blood institute diseases icon रक्ताभिसरण संस्थेचे आजार रक्तसंस्थेचे आजार
हृदयविकार

Excess Fat हृदयविकार हा शब्दप्रयोग आपण अनेक वेळा ऐकला असेल. हृदयविकार हे नाव फार ढोबळ आहे. कारण ‘विकार’ म्हणजे ‘आजार’. हृदयविकाराचा झटका म्हणजे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांमधून रक्तप्रवाह कमी किंवा बंद होणे यामुळे संबंधित भागातल्या स्नायूंचे पेशीसमूह मरतात. हे अचानक होत असल्याने त्याला ‘झटका’ असा शब्द पडला आहे. हृदयस्नायूचा जास्त भाग निकामी झाला तर हृदयक्रिया बंद पडून रुग्ण दगावण्याची शक्यता असते.

हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणा-या स्वत:च्या रक्तवाहिन्या (रोहिण्या) असतात. हृदयाच्या स्नायूचे दर मिनिटाला सुमारे 70 वेळा आकुंचन-प्रसरण होत असते. हे काम शरीरातल्या इतर कोठल्याही स्नायूपेक्षा जास्त जोरकसपणे, सातत्याने आणि नियमितपणे करावे लागते. हृदयाच्या स्नायूंना रक्तप्रवाहामार्फत प्राणवायू पुरवण्याचे काम काही क्षण जरी बंद पडले तरी हृदय बंद पडू शकते. त्यामुळे हृदयक्रिया दोन-तीन मिनिटे जरी बंद झाली तरी मेंदूचे कामकाज थांबून मृत्यू ओढवू शकतो.

भारतात हृदयाच्या आजारांमध्ये झडपांच्या दोषाखालोखाल याच आजाराचा क्रम लागतो. सुधारलेल्या देशांत तर हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. आपल्या देशातील श्रीमंत समाजातही असेच चित्र दिसते. सर्वसाधारणपणे हा आजार चाळिशी – पन्नाशी- साठी या वयोगटांत जास्त प्रमाणात येतो. स्त्रियांमध्ये याचे प्रमाण कमी आहे. स्थूलता, बैठे काम, अतिरक्तदाब, मधुमेह, तंबाखू व धूम्रपानाचे व्यसन असल्यास हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

कारणे

Smoking हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांत चरबीचे थर जमतात. यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. रक्तपुरवठा कमी झाला, की थोडया श्रमाने देखील हृदयाला प्राणवायू कमी पडायला लागतो. जेव्हा हृदयाला जास्त कामाची गरज लागते त्या वेळी (उदा. व्यायाम, थंडीचे वातावरण, भीती भावना अनावर होणे, इ.) ही कमतरता जाणवू लागते. प्रत्यक्ष हृदयविकाराचा झटका येण्याच्या आधी बरेच दिवस रक्तवाहिन्यांमधील दोष सुरू झालेले असतात. हृदयाचा रक्त पुरवठा खंडित होण्यामागे कारणे असू शकतात.

 • कॉरोनरी म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यात चरबीचे थर जमून त्या आतून गंजतात व अरुंद होतात. रक्तामध्ये चरबीचे प्रमाण वाढणे आणि धूम्रपान ही यामागची दोन प्रमुख कारणे आहेत.
 • अति रक्तदाबामुळे हृदयावर जादा लोड/दबाव येतो त्यासाठी लागणारा हृदयाचा रक्तप्रवाह कमी पडतो.
 • कधीकधी भावनिक ताण (राग, भीती) अचानक येऊन कमकुवत हृदय बंद पडते. (सिनेमात असे प्रसंग नेहमी असतात.)
 • शक्यतेपेक्षा अधिक श्रम व जोर लावणे, काम/व्यायाम करणे. विशेष करून थंडीच्या वातावरणात असे केल्यामुळे रक्तपुरवठयाची वाढीव मागणी पूर्ण करता न आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
 • रक्ताच्या बारीक गाठी हृदय-रक्तवाहिन्यात अडकून प्रवाह बंद पडणे.
हृदयवेदना

