femaleurine system icon स्त्रीजननसंस्था पुरुषजननसंस्था
स्त्रीजननसंस्था व मासिक पाळी विज्ञान
प्रास्ताविक

Happy Women for Work स्त्रियांचे आरोग्य आणि आजार हा एक महत्त्वाचा विषय आहे. आपल्या समाजातील स्त्रियांच्या उपेक्षेमुळे जन्माआधीपासूनच स्त्रीची परवड सुरु होते. आता लिंगनिदानावर बंदी आहे, तरीही स्त्रीगर्भ असला तर तो काढून टाकणे, मुलगा असेल तरच गर्भ वाढू देणे हे चालूच आहे. येथपासूनच स्त्रियांच्या दुय्यम स्थानाला सुरुवात होते. मुलगा जन्माला आला तर ठीक, मुलगी झाली तर आईही तोंड फिरवते. मुलगी झाली हे नवराबायको अनिच्छेने सांगतात. मुलगा झाला तर मात्र आनंदाने जगजाहीर करतात. जन्मानंतर मुलीची उपेक्षाच सुरु होते. खाण्यापिण्याकडे, आजारांकडे थोडे दुर्लक्ष व्हायला लागते. मुलाच्या ताटात साय तर मुलीकडे खालचे पातळ दूध अशी ही माया असते. शिक्षणात मुलांचा विचार आधी. घरकामाच्या वेळी मुलगा बसून तर मुलगी अवखळ वयातच घाण्यास जुंपली जाते. आईबापांच्या घरी सुरु झालेली ही उपेक्षा सासरी तर आणखी वाढत जाते. घरात कामाला सर्वात आधी उठणे, सर्वात नंतर झोपणे, सर्वांचे जेवून झाल्यावर उरलेले अन्न, शिळे अन्न वाढून घेणे, आजार अंगावर काढणे व पोराबाळांची काळजी ह्या सर्व गोष्टी सहजपणे स्त्रियांवर येऊन पडतात. दुर्दैवाने संसार मोडून माहेरी माघारी जायची पाळी आली तर माहेरी तसेच हाल होतात. स्त्री-पुरुषांच्या लग्नातील वयाच्या पाच-सहा वर्षाच्या अंतरामुळेच बायकोच्या आधी नवरा म्हातारा होतो, थकतो पण कष्टाने तेवढीच थकलेली बाई मात्र शेवटपर्यंत त्याची सेवा करीत राहते. थोडक्यात, ती शेवटी जेव्हा जाईल तेव्हाच सुटते.

अशी ही विषम सामाजिक परिस्थिती वैद्यकीय बाबतीतही लागू आहे. कुपोषणाने, उपेक्षेने स्त्रियांच्या आरोग्याचा दर्जा कमी राहतो. वजन, उंची हे तर कमी राहतातच, पण बहुतेक सर्व वयोगटांत स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असते. खरे तर शारीरिक स्नायू बळाचा अपवाद सोडला तर जीवशास्त्रीय दृष्टया स्त्रिया अधिक काटक असतात. परंतु अन्यायी समाजव्यवस्थेमुळे लोकसंख्येत पुरुषांच्या मानाने स्त्रियांची संख्या कमी असते, (भारतात दर हजार पुरुषांमागे फक्त 933 स्त्रिया असे प्रमाण आहे.)

औषधोपचाराच्या बाबतीत काही गोष्टी स्पष्टपणे दिसून येतात. एक तर नेहमीच्या आजारांच्या बाबतीत स्त्रिया डॉक्टरकडे पुरुषांच्या मानाने कमी जातात. अनेक कारणांनी स्त्रिया जास्त प्रमाणात दुखणी अंगावर काढतात. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांचे आजार- जननसंस्थेचे आजार, गरोदरपण व बाळंतपणाशी संबंधित आजार- हे मोठया प्रमाणात आढळतात. तरीही चांगल्या सोयी तालुका पातळीवरही अभावानेच आहेत. तालुकापातळीवरच्या डॉक्टरांपैकी असला तर एखादाच या विषयाचा तज्ज्ञ असतो. मागास जिल्ह्यांमध्ये परिस्थिती जास्तच बिकट आहे. पाण्याच्या सोयीही अभावानेच आढळतात.

