/tantrika tantra icon मानसिक आरोग्य आणि आजार चेतासंस्थेचे आजार (मज्जासंस्था)
ज्ञानंद्रिये

आपला डोळा, कान, जीभ, त्वचा, नाक यांद्वारे (पाच ज्ञानेंद्रिये) आपल्याला जगाचे ज्ञान होत असते. या सर्व ज्ञानेंद्रियांमध्ये खास प्रकारच्या पेशींचे जाळे असते. बाहेरील परिस्थितीमुळे या पेशीत वेगवेगळे संदेश निर्माण होतात. असे संदेश चेतातंतूमार्फत मेंदूतील योग्य केंद्राकडे पोहोचवले जातात उदा. डोळयाच्या बुबुळातून प्रकाश आत गेला, की बाहेरच्या वस्तूंचे चित्र आतल्या पडद्यावर उमटते. या पडद्यात अत्यंत संवेदनाक्षम पेशींचे जाळे असते. प्रकाशाचा कमीअधिकपणा , वस्तूंच्या चित्रातील रंग, आकार वगैरे गोष्टींची माहिती या पेशींतून चेतातंतूमार्फत मेंदूपर्यंत पोहोचते. तसेच कानातल्या पेशींवर आवाजाच्या लाटा व कंपने आदळली की त्यासंबंधी माहिती मेंदूकडे जाऊन ऐकू येते. जिभेत चव ओळखणारे पेशीगट असतात. तसेच त्वचेवर स्पर्श, तापमान, दाब वगैरे ओळखणा-या पेशी असतात.
ज्ञानेंद्रियात बिघाड होणे, चेतातंतूंमार्फत मेंदूंशी संबंधित भागात बिघाड होणे यापैकी काहीही झाले तर त्या ज्ञानेंद्रियाच्या कामात अडथळा येतो.

संप्रेरक ग्रंथी

ग्रंथी म्हणजे पेशींच्या गाठी किंवा गड्डे. यांचे काम म्हणजे निरनिराळे रस तयार करणे. ग्रंथींचे दोन प्रकार असतात. एक प्रकार म्हणजे नलिकांतून रस सोडणा-या ग्रंथी. उदा. पाचकरस (लाळ, स्वादूरस, पित्तरस) तयार करणा-या तसेच घाम व तेलकट पदार्थाने कातडी ओलसर ठेवणा-या ग्रंथी. दुसरा प्रकार म्हणजे थेट रक्तात रस सोडणा-या नलिकाविरहित ग्रंथी. या रसाला अंतःस्राव किंवा संप्रेरक (हार्मोन्स) असे म्हणतात. अंतःस्राव तयार करणा-या अशा संप्रेरक ग्रंथी (अंतःस्रावी) गळयात, पोटात, ओटीपोटात, मेंदूच्या खाली वगैरे निरनिराळया ठिकाणी असतात.

या संप्रेरक ग्रंथीतून तयार होणारा रस सरळ रक्तामध्ये जातो. यासाठी ग्रंथींना कोठल्याही प्रकारची वेगळी नळी नसते. याचा एक फायदा असा असतो, की रक्तप्रवाहातले संप्रेरक रसांचे नेमके प्रमाण त्या त्या ग्रंथींना कळते. यामुळे संप्रेरकांची आवश्यक तेवढीच मात्रा रक्तात सोडली जाते. रक्तातील विविध संप्रेरकांचे प्रमाण या व्यवस्थेमुळे अगदी नेमके राहते.

या संप्रेरकांचे निरनिराळे प्रकार आणि कामे असतात. शरीरातील पुरुषत्वाची किंवा स्त्रीत्वाची लक्षणे, रक्तातील साखरेचे प्रमाण, वाढ, उंची, रक्तदाब, मूत्रपिंडाचे कामकाज, चरबीचे प्रमाण, रासायनिक क्रियांचे नियंत्रण वगैरे अनेक महत्त्वाची कामे या रसांवर अवलंबून असतात. या संप्रेरकांचे प्रमाण ठरावीक मर्यादेत असावे लागते. त्यात थोडाही फेरफार झाला तर आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

उदाहरण

लग्नानंतर एक-दोन वर्षातच मनोरमाचे बोलणे-वागणे खूप बदलले. ती आता इतरांशी फारशी बोलेनाशी झाली. दिवसभर घरात बसे अथवा आतून कडी लावून कोंडून घेई. कपडयांबद्दल, नीटनेटके दिसण्याबद्दल तिला अजिबात काही वाटत नव्हते. रात्री झोप न लागणे, भूक कमी होणे, इत्यादी त्रासांनी ती आणखी खंगत चालली. नव-याने तिला सोडून दुसरे लग्न केले. याबरोबर तिची लक्षणे वाढत गेली. दिवसदिवस कोणाशी न बोलणे, रडत – कण्हत बसणे, इत्यादी गोष्टी नेहमीच्याच झाल्या. शेवटी तिने घरात कोणी नाही असे पाहून साडीने गळफास घेतला. मनोरमा ही ‘अतिनैराश्य’ या मनोविकाराने आजारी झाली होती. वेळीच तिच्यावर उपचार झाले असते तर ती वाचू शकली असती आणि बरीही झाली असती. पण यावर उपचार होऊ शकतील ही कल्पनाच कोणाला नव्हती.

