blood institute diseases icon रक्ताभिसरण संस्थेचे आजार रक्तसंस्थेचे आजार
हृदयाच्या झडपांचे आजार

जंतूदोषांमुळे हृदयाच्या झडपांचा आजार होऊन त्या बिघडतात हे आपण पाहिले. झडपांच्या आजाराचे व बिघाडाचे सांधेहृदयताप हे सर्वात प्रमुख कारण आहे. याशिवाय झडपांचे काही आजार जन्मजात असतात.

जन्मजात आजारांपैकी काही आजारांत झडपांत दोष (किंवा) हृदयाच्या कप्प्यांमधील पडद्यात भोके असतात. या भोकांमुळे रक्तप्रवाहात उलटसुलट गती निर्माण होते.

दम लागणे हे लक्षण झडपांच्या वा पडद्यांच्या दोषामुळे येणारे प्रमुख लक्षण असते. या आजारांमुळे लहान मुलांमध्ये खेळण्याची प्रवृत्ती कमी होऊन मुले बसून राहतात. पुन्हा पुन्हा कफ/ खोकला व दम येतो. आजाराची तीव्रता जास्त असेल तर जीभ, नखे, इत्यादींवर निळसर झाक दिसते. याचा अर्थ रक्ताच्या शुध्दीकरणाचे म्हणजे प्राणवायूचे प्रमाण कमी आहे. मुलाच्या छातीवर हात ठेवला तर दर ठोक्यागणिक थरथर जाणवते. अनेक मुलांची या आजाराने वाढ खुंटते व वजन कमी राहते.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार व शस्त्रक्रिया करणे योग्य ठरेल. काही झडपांच्या व पडद्यांच्या दोषावर शस्त्रक्रियेचा अगदी चांगला फायदा होतो.

इतर सूक्ष्मजंतूंमुळे होणारे हृदयाचे आजार

सांधेहृदयतापाप्रमाणेच इतर अनेक रोगजंतूंमुळे हृदयाला सूज येते. यात विषमज्वर, घटसर्प, क्षयरोग व इतर अनेक प्रकारचे जिवाणू येतात.

यापैकी प्रत्येक आजाराची स्वतंत्र लक्षणे व चिन्हे असतात. याबरोबरच नाडीचे ठोके कमी-जास्त होणे, छातीत दुखणे, दम लागणे, इत्यादी खाणाखुणा दिसतात. लिंगसांसर्गिक रोगांपैकी सिफिलिस (गरमी) या प्रकारच्या जंतूंमुळेही हृदयावर कायमचे दुष्परिणाम आणि झडपांचे व रक्तवाहिन्यांचे आजार होतात. शंका आल्यावर ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवून द्यावे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.