रक्तपुरवठा काही सेकंद कमी पडला आणि परत चालू झाला तर हृदयाच्या जागी नुसती वेदना जाणवते. ही वेदना अगदी खोल घुसणारी, प्रचंड दाब असल्यासारखी जाणवते. या वेदनेला आपण हृदयवेदना असे म्हणू या. ही अगदी तीव्र कळ असते. या ‘हृदयवेदनेची’ विशिष्ट जागा, स्वरूप यांवरून ती ओळखता येते. या अवस्थेत रुग्णाला योग्य उपचार व विश्रांती मिळाल्यास पुढचे नुकसान थोडे तरी टळू शकते.

रक्तपुरवठा कमी किंवा बंद अशा अवस्थेत जास्त वेळ गेला तर हृदयाच्या संबंधित स्नायूच्या पेशी मरतात. मग ही वेदना दोन तीन दिवस तशीच राहते.

त्याचबरोबर दम लागणे, घाबरे होणे, छातीत धडधडणे, (किंवा नाडीचे ठोके कमी पडणे), खूप घाम, इत्यादी लक्षणे दिसतात.

जर हृदयाच्या स्नायूंचा मोठा भाग निकामी झाला असेल तर हृदयक्रिया बंद पडून मृत्यूही येऊ शकतो. काही वेळा झोपेत किंवा विश्रांतीतही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

रक्तपुरवठा बंद पडून मृत झालेल्या स्नायूंचे पाच-सहा आठवडयांत एका वेगळया प्रकारच्या चिवट पेशीमध्ये रुपांतर होते. तो भाग जोडपेशींनी भरून येतो. म्हणजे जखम भरून आल्यावर जो पांढरट सांधणारा भाग दिसतो तसा प्रकार होतो. ह्या भागाची स्नायूंप्रमाणे हालचाल होत नाही, पण हृदयात इतर उरलेल्या स्नायूभागांची वाढ होऊन काम चालू राहते.

एकदा हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर तो परत येण्याची शक्यता असते.

रोगनिदान

Heart Attack पहिल्यांदा हृदयविकाराचा हा त्रास होतो तेव्हा ओळखण्यासाठी हृदयवेदनेची जागा व स्वरूप महत्त्वाचे असते.

 • ही कळ छातीच्या मध्यभागापासून निघून डाव्या हाताच्या छातीलगतच्या बाजूला येते. याच्याबरोबर दम लागणे, घाम, इत्यादी त्रास असतो.
 • कधी कधी छातीत नुसतीच जळजळ किंवा खूप दम लागणे, पाठीकडे खूप दुखणे अशा प्रकारची लक्षणे दिसतात.
 • काही जणांना काहीही लक्षण न जाणवताही हृदयविकाराचा झटका येतो (पण ते जाणवत नाही). निदान होण्यासाठी तज्ज्ञाकडून तपासणी आवश्यक आहे.
 • हृदयाचा आलेख (इसीजी) यांच्या मदतीने निदान होते. इसीजी म्हणजे हृदयाच्या सततच्या सूक्ष्म विद्युतप्रवाहांचा आलेख असतो. या आलेखातील बदलांवरून इतरही काही निष्कर्ष काढता येतात (उदा. हृदयाचा आकार, निरनिराळया कप्प्यांचे परस्पर संबंध, इ.).
 • रक्ततपासणीमध्ये काही विशिष्ट द्रव्ये वाढलेली दिसतात.
हृदयविकारामध्ये केल्या जाणा-या तपासण्या

Asthma Heart Disease 1. ECG कार्डिओग्राम – ह्या तपासणीमध्ये रुग्णाच्या दोन हात (मनगटे), दोन पाय (घोटे) व छातीवर इलेक्ट्रोडस् जोडतात. हृदयाच्या क्रिया या हृदयात सौम्य स्वरुपात निर्माण होणा-या विद्युतप्रवाहाने चालतात. या क्रियेचा आलेख म्हणजे ECG. हृदयविकाराचा झटका, हृदयाच्या तालबध्दतेत निर्माण झालेले दोष, हृदयाच्या कप्प्यांमध्ये निर्माण झालेले दोष, इ. माहिती या तपासणीत मिळते.