या सर्व परिस्थितीमुळे स्त्रियांच्या खास आजारांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. हे आजार ओळखणे, पुरेसे योग्य उपचार आणि योग्य वेळी तज्ज्ञाकडे पाठवणे ह्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्त्रियांची ही दुखणी बहुधा स्त्रियांनाच सांगितली जातात. त्यामुळे प्रशिक्षित नर्स किंवा आरोग्यसेविका हे काम योग्य प्रकारे करू शकेल.

स्त्रीजननसंस्थेची रचना व कार्य

स्त्रीशरीररचनेमध्ये जननसंस्था व स्तन यांची रचना वैशिष्टयपूर्ण असते. आधी आपण स्त्रीजननसंस्थेचा विचार करू या. जननसंस्थेमध्ये तीन मुख्य भाग असतात. (1) योनिद्वार, (2) योनिमार्ग, (3) गर्भाशय, गर्भनलिका व बीजांडे हा ओटीपोटातला भाग.

योनिद्वार

Vagina हा भाग मुख्यतः त्वचेचा बनलेला असतो. त्याच्या वरच्या टोकाला एक बोंड असते. या बोंडाचा भाग अत्यंत संवेदनाक्षम असून यावरच्या स्पर्शाने लैंगिक भावना जागृत होते. पुरुषाच्या बाबतीत शिश्नाचा पुढचा भाग जसा संवेदनाक्षम असतो तसाच हा भाग असतो. योनिद्वारावर कौमार्यावस्थेत झाकणारा त्वचेचा पातळ पडदा असतो व त्यात बारीक छिद्र असते. या छिद्रातून मासिक पाळीचे रक्त येऊ शकते. कौमार्यावस्थेत योनिद्वारातून हाताची दोन बोटे किंवा एक बोटही सहसा जाऊ शकत नाही. मात्र पुढील कारणांनी हा पडदा फाटू शकतो. योनिमार्गात बोटे घालून लैंगिक आनंद मिळवणे (हस्तमैथुन) काही मैदानी खेळ किंवा लैंगिक योनिसंबंध आला तर ही पातळ त्वचा फाटते. यामुळे योनिमार्गाचा रस्ता मोकळा होतो. सुरुवातीला पडदा फाटताना रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव 2-3 दिवसांनी पूर्ण थांबतो व वेदनाही थांबते. हे सर्व जर माहीत नसेल तर विनाकारण गैरसमज, भीती वाटण्याचा संभव असतो.

योनिद्वाराच्या वरच्या बोंडाच्या जरा खाली लघवीचे छिद्र असते. मूत्राशयातून येणारी मूत्रनलिका या छिद्रावाटे बाहेर उघडते.

योनिद्वाराच्या दोन्ही बाजूंना त्वचेचे जाडसर थर असतात. यांना योनिद्वाराच्या ‘पाकळया’ म्हणता येईल. या पाकळयांमध्ये पाझरणा-या ग्रंथी असतात. लैंगिक उद्दिपनानंतर त्यातून चिकट द्राव बाहेर पडतो. या द्रावाने लैंगिक संबंध सोपा होतो व जखमा होत नाहीत. कधीकधी या ग्रंथी सुजून गाठी तयार होतात व त्या दुखतात.

