Addiction Icon व्यसने
चार मुख्य व्यसने

Addiction भारतात मुख्यतः चार पदार्थांच्या व्यसनांचे प्रमाण जास्त आहे : तंबाखू , दारू, गांजा आणि अफू. क्रमाने ते जास्त मादक आहेत. गांजा, अफू खेडेगावात मिळणे फार अवघड नसते पण हेरॉईन, गर्द इ. त्यांचे प्रकार मात्र सहसा शहरात आढळतात.

व्यसनाधीनतेच्या पाय-या
वैद्यकीय दृष्टिकोनातून व्यसनाधीनतेच्या चार पाय-या आहेत

1. तोंडओळख अथवा सुरुवात
2. सहज सेवनाची पायरी
3. सतत सेवनाची पायरी
4. व्यसनपतित अवस्था
अनेक व्यसनांची सुरुवात गमतीत होते. कधी मित्रमंडळीत गंमत म्हणून, कधी कुतूहल तर कधी धाडस म्हणून या पदार्थांचा संबंध येतो. ही झाली तोंडओळख. यापुढच्या पायरीत ती व्यक्ती स्वत:हून कधीकधी ‘सहज’ हे पदार्थ वापरून बघते. एकदा सतत सेवनाची पायरी गाठली, की ती व्यक्ती त्या पदार्थाच्या पूर्ण आहारी जाते. तो पदार्थ जर मिळाला नाही तर त्रासदायक शारीरिक, मानसिक लक्षणे दिसतात. उदा. सतत दारू पिणा-याला एखादा दिवस दारू मिळाली नाही तर अंगाची थरथर, उन्मादी अवस्था होते.

या पायरीवर व्यसनी व्यक्तीच्या मानसिकतेतही कायमचे बदल होत जातात. उदा. पैशासाठी खोटे बोलणे, चोरी, आक्रमकता, असहायता, इत्यादी गोष्टी स्वाभाविक होऊन जातात.

पतित अवस्था

या अवस्थेत व्यसनाधीन व्यक्तीच्या स्वभावात कायमचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम होतात. उदा. दारू पिणा-यामध्ये यकृताला सूज येणे, हातापायांना मुंग्या येणे, मेंदूत कायमचे दोष तयार होणे, स्वभावात अनेक दोष स्थिर होणे, इत्यादी. या अवस्थेत कितीही मदत केली तरी ती व्यक्ती सुधारण्याची फारशी शक्यता नसते. अशी व्यक्ती समाजातून बाहेर फेकली जाते. तरीही आपण व्यसनमुक्तीचे प्रयत्न सोडू नयेत.

उपचार

पहिले सूत्र म्हणजे लवकरात लवकर व्यसन ओळखणे. विशेषतः गर्द, इत्यादी अतिमादक पदार्थांच्या व्यसनांमध्ये नंतर केलेले उपचार फारसे यशस्वी होत नाहीत. सहजसेवनाच्या पायरीवर व्यसन थांबवणे अगदी महत्त्वाचे असते. एकदा त्या पदार्थाच्या आहारी गेल्यावर व्यसन थांबवणे थोडया लोकांच्या बाबतीतच शक्य होते.

दुसरे सूत्र म्हणजे व्यसन रोखण्याबरोबरच इतर पूरक आधार देणे. रुग्णालयात दाखल करणे, रुग्णांच्या गटांवर एकत्र उपचार, मानसोपचार करणे, समाजात पुन्हा सुस्थिर करणे, मानसिक आधार देणे, इत्यादी प्रयत्न केले तर उपयोग होतो.

पुरुषांचा खेळ, स्त्रियांचा छळ

बहुतेक व्यसने मुख्यतः पुरुष करतात. स्त्रियांनी व्यसन केलेच तर त्याची तीव्रता पुरुषाइतकी नसते. अपवाद फक्त अगदी अमली पदार्थांचा (हशीश, गर्द इ.). दारू, तंबाखू चे व्यसन स्त्रियांत अल्प आणि प्रमाणही कमी असते.

पण व्यसने जरी बहुधा पुरुष करीत असले तरी त्यांतली बरीच दुःखे स्त्रियांना भोगावी लागतात. दारूडा नवरा म्हणजे स्त्रीच्या जीवनाचे धिंडवडे. मारहाण, उपेक्षा, आजार हे तर होतेच. गरीब कुटुंबात स्त्रीवर सर्व आर्थिक जबाबदारीही येऊन पडते. व्यसनामुळे नव-याचे आयुष्य कमी होते; पण हाही स्त्रीला एक शापच असतो. म्हणूनच बहुतेक व्यसनमुक्तीच्या चळवळींमध्ये स्त्रीशक्ती पुढे असते.

व्यसनमुक्ती कार्यक्रम
व्यसने सोडविण्यासाठी

व्यसनमुक्ती हे त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी मोठेच आव्हान असते आणि चिकाटीने प्रयत्न केला तरच यात यश येऊ शकते. जेव्हा सवय प्राथमिक अवस्थेत असते तेव्हा ती सोडणे सगळयात सोपे असते, नंतर ते अवघड होत जाते.

व्यसनमुक्तीसाठी साधारणपणे खालीलप्रमाणे कार्यक्रम आखावा लागतो.

1. आधी त्या व्यक्तीला वेगळे काढून त्या पदार्थाचा पुरवठा बंद करणे, यासाठी खास संस्था असल्या तर त्यांचा उपयोग करावा. पदार्थ न घेतल्याने जे शारीरिक-मानसिक त्रास होतात त्यांवर उपचार करावे लागतात. नाहीतर पदार्थाची ओढ लागणे व अपयश येणे सहज शक्य आहे.

2. व्यसन थांबल्यानंतर आयुष्यात थोडी पोकळी निर्माण होते. ती भरून काढण्यासाठी मन रिझवतील असे कार्यक्रम लागतात. – उदा. खेळ, गाणी, भजन,इ. शक्यतो हे कार्यक्रम सामूहिक असावेत म्हणजे सगळयांबरोबर लवकर प्रगती होते. योगाभ्यासाचा यात चांगला उपयोग होतो.

3. व्यायाम, अभ्यास, व्यवसाय मार्गदर्शन, इत्यादी इतर जीवनोपयोगी अभ्यासाची व्यसन सुटायला मदत होते.

4. व्यसन पूर्ण सुटल्यानंतर पुन्हापुन्हा तपासणीसाठी बोलावून लक्ष ठेवणे, तसेच तो पदार्थ परत उपलब्ध होणार नाही याची काळजी घ्यावी.

5. तो पदार्थ जवळपास मिळू नये अशी व्यवस्था झाली नाही तर एवढे प्रयत्न वाया जाण्याची दाट शक्यता नेहमीच असते हे लक्षात घ्यायला हवे.

व्यसनमुक्तीसाठी आता अनेक संस्था प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रात मुक्तांगण, अल्कोहोलिक ऍनानिमस, स्वाध्यायपरिवार गडचिरोलीतील सर्च ही संस्था इ. संघटना यात मदत करू शकतील. अनेक शहरांत अशी केंद्रे असतात.

भारतात भांग व गांजा शेतात लावायला बंदी आहे. तरीही चोरून मारून काही शेतकरी ही पिके घेतात. मात्र अफूची मोठी लागवड अफगाणिस्तान या देशात होते. या देशात अफू हेच मुख्य नगदी पीक झाले आहे. या देशातून जगभर अफू चोरटया मार्गाने पोचते. दहशतवादी संघटना या व्यापारातूनच निधी मिळवतात.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.