Ayurveda Icon आधुनिक औषध विज्ञान औषध विज्ञान व आयुर्वेद
आधुनिक औषध विज्ञान

रोगांचा इतिहास हा माणसाइतकाच जुना आहे. थंडी आणि उष्णता, जीवजंतू, विषारी पदार्थ, अपघात, उपासमार, वय, कामधंदा या सर्वांचा बरावाईट परिणाम लक्षावधी वर्षे माणसावर होत आलेला आहे. आजारातून सुटण्यासाठी तेव्हापासून माणसाची सतत धडपड चालू आहे. ही धडपड पृथ्वीवर सगळीकडे होत राहिली. निरनिराळया लोकजीवनांत निरनिराळया उपचारपध्दती तयार झाल्या. मंत्रतंत्रापासून ते मेंदूवरच्या अवघड शस्त्रक्रियेपर्यंत आपला प्रवास झाला. ठळक अशी उदाहरणे पाहिली तर आयुर्वेद, सिध्द, होमिओपथी, ऍलोपथी (आधुनिक वैद्यक) अक्युपंक्चर (म्हणजे सुया टोचून उपचार करणे), योगचिकित्सा, निसर्गोपचार, बाराक्षार, संमोहनशास्त्र, युनानी अशी अनेक शास्त्रे आहेत. याशिवाय आदिवासी जमातींमध्ये वेगवेगळया पध्दती आहेतच.

यांतील काही पध्दतींमध्ये औषधे वापरली जात नाहीत. मात्र आयुर्वेद, युनानी, सिध्द, होमिओपथी व आधुनिक वैद्यक (ऍलोपथी) यांमध्ये औषधांचा वापर होतो. आजच्या परिस्थितीत उपचार म्हणजे औषधोपचार असे समीकरणच झाले आहे. या वाढत्या औषधवापरामुळे अनेक प्रश्नही निर्माण झालेले आहेत. औषध कंपन्यांनी आक्रमक तंत्राने औषधांचा जादा वापर डॉक्टरवर्ग व जनतेच्या गळी उतरवला आहे. वैद्यकीय क्षेत्रातला मोठा खर्च औषध विकत घेण्यातच जातो. शिवाय औषधांचे दुष्परिणामही होत असतात. म्हणून औषधांचा योग्य व काटेकोर वापर करण्यासाठी औषधशास्त्राचे पुरेसे ज्ञान औषध देणा-याला हवे. तसेच थोडेफार ज्ञान लोकांपर्यंतसुध्दा गेले पाहिजे.

आधुनिक औषधे

होमिओपथिक व ऍलोपथिक औषधशास्त्रे ही दोन्ही आधुनिक काळातही आहेत. मात्र इथे ऍलोपथिक औषधशास्त्र या अर्थानेच आधुनिक औषधशास्त्र असा शब्द वापरला आहे. ऍलोपथीमध्ये प्रभावी, निर्धोक अशी औषधे 19 व्या शतकाच्या अखेरीपर्यंतही फारशी नव्हती. विसाव्या शतकात, विशेषतः गेल्या पन्नास-साठ वर्षांत मात्र या शास्त्रात अत्यंत वेगाने प्रगती झाली. गुणकारी व तुलनेने निर्धोक अशी शेकडो औषधे आता बहुसंख्य रोगांसाठी उपलब्ध आहेत. याचे श्रेय एकतर सर्वसाधारण विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीला आहे. कारण निरनिराळया विज्ञान-क्षेत्रांतील प्रगतीच्या आधारेच आधुनिक औषधशास्त्र उभे राहिले आहे. त्याचबरोबर आधुनिक औषधशास्त्राची एक पध्दत, शिस्त तयार झाली आहे. जगभर ती शिस्त मानली जाऊन त्या आधारे संशोधन होते. त्याचा फायदा सर्व मानवजातीला मिळतो हेही महत्त्वाचे आहे. नवीन औषध शोधताना ते प्रभावी व तुलनेने निर्धोक आहे याची खात्री एका समान पध्दतीच्या आधारे करतात. औषध उत्पादक कंपन्यांनीही संशोधन करून अनेक नवी औषधे तयार केली आहेत.