2. स्ट्रेस टेस्ट – यात रुग्णास इलेक्ट्रोडस् लावून एका फिरणा-या पट्टयावर चालवतात व एकीकडे त्याचा ECG घेत असतात. व्यायामामुळे हृदयावर कामाचा बोजा वाढल्यावर स्थिर अवस्थेत न सापडलेले दोष स्ट्रेस टेस्ट मध्ये सापडतात.

3. स्ट्रेस थॅलियम/परफ्यूजन टेस्ट – यात रेडिओऍक्टिव्ह पदार्थ इंजेक्शनद्वारे रक्तात देतात व हृदयामध्ये त्याचे चलनवलन बघतात.

4. ऍंजियोग्राफी – हृदयविकारामध्ये ही तपासणी करतात. हृदयाच्या रक्तवाहिन्या सक्षमतेने काम करतात की नाही हे यात समजते. रक्तवाहिन्या अरुंद झाल्यास हृदयविकाराचा धोका असतो. त्यामुळे एक किंवा अधिक रक्तवाहिन्या तुंबल्या असतील तर त्यानुसार ऍंजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरीची जरुरी लागते.

हृदयविकाराच्या झटक्यावरचा उपचार रुग्णालयात, तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच करावा लागतो. रुग्णालयातही असे रुग्ण दगावण्याचे प्रमाणही बरेच असते.

प्रथमोपचार

Angiography हृदयविकाराचा झटका येण्याआधी अनेक रुग्णांमध्ये हृदयविकाराची लक्षणे दिसून येतात. यामध्ये जरा चालल्यावर छातीत मध्यभागी दुखणे, छातीवर दाब आल्यासारखे, घुसमट झाल्यासारखे वाटणे, इ. अशा त्रासावर एक अत्यंत प्राथमिक उपयुक्त साधन म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्या सैल व रुंद करून रक्तप्रवाह सुधारणारे एक औषध-नायट्रेटची गोळी. हृदयवेदना आल्याआल्या ही गोळी लगेच जिभेखाली धरावी. काही सेकंदात औषध विरघळून जिभेखालच्या केशवाहिन्यांत शिरून रक्तात पसरते. रक्तावाटे हृदयाच्या रक्तवाहिन्यांत औषध पोचून तिथला रक्तपुरवठा सुधारतो. याबरोबर वेदना कमी होते. यावरून वेदना हृदयविकाराची आहे हे निश्चित कळते. त्याबरोबरच पुढील नुकसान टळते व हृदयपेशी तग धरू शकतात. त्याचबरोबर वेदना सुरु झाल्यापासून रुग्णास झोपवून ठेवावे. कमीत कमी हालचाल करु द्यावी. पुढील सल्ल्यासाठी तज्ज्ञाकडे पाठवावे. हृदयविकाराची शक्यता क्वचित असली तरी ही अत्यंत स्वस्त असलेली गोळी नेहमी जवळ ठेवावी. यामुळे वेळप्रसंगी कोणालाही अत्यंत मोठी मदत होऊ शकेल. हृदयविकाराच्या रुग्णांनीही ही गोळी सदैव जवळ बाळगण्याची गरज आहे. या गोळीने रुग्णास जीवदान मिळू शकेल.

या गोळीबरोबरच ऍस्पिरिनची एक गोळी चूर्ण करून पाण्यात मिसळून लगेच द्यावी. यामुळे रक्त जास्त प्रवाही होते व नुकसान टळते. यासाठी ऍस्पिरिनच्या लहान गोळया मिळतात.

