femaleurine system icon स्त्रीजननसंस्था पुरुषजननसंस्था
जननसंस्थेच्या गाठी व कर्करोग

Genetic Bone Cancer जननसंस्थेत ठिकठिकाणी मांसल गाठी तयार होऊ शकतात. योनिद्वार, योनिमार्ग, गर्भाशय, बीजनलिका, बीजांडे यापैकी कोठेही या गाठी होऊ शकतात. सर्व गाठींची तपासणी ‘आतूनच’ करावी लागते. सामान्यपणे तीन-चार प्रकार नेहमी आढळणारे आणि महत्त्वाचे आहेत : (1) गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग (2) गर्भाशयाच्या साध्या व कर्करोगाच्या गाठी (3) बीजांडाच्या साध्या गाठी (4) बीजांडाचे कर्करोग. (5) गर्भाशयाच्या आतील अस्तराचा कर्करोग

गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग

भारतातील स्त्रियांच्या कर्करोगांत प्रमुख कर्करोग हा गर्भाशयाचा आहे. सहसा हा आजार जननक्षम आणि तरुण-मध्यम वयात येतो. सतत बाळंतपणे, लिंगसांसर्गिक आजार, अस्वच्छता, अनेक पुरुषांशी लैंगिक संबंध या काही बाबी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाशी जास्त निगडित आहेत. म्हणजेच अशा स्त्रियांना या कर्करोगाचा धोका जास्त असतो.

पाळीच्या चक्रात अचानक झालेला बदल, अंगावर पांढरे/लाल किंवा दुर्गंधीयुक्त स्राव जाणे, लैंगिक संबंधांनंतर लाल अंगावर जाणे, लघवी किंवा संडासच्या भावनेत झालेले बदल, मासिक पाळी बंद झाल्यानंतर पुन्हा रक्तस्राव सुरु होणे यासारखी लक्षणे गर्भाशयाच्या कर्करोगात दिसतात.

कारणे

कर्करोग झालेल्या सुमारे 70% स्त्रियांमध्ये ह्यूमन पॅपिलेमा व्हायरस या विषाणूची लागण झालेली सापडते. हा विषाणू लैंगिक संबंधातून पसरतो. जितक्या जास्त व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध असतील तितकी याची शक्यता वाढते.

याबरोबरच धूम्रपान, एच.आय.व्ही. ची लागण, क्लॅमिडिया जंतुदोष, काही हार्मोन्स उदा. गर्भनिरोधक गोळयांचा दीर्घकाळ वापर अशी काही इतर कारणेही दिसून येतात.

स्त्रियांच्या बाबतीत हा अत्यंत महत्त्वाचा आजार आहे. हा वेगाने वाढतो व लवकर हाताबाहेर जातो. सुरुवातीस गर्भाशयाच्या तोंडाला खरबरीतपणा येतो. नंतर फ्लॉवरच्या आकाराची गाठ होते. त्यानंतर गाठीची झपाटयाने वाढ व प्रसार होतो.

पूर्वनिदान
  • कर्करोगाची गाठ व्हायच्या आतच याचे पूर्वनिदान करता येते.
  • यासाठी चाळीशीनंतरच्या प्रत्येक स्त्रीच्या गर्भाशयाच्या तोंडाचा नमुना घेतात. त्यात कर्करोगाच्या ‘प्राथमिक’ पेशी सूक्ष्मदर्शकाखाली तपासतात. याला पॅपस्मिअर तपासणी म्हणतात. ही तपासणी अगदी साधी आणि निरुपद्रवी आहे. यात गर्भाशयमुखाला जखम न करता केवळ वरवर खरवडून नमुना घेतला जातो. पॅप तपासणीसाठी शिबिरे घेता येतात आणि एकेका दिवसांत शंभर-दोनशे स्त्रियांची तपासणी करता येते.
  • पेशी तपासणीत जर कर्करोगाची खूण दिसली तर गर्भाशयाच्या तोंडाचा लहान तुकडा काढतात. याची तपासणी करून निश्चित निदान करता येते.
  • कर्करोगाची खात्री झाल्यानंतर उपचार ठरतो. प्राथमिक अवस्थेत या कर्करोगावर उपचार झाल्यास पुढचे संकट टळू शकते.
लक्षणे व रोगनिदान

याची प्रमुख लक्षणे म्हणजे चाळीशीनंतर पाळीशी संबंधित नसलेला अवेळी रक्तस्राव. लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव हे देखील लक्षण असू शकते.

  • खात्रीशीर निदानासाठी संबंधित भागाचा तुकडा तपासणीसाठी काढतात.
  • स्क्रीनिंग टेस्ट -1. पॅपस्मिअर- गर्भपिशवीच्या तोंडावरून एक चमच्यासारखे हत्यार फिरवून काचेवर नमुना तपासणीसाठी घेतात.

