/tantrika tantra icon चेतासंस्थेचे आजार (मज्जासंस्था) मानसिक आरोग्य आणि आजार
शरीरविज्ञान
प्रास्ताविक

Nervous System यापूर्वी चेतासंस्थेबद्दल थोडीशी माहिती आपण पाहिली आहे. चेतासंस्थेमध्ये मेंदू, चेतारज्जू व चेतातंतू (नसा) यांचे जाळे, असे तीन भाग पडतात. चेतासंस्थेच्या कामांमध्ये मुख्यतः संवेदनांचे ज्ञान, संवेदनांचा ‘अर्थ लावणे’, शरीरातील अवयवांना आदेश पाठवणे, विचार करणे, स्मरण, इत्यादी भाग सांगता येतील.

संवेदनांचे प्रकार अनेक आहेत. यात दृष्टी (डोळे), ध्वनी आणि तोल (कान), वास (नाक), चव (जीभ), स्पर्श, शीतोष्ण, दाब व वेदना (त्वचा), ताण, थरथर, स्थितिबद्दल ज्ञान (सांधे, स्नायुबंध, इ.), शरीरांतर्गत अवयवांमधील अनेक घडामोडी (उदा. पोटातील जळजळ किंवा मूत्राशय भरले असल्याची संवेदना, इ.) अशा अनेक प्रकारच्या संवेदना येतात. या सर्व संवेदना मेंदूपर्यंत ज्ञानतंतूंमार्फत पोचतात. डोळा, कान, जीभ, नाक यांतील संवेदना खास चेतांनी सरळ मेंदूत नेल्या जातात. तसेच चेहरा, डोळा, जीभ, घसा यांतील स्नायूंना आदेशही मेंदूकडून खास चेतांमार्फत मिळतात. पण मान व त्याखालचे सर्व अवयव आणि मेंदू यांचा संबंध मुख्यत: चेतारज्जूमार्फतच येतो.

चेतारज्जूपासून कण्यातून बाहेर पडणा-या नसा (चेतासूत्रे) शरीरातील त्या त्या भागात जाऊन संदेशवहनाचे काम पार पाडतात. या चेतातंतूंच्या प्रचंड जाळयाचा आणि मेंदूचा संबंध चेतारज्जूमार्फतच ठेवला जातो, चेतारज्जूला इजा झाली, की हा हमरस्ता बंद पडून मेंदू आणि डोक्याखालच्या भागाचा संपर्क तुटून जाईल. चेतारज्जूस अनेक प्रकारांनी इजा होऊ शकते (उदा. पाठीच्या कण्यास मार बसणे, मणक्यांमधली कूर्चा सरकणे, इ.)

टीप – शरीरविज्ञानाच्या सध्याच्या शालेय परिभाषेत पुढीलप्रमाणे शब्द (कंसातले) वापरलेले आहेत : मेंदू (मस्तिष्क), मोठा मेंदू (प्रमस्तिष्क), लहान मेंदू (अनुमस्तिष्क), मूळमेंदू (लंबचेता), चेतारज्जू (मेरूरज्जू), मज्जातंतू (चेतातंतू), नसा (चेता).

मेंदू

Brain Scans मेंदूचे कामही अत्यंत गुंतागुंतीचे आहे. आपल्याला मेंदूबद्दल काही गोष्टी निश्चित कळल्या आहेत त्या अशा : मेंदूकडे सतत संवेदनासंदेश येत असतात. हे सर्व संवेदनासंदेश विशिष्ट भागात पोचतात. शरीराच्या अवयवांकडून येणारे संदेश मेंदूच्या विशिष्ट भागात पोचतात. म्हणजे अंगठा , हात, पाय, चेहरा, इत्यादी सर्व भागांकडून येणा-या संदेशांसाठी विशिष्ट जागा ठरल्या असतात. या भागांस संवेदनाक्षेत्र म्हणतात. दृष्टीज्ञान व ध्वनिज्ञानाच्या जागाही ठरलेल्या आहेत. या संवेदना क्षेत्राला इजा झाल्यास त्यातील जागांप्रमाणे ठरावीक अवयवांचे संदेश समजणार नाहीत.

शरीराच्या हालचालींचे नियंत्रण करणा-या सर्व भागाला मिळून प्रेरकक्षेत्र म्हणता येईल. या भागास इजा झाली तर ठरावीक अवयवांची हालचाल होणार नाही. अर्धांगवायू (पक्षाघात) होतो तो असा स्मरणशक्ती, विचारशक्ती, बोलणे यांच्याही जागा ठरलेल्या आहेत. हे काम मेंदूच्या कपाळाच्या भागात चालते. मेंदूचा खालचा भाग (लहान मेंदू व मूळ मेंदू) बरीच कामे स्वतंत्रपणे पार पाडतो (श्वसन, हृदयक्रिया). शरीरांतर्गत अनेक घडामोडी, लैंगिक क्रिया, संरक्षण-आक्रमणाची भावना, तोल सांभाळणे, निद्रा,खाणे, गिळणे, इत्यादी प्राणिजीवनाचा कारभार मध्य मेंदू व मूळ मेंदू मिळून पाहतात.