उपचार

एकदा हृदयविकार झाला, की त्याचे परिणाम व पुढचे सर्व उपचार अत्यंत अवघड असतात. कधी रक्तवाहिन्या इतक्या निकामी होतात, की रक्तवाहिन्यांवर प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करून रक्ताला नवीन वाट करून देणे किंवा आतली चरबी खरवडून काढणे हेच उपाय उरतात. याशिवाय परत हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून सतत गोळया घेत राहावे लागते.

प्रतिबंध

हृदयविकाराचे प्रमाण श्रीमंत-प्रगत समाजात वाढत आहे. अतिरक्तदाब हे हृदयविकाराचे एक महत्त्वाचे कारण आहे. दुसरे म्हणजे मांसाहारी जेवणाचा अतिरेक, चरबीयुक्त पदार्थ खात राहणे, वनस्पती तूप, इत्यादींमुळे रक्तातले चरबीचे प्रमाण वाढत जाते. हे चरबीचे थर रक्तवाहिन्यांत जमत जातात. हे या आजाराचे मुख्य कारण आहे.

आहारावर नियंत्रण, शारीरिक कष्ट-व्यायाम आणि मानसिक आरोग्य या मार्गांनीच हृदयविकार टाळता येतील.

योग्य आहार-विहार, तंबाखू, धुम्रपान टाळावे. उचित व्यायाम आणि मानसिक संतुलन याद्वारे हृदयविकार टाळता येतात. तसेच असलेला आजार हळूहळू बरा करता येतो. याबद्दल अगदी थोडक्यात पाहू या.

आहार

आहारात चरबी/तेल कमीतकमी वापरणे, कमी खाणे हे महत्त्वाचे. प्राणिज चरबी (मांसाहार, अंडे, इ.) वनस्पती तूप, बरीच तेले ही हृदयास हानीकारक असतात. त्यांचा वापर मर्यादित करावा किंवा टाळावाच. सोबत चांगली, मध्यम, वाईट तेलांचा एक तक्ता दिला आहे. मांसाहार टाळावा हे चांगले.

श्रमाच्या व कष्टाच्या मानाने खाणे योग्य असावे. सर्व जादा अन्न शरीरात चरबीच्या रुपात साठते.

भाज्या, फळे यांत चोथा जास्त, ऊर्जा कमी असते. असा आहार जास्त चांगला ठरतो.

व्यायाम

व्यायामाची मूलतत्त्वे वेगळया प्रकरणात दिली आहेत. इथे एवढे सांगणे पुरेल की निदान रोज किमान अर्धा तास चालणे हे अशा रुग्णांना आरोग्यासाठी आवश्यक आहे.

मानसिक आरोग्य

आत्यंतिक राग, द्वेष, कुढणे, इ. भावना हृदयाला हानिकारक आहे. निरनिराळया मार्गांनी त्यावर मात करा. योग-आसनांचा आणि श्वसन, प्राणायाम, योगनिद्रा, इत्यादी उपायांचा फार चांगला उपयोग होतो.

हृदयविकार होऊ नये म्हणून सर्वोत्तम तेलांचे मिश्रण किंवा प्रमाण असे : गोडेतेल/सूर्यफुल/करडई/शिरस हे पाच भाग आणि मोहरी किंवा सोयाबीन तेल यांचा एक भाग. ही तेले मिसळण्याची गरज नाही; आलटून पालटून वापरू शकतो. उदा. न्याहरीच्या वेळी मोहरी/करडई/ शिरस किंवा सोया; तर दुपारच्या व रात्रीच्या स्वयंपाकात गोडेतेल/सुर्यफुल/करडई, इत्यादी.

