Health Service देशाचे आरोग्य आरोग्य सेवा
राष्ट्रीय कुटुंब पाहणीचे (3री फेरी) महाराष्ट्राचे
विवाह आणि जननदर आकडेवारी

महाराष्ट्रात मुलींचे लग्न लवकर होते. सरासरी 39% स्त्रियांचे लग्न 18 वर्षाच्या आतच झाले असे आकडेवारीत दिसून येते. मात्र हे प्रमाण 1998-99 पेक्षा 9% कमी दिसते. ग्रामीण भागात हे प्रमाण सुमारे 49% म्हणजे फारच जास्त आहे.
2. सुमारे 15% पुरुषांची लग्नेही 21 वर्षाच्या आत होतात.
3. सरासरी प्रजनन दर 2.1 असला तर, ग्रामीण भागात तो 2.3 इतका आहे. याचे कारण ग्रामीण भागात कुटुंबनियोजन सरासरी उशिरा होते. याला पुष्कळ कारणे आहेत. पण तरीही हा फरक फार नाही. म्हणजेच केवळ कुटुंबनियोजनाचा धोशा लावणे चुकीचे आहे.
4. महाराष्ट्रात सुमारे 14% स्त्रिया 15 ते 19 या वयातच गरोदर किंवा प्रसूत होतात असे दिसते. ग्रामीण भागात हे प्रमाण 18% आहे. (शिक्षण नसलेल्या स्त्रियांमध्ये हे प्रमाण 44% इतके जास्त आहे.)
5. महाराष्ट्रातील स्त्री सरासरी 20 वर्षाच्या वयात प्रथम आई होते. याचा अर्थ लग्नानंतर अनेक स्त्रिया लवकरच गरोदर राहतात व बाळंत होतात. या ‘घाई’ मुळे अनेक समस्या तयार होतात. केवळ ही ‘घाई’ कमी झाली तरी आरोग्य पुष्कळ सुधारू शकते.
ज्यांना दोन मुली आहेत अशांपैकी निम्म्या जणींनाच ‘आणखी संतती’ नको असते. म्हणजे उरलेल्या निम्म्या जणींना (45%) मूल हवे असते; म्हणजेच मुलगा हवा असतो. काही अभ्यासकांच्या मते आपला प्रजनन दर कमी न होण्याचे हेच एक प्रमुख कारण आहे.

कुटुंबनियोजनाबद्दल

7. महाराष्ट्रातल्या जननक्षम वयातील स्त्रियांपैकी (15-49 वयोगट) 67% स्त्रिया कोणती ना कोणती संतती प्रतिबंधक पध्दत वापरतात. यात आधुनिक व पारंपरिक अशा सर्व पध्दती धरल्या आहेत.
8. केवळ आधुनिक पध्दतींचा विचार केल्यास या स्त्रियांपैकी 65% एखादी पध्दत वापरतात. यात संततीप्रतिबंधकाच्या प्रकारानुसार स्त्रिया नसबंदी (51.1%), तांबी (3%), गोळी (2.5%) वापरतात. ज्यांचे जोडीदार पुरुष संततीप्रतिबंधक वापरतात अशांमध्ये निरोध वापर (6.4%), पुरुष नसबंदी (2.1%) अशी आकडेवारी आहे. एकूणच तांबी, निरोध, गोळी या तात्पुरत्या साधनांचा वापर फक्त 12 % इतकीच जोडपी करतात.
9. ज्यांना संततीनियमनाची गरज आहे पण सेवा मिळत नाही त्यांचे प्रमाण सुमारे 10% पर्यंत आहे. यापैकी तात्पुरती साधने हवे असलेले 5.6% तर नसबंदी हवी असलेली 4% जोडपी आहेत.

माता बाल आरोग्य सेवा

स्त्रिया व मुलांना आरोग्यसेवा वारंवार लागतात. म्हणूनच हे निर्देशांक एकूण आरोग्यसेवा मोजायला उपयुक्त असतात.

