skin iconत्वचाविकार
खाज

खाज (कंड) अनेक कारणांनी सुटते. खरूज, नायटा इतर सूक्ष्मजंतूंमुळे होणारा दाह, घामोळया, ऍलर्जी किंवा वावडे व उवा ही खाज सुटण्याची प्रमुख कारणे आहेत. (वावडे हे सूर्यप्रकाश, धूळ, कपडे, औषधे, मासे, अंडी, काँग्रेस गवत यांपैकी कशाचेही असू शकते.)

वावडे : कारणे

कोठल्याही पदार्थाचे वावडे येऊ शकते. पण नेहमीच्या अनुभवात काँग्रेस गवत (गाजर गवत), खाण्यात एखादा नवीन पदार्थ (उदा. मासे), अंडी, फुलाफळांचे नवीन बहर, बदललेला मोसम अशा अनेक कारणांनी वावडे येऊ शकते. पण ते सर्वांनाच येते असे नाही. एखादा कीटक चावल्यामुळे एखाद्याला गांध येईल तर दुस-याला नाही.

वावडे येण्याचे प्रमाणही वेगवेगळे असते. नुसती थोडी खाज सुटण्यापासून ते सर्व शरीरावरची त्वचा सुजण्यापर्यंत वावडे येऊ शकते.

बहुतेक वेळा वावडयाचे कारण दूर झाले, की खाज व पुरळ आपोआप कमी होतात.

वावडयाचे कारण कायम राहणारे असेल (उदा. गाजर गवत) तर हळूहळू त्वचा खराब होऊन त्वचेला पू होणे, पाणी सुटणे, रक्त येणे असे परिणाम होऊ शकतात. यामुळे त्वचा कायमची जाड काळपट व खरखरीत होते.

खरूज

skin itchy खरजेचे बारीक किडे असतात ते साध्या डोळयांना दिसत नाहीत, भिंगाखालीच दिसू शकतात. हे किडे कपडयांतून, संपर्कातून एकमेकांकडे जातात. हे किडे कातडीत घरे (बोगदा) करून, अंडी घालतात. ही अंडी फुटून नवीन किडे बाहेर पडतात व नवीन घरे करतात. सुरुवातीला खरजेची घरे नाजूक त्वचेत (उदा. बोटांच्या बेचक्यात, हातावर) आढळतात. हळूहळू ती शरीराच्या इतर भागातही पसरतात. काळजीपूर्वक पाहिल्यास कातडीवर घरांच्या बारीक खुणा दिसतात. ती जागा लालसर दिसते. रात्रीच्या वेळी ही खाज जास्त जाणवते.

उपचार लवकर केला नाही तर या घरांमध्ये इतर सूक्ष्मजंतूंचा शिरकाव होतो. यामुळे पू होतो व ताप येतो. याला ओली खरुज म्हणतात.

खरजेचे किडे खसखस ते मोहरीइतक्याआकाराचे असतात. नर लहान तर मादी मोठी असते. शरीरावर सरासरी 12 किडे आढळतात. मादी कीटक त्वचेमध्ये नागमोडी तयार करून अंडी घालते. हे नागमोडी बीळ ओळखायला सोपे असते. या जागी जेंशन शाईचा एक थेंब टाका व स्पिरीटच्या बोळयाने लगेच पुसून घ्या. तोपर्यंत शाई बिळात जाते व त्यामुळे बिळ निळे-जांभळे उठून दिसते. किडा सापडल्यास साध्या भिंगाखाली व्यवस्थित पाहता येतो.

उपचार

खरजेसाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत. सर्वात स्वस्त व त्यातल्या त्यात निर्धोक औषध म्हणजे बेंझिल द्राव (बीबी) याची 25% द्रावणाची बाटली मिळते. बेंझिल औषध गरोदर स्त्रिया आणि 2 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी वापरायचे नसते. इतर मुलांसाठी हे औषध निम्मे पाणी मिसळून वापरायचे असते. मोठया मुलांमध्ये/माणसांमध्ये सरळ 25% द्रावण वापरावे. हे औषध आंघोळ झाल्यानंतर अंग कोरडे करून शरीरावर सर्वत्र लावावे. यानंतर 8-8 तासांनी परत एकेकदा लावावे. म्हणजे 24 तासांत ते 3 वेळा लावावे लागते. तोपर्यंत आंघोळ करू नये. या औषधाने थोडावेळ अंगाची आग होते.

या औषधाने खरुज बरी झाली नाही तर परमेथ्रिन 5% हे औषध वापरावे. याचे क्रीम मिळते. हे क्रीम रात्री झोपताना लावावे. पुढच्या आठवडयात परत असेच लावावे. याने आग होत नाही. लहान मुलांना आणि गरोदर स्त्रियांनापण हे औषध चालते.

खरजेच्या काही औषधांमध्ये गॅमा बेंझिन असते. ह्या औषधाने आग होत नाही पण ते त्वचेतून शरीरात शोषले जाते. याचे दुष्परिणाम होऊ शकतात. गरोदर स्त्रिया व 2 वर्षापेक्षा लहान मुलांना तर ते लावूच नये. मोठया मुलां-माणसांमध्ये मर्यादित भागावर खरुज असल्यास ते लावता येईल पण सर्व शरीरावर न लावणे बरे. एकूणच हे औषध टाळलेले बरे. हे औषध खरे म्हणजे फक्त उवांसाठी राखीव ठेवावे.