ऍंजिओप्लास्टी

Heart Mild Oil हृदयाच्या रक्तवाहिन्यांची कॅथेटर (नळीतून) दुरुस्ती करण्याचे तंत्र विकसित झाल्यापासून या रुग्णांना मोठे वरदान मिळाले आहे. ही संपूर्ण शस्त्रक्रिया क्ष-किरण यंत्रावर सतत पाहिली जाते. या शस्त्रक्रियेसाठी मांडीच्या किंवा दंडाच्या शुध्द रक्तवाहिनीतून नळी घातली जाते. या नळीतून आणखी एक वायर/तार घातली जाते. नळीतून मधून मधून क्ष-किरण चित्रात दिसेल असा द्रवपदार्थ सोडला जातो. अडथळयांची जागा यामुळे स्पष्ट कळून येते. हा अडथळा काढण्याजोगा असेल तर तारेने खरडून साफ केला जातो. यानंतर त्या ठिकाणी स्टेंट म्हणजे धातूची स्प्रिंग ठेऊन रक्तवाहिनी खेळती ठेवली जाते. या स्प्रिंगमध्ये औषधयुक्त प्रकार उपलब्ध आहे. या औषधाने तिथे रक्ताची गाठ होणे टळते. ही शस्त्रक्रिया केल्यावर 2/3 दिवस रुग्णालयात राहावे लागते व रक्त पातळ ठेवण्याचे औषध घेत राहावे लागते. आजाराचे स्वरुप मर्यादित असेल तर ही ऍंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया चालते. हृदयाच्या तीनही रक्तवाहिन्या जागोजागी खराब झाल्या असतील तर या उपचारांचा उपयोग नसतो. (अशावेळी बायपास शस्त्रक्रिया करावी लागते.) या उपचारांचा एकूण खर्च स्टेंट धरून 60-70 हजारापर्यंत येतो. केवळ ऍंजिओग्राफी (म्हणजे अडथळा निदान) केल्यास आठ ते दहा हजार खर्च येतो. ऍंजिओग्राफीत अडथळा दिसून आल्यास त्याच वेळी दुरुस्तीची ही शस्त्रक्रिया पार पाडता येते. यामुळे त्रास, खर्च व वेळ वाचतो. मात्र यात काही प्रमाणात धोकाही असतो.

बायपास शस्त्रक्रिया

हृदयाची एखादी रक्तवाहिनी अनेक ठिकाणी खराब झाली असेल, किंवा तीनही रक्तवाहिन्या खराब झाल्या असतील तर बायपास शस्त्रक्रिया करावी लागते. गर्दीच्या कोंदट रस्त्याला जसा बायपास (वळणरस्ता) काढला तसा हा बायपास असतो. यात मूळ रक्तवाहिनीला शरीरातली पायाची नीला किंवा छातीतली एक ‘जादा’ रक्तवाहिनीचा तुकडा जोडला जातो. यानंतर रक्तप्रवाह या जोडवाहिनीतून जातो. या शस्त्रक्रियेसाठी कृत्रिम हृदयपंपाची मदत लागू शकते. शस्त्रक्रिया करण्यासाठी छातीच्या मधोमध छेद घेऊन हृदयापर्यंत जावे लागते. या शस्त्रक्रियेचे तंत्र आता चांगले विकसित झाले असून अनेक शहरांमध्ये सुसज्ज रुग्णालये सेवा देत आहेत. याचा खर्च अंदाजे दीड लाखाच्या आसपास जातो. यासाठी 10-12 बाटल्या रक्ताची गरज लागते. या शस्त्रक्रियेने रुग्णाचे आयुष्यमान वाढते आणि कार्यक्षमता टिकून राहते. मात्र ही रोगप्रक्रिया चालूच असल्याने जोडवाहिन्याही कालांतराने खराब होतात. अनेक रुग्णांना काही वर्षांनी दुसरी बायपास शस्त्रक्रिया लागू शकते.

