sexual health icon लैंगिक समस्या पुरुषजननसंस्था
सामान्य लैंगिक शरीरक्रिया विज्ञान

लैंगिक क्रियेतला मुख्य भाग म्हणजे ताठ झालेल्या शिश्नाचा योनिमार्गात प्रवेश, व काही मिनिटानंतर शिश्नामधून वीर्यपतन होणे व स्त्रियांच्या ओटीपोटात सुखद आकुंचन क्रिया होणे. यामुळे स्त्री-पुरुषांना शारीरिक पातळीवरचा सर्वोच्च आनंद होतो व गर्भधारणा होऊ शकते.

या मुख्य क्रियेआधी चुंबन, आलिंगन, स्पर्श, इत्यादी ‘कामक्रीडा’ असतात व एकूण शरीर सुखात व उद्दीपनात या कामक्रीडांचा भाग महत्त्वाचा असतो.

शारीरिक संबंधाच्या वेळी एक प्रकारची सुरक्षितता व एकांत आवश्यक असतो, तसेच स्त्रीपुरुषांमध्ये एक विश्वासाचे व प्रेमाचे नाते आवश्यक असते.

प्रत्यक्ष योनि-शिश्न संबंधाच्या वेळी दोन्ही इंद्रियांना काही स्त्राव (पाझर) सुटतात, त्यामुळे लैंगिक संबंध सोपा होतो. कोरडेपणामुळे दोन्ही इंद्रियांना वेदना-इजा होऊ शकते. स्त्री-पुरुषांच्या मानसिक-शारीरिक कारणांमुळे लैंगिक इच्छा, स्त्राव, समागमाचा काळ (एकूण मिनिटे) यात थोडेफार बदल होत असतात.

पुरुषजननेंद्रियाची ‘ताठपणा’ आल्यावरची लांबी 4 ते 7 इंचापर्यंत असू शकते. लांबी किंवा जाडी यावर सुख अवलंबून नसते. लैंगिक सुख ताठरपणा व त्यानंतरचे वीर्यपतन यावर अवलंबून असते, तसेच स्त्री जोडीदाराकडून मिळणा-या प्रतिसादावर अवलंबून असते.

स्त्रीयोनीचा आकार शिश्नासाठी पुरेसा मोठा असतो, कारण बाळंतपणात पूर्ण वाढलेले बाळ त्यामार्गाने बाहेर येणार असते. मात्र योनिमार्गाचे प्रवेशद्वार दोन कारणांमुळे लहान असू शकते. पहिल्या काही शरीरसंबंधाच्या वेळी ते अजून पुरेसे सैल झालेले नसते व त्यावर एक पातळ पडदा असतो. पहिल्या दोन तीन संबंधांनंतर बहुधा ही समस्या संपते. मात्र आपल्याकडे मुलींची लग्ने इतक्या लवकर लागतात (बालविवाह) की अनेक मुलींची यासाठी पुरेशी वाढच झालेली नसते. अशा लहान मुलींना संबंधाच्यावेळी खूप वेदना होते, इजाही होते. (शरीरसंबंधाची भीती निर्माण होण्यात हे एक प्रमुख कारण आहे)

किती वेळ ?

शरीरसंबंध (म्हणजे योनिप्रवेश ते वीर्यपतन) सुमारे सामान्यतः 2-5 मिनिटे टिकतो. क्वचित तो जास्तकाळ म्हणजे 15-20 मिनिटेपण टिकू शकतो. अनेक वेळा शिश्नाचे उद्दीपन (उत्तेजन) खूप आधी झाले असेल तर अधीरपणामुळे वीर्यपतन लगोलग होऊ शकते. अनुभवाने व काही युक्त्यांमुळे ही समस्या सुटत जाते.

किती वेळा ?

साधारणपणे जोडप्यांमध्ये आठवडयातून 3/4 वेळा किंवा रोजही शरीरसंबंध होतो. काही जोडपी दिवसातून 2/3 वेळाही शरीरसंबंध करतात. इच्छा व प्रकृतीनुसार हे प्रमाण बदलते. कमी किंवा जास्त असे माप याला लावता येणार नाही. मात्र उभय जोडीदारात फरक असेल तर एकाला हा त्रास (अपुरेपणा किंवा अतिरेक) वाटण्याचा संभव आहे.