बाळंतपणाच्या वेळी- विशेषतः पहिल्या वेळी – योनिद्वार फाटल्याने जखमा तयार होतात. अशा जखमा बहुधा खालच्या बाजूला (म्हणजे घडयाळाची कल्पना केल्यास 4,5,6,7,8 या ठिकाणी) होतात. जखमा योनिमार्गात तसेच गुदद्वार व गुदाशय या दिशेने जातात. नीट काळजी घेतली नाही तर या जखमा दूषित होतात. जखम भरून आकसल्यावर योनिद्वार कायमचे वेडेवाकडे होते. या जखमा टाळण्यासाठी डॉक्टर बहुधा पहिल्या बाळंतपणात ‘योनिछेद’ देतात. यालाच बाळंतपणात ‘टाके पडणे’ असे काही लोक म्हणतात.

योनिमार्ग

Vaginally जननसंस्थेचा दुसरा भाग म्हणजे गुहेप्रमाणे असलेला योनिमार्ग. योनिमार्ग हा योनिद्वारापासून सुरू होऊन गर्भाशयाच्या तोंडापर्यंत जातो. ही एक नाजूक त्वचेची पिशवी असते. योनिमार्गाची त्वचा सैल असते. ती ताणून बाळाचे डोके जाईल इतकी मोठी होऊ शकते.

योनिमार्गाची पिशवी जागच्या जागी धरून ठेवण्यासाठी आजूबाजूला ओटीपोटाचे आतले स्नायू आणि स्नायुबंध असतात. योनिमार्गाच्या मागे गुदाशय म्हणजे मोठया आतडयाचा शेवटचा भाग असतो. पुढे मूत्राशय आणि दोन्ही बाजूंस स्नायू तसेच इतर अनेक अवयव (उदा. रक्तवाहिन्या, बीजांडे, इ.) असतात.

गर्भाशयाच्या तोंडाचा भाग योनिमार्गात उतरलेला असतो व दोन बोटे घालून तपासताना हा भाग बोटांना लागतो. याचा आकार लांबट पेरूच्या देठासारखा असतो.

योनिमार्गाची त्वचा लालसर आणि मऊ असते आणि त्यातील ग्रंथींतून ओलसरपणासाठी द्रव पाझरतात. काहीजणींना उतारवयात ‘अंग़’ बाहेर पडण्याचा (म्हणजे गर्भाशय बाहेर डोकावण्याचा) त्रास होतो. योनिममार्गाची त्वचा आणि बाजूचे स्नायू शिथिल झाल्यामुळे गर्भाशय असे खाली उतरते.

योनिमार्गाच्या या विशिष्ट रचनेमुळे स्त्री-पुरुषसंबंध, बाळंतपण, इत्यादी गोष्टी शक्य होतात.

योनीमार्गात कायमच सहजिवाणूंची एक प्रजाति वसतीस असते. या जिवाणूंमुळे योनिमार्गात कायम आम्लता राहते. या आम्लतेमुळे इतर कोणतेही रोगजंतू सहसा योनीमार्गात टिकू शकत नाहीत. मात्र पाळीच्या काळात आणि बाळंतपणानंतर ही आम्लता थोडी कमी होते.

योनिमार्ग हा योनिद्वारापासून सुरु होऊन गर्भाशयाच्या तोंडाशी संपतो. या अवयवांना वारंवार जंतुदोषाचा सामना करावा लागतो. या अवयवाचे आजार समजून उपचार करणे व आवश्यक तर तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

गर्भाशय, गर्भनलिका आणि बीजांडे

Uterus Diagram गर्भाशय हा काहीसा लांबट पेरूच्या आकाराचा असतो. गर्भाशय आतून पोकळ असते. गर्भाशयाचा आकार गर्भावस्थेत वाढत जातो. गर्भ नसलेल्या काळात तो मध्यम पेरूइतका (3-4 इंच लांब, 2 इंच रुंद व 1 इंच जाड) आणि तसाच गोलसर असतो.

गर्भाशयाच्या तोंडाचा भाग लांबसर-म्हणजे पेरूच्या टोकासारखा असतो. याला मधोमध एक छिद्र असते. यातून शुक्रपेशी गर्भाशयात प्रवेश करतात. कौमार्यावस्थेत हे छिद्र अगदी लहान म्हणजे जेमतेम टाचणी जाईल एवढे असते. बाळंतपणानंतर मात्र ते सैल आणि दाभण जाईल इतके मोठे होते. गर्भाशयात एक लहान पोकळी असते. यातच गर्भ वाढतो.

