Old Age Icon म्हातारपण
म्हातारपण आणि आरोग्यरक्षण

Bhajan Kirtan म्हातारपणात अनेक आजार उगवतात. पण म्हातारपण म्हणजे आजारपण असे समीकरण नाही. अमुक वयानंतर म्हातारपण चालू होते असे म्हणू नये. वाढत्या वयातही आरोग्य व कार्यक्षमता टिकवून धरणारे अनेकजण असतात. कामे करीत शंभर वर्षे जगण्याची, आशा धरायला आपल्या ऋषींनी सांगितले आहे. बालमृत्यू आणि अपमृत्यू सोडल्यास माणूस शंभर वर्षे जगू शकतो. भारतात आयुर्मान सरासरी 65 च्या वर गेले आहे.

या शतायुषी जगायच्या आशेला आधुनिक वैद्यकशास्त्राने अनेक बाजूंनी आधार दिला आहे. मात्र जीवनपध्दतीत कृत्रिमता आणि कमी श्रम आल्यामुळे आयुष्य त्यामानाने कमी होते हा प्रश्न आहे.

माणसाने सदातरुण राहावे यासाठी औषधांचा शोध तर पूर्वीपासून सुरू आहे, तो शोध आताही चालू आहे. पण तारुण्य याचा अर्थ केवळ जिभेचे आणि लैंगिक चोचले एवढाच नाही. प्राचीन जीवनव्यवस्थेने जीवनाचे चार भाग पाडले आहेत. वयाच्या पंचवीसपर्यंत ब्रह्मचारी अवस्था, त्यापुढे पन्नासपर्यंत गृहस्थ, त्यापुढे पंचवीस वर्षे थोडे दूर राहून जीवनात भाग घेणे (वानप्रस्थ) आणि त्यानंतर पूर्ण निवृत्ती – संन्यास अशी कल्पना आहे. अनेकजणांनी त्यानुसार जगून हे सिध्द करून दाखवलेले आहे.

या चार अवस्थांत माणसाने जीवनाबद्दल वेगवेगळी वृत्ती धारण करणे अपेक्षित आहे. पहिल्या अवस्थेत शरीरसंपदा आणि ज्ञानसंपदा मिळवणे, गृहस्थ अवस्थेत वैवाहिक आणि सामाजिक जीवन, नंतर समाजासाठी वाहून घेणे आणि मग निवृत्ती. पण साठ वर्षाला निवृत्ती या सरकारी पध्दतीने म्हातारपण जास्त जवळ आणून ठेवले आहे.

जीवशास्त्रीयदृष्टया म्हातारपण म्हणजे पेशी जुन्या होणे म्हणजेच गंजणे, आणि त्यांतील जीवनतत्त्व कमी होणे. म्हातारपणात पेशींमधले पाण्याचे प्रमाण कमी होत जाते असे आढळले आहे. याचप्रमाणे स्नायू-इंद्रियांची शक्ती क्षीण होत जाते. मानसिक दृष्टया अनेक ब-या वाईट वृत्ती तयार होतात. निवृत्ती, अलिप्तपणा, असहायपणा, चिडखोरपणा, असहनशीलता तसेच नि:स्वार्थीपणा आणि दयाळूपणादेखील. यांतला कोठला भाग कमीजास्त होतो ते व्यक्ती-प्रकृती व परिस्थितीवर अवलंबून असते. कौटुंबिक आधार असेल तर या गोष्टी ब-याच सोप्या होतात. लहान मुलांची आणि वृध्दांची काळजी घेणे ही सर्व कुटुंबाची जबाबदारीच आहे.

स्वत:ची काळजी

Old Age Self Care जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत स्वत:ची काळजी घेत राहिले पाहिजे. खाण्यापिण्यात संयम, माफक काम आणि श्रम, सुरक्षिततेसाठी काही विशेष काळजी (उदा. काठी, प्रकाश, इ.), योग्य विश्रांती, झोप आणि करमणूक या गोष्टी सांभाळायला पाहिजेत.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.