Ayurveda Icon आधुनिक औषध विज्ञान औषध विज्ञान व आयुर्वेद
औषधे – शास्त्र आणि व्यवहार

औषध ही आजच्या जीवनातील आवश्यक बाब झालेली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या खालोखाल वैद्यकीय उपचारांचाच खर्च जास्त आहे. त्यातही सरासरीने औषधांचा खर्च फार मोठा आणि जाचक आहे. डॉक्टर अनेक प्रकारची औषधे लिहून देतात. पुरेसे पैसे नसल्याने बहुतेकांना निम्मीशिम्मी औषधे घेऊनच दुकानातून परत फिरावे लागते. ही सगळी दुरवस्था समजून घेण्यासाठी औषधांचा थोडाफार व्यवहार माहीत होणे आवश्यक आहे.

आवश्यक औषधांची यादी (EDL)

पहिली गोष्ट म्हणजे औषधे आवश्यक आहेत, पण बाजारात मिळणा-या अक्षरशः हजारो औषधांच्या एवढया पसा-याची काही गरज नाही. जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेल्या ‘ आवश्यक औषधांच्या यादीत’ फक्त 300 च्या आसपासच औषधे आहेत.या 300 औषधांत डोकेदुखीपासून कॅन्सरपर्यंतची जवळजवळ सर्व आवश्यक औषधे येतात. आपण प्राथमिक आरोग्यासाठी त्यांतली फक्त 30-40 औषधे वापरणार आहोत. ही यादी करताना औषधांची गुणवत्ता (परिणामकारकता), निर्धोकपणा, उत्पादनमूल्य आणि सोपेपणा या घटकांचा विचार केलेला आहे. ह्या यादीत फक्त ‘मूळ’ औषधांचीच नोंद आहे.

मूळ नावे आणि व्यापारी नावे

Janerek Drugs औषधांना तीन प्रकारची नावे असतात. एक म्हणजे रसायनशास्त्रानुसार असणारे नाव. ते लांबलचक , गुंतागुंतीचे असते. पर्याय म्हणून औषधशास्त्रात तुलनेने सुटसुटीत नाव वापरले जाते याला ‘मूळ’ वा ‘औषधशास्त्रीय’ नाव म्हणू. तिसरे म्हणजे औषध कंपन्यांनी ठेवलेले व्यापारी टोपण नाव. एकच मूळ औषध निरनिराळया टोपण नावांनी उपलब्ध असते. ऍसिटाइल सॅलिसिलीक ऍसिड, ऍस्पिरीन, डिस्प्रिन ही एकाच औषधाची अनुक्रमे रासायनिक, औषधशास्त्रीय व टोपण नावे झाली. व्यापारी नावे (ब्रँड नेम) ठेवण्याचा उद्देश म्हणजे ग्राहकाचा बुध्दीभेद करून जास्त नफा कमावणे. सर्व कंपन्यांनी एकाच मूळ नावाने औषध विकल्यास सर्वांची किंमत ग्राहक सारखीच ठरवतील. (म्हणजे ग्राहक स्वस्त आणि चांगले औषध घेईल). असे होऊ नये म्हणून निरनिराळी नावे ठेवली जातात. वेगळी व्यापारी नावे, आकर्षक वेष्टण, भरपूर किंमत एवढे सगळे ग्राहकांच्या माथी मारण्यासाठी डॉक्टरवर्गाला हाती धरले जाते. भेटवस्तू व सँपलच्या नादाने बहुसंख्य डॉक्टर अशी जास्तीत जास्त औषधे रुग्णांना ‘लिहून’ देतात. यातून नुकसान रुग्णांचे होते.

औषधांबद्दलचे अज्ञान

अनेक औषधांबद्दल डॉक्टरांना पुरेशी माहिती नसते. पुरेसे रोगनिदान न करता जास्तीत जास्त औषधे लिहून मोकळे होण्याची प्रवृत्ती असते. ग्रामीण भागात तर बहुतेक डॉक्टर होमिओपथी किंवा आयुर्वेदाचे असतात. पण ते सर्रास ऍलोपथिक औषधे वापरतात. यातून दुष्परिणाम होतील हे उघड आहे.

सामान्य जनतेला अर्थातच औषधांची कमीच माहिती असते. मुळात गूढतेचे वलय भेदून वैद्यकीय बाबींकडे पाहणे अजून तरी शक्य झालेले नाही.त्यातच आजारांची नावे इंग्रजी, औषधांची नावे इंग्रजीतून, पण बहुसंख्यांना इंग्रजी येत नाही. भरीस भर म्हणून व्यापारी नावाचा उपयोग; या सर्वातून बिचारे रुग्ण डॉक्टरांनी दिलेली औषधे मुकाटयाने घेतात. यामुळे अनेक प्रकारचे दुष्परिणामही रुग्णांना भोगावे लागतात.