हृदयविकार

आपण प्रत्येकाने हृदयविकाराच्या झटक्याबद्दल ऐकलेले असते. हृदयविकाराचे प्रमाण वाढतच आहे, आता तरुण वयातही हा आजार होऊ लागला आहे. हृदयविकाराचा झटका अचानक येतो. काही जण सुरुवातीसच दगावतात. आणि काही तर झोपेतच जातात. काही जणांना हॉस्पिटलमध्ये मृत्यू येऊ शकतो तर काही लोक जगतात पण बरेच खर्चिक उपाय करावे लागतात. खरं म्हणजे हृदयविकार टाळता येतो. झटका यायच्या आधी हृदयविकार ओळखतापण येतो. म्हणूनच ही माहिती लक्षात ठेवा आणि इतरांना सांगा.

हृदयविकाराची कारणे

हृदयाच्या रक्तवाहिन्या खराब होणे, अतिरक्तदाब ही हृदयविकाराच्या झटक्याची मुख्य कारणे आहेत. कधीकधी हृदयाच्या रक्तवाहिन्यात गुठळ्या अडकून झटका येतो.

 • रक्तवाहिन्या चरबीच्या थरांनी खराब होतात. पाण्याचे नळ जसे गंजतात तसेच हे असते. यामुळे हृदयाला स्वत:लाच रक्तप्रवाह कमी पडतो. विश्रांतीत एकवेळ हे चालू शकते. पण अतिश्रम, अतिथंडी किंवा मानसिक ताणतणावात रक्तप्रवाहाची मागणी वाढते. अशा वेळी पुरवठा कमी पडून झटका येतो.
 • रक्तप्रवाह कमी पडल्याने हृदयाचा संबंधित स्नायूभाग मरतो. मरणारा स्नायूभाग जास्त असेल तर हृदय बंद पडते, अन्यथा चालू राहते. हृदयाला मुख्य तीन रक्तवाहिन्या असतात. यातील कोठली रक्तवाहिनी आणि किती अडलेली आहे यावर बरेच अवलंबून असते.
 • रक्तवाहिन्यांचा आजार आणि अतिरक्तदाब हे कायमचे आजार असतात. अतिखाणे, तेलतूप जास्त खाणे, मधुमेह, बैठे जीवन, धूम्रपान, ताणतणावाचे जीवन, लठ्ठपणा आणि काही प्रमाणात आनुवंशिकता ही त्याची कारणे आहेत. पूर्वी हा आजार चाळीशीत सुरू व्हायचा. तो आता विशी-तिशीतच सुरू होतो.
लक्षणे
 • काही जणांना हृदयविकाराच्या झटक्याची वेदना जाणवते तर काही जणांना काहीच जाणवत नाही. कार्डिओग्राम काढताना काही जणांना जुना हार्ट ऍटॅक आलेला दिसून येतो. याउलट काही जण झोपेतच हृदयविकाराने मृत्यू पावतात. पहिल्या झटक्यातच काहीजण दगावू शकतात.
 • हृदयविकाराची वेदना छाती, खांदा, बेंबीच्या वरच्या भागात, पाठीत किंवा वर जबड्यापर्यंत कोठेही जाणवते.
 • रुग्णाला दम लागतो, घाम आणि धडधड जाणवते. नाडी वेगाने चालते किंवा कधीकधी संथ चालते.
 • रक्तदाब कमी झाल्याने कधीकधी घेरी येऊन माणूस पडतो.
प्राथमिक उपचार आणि पाठवणी

रुग्णाला आडवे पडून राहायला सांगा, दोन्ही पायांखाली आधार देऊन पाय उंचवा. यामुळे रक्तप्रवाह हृदय व मेंदूकडे जास्त वळतो.