10. प्रसूतीपूर्व काळजी ही एक महत्त्वाची सेवा आहे. अशा निदान 3 प्रसूतीपूर्व भेटी (डॉक्टर/नर्सकडून ) झालेल्या स्त्रिया 75% आढळल्या. यात शहरी भागात जास्त टक्केवारी (87%) तर ग्रामीण भागात कमी (65%) टक्केवारी आढळते.
11. ऍनिमिया/रक्तपांढरी ही आपल्याकडे मोठीच आरोग्यसमस्या आहे. यासाठी गरोदरपणात 90 दिवस लोहगोळया देण्याचा शासकीय कार्यक्रम आहे. मात्र फक्त 30% गरोदर स्त्रियांना असा उपचार मिळू शकला असे सर्वेक्षणात आढळले.
12. Teenage Group Training बाळंतपणात कुशल नर्स किंवा डॉक्टरची मदत/उपस्थिती असणे महत्त्वाचे असते. अन्यथा मातामृत्यू, बालमृत्यू किंवा कायमचे नुकसान होण्याची शक्यता असते. या सर्वेक्षणात फक्त 70% बाळंतपणात ही सोय झाली होती. ग्रामीण भागात तर हे प्रमाण फक्त 57% आहे.
13. घरी प्रसूत न होता उपकेंद्र, प्राथमिक आरोग्यकेंद्र, रुग्णालय (खाजगी अथवा सरकारी) यापैकी कोणत्याही संस्थेत बाळंतपण झाले तर चांगले असते. महाराष्ट्रात 66% प्रसूती ‘संस्थेत’ होतात. मात्र ग्रामीण भागासाठी ही टक्केवारी फक्त 50 च्या आसपास आहे. शहरांमध्ये 85%वर प्रसूती रुग्णालयात होतात.
14. प्रसूतीनंतर दोन दिवसांत आरोग्यसेविकेची किंवा डॉक्टरांची भेट होणे हे केवळ 59% मातांच्या बाबतीत घडते. ग्रामीण भागात ही टक्केवारी 50% पेक्षा कमी आहे.

लसीकरण आणि जीवनसत्व अ वाटप

15 (अ) बालकांमध्ये 12-23 महिने वयोगटातील पूर्ण लसीकरणाचे प्रमाण महाराष्ट्रात 59% आहे. ग्रामीण भागात ते 50%च्या खाली आहे.
15 (ब) वरील वयोगटातील बालकांच्यापैकी 95% बालकांना बी.सी.जी टोचल्याचे दिसून येते. ही टक्केवारी ग्रामीण भागात देखील बरी (93.5%) आहे.
15 (क) या वयोगटातील बालकांपैकी पोलिओचे तीन डोस मिळालेल्या बालकांचे प्रमाण 73% इतके आहे. ग्रामीण भागात मात्र हे प्रमाण 64% इतकेच आहे. एकूणच पल्स पोलिओ मोहीम असूनही पोलिओ लसीकरणाची टक्केवारी कमीच आहे.
15(ड) वरील वयोगटातील बालकांपैकी 76% बालकांना तिहेरी लसीचे तिन्ही डोस मिळालेले दिसतात. ग्रामीण भागात ही टक्केवरी 70% च्या खाली आहे. अर्थातच हे प्रमाण कमीच आहे.
15 (इ) वरील वयोगटातील बालकांपैकी गोवर लस टोचली आहे अशा बालकांची संख्या 85% पर्यंत आहे. मात्र ग्रामीण भागात ती 83%च्या आत आहे.
16. 12-35 महिने वयोगटातील बालकांपैकी गेल्या 6 महिन्यात जीवनसत्व ‘अ’ मिळालेल्यांचे प्रमाण केवळ 32% आहे आणि ग्रामीण भागात ते केवळ 30%च्या आत पडते. याचा अर्थ दुस-या वर्षापासून ‘अ’ जीवनसत्व वाटपाची टक्केवारी खूपच कमी आहे.