औषधांचा आवाजवी मारा

Drugs Hit कित्येक वेळा किरक़ोळ आजारांवरही सहा-सात औषधे दिलेली आढळतात. प्रतिजैविके (जंतुविरोधी औषधे), टॉनिके (जीवनसत्त्वे,क्षार, इ.) यांचा गैरवापर तर फार होतो. टॉनिकांचा एकूण भरमसाठ उपयोग अनावश्यक आहे. त्या किंमतीत रुग्णाला महिनाभर रोज एखादे अंडे वा पौष्टिक पदार्थ सहज घेता येईल. टॉनिकपेक्षा हा पर्याय अनेकपटींनी श्रेष्ठ आहे. खोकल्याच्या औषधांचाही असाच गैरवापर होतो.

आपल्याकडे अशास्त्रीय मिश्रणे, बंदी घातलेली औषधे वापरली जातात. ज्या कारणांसाठी औषध सांगितले आहे त्यापेक्षा वेगळयाच कारणांसाठी त्या औषधांचा गैरवापर होतो असेही आढळते. इंजेक्शने आणि सलाईनचा सर्रास गैरवापरही असाच वाईट आहे.

किमती

भारतातील बहुतेक औषधांच्या फार्म्युल्यांचे उत्पादन हे आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या हाती आहे. किंमतीच्या बाबतीत केंद्र शासन दुबळेपणाने वागते. त्यामुळे आवश्यक औषधांची मनमानी किंमत ठरवून अव्वाच्या सव्वा फायदा उकळणे हे कंपन्यांना सोपे आहे. अशा औषधांवर शंभर-दोनशे टक्के नफा सर्रास घेतला जातो. योग्य नफा घेऊन स्वस्त किमतीतही औषधे उपलब्ध करता येतात, हे काही भारतीय संस्थांनी प्रत्यक्ष दाखवून दिले आहे. (उदा. लो कॉस्ट ही बडोद्याची संस्था).

औषधवापराने निर्माण झालेले प्रश्न : औषधांच्या व्यवहारामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत ते असे :

  • वैद्यकीय स्वरूपाचे प्रश्न : उदा. स्त्रीसंप्रेरकांच्या वाढत्या वापराने स्त्रियांच्या आरोग्यावर दुष्परिणाम, औषधांनी गर्भावर दुष्परिणाम, जंतुविरोधी औषधांच्या गैरवापराने जंतूंमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होणे, इत्यादी.
  • अवाजवी किंमतींमुळे जनतेस पुरेशा व योग्य औषधोपचारांपासून वंचित राहावे लागणे आणि आर्थिक नुकसान.
  • औषधउद्योगांवर ग्राहकांचा व सरकारचा वचक नसल्याने निरर्थक औषधांचा पूर, तर आवश्यक औषधांचा तुटवडा कायम राहणे.
आपण काय करू शकतो?

या प्रश्नांवर सरकार, वैद्यकीय व्यवसाय करणारा वर्ग व जनता या सर्वांनीच अंकुश आणायला पाहिजे. अनेक संस्था त्यासाठी काम करीत आहेत. आपणही काही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, ती अशी :

  • रोगनिदान करूनच औषधोपचार करण्यासाठी आग्रह करणे.
  • अपुरा औषधोपचार न करणे. आजाराचे दुष्परिणाम लक्षात घेऊन सुरक्षितपणे औषधांचा वापर करणे.
  • रुग्णांनी औषधांची पुरेशी माहिती घेणे. यासाठी आरोग्यशिक्षण महत्त्वाचे आहे.
  • शक्यतोवर स्थानिक परंपरागत उपचारांचा वापर करणे. हा भाग फार महत्त्वाचा आहे. कित्येक आजारांत हे स्थानिक उपचार आधुनिक उपचारांपेक्षा सरस ठरतात. केवळ स्वस्त आहे म्हणून ही व्यवस्था दुय्यम ठरत नाही.
  • लोकांना स्वस्त, निर्धोक व आवश्यक औषधांचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी औषध चळवळीला मदत करणे.
  • टॉनिके, इंजेक्शने, सलाईन, इत्यादींच्या वाढत्या वेडाला आळा घालण्यासाठी लोकशिक्षण करणे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.