 • रुग्णाला शांत राहायला आणि संथ श्वसन करायला सांगा.
 • कपभर पाण्यात ऍस्पिरीनची गोळी विरघळून प्यायला द्या.
 • नायट्रोग्लिसरीनची गोळी जिभेखाली धरायला द्या.
 • प्राणवायूचे सिलींडर असेल तर मास्क लावून द्या.
 • नाडी आणि शुद्ध तपासा. नाडी लागत नसेल तर कृत्रिम हृदयक्रिया-श्वसन द्यावे लागेल. यासाठी कोणी मदतीला असल्यास बोलवा.
 • रुग्णवाहिकेतून रुग्णालयात न्या. काही शहरात हृदयविकारासाठी खास कार्डिऍक ऍम्ब्युलन्स असते.
 • संबंधित वैद्यकीय तज्ज्ञाला फोन करून कल्पना द्या. रुग्णाचे नाव पत्ता माहीत नसल्यास शोधा आणि नातेवाइक, मित्रांना कळवा.
 • वैद्यकीय विम्याबद्दलपण चौकशी करून घ्या.
रुग्णालयातले तातडीक निदान
 • कार्डिओग्राममुळे अडलेली रक्तवाहिनी आणि बाधित स्नायूभागाचा अंदाज येतो.
 • रक्तातील काही एन्झाईम –म्हणजे किण्वे–यांची पातळी वाढलेली असते.
 • कॉरोनरी सिटीस्कॅन असेल तर अडलेली रक्तवाहीनी स्पष्ट समजू शकते.
 • एको कार्डिओग्रामने हृदयाच्या कप्प्यातील रक्तप्रवाह समजतो.
तातडीक उपचार

उपचारांसाठी वय, रक्तप्रवाह किती अडला आहे, मधुमेह इ. घटकांचा विचार करावा लागतो.

 • रक्तवाहिनीतील गुठळी विरघळण्यासाठी औषध लागत असल्यास 2 तासांत ते द्यावे लागते. हे औषध खर्चिक पण उपयुक्त आहे.
 • तातडीक एन्जिओग्राफीचा खर्च सुमारे 10 हजार पर्यंत येतो.
 • काही रुग्णांना एन्जिओप्लास्टीची गरज भासते. एन्जिओप्लास्टीचा खर्च स्टेंटवर अवलंबून असतो.
 • काही रुग्णांमध्ये बायपास शस्त्रक्रिया लागते. यात अडलेल्या रक्तवाहिनीला पर्यायी मार्ग म्हणून शरीरातील रक्तवाहिनीचा तुकडा लावला जातो. ही शस्त्रक्रिया अर्थातच खर्चिक आहे. शस्त्रक्रिया तातडीक की पूर्वनियोजित आहे यावर याचे कमीजास्त यश अवलंबून असते.
प्रतिबंध
 • मधुमेह आणि अतिरक्तदाब या आजारांना दूर ठेवा. शरीरभार आणि कंबर-नितंब गुणोत्तर संतुलित राखा.
 • जीवनशैली निरोगी ठेवण्यासाठी आहार, ताणतणाव, शारीरिक श्रम, झोप हे महत्त्वाचे घटक आहेत. धूम्रपान अतिशय घातक आहे.
 • फळे, भाजीपाला, लिंबू, लसूण, हळद आणि योग्य तेलांचा वापर करा.
 • आठवड्यातून निदान चार दिवस दमसांस म्हणजे ऐरोबिक प्रकारचे व्यायाम करा.
 • योगासनेही चांगली असली तरी दमसास व्यायामांना पर्याय नाही.
हृदयवेदना उर्फ अंजायना

प्रिय मित्रांनो आपण आता हृदयवेदनेबद्दल जाणून घेऊ या. छातीचे प्रत्येक दुखणे हे काही हृदयाचे नसते. छातीत दुखण्याची अनेक कारणे आहेत. – उदा. स्नायू किंवा बरगड्यांना इजा, जठरातील आम्लता, न्यूमोनिया आणि हृदयविकार. ही वेदना साध्या दुखण्यापासून तीव्र कळेपर्यंत कोणत्याही स्वरूपाची असू शकते. हृदयवेदना म्हणजे खरे तर हृदयविकाराचा पहिला टप्पा असतो. हृदयवेदनेचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे विशिष्ट श्रमाने निश्चितपणे जाणवणारी म्हणजे सश्रम हृदयवेदना. ही वेदना आणि विश्रांतीने थांबते. दुसरा प्रकार विश्रांतीतही होणारी म्हणजे विनाश्रम हृदयवेदना. हा दुसरा प्रकार आजाराची म्हणजे पुढची पायरी असते.