औषध लावल्यावर खरजेचा किडा मरतो. पण कातडी काही दिवस खाजत राहते. लगेच परत औषध न लावता वावडेविरोधी सी.पी.एम. गोळी सकाळी एक, रात्री एक अशी द्यावी. गरज पडल्यास आठवडयानंतर परत पांढरे औषध लावावे. ही झाली कोरडया खरजेची उपाययोजना.

ओली खरूज असल्यास (म्हणजे पू झाला असल्यास) आधी पाच दिवस कोझालचा डोस देऊन पू घालवावा. कोरडेपणा आल्यावर गॅमा लावावे.

खरजेसाठी ‘इव्हरमेक्टिन’ हे औषध तोंडाने घेता येते. हे घेतल्यावर वरून औषध लावण्याची गरज नसते.

सर्व कपडे उन्हात वाळवावेत. घरातल्या इतर सर्व व्यक्तींनाही हेच औषध एकदमच लावावे. नाही तर खरूज एकमेकांत फिरत राहील.

खरुज आणि आयुर्वेद
  • खरजेसाठी दद्रुहर लेप लावावा किंवा महामारिच्यादी तेल खरजेच्या भागावर कापसाच्या बोळयाने लावावे. याबरोबरच पोटातून दोन वेळा याप्रमाणे 10 दिवस द्यावे.
  • याबरोबर मंजिष्ठा (लालसर वनस्पती) चूर्ण एक चमचा सकाळी रिकाम्या पोटी द्यावे. त्यानंतर अर्धा तास तोंडाने काहीही घेऊ नये. या औषधाने रक्तशुध्दी होऊन त्वचेचे आरोग्य सांभाळले जाते. (या औषधाने लघवी लाल होते याची रुग्णाला कल्पना द्यावी.)

खरजेसाठी कडूनिंब पाल्याचाही वापर केला जातो.

होमिओपथी निवड

आर्सेनिकम, बेलाडोना, कल्केरिया कार्ब, कॉस्टिकम, हेपार सल्फ, मर्क सॉल, नेट्रम मूर, -हस टॉक्स, सिलिशिया, सल्फर, थूजा

नायटा, गजकर्ण

ringworm नायटे निरनिराळया प्रकारचे असतात. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर, जांघेत कमरेवर दगडफुलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा. यांत त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य कारणे म्हणजे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई, एकमेकांचे कपडे वापरणे, इत्यादी.

अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपडयाखाली नीट स्वच्छता राहत नाही. या ठिकाणी खरूज, नायटा, गजकर्ण वाढतात.

लक्षणे

हे दोन्हीही आजार कंबर, पोट, मांडया, जांघा, इत्यादी भागांत जास्त करून होतात. यामुळे खूप खाज सुटते. गजकर्ण व नायटयाची वाढ वेगाने होते, पण कातडीवर बधिरता मात्र नसते. यावरून कुष्ठरोगापासून हे आजार वेगळे ओळखता येतात. (कुष्ठरोगात चट्टयांना खाज सुटत नाही व कमी अधिक बधिरता येते.)

उपचार

स्वच्छता ही प्रथम महत्त्वाची आहे. – (रोज आंघोळ करणे, नखे कापणे.)

गजकर्ण, नायटयाचा भाग गरम पाणी व साबणाने स्वच्छ धुऊन नायटा मलम (व्हिटफिल्ड) रोज चोळून लावावे. व्हिटफिल्ड मलमाने सुरुवातीला आग होते, पण दोन-तीन आठवडयांत आराम पडतो व चट्टा जातो. नंतर आठवडाभर तरी मलम लावत राहावे. नाही तर नायटा परत उमटतो. व्हिटफिल्ड मलमापेक्षा मायकोल मलम जास्त चांगले आहे. याचा परिणाम लवकर (10 दिवसांत) होतो.

आयुर्वेद

गजकर्णासाठी उपाय करताना त्वचा कोरडी राहील अशी काळजी घेणे आवश्यक आहे.

  • गजकर्णाच्या भागावर करंजतेलाचा बोळा घासावा.
  • या बाह्य उपचाराबरोबर कोठा स्वच्छ राहण्यासाठी त्रिफळा चूर्ण (चमचाभर) कोमट पाण्याबरोबर रोज रात्री याप्रमाणे 10 दिवस घ्यावे.

नायटयासाठी आणखी एक पर्यायी बाह्य उपाय म्हणजे बहाव्याची कोवळी पाने वाटून सकाळ- संध्याकाळ लेप द्यावा.

घामोळया

घामोळया हा उन्हात लहान मुलांना होणारा त्रास आहे. घाम तयार करणा-या ग्रंथींची तोंडे बंद झाल्याने हा त्रास होतो. यात त्वचेवर बारीक पुरळ, लालसरपणा आणि खाज ही लक्षणे दिसतात. हा त्रास बहुधा पाठीवर होतो. साधारणपणे काही दिवसांतच हा त्रास आपोआपच नाहीसा होतो. तोपर्यंत खोबरेल तेल, चंदनलेप किंवा टाल्कम पावडर लावल्यामुळे आराम पडतो.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.