बालकांच्या आजारावरील उपचार (3 वर्षांपर्यंतची बालके)

Treatment Childhood Diseases 17. गेल्या दोन आठवडयांत अतिसाराने आजारी झालेल्या बालकांपैकी जलसंजीवनीचा उपचार मिळालेल्यांचे प्रमाण 40%च्या आत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात ही टक्केवारी जवळजवळ सारखीच आहे. याचा अर्थ सुमारे 62% बालकांना जलसंजीवनीचा उपचार मिळत नाही.
18. मात्र वरील बालकांपैकी 78% बालकांना कोणत्या ना कोणत्या आरोग्य केंद्रात नेल्याचे आढळले. शहरात हे प्रमाण 84% तर ग्रामीण भागात 78% आहे.
19. न्यूमोनिया किंवा श्वसनदाह झालेल्या बालकांपैकी 83.5%बालकांना कोणत्या ना कोणत्या आरोग्यकेंद्रात नेलेले होते असे दिसते. याचा अर्थ अतिसाराच्या धोक्यापेक्षा श्वसनदाहाचा धोका लोकांना जास्त वाटतो.

बालसंगोपन आणि बालपोषण आकडेवारी

Childhood Problem 20. तीन वर्षाखालील बालकांपैकी फक्त 52% बालकांना जन्मानंतर तासाभराच्या आत स्तनपान दिले गेले. शहरी आणि ग्रामीण भागात ही आकडेवारी फारशी वेगळी नाही.
21. सहा महिन्यांपर्यंतच्या बालकांना ‘केवळ स्तनपान’ देणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या सर्वेक्षणात फक्त 53% बालकांना ‘केवळ स्तनपान’ दिले गेले. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात ही टक्केवारी थोडी कमीच आहे. शहरी भागात 50% वर बालकांना सहा महिन्यांच्या आतच वरचा आहार देणे सुरु करतात.
22. बालवयात 6-9 महिने वयोगटातील स्तनपानाबरोबरच खिरीसारखा सैल आहार देणे वाढीच्या दृष्टीने आवश्यक असते. मात्र या सर्वेक्षणात फक्त 48% बालकांना असा आहार मिळतो असे दिसते.
23. महाराष्ट्रात 3 वर्षाखालील बालकांपैकी वयाप्रमाणे उंची नसणे (म्हणजे खुरटलेल्या) बालकांची टक्केवारी 38% इतकी जास्त आहे. ग्रामीण भागात ही टक्केवारी 40%वर जाते तर शहरी भागात 35%च्या आसपास पोहोचते. आश्चर्य म्हणजे मुंबई आणि ग्रामीण भागाच्या टक्केवारीत फारसा फरक नाही.
24. महाराष्ट्रात 3 वर्षाखालील रोडावलेल्या बालकांचे प्रमाण 15% इतके आहे. रोडावणे याचा अर्थ उंचीच्या प्रमाणात वजन नसणे. म्हणजेच अल्पकालीन कुपोषणाचे निदर्शक आहे.
25. महाराष्ट्रात 3 वर्षाखालील बालकांपैकी वयानुसार अल्पवजनी बालकांची टक्केवारी 40% पर्यंत आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण 43.5% इतके आहे.

विवाहित प्रौढांच्या पोषणाची स्थिती

Lifestyle खालील आकडेवारी कधी-विवाहित स्त्री पुरुषांची आहे. कधी-विवाहित म्हणजे एकदातरी विवाह झालेला पुरुष/स्त्री. विवाहित, घटस्फोटित, विधुर, विधवा इ. सर्व यात धरतात.

