Health Service राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आरोग्य सेवा
जननी सुरक्षा योजना

Delivery travelling to Hospital या योजनेतून सुरक्षित प्रसूतींचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ही योजना मुख्यत: गरीब व मागासवर्गीय कुटुंबांसाठी आहे. या योजनेचा तपशील या प्रकरणाच्या शेवटी दिला आहे.

आरोग्य विमा योजना

Modern Ambulance भारतातला आरोग्यावरचा बहुसंख्य खर्च लोक स्वत:च्या खिशातून करतात. यासाठी वेळप्रसंगी लागेल त्याप्रमाणे खर्च करावा लागतो. मात्र यासाठी चीजवस्तू विकणे किंवा कर्ज काढावे लागते. असे होऊ नये म्हणून आरोग्य विमा योजना उपयोगी आहेत. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला काही ठरावीक रक्कम देऊन आरोग्यसेवांचा विमा विकत घेता येतो. ग्रामीण आरोग्य मिशनमार्फत अशा आरोग्य विमा योजनांचा प्रसार व्हावा अशी योजना आहे. मात्र यासाठी थोडा निधी दिलेला आहे. गरीब कुटुंबांचा विमा उतरवण्यासाठी निधी उपलब्ध करावा लागेल. पण ज्यांना शक्य आहे अशी कुटुंबे स्वत:च हा विमा खरेदी करु शकतात.

मर्यादा व आव्हाने

Ladakh Regional Doctor ग्रामीण आरोग्य मिशनचा प्रयत्न खूप असला तरी यामध्ये काही अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत.

मुख्य समस्या म्हणजे आशा कार्यकर्त्यांना पुरेसे प्रशिक्षण, साधनसामग्री आणि औषधे दिली नसल्यामुळे गावपातळीवर आरोग्यसेवा वाढवण्याचा प्रयत्न खुंटला आहे. जोपर्यंत गावपातळीवर किमान आरोग्यसेवा उभ्या होत नाहीत तोपर्यंत एकूण आरोग्यव्यवस्था सुधारणे अवघड आहे.

मिशनचा मुख्य भर हॉस्पिटलमध्ये बाळंतपणे वाढवण्यावरच आहे. या सेवांची गुणवत्ता अजून कमीच आहे. उपकेंद्रावर होणारे बाळंतपण फार गुणवत्तेचे नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात बाळंतपणाची गर्दी वाढल्याने काही तासांतच बाळ- बाळंतीणीला घरी पाठवावे लागते.

UP Training Class ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर्स मिळत नसल्याने तातडीक बाळंतपण- शस्त्रक्रियेच्या सेवा अद्याप कमी आहेत. यामुळे अनेकांना जिल्हा रुग्णालयात पाठवावे लागते. यामुळे या रुग्णालयात गर्दी दिसली तरीही खरी सुधारणा नाही. जननी सुरक्षा योजनेच्या पैशाच्या आमिषाने ही गर्दी दिसते. या उलट एकूणसेवा सुधारुन आकर्षक केल्या असत्या तर हळूहळू बाळंतपणासाठी लोक आलेच असते. बाळंतपणाशिवाय इतर सेवांची वाढ फारशी झालेली नाही.

खाजगी क्षेत्रातून उपचार घेणारे लोक सरकारी आरोग्यसेवांकडे यावे ही मिशनची अपेक्षा चांगली असली तरी आरोग्य मिशनला हे अद्याप शक्य झालेले नाही. त्यामुळे अजूनही लोक मोठया प्रमाणावर खाजगी डॉक्टरांवर अवलंबून आहेत.

जननी सुरक्षा योजना कशासाठी?

NGOs दरवर्षी भारतात, गरोदरपण व बाळंतपणासंबंधित समस्यांमुळे लाखभर स्त्रियांचे मृत्यू होतात. गरोदरपणात, बाळंतपणात तसेच बाळंतपणानंतर जर योग्य खबरदारी घेतली तर यातील बरेचसे मृत्यू टाळता येण्यासारखे आहेत.