पॅप तपासणी शिबिरामध्ये साधारणपणे 1 टक्का नमुने कर्करोग सूचक आढळतात. यानंतर सरासरी 15 वर्षांनी पुढे कर्करोग होतो असे दिसते. म्हणजेच आपल्याला पॅप तपासणीनंतर उपचारासाठी चांगला वेळ मिळतो. अर्थात 15 वर्षे थांबायचे नसते. प्रगत देशांमध्ये या तपासणीने 80% कर्करोग वाढण्याआधीच शोधले जातात आणि या आजारामुळे मृत्यू येण्याचे प्रमाण 60% कमी झाले आहे.

पॅप टेस्ट बरीच भरवशाची आहे, मात्र 15% सदोष नमुने मुळात सदोष नसतात. त्यामुळे पक्के निदान आवश्यक असते. तसेच कर्करोगाची प्राथमिक अवस्था असून पॅप टेस्टमध्ये दोष कळला नाही असेही होऊ शकते. म्हणून दरवर्षी पॅप तपासणी करणे चांगले.

पॅप तपासणी तंत्रात अनेक सुधारणा झालेल्या आहेत. याशिवाय इतरही रोगनिदान तंत्रे विकसित झालेली आहेत.

2. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस टेस्ट- ही रक्त तपासणी आहे. सुमारे 70% कर्करोगसंभव स्त्रियांमध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह येते.

3. कर्करोग वाढलेल्या स्त्रियांना स्कॅन, इत्यादी अनेक तपासण्या कराव्या लागतात. यामुळे कर्करोगाची वाढ व प्रकार कळून येतो.

प्रतिबंध

भरपूर भाज्या व फळे यांचा आहारात समावेश असणे व पपई, लिंबू यांचा वापर, जीवनसत्त्व अ, ब (फोलिक ऍसिड) क, माशाचे तेल हे गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी मदत करतात.

हल्ली एच.पी.व्ही वॅक्सीन मिळते. सर्व मुलींमध्ये 6 वर्ष वयानंतर ते लैंगिक संबंध सुरु होण्याआधीच्या वयापर्यंत ही लस टोचणी केल्यास एच.पी.व्ही संसर्ग व कर्करोग टाळता येऊ शकेल.

उपचार

पॅप टेस्ट निदानात कर्करोगाची सूचना असल्यास छोटया शस्त्रक्रियेने काम होऊ शकते. यासाठी अनेक प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. क्रायोसर्जरी, लेझरने दहन, साधी शस्त्रक्रिया यापैकी उपलब्ध असेल त्या उपचाराने पुढचा सर्व त्रास टाळता येतो.

काही स्त्रियांच्या बाबतीत गर्भपिशवी काढून टाकण्याचा विचार केला जातो. विशेषत: उतारवयात हा पर्याय वापरला जातो.

एकदा निदान झाल्यावर उपचार गुंतागुंतीचे आहेत. आजार किती लवकर लक्षात आला/निदान झाले यावर उपचार ठरतात. यात गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया, किरणोपचार (रेडियेशन) व औषध (किमोथेरपी) यांचा समावेश असतो. लवकर निदान झाल्यावर संपूर्ण उपचार घेतल्यावर जीव वाचू शकतो.

गर्भाशयमुखाचा कर्करोग

भारतात गर्भाशयमुखाचा कर्करोग स्त्रियांसाठी फार महत्त्वाचा आहे. गर्भाशयाचे लांबट तोंड योनीमार्गात उघडते. आपल्या हाताच्या बोटांनी त्याला स्पर्श करता येतो. हा कर्करोग लवकर शोधता येतो आणि वेळीच उपचाराने तो बराही होऊ शकतो. भारतात हा कर्करोग लैंगिक संसर्गामुळे आणि जास्त बाळंतपणांमुळे होतो असे दिसते. 35-45 वयोगटात हा कर्करोग जास्त आढळतो. आता यासाठी एक प्रतिबंधक लसही आहे.