तीन पदरी आवरण

Brain Model मेंदूवर तीन पदरी आवरण असते. त्यातला एक पदर मेंदूला पूर्ण चिकटलेला असतो. तिसरा पदर कवटीला चिकटलेला असतो. या दोन्ही आवरणाच्या मध्ये एक पातळ आवरण असते. मेंदूभोवतालच्या दुपदरी आवरणात मेंदूजल असते. हे मेंदूजल मेंदूतल्या पोकळयांमध्ये व चेतारज्जूभोवतीच्या पोकळीत खेळते असते. या दुपदरी आवरणाला जंतुदोष होऊन ‘मेनिंजायटिस’ हा आजार होतो. यावेळी या मेंदूजलाच्या तपासणीत ‘पू’ निदर्शक खाणाखुणा (उदा. पांढ-या पेशी) आढळतात.

संदेशवहन

चेतासंस्थेतले सर्व प्रकारचे संदेशवहन हे रासायनिक किंवा विद्युत माध्यमाने होत असते. संदेशवहनाचे हे ‘विद्युत’वहन उपकरणांच्या साहाय्याने मोजता येते. निरनिराळया आजारांमुळे हे संदेशवहन बिघडू शकते. उदा. कीटकनाशक विषारी औषधांचा परिणाम होऊन संदेशवहनाची गती कमी होते. चेतासंस्थेचे हे एकूण कार्य व रचना गुंतागुंतीची आहे. तरी हे सर्व इतके नियमबध्द आहे की लक्षणांवरून व खुणांवरून तज्ज्ञांना चेतासंस्थेच्या आजारांची जागा अचूकपणे ठरवता येते. मन, भावना, इच्छा, इत्यादी गोष्टींबद्दलची गूढता कमी करण्यासाठी आणि अंधश्रध्दा घालवण्यासाठी थोडी पूर्वतयारी म्हणून ही माहिती उपयोगी होईल.

चेतासंस्थेत मेंदू, चेतारज्जू (मेरूरज्जू) आणि चेता हे मुख्य भाग आपण पाहिले. शरीराच्या ऐच्छिक स्नायूंवर चेतासंस्थेमार्फत आपल्या मनाने आपण नियंत्रण करू शकतो. हालचाल, खेळ, विश्रांती, प्रतिकार वगैरे सर्व गोष्टी आपण चेतासंस्थेच्या द्वारेच करतो. याचे नियंत्रण मेंदूच्या कानशिलापासून कानशिलापर्यंतच्या विभागात होते. इथून आपण आदेश सोडतो.

सुस्ती व मस्ती -ऐंद्रिय (ऑटोनोमिक) चेतासंस्था

Karate या ऐंद्रिय चेता व्यवस्थेच्या चेता व वायरिंग सर्व शरीरात स्वतंत्रपणे केलेले असते. यात दोन भाग असतात. अ) मस्ती-सावधान ब) सुस्ती-विश्राम यातील सावधान-मस्ती व्यवस्थेचे सूक्ष्म चेतातंतू त्वचा, रक्तवाहिन्यापर्यंत गेलेले असते. म्हणजेच ते संपूर्ण शरीरात पसरलेले असते. मात्र शरीरात श्वसन, रक्ताभिसरण, पचन वगैरे अनेक गोष्टी आपोआपच होत असतात. एवढेच नाहीतर भीती किंवा रागाच्या प्रसंगी, किंवा लैंगिक क्रियेत शरीरात वाढीव रक्तपुरवठा आपोआपच होत असतो. या सगळया अंतर्गत क्रिया-प्रक्रियांचे नियंत्रण करण्यासाठी एक स्वतंत्र चेता व्यवस्था असते. ह्या व्यवस्थेला आपण आंतरिक किंवा ऐंद्रिय चेताव्यवस्था म्हणूया. ही व्यवस्थाही शेवटी मेंदूच्याच नियंत्रणाखाली असते. पण ती ऐच्छिक नसते. ही व्यवस्था स्वत: अनेक गोष्टींचे संचालन करते.

मात्र या व्यवस्थेत दोन स्वतंत्र खाती असतात. एकीला म्हणतात सावधान-मस्ती विभाग (सिम्पथेटिक). मोटरगाडीच्या ऍक्सेलरेटरप्रमाणे ही काम करते. समजा शरीराला (म्हणजे आपल्याला) आक्रमण करायचे आहे किंवा घाबरुन पळायचे आहे तर अशावेळी आतली सगळी यंत्रणा यासाठी तयार करते ती हीच यंत्रणा. यामुळे काय काय होते ते पाहू या.

