हवेची मोजमापे करण्यासाठी श्वासमापक यंत्रे मिळतात. ‘पीक-फ्लो-मीटर’ हे उपकरण यासाठी उपयुक्त असते.

होमिओपथी निवड

आर्सेनिकम, बेलाडोना, ब्रायोनिया, सीना, चामोमिला, ड्रॉसेरा, हेपार सल्फ, लॅकेसिस, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, नक्स व्होमिका, फॉस्फोरस, पल्सेटिला, -हस टॉक्स,सिलिशिया, स्ट्रॅमोनियम, सल्फर

फुप्फुस सुजेचा दमा

हृदयाचे कामकाज मंदावल्यानंतर देखील ‘दम्यासारखा’ विकार अचानक उद्भवतो. हृदयविकाराचा झटका, झडपांचा आजार, गिरीशिखरावर किंवा 2500 मीटर उंचीवर सवय नसतांना जाणे या करणांनी हा दमा उद्भवतो. यात मुख्य म्हणजे फुप्फुसातल्या पेशींमध्ये द्रवपदार्थ तुंबतो. यामुळे हवेला अडथळा होतो. रुग्ण यामुळे अचानक अस्वस्थ, घाबरा होतो, दम लागतो, खूप घाम येतो, रुग्ण उठून बसतो, तोंडाला फेस येतो, नाडी वेगाने चालते, रक्तदाब वाढतो किंवा उतरतो, आवाजनळीने छाती तपासल्यावर सूक्ष्म बुडबुडयांचे आवाज येतात.

उपचार

रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात हलवावे. अशावेळी इंजेक्शने, ऑक्सिजन, श्वसनोपचार, इ. मदत लागू शकते. प्रथमोपचार म्हणून (उपलब्ध असल्यास) अमिनोफायलिन, फ्रुसेमाईड, मॉर्फिन, इ. इंजेक्शने द्यावी लागतील. हिमालयात सहलीला जाणा-यांनी ही साधने सोबत ठेवावीतच. कोणालाही असा ऍटॅक येऊ शकतो.

शेतकरी कामगारांचा खोकला

निरनिराळया व्यावसायिक कामगारांना त्या त्या वातावरणात प्रदूषण खोकले होऊ शकतात. आपल्या देशात खालील काही स्पष्ट आजार दिसून येतात.

धान्य गोडाऊन मधले कामगार, ओल्या-कुबट वातावरणात काम करणारे शेतकरी, पक्षी हाताळणारे यांना ऍस्पर नावाच्या बुरशीमुळे खोकला येतो व पुढे फुप्फुसांचा दाह होतो.

गिरणी कामगार – निरनिराळे प्रदूषण वायू, धूर, रासायनिक वाफा, निकेल धातू, ऍसबेस्टॉस तंतू, गादी कामगार, कापड कामगार, खाण कामगार, लाकूड मिल, दगड-खडी कामगार, पिठ गिरण्या, मसाला-तिखट दळणारे, तंबाखू-धुळीत काम करणारे कामगार, इ.

या सर्वांना कमी अधिक प्रमाणात साधारणपणे सामान्य लक्षणे दिसतात. खोकला हा अर्थातच प्रमुख लक्षण असतो. छाती दाटून येणे, दम लागणे हे दोन त्रास जाणवतात.

प्रदूषणात काम केल्यावर लगेच हा त्रास सुरु होतो. असा त्रास पूर्वी झालेला नसणे हे रोगनिदानात महत्त्वाचे आहे. काही वेळा प्रदूषण संबंधांनंतर 24 तासांच्या आत त्रास सुरु होतो, आणि कमी-अधिक प्रमाणात टिकून राहतो. कधीकधी 3 महिन्यांपर्यंत त्रास सुरुच राहतो. मात्र काही धुळींच्या बाबतीत आजार काही महिन्यांनंतर येऊ शकतो. (उदा. सिलिकॉसिस)

उपचार म्हणजे प्रदूषणापासून अलग होणे. यासाठी व्यावसायिक आजारांच्या प्रकरणात जास्त माहिती वाचायला मिळेल.

दमा -आयुर्वेद

दमा हा अगदी चिवट आजार आहे. दम्याचा जोर कशामुळे कमीजास्त होतो याची माहिती आवश्यक आहे.

जेवण झाल्यावर लगेच सुरू होणारा दमा कफ दोषामुळे असतो. या दम्यास श्वासकुठार गोळी, वमन या उपायांनी चांगला उतार पडतो. थंड हवा, पेरू, थंड पाण्याची आंघोळ, यांमुळे हा दमा वाढतो.

याउलट जेवणानंतर दोन तासांनी सुरू होणारा आणि सुमारे पाच तास टिकणारा दमा पित्तदोषामुळे येतो. अशा रुग्णांना गार पाणी, पंख्याचा वारा, इत्यादी गोष्टी आवडतात असे आढळते. श्वासकुठार गोळी या दम्यावर लागू पडत नाही. यासाठी 200 ग्रॅम ज्येष्ठमध पुडीवर उकळलेले एक लिटर पाणी ओतून, अर्धातास ठेवून ज्येष्ठमध्यजल तयार करावे. हे कोमट-गरम पाणी थोडयाथोडया वेळाने 100 मिली. दिल्याने अशा रुग्णांना आराम पडतो. (याबरोबरच पित्त कमी होण्यासाठी सूतशेखर गोळी (100मि.ग्रॅ) तीन वेळा दिल्याने चांगला उपयोग होतो.)

संध्याकाळी किंवा पहाटे सुरू होणारा दमा वातप्रकोपाचा असतो. या रुग्णांना श्वासकुठार व कण्टकारी (किंवा वासावलेह) दोन चमचे दोन वेळा तीन-चार दिवसांपर्यंत चालू ठेवावे. याचबरोबर 100 मि.ली गरम दुधात 10-15 मि.ली नारायण तेल मिसळून द्यावे. असे तीन चार वेळा औषध दिल्यास धाप कमी पडते.

दम्यावर योगोपचारांचा चांगला परिणाम होतो. वमन, जलनेति, भस्त्रिका व काही आसने (पश्चिमोत्तासन, सर्वांगासन, हलासन) प्राणायाम यांच्या नियमित आचरणामुळे दमा कमी पडतो.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.