गर्भाशयाच्या दोन्ही बाजूंना गर्भनलिका असून त्या या गर्भाशयात उघडतात. या नळयांचे काम म्हणजे बीजांडात तयार होणारी स्त्रीबीजे वाहून गर्भाशयात आणून सोडणे. स्त्रीबीजांचे फलनही या गर्भनलिकांमध्येच होते. या नळया जर काही कारणाने बंद झाल्या तर गर्भधारणा होऊ शकणार नाही. हे वंध्यत्वाचे एक महत्त्वाचे कारण आहे. स्त्रीनसबंदीमध्ये या नळया कापून दोरा बांधून बंद केल्या जातात.

Ovulation मासिक पाळी आल्यापासून उतारवयात ती जाईपर्यंत स्त्रीबीजे तयार होतात. स्त्रीबीजांडात दर महिन्यास एक स्त्रीबीज तयार होऊन गर्भनलिकेत येते. एका वेळी एकाच बाजूने स्त्रीबीज येते. गर्भावस्थेत स्त्रीबीजांडाचा आकार मोठा होतो, पण इतर वेळी सुपारीपेक्षा लहान असतो. बीजांडातून स्त्रीबीज बाहेर पडले, की गर्भनलिकेच्या पसरट आणि संथ हालचाल करणा-या तोंडातून ते नळीत येते. स्त्रीबीजांडात काही स्त्रीसंप्रेरके तयार होतात. यांमुळे मासिक पाळी येणे, गर्भ राहणे व वाढणे, स्त्रीत्वाची वैशिष्टये उदा. अवयवांना गोलाई असणे, दाढीमिशा नसणे, योनिद्वाराशी केसांचा उलटा त्रिकोणी भाग असणे, स्तनांचा आकार, आवाजातले मार्दव, इ. गुण टिकवले जातात. जर स्त्रीबीजांडे काढून टाकावी लागली (रोगांमुळे) किंवा निकामी झाली तर वरील वैशिष्टये जाऊन ‘पुरुषीपणा’ दिसू लागतो. काही स्त्रियांना उतारवयात ओठावर लव असण्याचे कारण स्त्रीरसांचे (संप्रेरक) प्रमाण कमी होणे हे असते. उतारवयात शरीरातील हाडांचा विरळपणा याच कारणाने होतो.

मेंदूतील एक अंतःस्त्रावी ग्रंथी (पिच्युटरी) स्त्रीजननसंस्थेची वाढ आणि स्त्रीबीजांडाच्या वाढीचे नियंत्रण करते. मेंदूतल्या या ग्रंथीवर शरीरातील अनेक इतर ग्रंथींचेही काम अवलंबून असते.

स्तन

Breast Diagram स्तनांची रचना लिंबू किंवा संत्र्याप्रमाणे अनेक (16-20) कप्प्यांमध्ये केलेली असते. स्तनांच्या बोंडाशी हे सर्व कप्पे चाकाच्या आ-यांप्रमाणे एकत्र जोडलेले असतात. प्रत्येक कप्प्यात दुग्धजनक ग्रंथींचा एक घड असतो. त्यात निर्माण होणारे दूध एका नलिकेवाटे बोंडात आणले जाते.

स्त्री व पुरुषांच्या स्तनांची मूळ रचना सारखीच असते. मात्र स्त्रियांच्या स्तनांचा आकार मोठा असतो. त्यातल्या चरबीचे प्रमाण व दूध तयार करणा-या ग्रंथी जास्त असतात. परंतु मूळ रचना सारखी असली तरी स्तनांच्या आजारांचे प्रमाण स्त्रियांमध्ये (पुरुषांच्या मानाने) खूपच जास्त असते. स्तनांचा कर्करोग, गळू, गाठी, इत्यादी आजार स्तनांमध्ये होऊ शकतात. स्तनांची रसवाहक संस्था काखेतल्या ग्रंथींशी जोडलेली असते. त्यामुळे कर्करोग किंवा जंतुदोष झाल्यानंतर काखेतल्या ग्रंथी सुजून अवधाण येते.