कारणे
  • या कर्करोगास ह्युमन पॅपिलोमा व्हायरस 95% बाबतींत कारणीभूत दिसतो. जास्त बाळंतपणे आणि लवकर बाळंतपणांमुळे या विषाणू संसर्गाचा धोका वाढतो.
  • लिंगसांसर्गिक आजारांची लागण झाल्यास कर्करोगाचा धोका वाढतो.
  • पुरुष जोडीदाराच्या शिश्नावर त्वचेखाली चिकटा असणे. या चिकट्यात विषाणू राहतात. सुन्ता केल्याने ही त्वचा आणि चिकटा जातो. त्यामुळे मुस्लीम स्त्रियांना या कर्करोगाचा धोका कमी असतो.
सूचक लक्षणे
  • रक्तस्त्राव हे सर्वात महत्त्वाचे लक्षण. मासिक पाळी सोडून अधेमधे किंवा लैंगिक संबंधानंतर रक्तस्त्राव हे सूचक असते.
  • रजोनिवृत्तीनंतर योनीमार्गे रक्तस्त्राव होणे योनीमार्गातून लालसर पिवळसर दुर्गंधयुक्त स्त्राव असल्यास शंका घ्यावी.
  • हा कर्करोग मुळात न दुखणारा असतो. पण त्यात पू झाला तर दुखते.
रोगनिदान आणि तपासण्या
  • आजार लवकर शोधून काढायचा असतो. म्हणून आपण लक्षणांवर अवलंबून राहायचे नसते. आता चांगल्या तपासण्या उपलब्ध आहेत.
  • पॅप तपासणी म्हणजे गर्भाशयमुखावरचा पेशीनमुना घेऊन सूक्ष्मदर्शकाने तपासणे. या तपासणीत पेशींमध्ये कर्करोगसूचक बदल दिसतात. ही तपासणी स्वस्त आणि 80%अचूक असते. शिबीरे भरवून ही तपासणी मोठ्या प्रमाणावर करता येते. या तपासणीनंतर पुढचे उपचार करायला भरपूर अवधीही मिळतो. पॅप तपासणीने कर्करोग सूचक बदल चार पायऱ्यांमध्ये ओळखता येतात.
  • रजोनिवृत्तीनंतर पॅप तपासणी थोडी कमी भरवशाची असते. मात्र स्त्रीसंप्रेरके देऊन ती जास्त भरवशाची करता येते.
  • ऍसिटोव्हाईट हा पॅप तपासणीला एक चांगला पर्याय आहे यात गर्भाशयमुखाला 5% ऍसेटिक आम्ल लावून बदल निरखा. या तपासणीत कर्करोगसूचक भाग पांढरट दिसतो.
  • अशीच एक तपासणी म्हणजे शिलरची आयोडीन तपासणी. यात निरोगी भाग निळसर दिसतो.
  • या कोणत्याही तपासणीत कर्करोग सूचना मिळाली तर तेवढा भाग काढून सूक्ष्मदर्शक तपासणीसाठी पाठवता येतो.
  • योनीमार्गाच्या साध्या स्पेक्युलम तपासणीतही गर्भाशयमुखावर गाठी किंवा खरबरीत मोड दिसू शकतात.
  • ह्युमन पॅपिलोमा व्हायरससाठी ट्यूमर मार्कर आणि डी.एन.ए. या प्रगत तपासण्या आहेत.
  • गर्भाशय मुखाचा कर्करोग किती पसरला आहे हे कळण्यासाठी आपले डॉक्टर सिटी स्कॅन, एम.आर.आय आणि पी.ई.टी. तपासणी करायला सांगू शकतील.
  • खेदाची गोष्ट अशी की पूर्वनिदान सोपे असूनही बऱ्याच स्त्रियांना अशा तपासण्यांचा लाभ मिळत नाही. उपचारासाठी काहीजणी फार उशिरा येतात.
वैद्यकीय उपचार
  • कर्करोगसूचक बदल असतील तर त्या त्या पायरीप्रमाणे योग्य उपचार करावे लागतात.
  • आजार मर्यादित असेल तर तेवढा भाग नष्ट करण्यासाठी कॉटरी किंवा क्रायोसर्जरी किंवा लेझर तंत्र उपलब्ध आहे. कॉटरींग म्हणजे जाळणे तर क्रायोसर्जरी म्हणजे अतिशीत तंत्र. लेझरने त्या पेशी उकळतात वाफळतात व फुटतात.
  • गर्भाशयमुख शस्त्रक्रियेने काढून टाकता येते. यासाठी विविध तंत्रे आहेत.
  • आजार वाढला असेल तर पूर्ण गर्भाशय काढावे लागते.
प्रतिबंध
  • योग्य वयात लग्न, कमी अपत्ये, लैंगिक सुरक्षित व्यवहार, स्वच्छता यामुळे या कर्करोगाची शक्यता कमी होते.
  • पॅप टेस्टने प्रगत देशामध्ये या आजाराचे प्रमाण खूप घटले आहे. ही तपासणी सर्व स्त्रीरोगतज्ज्ञ करू शकतात.
  • ऍसेटिक आम्ल किंवा शिलर तपासणी आरोग्यसेवकही करू शकतात.
  • ह्युमन पॅपिलोमा लसपण आता उपलब्ध आहे. यामुळे हा कर्करोग आणि विषाणू कोंब हा आजार टळतो. ही लस मुलींना किशोर वयातच दिली पाहिजे. याचे तीन डोस असतात व ते एकूण सहा महिन्यांच्या कालावधीत द्यायचे असतात.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.