मैथुनक्रियेतल्या मानसिक समस्या
(1) लवकर वीर्यपतन/शीघ्रपतन होणे

गैरसमजामुळे किंवा अवास्तव कल्पनांमुळे ब-याच पुरुषांना आपण ‘कमजोर आहोत’ अशी भावना होते. या भावनेमुळे मैथुनक्रियेसाठी आवश्यक ताठरपणा व ताठर-काळ मिळत नाही. ब-याच वेळा अशा जोडप्यांशी नीट सल्लामसलतीने हा प्रश्न सुटू शकतो. या समस्येवर खालीलप्रमाणे उपाय सुचवण्यात येतो, यासाठी स्त्री-पुरुष या दोघांचे सहकार्य हवे.

मास्टर पध्दत – (अ) स्त्रीने शिश्नाचे हस्तमैथुन करावे, मात्र वीर्यपतनापर्यंत वेळ येऊ न देता थांबावे. (ब) ताबडतोब तीन बोटांनी शिश्नाचे पुढचे बोंड दाबून धरावे- यामुळे इंद्रिय सैल व लहान होते. (क) वरील अ व ब क्रिया परत परत कराव्यात, मात्र प्रत्यक्ष मैथुन टाळावे. शेवटी वीर्यपतन होऊ द्यावे. यामुळे वीर्यपतनाचा काळ वाढू शकतो असा विश्वास निर्माण होतो. (ड) काही दिवस असेच करून पुरेसा आत्मविश्वास आल्यावर ‘पुरुष खाली स्त्री वरती’ अशा स्थितीत मैथुन करावे. यातही मधून मधून सैलावून थांबावे व वाटल्यास शिश्नाचे टोक दाबून नंतर सोडावे व मैथुनक्रिया परत करावी. (इ) याप्रमाणे ‘वरती स्त्री’ स्थितीत काही दिवस मैथुन करावे. (फ) यानंतर दोघांनी कुशीवर राहून मैथुन करावे व काही दिवस या पध्दतीने सवय करावी. (ग) नंतर स्त्री खाली, पुरुष वरती अशा अवस्थेत मैथुन करावे. याप्रमाणे शीघ्रपतनाची भीती नष्ट करता येते.

(2) ताठरपणा नसणे

हीही एक मनाची समस्या आहे. पुरुषाच्या इंद्रिय-ताठरपणा प्रसंगी कमीजास्त होऊ शकतो. अतिकष्ट, थकवा, रात्रपाळी, जागरणे, व्यायामाचा अभाव, अशक्तपणा, आजारातून उठलेले असणे, इत्यादी कारणांनी ताठपणा कमी होतो. कारण दूर झाल्यावर समस्याही आपोआप सुटते. योग्य आहार, विश्रांती, करमणूक, व्यायाम, इत्यादी उपायांनी अशा बहुतेक सर्व समस्या आपोआप सुटतात त्यासाठी औषधोपचार करावा लागत नाही.

नैराश्य -नैराश्यग्रस्त अवस्थेत इंद्रिय ताठ होत नाही व मैथुनेच्छापण मंद असते.

(3) स्त्री-मनाची कारणे

शरीरसंबंधाबद्दल भीती, लिंगसांसर्गिक आजार किंवा नको असताना गर्भ राहण्याची भीती, एकांतवासाचा अभाव, इत्यादी कारणांमुळे स्त्रियांना मैथुनाची भीती असू शकते. लहानपणी काही अत्याचार झाला असेल तर खोल मनात अशी भीती रुजून बसलेली असते. ब-याच घरांमध्ये लहान मुलींना नातेवाईकांकडूनच लैंगिक त्रास होतो हे पण एक महत्त्वाचे कारण आहे.

अशा समस्या सहानुभूतीने व बरेच दिवस उपाय केल्यावरच जातात. जोडीदारांचा परस्पर-विश्वास, प्रेम, सहानुभूती हेच यावरचे मुख्य उपाय आहेत.