मासिक पाळीचे शरीरविज्ञान

सुमारे 15 ते 45 वर्षे या वयात स्त्रीसंप्रेरकांच्या प्रभावामुळे खालील परिणाम घडतात.

  • गर्भाशयात दर महिन्यास अस्तर तयार होते.
  • बीजांडातून स्त्रीबीज बाहेर पडते.
  • स्त्रीबीज फळले नाही तर तयार झालेले अस्तर गळून पडून मासिक रक्तस्राव होतो.
  • पाळी संपल्यावर परत अस्तर तयार होऊ लागते.

Girls Cycling या सर्व घटनाचक्राला ‘मासिक पाळी’ असे म्हणतात.

स्त्रीबीजांडात हजारो स्त्रीबीजे सुप्तावस्थेत असतात. दर महिन्यास त्यातील एक पिकून गर्भनलिकेत येते. याच वेळी तिथे शुक्रपेशी हजर असतील तर फलन होते. फलन म्हणजे स्त्रीबीज व पुरुषबीज यांचा संयोग होतो. फलित स्त्रीबीज गर्भाशयात येते व रुजते. गर्भाशयात गर्भधारणेसाठी आवश्यक असलेले बदल तोपर्यंत झालेलेच असतात. मुख्य म्हणजे गर्भाशयाच्या अस्तराची वाढ होऊन ते 3 ते 5 मि. मि. इतके जाड होते. ही वाढ इस्ट्रोजेन संप्रेरकामुळे होते. पहिल्या दोन आठवडयांत इस्ट्रोजेनची पातळी वाढते आणि स्त्रीबीज बाहेर पडते. (यानंतर 2-3 दिवस इस्ट्रोजेनची पातळी अचानक खालावते. प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढत जाते.)

यानंतर एक-दोन दिवसांतच इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही दोन्ही संप्रेरके तयार होतात. रक्तातली त्यांची पातळी वाढत जाते. यांपैकी प्रोजेस्टेरॉनमुळे गर्भाशय-अस्तराच्या वर गर्भधारणेच्या दृष्टीने अनेक सूक्ष्म बदल होतात. यामुळे गर्भाच्या प्राथमिक पोषणाची तयारी होते.

गर्भधारणा झाली नाही तर प्रोजेस्टेरॉनची पातळी खालावते. आठवडयानंतर हे अस्तर गळून पडते व रक्तस्राव होतो. यानंतर परत इस्ट्रोजेनच्या प्रभावाने अस्तर वाढायला लागते. हे मासिक चक्र चालूच राहते.

Menstrual Cycle गर्भधारणेचे नऊ महिने व त्यानंतरच्या स्तनपानाच्या काळात मासिक पाळी येत नाही.

पाळीचे हे चक्र सर्वसाधारणपणे 28 दिवसांचे असते, पण काही दिवस मागेपुढे होऊ शकतात. रक्तस्रावाचा काळही एक-दोन दिवसांपासून पाच दिवसांपर्यंत असू शकतो. ई आणि पी (इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन) संप्रेरकांच्या पातळीतील चढ-उताराने मासिक पाळीच्या घटनाचक्रात बदलही होतात.

पाळीच्या वेळी अस्तर गळून पडण्याच्या या घटनेमुळे एक मोठा फायदा होतो. हा फायदा म्हणजे गर्भाशयात जंतुदोषाची लागण दीर्घकाळ राहू शकत नाही. जुने अस्तर टाकले गेल्यामुळे त्याबरोबर दूषित भागही टाकला जातो. पण गर्भनलिका व ओटीपोटात जंतुदोष पोचला तर मात्र तो तिथे जास्त राहू शकतो- पाळीबरोबर टाकला जात नाही.