औषध संशोधन

वनस्पती, प्राणी, जीवजंतू, क्षार, खनिज यांवर गुंतागुंतीच्या रासायनिक क्रिया करून आधुनिक औषधे तयार केली जातात.

  • प्राण्यांमध्ये विशिष्ट विकार निर्माण करून त्यावर एखादे औषध उपयोगी पडते का ते पाहिले जाते. एकाच वेळी अनेक उंदीर वा तत्सम प्राणी निवडले जातात. पैकी निम्म्यांना हे नवीन औषध दिले जाते तर निम्म्यांना वरून तशाच दिसणा-या कॅपसूलमध्ये निरुपद्रवी पदार्थ घालून दिली जाते. आजार बरे होण्याचे प्रमाण हे औषध दिलेल्या गटामध्ये जास्त आढळले तरच हे औषध प्रभावी ठरते.
  • तसेच औषधाच्या नेहमीच्या डोसच्या अनेकपट डोस प्राण्याला देऊन त्याचे दुष्परिणाम अभ्यासतात. सध्या अस्तित्त्वात असलेल्या औषधांच्या मानाने हे नवीन औषध प्राण्यांमध्ये प्रभावी व तुलनेने निर्धोक ठरले तरच संशोधक पुढे जातात.
  • यानंतर मानवी स्वयंसेवकांमध्ये त्याची चाचणी घेतली जाते. या चाचणीत ते पुरेसे परिणामकारक, पुरेसे निर्धोक ठरले तरच सर्वसामान्य वापरासाठी ते खुले केले जाते. या सर्व चाचण्या योग्य पध्दतीने पार पाडण्याचे, त्याचे निष्कर्ष तपासण्याचे शास्त्रशुध्द निकष असतात. या सर्व निकषांना एखादे औषध उतरले तरच ते शास्त्रीय दृष्टया सिध्द झाले असे समजतात. हे सर्व करायला दहा ते वीस वर्षे व कोटयवधी रुपये खर्ची पडतात.

या सर्व चाचण्यांना उतरलेली सुमारे हजारभर पुरेशी गुणकारी व पुरेशी निर्धोक औषधे शास्त्रज्ञांना आतापर्यंत सापडली आहेत. पैकी जागतिक आरोग्यसंघटनेने सुमारे तीनशे औषधांना आवश्यक औषधे (बहुसंख्य आजार बरे करण्यासाठी आवश्यक) म्हटले आहे. ही औषधे पुरेशा प्रमाणात, सर्वत्र व नेहमी उपलब्ध असलीच पाहिजेत अशी जागतिक आरोग्य संघटनेची शिफारस आहे.

नवनवीन औषधांचा शोध कायम चालूच राहणार आहे. पण प्रत्येक औषध शास्त्रीय कसोटीला तावून सुलाखून उतरले पाहिजे. नाहीतर एखादे औषध बाजारात येऊन लाखो लोकांनी वापरल्यावर लक्षात आले, की ते खरोखर गुणकारी नाही (कारण अनेकदा आजार आपोआप शमतात) किंवा त्याचे गंभीर दुष्परिणाम आहेत तर ते फार महागात पडते. पूर्वी असे अनेकदा झाले आहे. त्यामुळे नवीन औषधांबाबतचे निर्णय आता अधिक काटेकोर कसोटीवर घेण्याची प्रथा आहे.

नवीन, अधिक परिणामकारक, स्वस्त,अधिक निर्धोक औषधे उपलब्ध होत आहेत. या तुलनेत दृष्टीने डावी जुनी औषधे कालबाह्य समजून त्यांचे उत्पादनच बंद व्हायला हवे असे आधुनिक औषधशास्त्र सांगते. पण भारतात मात्र अनेक कालबाह्य औषधे सर्रास खपवली जातात.

आधुनिक औषधशास्त्र हे अत्यंत प्रगत, गतिशील शास्त्र आहे. औषधशास्त्र हे वैद्यकशास्त्राचे एक अत्यंत महत्त्वाचे उपांग आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.