नपुंसकता

हा शब्द काही वेळा आपण ऐकतो. ऐकणा-याला किंवा बोलणा-याला त्यातून अमुकजण ‘पुरुष- नाही’ असे अभिप्रेत असते. स्त्री संबंध करू न शकणे हाच याचा अर्थ. यामागे काही शारीरिक किंवा वर सांगितल्याप्रमाणे मानसिक कारणे असू शकतात. तज्ज्ञाकडून तपासणी करून घ्यावी.

लैंगिक विकृती

खालीलप्रमाणे काही लैंगिक विकृती आढळतात.

  • स्त्री जोडीदार असतानाही केवळ गुदामार्गे मैथुन करणे. पुरुष-समलिंगी संबंधाची लहानपणापासून सवय जडली तर लग्न झाल्यावरही स्त्रीच्या योनिमार्गाऐवजी गुदाशय प्रवेशाचीच इच्छा बाळगणे असा प्रकार काही वेळा आढळतो. यामुळे स्त्रीजोडीदारास लैंगिक समाधान मिळत नाही व गर्भधारणाही होत नाही.
  • लैंगिक संबंधावेळी/ऐवजी मारहाण करणे. बरेच पुरुष स्त्रियांना लैंगिक संबंधाचे वेळी मारणे, शिवीगाळ करणे, सिगरेट-बिडीचे चटके देणे आदि अत्याचार करतात. लैंगिक आत्मविश्वासाचा अभाव, दारूचे व्यसन, संशयीपणा, इत्यादी कारणे यामागे असतात.
  • वेश्यागमनाची सवय – काही पुरुषांना, पत्नी लैंगिकदृष्टया योग्य असूनही, वेश्यांकडे जाण्याची सवय असते. यातून आरोग्याचे तसेच कौटुंबिक प्रश्न उद्भवतात.
धातू जाण्याची भीती

स्वप्नात किंवा जागेपणी ‘वीर्य गळण्याची’ भीती मोठया प्रमाणावर आढळते. अनेक पुरुष यामुळे सतत त्रस्त असतात. स्वप्नात वीर्य जाण्याची क्रिया इंद्रिय ताठरल्यानंतरच होते. इंद्रिय ताठ होऊन नंतरच वीर्य बाहेर फेकण्याची क्रिया होते, त्याशिवाय वीर्य बाहेर येऊच शकत नाही. म्हणूनच आपोआप वीर्य गळण्याची, किंवा ‘लघवीतून धातू जाणे’ म्हणजे ‘वीर्यपतन’ असू शकत नाही. मग धातू जाणे म्हणजे काय? ‘धातू जाणे’ म्हणजे शिश्नाच्या बोंडावरचे स्त्राव जाणे, किंवा जंतुदोषामुळे पू जाणे यापैकी काही तरी असू शकते. काही जणांच्या वीर्यकोशात जंतुदोष होऊन पू तयार होतो, व हा पू मलविसर्जनाच्या वेळी मूत्रनलिकेतून बाहेर पडतो. गुदाशय हे मूत्रनलिकेच्या व वीर्यकोशाच्या मागेच असते. हे सर्व समजावून सांगून आवश्यक वाटल्यास तपासणीसाठी पाठवावे.

लैंगिक समस्यांवरची टॉनिके

फार पूर्वीपासून लैंगिक इच्छा व शक्ती वाढवणारी औषधे निरनिराळया शास्त्रात सांगितली जातात. अनेक उपाय प्रचलितही आहेत. आजही अनेक पुरुष यासाठी लाखो रुपये खर्च करतात असे आढळते. यातली काही सोडता बरीच औषधे व्यर्थ जातात. ‘वियाग्रा’ नावाचे एक औषध आहे, याचे दुष्परिणामही दिसून आले आहेत. एकूणच अशा उपायांपेक्षा योग्य मनोभूमिका, आहार-विहार-व्यायाम यातून योग्य लैंगिक समाधान मिळू शकते. यातूनही उपयोग न झाल्यास योग्य तज्ज्ञांकडे जावे.

काही उदाहरणे

लैंगिक तक्रारींच्या मुळाशी बहुधा मानसिक/सामाजिक तक्रारी किंवा माहितीचा अभाव असतात. खालील काही उदाहरणे पाहा.