– स्नायूंचा रक्तपुरवठा वाढतो.
– यासाठी हृदय वेगाने धडधडते, जास्त दाब निर्माण करते. हृदयाला जास्त रक्तपुरवठा होतो.
– स्नायूंमधल्या रक्तवाहिन्या रुंदावतात, त्यातून रक्त जास्त वाहू लागते.
– श्वासनलिका रुंदावतात आणि हवेचा जास्त पुरवठा होतो.
– घाम येतो. यामुळे शरीरातली उष्णता बाहेर टाकली जाते. (कूलिंग मशिनप्रमाणे).
– तोंडाला लाळ कमी सुटते, तोंड कोरडे पडते.
– याचबरोबर पचनसंस्थेची हालचाल व रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे इकडे रक्त कमी येऊन स्नायूंकडे वळवले जाते.
– लघवी कमी निर्माण होते. मूत्राशय सैलावते.
– डोळयाच्या बाहुल्या विस्फारतात, त्यामुळे जास्त प्रकाश आत शिरतो.
– यकृतामार्फत रक्तात जास्त साखर सोडली जाते. यामुळे उर्जा पुरवठा होतो.
– स्नायूतील ग्लायकोजेन विरघळून साखर उपलब्ध होते.
– स्नायूंचा तणाव/आकुंचन वाढतो.
– शरीरातील रासायनिक क्रियांचा वेग वाढतो.
– भीतीने शरीरावर रोमांच उभे राहतात.
– मेंदूची जागरुकता वाढते.
– त्वचेच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया वेगवान होते (याची गरज लागू शकते)
– (पुरुष जननेंद्रियातून वीर्य बाहेर पडते. हा परिणाम विशिष्ट प्रसंगीच होतो.)
ह्या सर्व प्रक्रियांमुळे शरीराची लढण्याची किंवा पळ काढण्याची चांगली तयारी होते.

हे सगळे व्हायला फक्त 4-5 सेकंद पुरतात. उदा. तुमच्यामागे अचानक कुत्रा लागला तर तत्क्षणी तुम्ही घाबरता आणि पळू लागता. आपल्याला काही कळायच्या आत वरील सर्व घटना घडू लागतात. ही सावधान (सिम्पॅथेटिक) चेताव्यवस्था कोणकोणत्या प्रसंगी काम करते?

– घाबरून पळायचे असेल, किंवा बस पकडायची असेल.
– लढायचे असेल.
– स्पर्धा (परीक्षा)
– तणाव, उत्सुकता, लैंगिक भावना
– राग (क्रोध) एखाद्यावर आपण खूप रागावलो असू तर
सुस्ती-विश्राम विभाग

Sleep Dreams ही छाती-पोटातल्या इंद्रियाशी जोडलेली असते. पॅरासिम्पथॅटिक किंवा ‘पचन व विश्राम’ चेताव्यवस्थेमुळे खालील परिणाम साधतात.

– डोळयाच्या बाहुल्या लहान होतात-प्रकाश कमी दिसतो.
– तोंडाला लाळ सुटते.
– हृदयाचा वेग कमी होतो. नाडी मंदावते. जोर कमी होतो.
– श्वसनाची हवेची देवाण घेवाण कमी होते. श्वासनलिका अरुंद होतात.
– फुप्फसांमधला रक्तपुरवठा कमी होतो.
– पचनसंस्थेत हालचाल, लगबग वाढते. जठराचे तोंड सैलावते.
– यकृतात साठवणूक केलेल्या साखरेची प्रक्रिया सुरु होते.
– मूत्राशय सजग होते. त्यामुळे लघवीची भावना होते.
– पुरुष जननेंद्रिय/लिंग ताठ होते.
या सर्व प्रक्रिया अन्नपचनाच्या व आरामाच्या दृष्टीने अनुकूल आहेत. संपूर्ण शरीरात दोन जातींची सूक्ष्म बटने असतात. त्यांना अ व ब प्रकारचे रिसेप्टर म्हणतात. अनेक औषधे या सूक्ष्म रिसेप्टरवरच क्रिया करतात. वैद्यक शास्त्रातला हा विशेष शोध आहे.

या अंतर्गत किंवा ऐंद्रिय चेताव्यवस्थांमुळे शरीर एकतर सावध होते (लढायला किंवा पळून जायला) नाहीतर आरामासाठी.

साधारणपणे भोजन प्रसंगापासून 1-2 तासभर ही आरामाची चेताव्यवस्था जास्त काम करते. यावेळी धावपळ करायला आपल्याला आवडत नाही, उलट बसायला किंवा झोपायला आवडते. झोपेत देखील ही चेताव्यवस्था जास्त चालते.