हृदयवेदनेची कारणे

हा आजार हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधे साठलेल्या चरबीच्या थरामुळे होतो. यामुळे रक्तप्रवाह कमी पडतो. विश्रांतीत हे चालून जाते पण श्रमाने वेदना जाणवते. रक्तवाहिनीतला अडथळा अधिक मोठा असेल तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. शास्त्रीयदृष्ट्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आजारांच्या 6 पायऱ्या आहेत. सश्रम हृदयवेदना ही त्यातली पहिली आहे.

रोगनिदान

विशिष्ट श्रम किंवा भावनिक ताण, अतिथंडी, जास्त जेवण किंवा धूम्रपानानंतर सश्रम हृदयवेदना जाणवते. वेदना अर्धा ते 5 मिनिटे टिकते. याची जागा छातीच्या डाव्या बाजूस असते.

ही वेदना त्या बाजूचा खांदा, हात, मानेचा भाग, जबडा तसेच पाठीकडे आणि बेंबीकडे घुसल्यासारखे वाटते. पण ही वेदना वरती जबडा किंवा खाली बेंबी यांच्या पलीकडे जात नाही.

ही वेदना विश्रांतीने आणि नायट्रोगिलसरीन औषधाने थांबते हे महत्त्वाचे.

प्राथमिक उपचार

ताबडतोब विश्रांती आणि नायट्रोग्लिसरीन यामुळे वेदना थांबते. धीराने घेणे महत्वाचे असते.

यासाठी नायट्रोग्लिसरीन गोळी किंवा फवारा जिभेखाली द्यावा. यामुळे 2-5 मिनिटांत वेदना थांबते. या औषधाने रक्तवाहिन्या विस्फारून रक्तप्रवाह सुधारतो. अशा रुग्णाने हे औषध कायम बरोबर बाळगावे.

या औषधाची चिकटपट्टीपण मिळते.

कपभर पाण्यात विरघळणारी ऍस्पिरीन गोळी सोडून ते पाणी प्यावे. यामुळे रक्त पातळ आणि प्रवाही राहते.

वैद्यकीय उपचार

हृदयवेदना ही हृदयविकाराचीच प्राथमिक पायरी आहे. म्हणून आपल्या डॉक्टरांना वेळीच कळवले पाहिजे. आवश्यक वाटल्यास रुग्णालयात दाखल व्हा.

वैद्यकीय सल्ल्यानुसार कार्डिओग्राम, स्ट्रेस टेस्ट, इको टेस्ट किंवा एन्जिओग्राफी करावी लागेल.

रक्तवाहिनीत अडथळा मोठा असेल तर एन्जिओप्लास्टी किंवा हृदयाची बायपास शस्त्रक्रिया देखील करावी लागेल.

प्रतिबंध

निरोगी आहार विहार, एरोबिक व्यायाम, धूम्रपान आणि ताणतणावापासून दूर राहणे, रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण, वजन आटोक्यात ठेवणे या एकत्रित उपायांनी हृदयविकार टाळता येतो.

एकदा हृदयवेदना जडली की झटका येऊ नये म्हणून बरीच काळजी घ्यावी लागते. नायट्रोग्लिसरीन हा केवळ प्राथमिक उपचार आहे. पुढचा धोका टाळण्यासाठी योग्य तपासण्या करायला पाहिजेत.

विशेष सूचना

कोणतीही हृदयवेदना असली तरी धावपळ न करता आणि घाबरून न जाता एका जागी शांत राहावे. यामुळे हृदयाला आहे त्या रक्तप्रवाहाचा नीट उपयोग करता येईल.

आपली प्रथमोपचाराची औषधे नेहमी बरोबर ठेवा. आपला रक्तदाब आणि रक्तातील साखर यावर लक्ष असू द्या.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.