या समस्यांवर मात करण्यासाठी सुसज्ज रुग्णालयात बाळंतपण करणं चांगलं. मात्र ब-याचदा डॉक्टरांची फी, प्रवास खर्च, औषधांचा खर्च अशा आर्थिक अडचणींमुळे आणि इतरही कारणांकरता लोक घरीच बाळंतपण करतात.

दारिद्रयरेषेखालील स्त्रियांसाठी भारत सरकारने जननी सुरक्षा योजना नावाची नवीन योजना सुरू केलेली आहे. योजनेकरता पात्रता आणि रोख रक्कम ही या योजनेची ठळक वैशिष्टये आहेत. ही मदत गरोदरपणापासूनच मिळायला पाहिजे.

यात एकोणीस वर्षांपुढील वयाच्या आणि दारिद्रयरेषेखालच्या कुटुंबांमधल्या सर्व स्त्रियांना रोख मदत मिळते. तिस-या बाळंतपणाला आलेल्या स्त्रिया जर त्यानंतर खुशीने ऑपरेशन करून घ्यायला तयार असतील तर त्यांनाही ही मदत मिळेल.

यात बाळंतिणीला 700 रु. ची मदत दिली जाईल. मदत करण्यासाठी आपल्याला येण्या-जाण्याच्या तसेच रुग्णालयात बाळंतिणीसोबत राहण्याच्या खर्चाकरता रोख 600 रु. दिले जातील. ही योजना घरी बाळंतपण करण्यासाठी लागू आहे. अशा स्त्रीला 7 दिवसांच्या आत 500 रु. साहाय्य मिळते.

जननी सुरक्षा योजनेत आपले काम

Kargil Activist Women नर्सताई गावात येईल तेव्हा आपण गरोदर स्त्रिया आणि विशेषतः दारिद्रयरेषेखालील कुटुंबातील गरोदर स्त्रियांच्या नोंदी तिच्याजवळ केल्या पाहिजेत.

जर गरोदर स्त्रीकडे दारिद्र्यरेषेचं कार्ड नसेल तर आपण ते ग्रामसेवकांकडून तिला मिळवून दिलं पाहिजे.

रुग्णालयात बाळंतपण करण्यासाठी आणि निदान चार प्रसूतिपूर्व तपासण्या करून घेण्यासाठी आपण गरोदर स्त्रीला व घरवाल्यांना आग्रह व प्रोत्साहन दिले पाहिजे.

बाळंतपणासाठी जवळच्या सुसज्ज अशा रुग्णालयांची माहिती आपल्याला नर्सताईकडून मिळेल.

आपण गरोदर बाईला आधीच ठरवलेल्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात घेऊन गेलं पाहिजे. यासाठी खाजगी रुग्णालयातही ही योजना लागू आहे. बाळ-जन्माची नोंद आपण पंचायतीत किंवा नर्सताईजवळ करावी.

ग्रामीण आरोग्यमिशनमधील इतर सेवा
  • एकत्रित आजार नियंत्रण योजना : हिवताप, इतर साथरोग, अतिरक्तदाब, मधुमेह इ. आजारांची माहिती एकत्र करणे व सेवा-व्यवस्थापन करणे.
  • शालेय आरोग्य तपासणी व सेवा यासाठी पथक नेमलेले असते.
  • रुग्णवाहिका – कमी खर्चात किंवा मोफत रुग्णवाहिका सेवा पुरवणे ही एक महत्त्वाची सेवा आहे. आंध्र प्रदेशात ही सेवा चांगली सुरु झाली आहे. ही योजना डायल या नावाने आहे.
  • पोषण आधार – कुपोषित बालकांसाठी पोषण-सुधार योजना आहेत. यात बालक आणि पालक यांना 2-3 आठवडे पोषण सुधार केंद्रात ठेवून सेवा व प्रशिक्षण दिले जाते.
  • आयुष – आयुर्वेद, योग, होमिओपथी, युनानी वैद्यक सेवांचा प्रसार व विस्तार करणे हे मिशनचे एक धोरण आहे. म्हणून मुख्यत: प्राथमिक आरोग्य केंद्रात आयुर्वेदिक डॉक्टर उपलब्ध करण्याचे धोरण आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.