आपण याची प्रचिती घेऊ शकतो. कशी?

– नाडी मोजा. मिनिटाला किती वेग आहे? आता खोल श्वास घ्या आणि धरुन ठेवा. नाडी मोजा. नाडी मंद वेगाने चालते असे दिसेल. असे का? तर या क्रियेने आराम चेताव्यवस्था प्रबळ होते.
– खूप वेदना झाल्यास ‘पचन व विश्राम’ चेताव्यवस्था जास्त सजग होते. त्यामुळे अचानक रक्तदाब, नाडी कमी होते. यामुळे माणूस चक्कर येऊन खाली पडतो. हाच अनुभव पोटात खूप कळ आल्यास, खूप गॅस झाल्यास येतो. अशी चक्कर खाली पडल्यावर रक्तपुरवठा सुधारुन बरी होते.
या ऐंद्रिय चेताव्यवस्थेचे महत्त्व असे की, वैद्यक शास्त्रात अनेक औषधे याच्या मार्फतच काम करतात. काही औषधे एका व्यवस्थेला प्रबळ करतात, तर काही तिला अडवतात. उदा. रक्तदाब कमी करणारी बरीच औषधे ‘सावधान’ व्यवस्थेला मंदावतात आणि त्यातूनच रक्तदाब कमी होतो. बेलाडोना नावाचे औषध ‘पचन आणि विश्राम’ चेताव्यवस्थेला अडथळा आणते. त्यामुळे तोंड कोरडे पडते, आतडी मंदावतात, बध्दकोष्ठ होते. पोटाची कळ थांबवण्यासाठी हे औषध वापरले जाते.

ही व्यवस्था बिघडली की विशिष्ट आजार निर्माण होतात. त्यातला हा एक आपल्या माहितीत असायला पाहिजे. काही वृध्द व्यक्तींना झोपेतून उठताना चक्कर येण्याचा त्रास होतो. याला ऑर्थोस्टटिक हायपोटेन्शन किंवा अल्प रक्तदाब म्हणतात.

झटके येणे

मुलांमध्ये व मोठयांमध्ये झटके येण्याची कारणे बहुधा वेगवेगळी असतात. झटका येणे म्हणजे स्नायूंचे इच्छेशिवाय व अचानक आखडणे. झटका एखाद्या स्नायूपुरता किंवा अनेक भागांत असतो (उदा. धनुर्वात). काही वेळा केवळ दातखीळ बसून सुरुवात होते. झटके सर्व शरीरभर पसरतात. झटक्यांच्या कारणांचा वयाप्रमाणे विचार करावा.

झटक्याची कारणे : लहान मुले (पाच वर्षेपर्यंत)
  • काही मुलांना जास्त ताप आल्यास झटका येतो. ताप उतरल्यावर झटके थांबतात.
  • मेंदूला किंवा मेंदूच्या आवरणाला सूज आल्यास झटके येतात.
  • धनुर्वात (हल्ली हा आजार आढळत नाही)
  • काही विषारी पदार्थ पोटात गेल्यास.
  • अपस्मार, फेफरे (पुढील आयुष्यातही टिकते).
  • शरीरातले चुन्याचे प्रमाण कमी झाल्यास.
  • डोक्यास मार लागून मेंदूला धक्का पोचला असल्यास.
  • नवजात अर्भकांत शरीरातील चुना (कॅल्शियम) कमी झाल्यास किंवा शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास झटके येतात. नवजात अर्भकाचे झटके ओळखणे अवघड असते. या वयातले झटकेदेखील काही स्नायू भागांपुरतेच मर्यादित असतात. हाताचे स्नायू आखडणे, पाय सारखा जवळ ओढणे, पाठ जमिनीपासून उंचावून ताणून धरणे, मान वाकडी करणे, डोळे फिरवणे अशा विविध स्वरूपांत हे झटके येऊ शकतात. थोडयाशा अनुभवानंतर हे कळू शकते. अर्थात बाळाच्या आईला बाळाचे हे ‘वेगळे वागणे’ कळते. त्या मानाने मोठया मुलांना किंवा माणसांना आलेले झटके कळणे सोपे असते.
मोठेपणी झटके येण्याची कारणे

तरुण व प्रौढ वयातल्या झटक्यांमागे अपस्मार, फेफरे, धनुर्वात, विषबाधा, सर्पदंश, मेंदूला मार लागणे (उदा. अपघात), मेंदूला सूज, गाठ येणे यांपैकी काही कारण असू शकेल.

झटका तीव्र व सर्व शरीरभर असेल तर ब-याच वेळा जीभ चावली जाते. वेडेवाकडे पडल्यामुळे जखम होऊ शकते, क्वचित बेशुध्दीही येऊ शकते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.