(1) एका नवविवाहित मुलीने नव-याशी असहकार पुकारला होता. शिश्नप्रवेश होऊच द्यायचा नाही हा तिचा निर्धार होता. वेगळे बोलावून विचारल्यावरही ती नीट काही कारण सांगेना. पूर्वी कोणा नातेवाईकांकडून त्रास झाल्याचीही काही शक्यता तिने नाकारली. शेवटी ‘एड्स रोग होऊ नये’ म्हणून ती संबंध टाळत असल्याचे दिसून आले. ही भीती चुकीची म्हणता येणार नाही. तीन महिने निरोध वापरून नंतर रक्त तपासणी करून मग निरोधाशिवाय संबंध करण्याची डॉक्टरने त्यांना सूचना केली. ती त्यांनी पाळली. पुढे सर्व सुरळीत झाले.

(2) एका नवीन जोडप्याची तक्रार अशी की जोडीदार चांगला नाही. नवरा म्हणे ‘ही स्त्रीच नाही’, तर बायकोचे म्हणणे ‘हा पूर्ण पुरुष नाही!’ तपासणीत दोघेही शारीरिकदृष्टया निर्दोष दिसून आले. खरे कारण तिला हे लग्न नको होते. इच्छेविरुध्द तिचे लग्न लावण्यात आले होते. काही मध्यस्थ बोलावून डॉक्टरांनी त्यांना ही परिस्थिती सांगितली. शेवटी हे लग्न टिकले नाही हे एकापरीने बरेच झाले.

(3) तिस-या एका जोडप्यात मुलीने अशी तक्रार केली की ‘समाधान मिळत नाही.’ तपासणीत योनिमार्गाचा पडदा अखंडच होता. सुमारे वर्षभर त्यांना शरीरसंबंधाची नीट माहितीच नव्हती. चित्रे दाखवून समजावल्यावर ही समस्या सुटली.

शरीरदोषांमुळे होणा-या लैंगिक समस्या

स्त्रियांच्या लैंगिक समस्या

बालविवाह

बालविवाहामुळे मुलींना अकाली शरीरसंबंधाला सामोरे जावे लागते. इजा होणे, अकाली गर्भधारणा, मैथुनाविषयी भीती, इ. दुष्परिणाम त्यामुळे होतात. लहान वय असल्याने कुटुंबात गौण स्थान निर्माण होते व ते बरीच वर्षे कायम राहते; स्त्री-पुरुष संबंधात यामुळे एक उच्च-नीचता तयार होते. बालविवाह हरप्रयत्नाने टाळले पाहिजेत.

योनिमार्गावरचा पडदा

काही जोडप्यांना योनिमार्गावरच्या पडद्याची कल्पना नसते. पडदा न फाटल्याने शिश्नाचा योनिमार्गात प्रवेश होत नाही, शरीरसंबंध वरवरचा येतो. यामुळे आनंद मिळणे तर दूरच; गर्भ राहणेही शक्य नसते. योनिमार्गाच्या तपासणीत हे कळून येते. सर्वसाधारणपणे हा पडदा पहिल्या संबंधातच पूर्णपणे फाटतो. 1-2 दिवस त्यातून किंचित रक्तस्राव होतो पण तो थांबतो. हस्तमैथुनानेही हा पडदा फाटू शकतो.

योनिमार्गाचा कोरडेपणा

काही स्त्रियांना योनिमार्गात (कोरडेपणा) स्त्राव कमी असल्यामुळे शरीरसंबंधात अडचण व वेदना होते. शिश्न आतमध्ये नीट शिरू शकत नाही. ब-याच वेळा ‘भीती’ हेच याचे कारण असते. खोबरेल तेल लावून तात्पुरती ही समस्या सुटू शकते. मैथुनोत्सुक स्त्रीच्या योनिमार्गात आपोआप स्त्राव पाझरतात. त्यामुळे मैथुनाअगोदरच्या कामक्रीडेचे महत्त्व आहे. स्त्रावाचे प्रमाण स्त्रीबीज निर्माण होण्याच्या दिवसांत साहजिकच जास्त असते; त्यानंतर ते थोडे कमी कमी होत जाते. पाळी कायमची थांबल्यानंतर योनीमार्ग कोरडा होत जातो.

