Disease Science Icon रोगशास्त्र खास तपासण्या
आजारांचे वर्गीकरण

रोगविकृतीशास्त्राप्रमाणे अनेक कारणांमुळे आजार होतात असे दिसते. आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे निरनिराळया जंतूंमुळे होणारे सांसर्गिक रोग. यांतच जंत, बुरशी यांमुळे होणारे आजार आहेत. निम्म्यावरील आजार रोगजंतूंमुळेच होतात. त्यांतही पचनसंस्था, श्वसनसंस्था, त्त्वचा यांचे आजार मोठया प्रमाणावर असतात.

Diseases Illness
Diseases Illness

असांसर्गिक आजारात बरेच गट आहेत. जन्मजात दोष, अवयवांची रचना किंवा कामकाज बिघडणे, पेशी जीर्ण होणे, अपु-या पोषणामुळे आजार होणे, कर्करोग (एखाद्या पेशीसमूहाची बेसुमार वाढ), विषारी किंवा अंमली पदार्थाचा परिणाम असे त्याचे प्रकार सांगता येतील. अशा बाह्य आणि शरीरांतर्गत रोगकारणांची यादी सोबतच्या तक्त्यात पाहायला मिळेल.

यातील बरीच रोगकारणे समजावून सांगायला सोपी आहेत. उदा. जीवजंतू, कुपोषण, इत्यादी गोष्टी स्वयंस्पष्ट आहेत. मात्र काही रोगकारणांबद्दल जास्त खुलासा केला पाहिजे. पेशीसमूह जुने होणे, झिजणे, गंजणे ही एक महत्त्वाची रोगप्रक्रिया आहे. मधुमेह, सांधेसूज, हृदयविकार, स्मृतिनाश ही या प्रकारची काही उदाहरणे आहेत.

Diseases Illness
Diseases Illness

सर्वसाधारणपणे वयाबरोबर अनेक पेशीसमूहांची जीवनशक्ती क्षीण होते. अवयवांची लवचीकता कमी होते, दोषतत्त्वे जमायला लागतात. असे बदल म्हातारपणातच येतील असे नाही. यांतले काही बदल तरुण वयातही सुरु होऊ शकतात. या बदलांमुळे शरीरात अनेक आजार तयार होतात. त्यांची एक यादी या तक्त्यात दिली आहे. या आजारांवर आधुनिक शास्त्रात रामबाण उपाय नाही; उलट हे एक मोठे आव्हान आहे. इतर उपचार पध्दतीतही यावर हमखास लागू पडतील असे उपाय दिसत नाहीत, मात्र शरीर-पेशी जीर्ण होण्याची प्रक्रिया आहार विहाराने पुढे ढकलता येते. याबद्दल आहाराच्या प्रकरणात विवेचन आहे.

अवयवांची ही एक मूळ रचना न बिघडता केवळ कामकाज बिघडणे (कार्यदोष) हा प्रकार आहे. याचे सगळयात स्पष्ट उदाहरण म्हणजे मधुमेह. या शरीराची मूळ रचना बदलत नाही पण कार्यपध्दत मात्र बिघडते. म्हणजे पेशींचा साखरेचा वापर नीट होत नाही आणि इन्शुलिन नीट काम करत नाही. बध्दकोष्ठ म्हणजे मलविसर्जनाची इच्छा न होणे (किंवा कमी होणे) हे असेच दुसरे उदाहरण आहे. मात्र काही वेळा बध्दकोष्ठाचे कारण शारीरिक असू शकते. (उदा. मोठया आतडयाचा कर्करोग).

सोबतच्या तक्त्यामध्ये आजारांचे वर्गीकरण दिले आहे. अवयव किंवा संस्था याप्रमाणे आजार पाहायचे झाल्यास त्या संस्थेखालची स्तंभातली माहिती वाचावी. तसेच कारणांप्रमाणे माहिती पाहिजे असल्यास आडव्या रांगेतली माहिती वाचावी.

हे वर्गीकरण तसे ढोबळ आहे. कारण एखाद्या रोगाची अनेक कारणे असतात, तसेच कित्येक रोगांची कारणे आपल्याला अजून पूर्ण कळलेली नाहीत. उदा. अतिरक्तदाबाचे नेमके कारण माहीत नाही. पण वजन जास्त असणे, वय वाढणे, मधुमेह यांसारख्या गोष्टींशी त्याचा संबंध आहे. कोडाचे नेमके कारण माहीत नाही. तसेच कुपोषणामुळे रोगजंतू लवकर हल्ला करतात. रोग निर्माण होणे तो लांबणे, बिघडणे, इत्यादी गोष्टी कुपोषणामुळे जास्त प्रमाणावर होतात. म्हणून हे वर्गीकरण ढोबळ आहे. सगळेच रोग किंवा सगळीच कारणे त्यांत घेतलेली नाहीत. या मर्यादा लक्षात घेऊनच हा तक्ता वाचावा.

Diseases Illness
Diseases Illness
  • शरीराची संरक्षण व्यवस्था कमी पडून कधीकधी रोग अपेक्षेप्रमाणे आटोक्यात येत नसतो. अशावेळी प्रतिजैविक औषधांचा वापर करावा.
  • प्रतिजैविक औषधांचा उपयोग ठरावीक मात्रेप्रमाणे (डोस) व ठरावीक तास आणि दिवस पाळून केला पाहिजे. हे पाळले नाही तर तात्पुरते दबलेले रोगजंतू त्या औषधाविरुध्द प्रतिकारशक्ती तयार करतात. असे टणक झालेले जंतू शरीरावर नव्याने हल्ला चढवतात. क्षयरोग, विषमज्वर या आजारांच्या बाबतीत तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.
  • निरोगी शरीरात काही निरुपद्रवी सूक्ष्मजंतू नेहमी राहतात आणि त्यांचा विशिष्ट उपयोगही असतो. उदा. पचनसंस्थेत कायम राहणारे काही जंतू ‘ब’ जीवनसत्त्वे तयार करतात.

प्रतिजैविक औषधांच्या अनिर्बंध वापराने अशा उपयोगी जंतुसमूहांचाही नाश होतो.
थोडक्यात सांगायचे तर रोगनिदान करून योग्य औषध निवडून, त्याचा योग्य मात्रेने पुरेसा काळ वापर करणे महत्त्वाचे आहे. प्रतिजैविक औषधांचा सर्रास गैरवापर घातक आहे.

आजारांना कारणीभूत ठरणा-या सूक्ष्म जीवजंतूंचे वर्गीकरण (तक्ता (Table) पहा)

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.