अर्पण पत्रिका

‘अर्पण’
‘चांगली कामे करीत शंभर वर्षे जगण्याची हौस धर’.

हे आरोग्यसूत्र ईशावास्याच्या ऋषीने हजारो वर्षांपूर्वी सांगितले.

इसवी सन दोन हजार येईल-जाईल, नवे शतकही येईल.

देशाचा एक हिस्सा तरी नवशतकात अधिकाराने प्रवेश करील.

स्कायस्क्रॅपर्स, सायबरस्पेस, मुक्त-अर्थव्यवस्था, व्यक्तिस्वातंत्र्य, इ.

त्याच वेळी दुसरा हिस्सा-दुसरा देशच जणू-इडापीडांशी झगडत असेल, पडकी घरे, फुफाटा, कशाबशा शाळा, सांडपाण्याची डबकी, उघडया हागंदा-या, अस्मानी-सुलतानीच्या फे-यात शेतकरी, पण राजकरणी गुंडांच्या ताब्यात सर्व जातिबध्द.

एकविसाव्या शतकात जाऊ पहाणाऱ्यांना शेष भारताचा रामराम. भेटू कधीतरी.

ज्या ‘भारतात’ अजूनही शेकडा सत्तर माऊल्या फक्त शेजारणीच्या भरवशावर बाळंतवेणा सोसतात, त्याही बहुतेक रात्रीच्या अंधारात, आषाढ-श्रावणाच्या पाऊसपाण्यात, विजेच्या लपंडावात, शेकडा पासष्ट बाळे, अर्धपोटी खुरटलेली, दीनवाणी जगतात.

शेकडा बहुतेक दुखणाईत औषध म्हणून पाणी टोचून घेतात,त्यासाठी घामाचा दाम मोजतात, प्रसंगी बैल बक-या विकतात, कर्जे काढतात.

इथे थंडीताप असो, ओटीपोटात दुखणे असो, की पोटात बैलाचे शिंग घुसो, रानावस्तीतून फाटयापर्यंत, फाटयापासून तालुक्यापर्यंत, तिथून आणखी कुठपर्यंतही वणवण केल्याशिवाय इलाज नाही, दम असेतोपर्यंत.

वणवण करूनही खरा विद्यावान, दयावान डॉक्टर भेटेल, याचा भरवसा नाही. दुखण्याची सुटी, रजा, वेतन, विमा, सवलत वगैरे सोडा; दयेचा शब्दही दुर्मीळ आहे. आकडे-सरासरीच्या खेळात इथले दु:ख मावणे कठीण आहे.

अशा लाखो- करोडो मायबाप, भाऊबहिणी, पोराबाळांना, आजच्या-उद्याच्या नागरिकांना, एकविसाव्या शतकात, निदान या महाराष्ट्रातल्या गावागावांत प्राथमिक का म्हणाना, पण शास्त्रीय वैद्यकसेवा मिळावी, म्हणून, तसेच अशा लाखोकरोडोंना सुचेल तसा बरावाईट सल्ला-इलाज करणा-या हजारो प्रामाणिक विद्यार्थी भारतवैद्यांना आणि जिज्ञासूंना साध्या सोप्या मराठीत थोडी तरी शास्त्र-विद्या समजावी, म्हणून हे ‘भारतवैद्यक’ अर्पण.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.