हे सगळे समजावून घेतल्यावर पाळीत अमंगळ असे काही नाही हे लक्षात येईल. अनेक घरांत स्त्रियांना मसिक पाळीच्या काळात ‘बाजूला बसायला’ लागते. त्यात अज्ञान आणि अंधश्रध्देचाच भाग आहे. तसे पाहता पाळीत विश्रांती मिळण्याची सबबही इथे लंगडी आहे, कारण या काळात स्त्रियांना धुणीभांडी करावी लागतात. अज्ञानाची जागा आता विज्ञानाने घेतली पाहिजे.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती गर्भधारणेबद्दल. अपेक्षित वेळी पाळी न आल्यास आणि त्याआधीच्या महिन्यात लैंगिक संबंध आलेला असल्यास गर्भधारणेची शक्यता मनात ठेवली पाहिजे. अनेक मुलींना यासंबंधीच्या अज्ञानामुळे व भीतीमुळे त्रास सहन करावा लागतो अशा वेळी लवकरात लवकर (म्हणजे पाळी चुकल्यानंतर 1 आठवडयांत) तपासणी व उपाययोजना झाल्यास पुढचा त्रास टळू शकतो. अनेक मुली गर्भपातासाठी इतक्या उशिरा येतात की त्या वेळी गर्भपात करणे शक्य नसते. गर्भपातासाठी जास्तीतजास्त 20 आठवडे ही मर्यादा आहे. त्यातही 12 आठवडे हाच जास्त सुरक्षित कालावधी असतो.

मासिक पाळीच्या वेळची स्वच्छता
Pregnancy Kit
Menstrual Cycle Cloth

मासिक रक्तस्रावाच्या वेळी योनीमार्गातली आम्लता कमी होते. यामुळे जंतुदोषासाठी अनुकूल परिस्थिती असते. अशा वेळी स्वच्छता महत्त्वाची असते. मुख्य मुद्दा म्हणजे स्वच्छ कपडयाची घडी वापरणे आवश्यक आहे. बाजारात मिळणारे पॅड्स महाग असतात. जुन्या स्वच्छ धुतलेल्या सुती कपडयाच्या घडया यासाठी पुरतात. घरच्या घरी घडया तयार करता येतात. यासाठी पातळ सुती कपडा (किंवा गॉझ) घेऊन त्यात कापूस ठेवून लांबट घडी तयार करता येते. निर्जंतुक करण्यासाठी प्रेशर कुकर किंवा सोलर कुकर असल्यास चांगले. पण यापैकी काहीही नसल्यास सुती जुनेराच्या धुऊन कडक उन्हात वाळवलेल्या घडया चालू शकतील. पुढची अडचण म्हणजे वापरानंतर या घडया टाकायला जागा नसते. याबद्दल खूप गैरसमज असल्यामुळे घरच्या कचराकुंडीत/बादलीत घडी टाकायला स्त्रियांना नको वाटते. मात्र रद्दी कागदात गुंडाळून टाकल्यास हा प्रश्न मिटतो.

योनिमार्गात बसू शकणारे प्लास्टिकचे लवचीक कप हे नवे साधन बाजारात उपलब्ध होत आहे. हा कप घडी करून स्वत:च आत बसवता येतो. दिवसभराचे रक्त त्यात जमा झाल्यावर तो काढून धुता येतो व परत बसवता येतो. गरजेप्रमाणे वारंवार धुऊन 3-4 दिवस वापरल्यावर पुढच्या पाळीपर्यंत तो राखून ठेवता येतो. हे कप सोयीचे आहेत, कारण कापडी घडी टाकणे हे कटकटीचे काम आहे व त्यामुळे प्रदूषण वाढते. मात्र हे कप सध्या महाग आहेत. प्रसार होईल तसे ते स्वस्त होत जातील.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.