अतिनैराश्य

अकारण दुःखी मन, कशातही रस नसणे, निद्रानाश इतरांशी मिळून मिसळून न राहणे या सर्व ‘अतिनैराश्याच्या’ खाणाखुणा आहेत. या मानसिक लक्षणांबरोबरच काही शारीरिक लक्षणेही (भूक नसणे, बध्दकोष्ठ, सैलपणा, थकवा, इ.) आढळतात. असा रुग्ण आत्महत्या करण्याचा संभव असतो. मृत्यू हेच औषध आहे अशी त्यांतल्या ब-याच जणांची खात्री असते. अशा दर दहा मनोरुग्णांपैकी एखादा तरी आत्महत्या करतो.

उदाहरण

रघुनाथ वकिलांची वकिली हळूहळू बंद झाली. सुरुवातीला अगदी हुशार म्हणून त्यांचा लौकिक होता. नंतर त्यांच्यात बदल दिसू लागले. सुरुवातीला खूप बडबड, चिडकेपणा सुरू झाला. त्यानंतर अशीलांना उर्मटपणे बोलणे, आरडाओरड करणे, कामावरचे लक्ष कमी होणे, स्वतःबद्दल अव्वाच्या सव्वा बोलणे, अनोळखी माणसांनाही हसून खेळून सलगी दाखवणे, खूप महत्त्वाकांक्षा, इत्यादी प्रकार दिसून येऊ लागले. आक्रमक बोलणे, वागणे जास्त झाल्यावर व्यवसायाला उतरण लागली. एक-दोन वर्षातच त्यांच्याकडे अशील जाणे थांबले, पण कोर्टात जाणे-येणे चालूच होते. काम मिळेनासे झाल्यावर ही सर्व लक्षणे जास्त वाढली. मध्येमध्ये यामध्ये चढउतार व्हायचे आणि आठवडा-दोन आठवडे चांगले जायचे. डॉक्टरकडून मानसोपचार झाल्यावर हळूहळू त्यांची लक्षणे सौम्य झाली. यानंतर त्यांचे वागणे बरेच सुसह्य झाले. हा ‘उन्माद’ आजार म्हणता येईल.

उन्माद व अतिनैराश्य या दोन्ही प्रकारच्या रुग्णांवर औषधोपचाराचा चांगला उपयोग होतो. याबरोबरच इतर नातेवाईकांनी मानसिक आधार देऊन समजूतदारपणा दाखवून मनोरुग्णास मदत केली पाहिजे.

उन्माद व अतिनैराश्य ही दोन टोके आहेत. एकाच रुग्णात ही दोन्ही टोके दिसू शकतात. कधी उन्माद तर कधी अतिनैराश्य.

लैंगिक विकृती

Same Sex समाजात नैसर्गिक लैंगिक प्रवृत्तीशिवाय अनैसर्गिक लैंगिक प्रवृत्ती व त्याबरोबर मानसिक दोष यांचे प्रमाण कमी नाही. समाजात सर्वसाधारणपणे पुढील लैंगिक विकृती आढळतात.

  • परपीडन – पीडन म्हणजे नैसर्गिक शरीरसुखाऐवजी जोडीदाराला शारीरिक, मानसिक पीडा देऊन आनंद मिळवणे. (उदा. सिगारेटचे चटके देणे, मारणे, इ.)
  • आत्मपीडन – स्वत:ला पीडा देऊन सुख मानणे.
  • लिंगप्रदर्शन – भिन्नलिंगी व्यक्तीसमोर आपले लिंग दाखवून असभ्य वर्तन करणे.
  • पशुमैथुन – पाळीव प्राण्यांशी लैंगिक संबंध.
  • बलात्कार – स्त्रीच्या संमतीशिवाय लैंगिक जबरदस्ती.
  • बालकशोषण – लहान मुलांवर जबरी करणे. ही विकृती मोठया प्रमाणात आढळते. अनेक घरात कुटुंबातच ही विकृती आढळते.
हस्तमैथुन

मुलामुलींनी हस्तमैथुन करणे ही विकृती मानली जात नाही. वयात आल्यानंतर बरीच वर्षे शारीरिक संबंध नसण्याच्या काळात लग्न होईपर्यंत हस्तमैथुन करणे स्वाभाविक मानले आहे. मात्र अशी सवय लग्नानंतरही राहणे ही मनोविकृती आहे, असे मानता येईल.

Sex Display
Child Sex Abuse
समलिंगी संबंध

पुरुष-पुरुष किंवा स्त्री-स्त्री संबंध हे अनेकांच्या मते ही विकृती नसून काही लोकांची नैसर्गिक प्रवृत्ती असते. याबद्दल कायदेशीर वाद असला तरी अनेक देशात हे संबंध मान्य झालेले आहेत.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.