शरीरसंबंध करताना वेदना

योनिमार्गाचा जंतुदोष-दाह मूत्रमार्गाचा दाह किंवा ओटीपोटात काहीतरी जंतुदोष असणे, गर्भाशयाच्या तोंडाला सूज असणे किंवा योनिमार्गात जखमा हे वेदनेमागचे प्रमुख कारण असते. अशा स्त्रीची आतून तपासणी करताना याच प्रकारची वेदना होते. योग्य उपचाराने ही तक्रार दूर होऊ शकते.

संप्रेरकसंस्थेचे आजार

मधुमेह, गलग्रंथीचे आजार व इतर संप्रेरक ग्रंथीच्या बहुतेक आजारात स्त्रियांच्या कामेच्छा कमी होतात. योग्य तपासणीअंती दोष कळू शकतो.

जननसंस्थेतल्या गाठी /कर्करोग

यामुळे मैथुनक्रियेत अडथळा येतो.

पुरुष शरीरदोष – संप्रेरकसंस्थेचे आजार

मधुमेह, गलग्रंथी व इतर संप्रेरकसंस्थांचे आजार एकूण लैंगिक इच्छा कमी करतात. मध्यम किंवा उतार वयात लैंगिक इच्छा अचानक कमी झाली तर मधुमेहासाठी तपासणी करून घ्यावी.

अंडगोलांची अपुरी वाढ

वृषण-अंडगोलांची वाढ कमी असल्यास पुरुषी लक्षणे कमी प्रमाणात दिसतात (दाढी-मिशा, काखेतले केस कमी असणे, आवाज बायकी असणे, स्तन थोडे मोठे असणे, इ.)

शिश्न वाकडे असणे

काही जंतुदोषांमुळे शिश्न वाकडे होते, अशाने शरीरसंबंधात अडचण निर्माण होते.

शिश्नाची त्वचा मागे न जाणे

साधारणपणे शिश्नाच्या कातडीचे छिद्र पुरेसे मोठे असल्यामुळे त्वचा मागे जाऊन शिश्नाचा बोंडाचा भाग उघडा होतो. शिश्न ताठरण्यासाठी हा भाग उघडा होणे उपयुक्त असते. संबंधानंतर त्वचा पूर्वीप्रमाणे पुढे आणता येते. (सुंता करताना ही त्वचा काढून टाकली जाते.) जर त्वचेचे पुढचे छिद्र लहान असेल तर त्वचा मागे जाऊ शकत नाही. क्वचित ही त्वचा मागे गेलीच तर ताठरलेल्या शिश्नावर आवळून अडकते. यामुळे खूप सूज येते. असे पुरुष शरीर संबंधाला साहजिकच धास्तावतात.

व्रण आणि जंतुदोष

लिंगसांसर्गिक किंवा इतर जंतुदोषांमुळे शिश्नावर व्रण, पू, सूज, गाठी, पुरळ असे विकार निर्माण होऊन लैंगिक क्रिया अवघड व वेदनादायक होते.

औषधांचे दुष्परिणाम

फीट (मिरगी), अतिरक्तदाब, मानसिक आजार यावरचे बहुतेक औषधोपचार यामुळे लैंगिक इच्छा मंदावते. सर्व रुग्णांना ही माहिती नीटपणे सांगितली पाहिजे.

यकृताचे आजार

यकृताचे कामकाज मंदावल्यामुळे (उदा. कावीळ) लैंगिक इच्छा कमी होते.

व्यसने

दारूचे व्यसन शिश्नाचा ताठरपणा कमी करते.

वाढते वय

वाढत्या वयाबरोबर इंद्रियाचा ताठरपणा, फुगीरपणा कमी होतो तसेच मैथुनक्रियेचा काळ कमीजास्त होतो. सर्वसाधारणपणे इंद्रियाची संवेदनक्षमता थोडी कमी झाल्याने वीर्यपतन थोडे उशिरा होते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.