Health Sciences Icon घर आणि परिसर स्वच्छता आरोग्य विज्ञाान
घनकचरा व्यवस्थापन
नकचरा व्यवस्थापनाचे हेतू ,उद्दिष्टे

garbage car घनकचरा म्हणजे रोजच्या वापरातून उरलेला निरुपयोगी पदार्थ. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून निघणारा घनकचरा व त्याची विल्हेवाट ही जगापुढील एक मोठी समस्या आहे. पूर्वीच्या काळी घनकचरा विल्हेवाटीची फार समस्या नव्हती; कारण लोकसंख्या कमी होती आणि घनकचरा टाकण्यासाठी जमीन मोठया प्रमाणात उपलब्ध होती. परंतु आता लोकसंख्या वाढल्यामुळे घनकचरा मोठया प्रमाणात तयार होतो व जमीन पूर्वी होती तेवढीच आहे. घनकचरा मोठया प्रमाणात निर्माण होण्याचे कारण म्हणजे शहरीकरण, औद्योगीकरण, प्लास्टिक वस्तू, उंचावलेले राहणीमान आणि त्यासाठी लागणा-या वेगवेगळया प्रकारच्या वस्तू, वाढलेल्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी शेतातील वाढलेले उत्पादन व त्यापासून निघणारा घनकचरा. या सर्व घनकच-याचे व्यवस्थापन करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. घनकचरा प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे.

भारतात दरमाणशी दर दिवसाला 0.4 कि.ग्रॅ एवढा घनकचरा तयार होतो. यावरुन घनकचरा प्रदूषणाची कल्पना आपण करु शकतो. शेतातून किंवा घरातून निघालेला घनकचरा उघडयावर टाकला जातो, तो कुजतो व त्यापासून दुर्गंधी सुटते याबरोबर कीटकांची उत्पत्ती होऊन आरोग्यास हानी पोहोचते. फार पूर्वीपासून घनकचरा जाळूनच त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु त्यामुळे हवेचे प्रदूषण होते व पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात येते.

अर्थव्यवस्था सुधारते तसे कचरा जास्त निर्माण होतो. कच-याचे प्रकारही वाढत जातात. हा अनेक प्रकारचा कचरा वेगवेगळया समस्या निर्माण करतो. आजार, प्रदूषण, सौंदर्यहानी आणि पर्यावरणाचे नुकसान असे अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच घनकचरा व्यवस्थापन करताना काही उद्दिष्टे आपण लक्षात ठेवायला पाहिजेत.

  • आरोग्य-संरक्षण, जीवनाची गुणवत्ता सुधारणे.
  • पर्यावरण प्रदूषण टाळणे, परिसर स्वच्छता.
  • भंगार-कच-यावर पुनर्प्रक्रिया होण्यासाठी चालना देणे.
  • जैविक-कच-यातून ऊर्जा निर्माण करून इंधन वाचवणे.
  • या सगळयातून काही रोजगार निर्मिती करणे.
  • संपूर्ण स्वच्छतेसाठी कचरा व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या केरकच-यात विविध पदार्थ असतात; त्यात वर्गवारी करावी लागते. वर्गवारी केल्याशिवाय घनकचरा व्यवस्थापन चांगल होऊ शकणार नाही. यासाठी पुढीलप्रमाणे वर्गवारी करता येईल.
घनकचरा व्यवस्थापन

Waste Management

  • सर्वप्रथम व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळीवर याबद्दल जाणीव निर्माण करायला पाहिजे; कारण तिथूनच व्यवस्थापनाला सुरुवात करायची आहे. हे झाले नाहीतर सार्वजनिक यंत्रणा (ग्रामपंचायत, नगरपालिका) काही करू शकणार नाही.
  • यापुढची पायरी म्हणजे गाव-नगर पातळीवर घन कचरा व्यवस्थापनाचे नियोजन . कचरा वर्गीकरण, जमा करून आणणे, विल्हेवाट, विक्री इ. सर्व घटकांचा विचार व्हायला पाहिजे. यात अनेक संस्था, गट सहभागी झाले तर हे काम यशस्वी होऊ शकते.संपूर्ण स्वच्छता अभियानासाठी मिळणा-या निधीच्या एकूण दहा टक्के रक्कम घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरता येईल.
  • काही घनकचरा सार्वजनिक जागीही निर्माण होतो. दुकाने, आठवडे बाजार, शाळा, मंदिरे, यात्रा, लग्नसमारंभ इ. ठिकाणी पण पुष्कळ कचरा निर्माण होतो. या सर्व घटकांचा विचारही व्यवस्थापनात करावा लागेल.
  • न कुजणारा किंवा सुका कचरा साधारणत: जमीन किंवा रस्ता भरण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
  • कुजणा-या कच-याचा उपयोग करून आपण कंपोस्ट खत किंवा गांडुळखत तयार करु शकतो.
घनकच-याचे परिणामकारक व्यवस्थापन तीन तत्त्वांवर अवलंबून आहे.

(3 R- Principal)

  • वापर कमी करणे (Reduce)
  • पुनर्वापर (Reuse)
  • चक्रीकरण (Recycle) पुनर्प्रक्रिया

1. वापर कमी करणे – सध्याचा काळ वापरा व फेका अशा स्वरुपांच्या वस्तूंचा आहे. एकदाच वापरण्याच्या वस्तूंमुळे प्रचंड प्रमाणावर टाकाऊ पदार्थ तयार होतात. फेकण्याजोगे साहित्य वापरण्यापेक्षा कायमस्वरुपी वापरण्यात येणा-या वस्तूंचा वापर केल्यास टाकाऊ वस्तूंची निर्मिती कमी होईल. उदा. चहासाठी प्लास्टिक कप किंवा कुलहड वापरण्यापेक्षा चिनी मातीचे किंवा काचेचे कप वापरावेत.

2. पुनर्वापर – आहे त्याच स्वरुपातील टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरणे म्हणजे पुनर्वापर. टाकाऊ पदार्थ अनेक प्रकारांनी वापरता येतात. जुने प्लॅस्टिकचे व धातूचे डबे, बाटल्या, बरण्या पुन्हा वापरल्यामुळे अविघटनशील कच-याचे प्रमाण कमी होईल.

3. पुनर्प्रक्रिया उदा. लोखंड. भंगारापासून परत लोखंडी वस्तू तयार करणे.

घनकचरा व्यवस्थापन पध्दती/पाय-या

सर्व व्यवस्थापनाची सुरुवात घराघरातच सुरु व्हायला पाहिजे. घनकच-याचं व्यवस्थापन करण्यासाठी घनकचरा वेगळा करणे महत्त्वाचे आहे. घनकचरा वेगळा करण्यासाठी खालीलप्रमाणे वेगवेगळा रंग असणा-या कचरा कुंडयांचा वापर केला जाऊ शकतो.

1. सफेद : पुन्हा वापरता येण्याजोगा कचरा
2. हिरवा : कुजणारा/ओला कचरा
3. काळा : न कुजणारा / सुका कचरा
पहिल्याप्रथम या कच-याची वर्गवारी केली पाहिजे. यातून कुजणारा कचरा घरच्या घरी कुजवून खत करता येते. उरलेला कचरा सार्वजनिक व्यवस्थेने उचलावा. घरातील कच-याच्या वर्गवारीसाठी निरनिराळया रंगाचे डबे/बादल्या वापराव्यात.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.