26. बॉडी मास इंडेक्स हा प्रौढांसाठी पोषणाचा चांगला निदर्शक मानला जातो. यामध्ये उंची आणि वजन मोजतात. वजन (कि. ग्रॅ.) भागिले उंचीचा वर्ग (मीटरमध्ये) या गणिताचे उत्तर म्हणजे बॉडी मास इंडेक्स (BMI). मराठीत बॉडी मास इंडेक्सला ‘शरीरभार निर्देशांक’ म्हणता येईल. महाराष्ट्रात 15-49 वयोगटातील स्त्रियांपैकी 32%च्या वर स्त्रियांचा शरीरभार कमी आहे. शहरी आणि ग्रामीण स्त्रियांमध्ये याबाबतीत प्रचंड तफावत आहे. ग्रामीण भागात 43% स्त्रिया कमी शरीरभाराच्या आढळल्या तर शहरांमध्ये 20.7% स्त्रिया या गटात आहेत. मुंबईत हेच प्रमाण केवळ 15% आहे.
27. पुरुषांच्या बाबतीत कमी शरीरभाराची हीच आकडेवारी 25% आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण 32%पर्यंत आहे तर शहरांमध्ये 17% इतकेच आहे.
28. महाराष्ट्रात जास्त शरीरभार असलेल्या किंवा लठ्ठ स्त्रियांचे प्रमाण 17% आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण केवळ 8% असून शहरांमध्ये 27% तर मुंबईत 35% इतके आढळते.
29. पुरुषांच्या बाबतीत जास्त वजन किंवा लठ्ठपणाची टक्केवारी महाराष्ट्रात 16% तर ग्रामीण भागात 8.3% आढळते. शहरांमध्ये ही आकडेवारी 25%च्या आसपास आहे.
रक्तपांढरी(ऍनिमिया)ची समस्या
30. महाराष्ट्रात 6-35 महिने वयोगटातील बालकांपैकी ऍनिमिया (रक्तपांढरी) असलेल्या बालकांचे प्रमाण 72% इतके जास्त आढळते. ग्रामीण भागात हेच प्रमाण 77% पर्यंत दिसते.
31. कधी विवाहित स्त्रियांच्या बाबतीत (15-49 वयोगट) ऍनिमियाचे प्रमाण 49% आहे. शहरी आणि ग्रामीण स्त्रियांच्या बाबतीत टक्केवारीत थोडासाच फरक आहे.
32. जननक्षम वयातील गरोदर स्त्रियांमध्ये या विकाराचे प्रमाण 58% आहे. शहरी व ग्रामीण टक्केवारीत या बाबतीत थोडासाच फरक आढळतो.
33. कधी विवाहित पुरुषांच्या बाबतीत (15-49 वयोगट) ऍनिमियाची टक्केवारी 16%च्या आसपास आढळते.
एच.आय.व्ही. एड्ससंबंधी माहिती

(15-49 वयोगटातील कधी विवाहित व्यक्ती)या गटांत

34. ‘एड्सबद्दल ऐकले आहे’ अशा स्त्रियांची टक्केवारी 80% पर्यंत पोहोचते. ग्रामीण भागात हे प्रमाण 70% तर शहरी भागात 90% च्या आसपास आहे.
35. ‘एड्सबद्दल ऐकले आहे’ अशा पुरुषांची टक्केवारी 90% पर्यंत पोहोचते. ग्रामीण भागात हे प्रमाण 84% तर शहरी भागात 96.5% च्या आसपास आहे.
36. निरोध वापराने एच.आय.व्ही. एड्स संसर्गाचा धोका कमी होतो हे माहित असलेल्या स्त्रियांचे प्रमाण फक्त 45% आहे. ग्रामीण भागात तर फक्त 31% स्त्रियांना अशी माहिती असते. शहरी भागातील 60% तर मुंबईत 70% स्त्रियांना ही माहिती असते.
37. निरोध वापराने एच.आय.व्ही एड्स संसर्गाचा धोका कमी होतो हे माहीत असलेल्या पुरुषांचे प्रमाण 78% आहे. ग्रामीण भागात तर फक्त 70%पुरुषांना अशी माहिती असते. शहरी भागातील 87% तर मुंबईत 94% पुरुषांना ही माहिती असते.
38. सध्या विवाहित स्त्रियांपैकी कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत भाग घेणा-या स्त्रियांचे प्रमाण महाराष्ट्रात 64% पर्यंत आहे. मात्र ग्रामीण भागात हे प्रमाण 57% पर्यंत घसरते. शहरी भागातील फक्त 71 तर मुंबईत 75% स्त्रियाच कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत सहभागी असतात.
39. नव-याकडून कधीतरी मारहाण होणा-या स्त्रियांचे महाराष्ट्रातील प्रमाण 30% वर आहे तर ग्रामीण भागात हेच प्रमाण 35% पर्यंत पोहोचते. शहरांतही 20% तर केवळ मुंबईत 26% स्त्रियांना अशा गोष्टींना तोंड द्यावे लागते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.