respiratory icon श्वसनसंस्थेचे नेहमीचे आजार श्वसनसंस्थेचे काही गंभीर आजार
घोरणे

घोरणे हा आजार आहे असे अनेक लोक मानत नाहीत. वयस्कर स्त्री पुरुषांपैकी 20 ते 25% लोक झोपेत घोरतात. वयाप्रमाणे घोरणा-या स्त्री -पुरुषांची संख्या वाढतच जाते. घोरणे म्हणजे झोपेत जीभ, टाळू आणि पडजीभ, इ. स्नायू सैल पडल्याने हवेच्या मार्गातील कंपनाने होणारा आवाज आहे. मात्र हा हवेच्या मार्गात अडथळा असल्याने झोपेत शरीरावर याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणूनच याचे वैद्यकीय महत्त्व आहे. हवेच्या अडथळयाच्या प्रमाणानुसार शरीरातील रक्तातल्या प्राणवायूचे प्रमाण निम्म्याच्या खाली जाऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ब-याच जणांना झोपेत घोरण्यामुळे श्वास अडून आचके येतात.

काही लोक यामुळे उठून बसतात किंवा काहीजण कुस बदलून झोपतात. कुस बदलल्यामुळे बहुधा हा अडथळा थांबून श्वास सुरळीत होतो.

घोरण्याबरोबर अनेक आजारांशी नाते आढळून येते. घोरणा-या व्यक्तींना अतिरक्तदाब, हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूचा आघात झाल्याने पक्षाघात होऊ शकतो.

घोरण्यामागे अनेक प्रकारची कारणे असू शकतात. घोरणे हे काही अंशी आनुवंशिक असू शकते. मात्र लठ्ठपणा, मधुमेह, धूम्रपान, मद्यपान, मान जाड असणे, गरोदरपणा, उतारवय, नाकातील मार्गामध्ये अडथळा, थायरॉईड संप्रेरकांची कमतरता, इ. निरनिराळी कारणे यामागे असतात. वयानुसार स्नायूंमध्ये ढिलाई येते व घोरणे सुरु होते. लठ्ठपणामध्ये स्नायूंमध्ये चरबी साठून स्नायू दुबळे होतात. हे आजार नसतील तर उतारवयातील घोरण्यापासून ही व्यक्ती मुक्त असू शकते.

घोरण्यामुळे श्वास अडून आचके येत असतील तर डॉक्टरकडे नक्की दाखवले पाहिजे. यासाठी काही तपासण्या करून घोरण्याचे कारण आणि प्राणवायू प्रमाणाची कमतरता निश्चित करता येते. छातीच्या डॉक्टरकडून तपासणी केल्यास रात्रभराचा घोरण्याचा आलेख व कार्डिओग्राम (ईसीजी) काढता येतो. यावरून निश्चित निदान करता येते. यातील बहुतेक लोकांना जीभ जडावल्यामुळे घोरण्याचा त्रास होत असतो.

कारणाप्रमाणे यावर वेगवेगळे उपचार उपलब्ध आहेत. जीभ जागच्या जागी रहावी म्हणून प्लॅस्टिकची आधारपट्टी किंवा शस्त्रक्रियेने घोरणे दुरुस्त करता येते.

योग्य आहार, व्यायाम, प्राणायामाचे काही प्रकार (उज्जायी व भस्त्रिका) वजन कमी करणे, कुशीवर झोपणे, या साध्या साध्या उपायांनी घोरण्याचा त्रास बराच कमी होऊ शकतो. यातून उपाय न झाल्यास व त्रास जास्त असल्यास डॉक्टरकडे आवश्य गेले पाहिजे.

घटसर्प

लहान मुलांमध्ये घटसर्प नावाचा एक गंभीर आजार येऊ शकतो. या सांसर्गिक आजाराची सुरुवात बारीक ताप, अंगदुखी, घसादुखी या लक्षणांनी होते. यात घशात किंवा टॉन्सिलवर पांढरट करडा पडदा तयार होतो. तो काढण्याचा प्रयत्न केल्यास तिथून रक्तस्राव होतो. यात ब-याचदा घशात अवधाण येऊन गळा सुजतो, गिळण्याची क्रिया मंदावल्याने तोंडातून लाळ गळत राहते. या आजारात हृदय, मेंदू, इत्यादी अवयवांवर जंतूंच्या विषाचा परिणाम होऊन मूल दगावण्याची शक्यता असते. सध्या तिहेरी लसटोचणी कार्यक्रमामुळे या घातक आजाराचे प्रमाण कमी झाले आहे.

स्वरयंत्रसूज

अन्न गिळताना, पाणी पिताना गळयाची जी घाटी वरखाली होते तेच स्वरयंत्र असते. स्वरयंत्रापासूनच श्वासनलिकेची सुरुवात होते. स्वरयंत्राची दोन कामे असतात.

  • हवेशिवाय दुसरा कोठलाही पदार्थ श्वासनलिकेत जात असल्यास आकसून रस्ता बंद होतो किंवा खोकल्याने (ठसका) तो पदार्थ बाहेर ढकलला जातो.
  • स्वरयंत्राचे दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे हवेच्या मदतीने आवाज काढणे. यासाठी त्यात दोन स्वरस्नायू असतात. हे स्वरस्नायू ताणून उंच स्वर काढता येतो.
कारणे

स्वरयंत्राची सूज सर्दी-पडसे, घसासूज या अनेक आजारांत येते. तसेच स्वरयंत्राला सतत ताण – जादा काम (उदा. भाषण, भजन, इ.), उतारवयात होणारा स्वरयंत्राचा कर्करोग, इत्यादी कारणांमुळे सूज येते. प्रदूषित हवेमुळेही स्वरयंत्राला सूज येऊ शकते.

रोगनिदान

स्वरयंत्राला सूज येण्याची निश्चित लक्षणे चिन्हे म्हणजे आवाज बसणे, घोगरेपणा आणि कोरडा खोकला (ढास) होत.

उतारवयात काही उघड कारण नसताना आवाजात फरक (घोगरेपणा, इ.) पडल्यास कर्करोगाची शक्यता असते. अशा वेळी ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवा. अशा वेळी स्वरयंत्राची तपासणी आवश्यक असते.

उपचार
  • सर्दी-पडसे, घसासूज. श्वासनलिका दाह, इत्यादी आजारांबरोबर जिवाणू दोषामुळे स्वरयंत्रसूज येते. यासाठी जंतुविरोधी कोझाल, टेट्रा, इत्यादी औषधांनी थांबते.
  • गाणी-भजने, इत्यादींमुळे येणारी सूज स्वरयंत्राला चांगली विश्रांती दिली, की बहुधा आपोआप थांबते. याबरोबर गरम पाणी पिणे, दूध-हळद याचाही चांगला उपयोग होतो. मात्र 10-15 दिवसांतही आराम पडत नसल्यास तज्ज्ञाकडे पाठवावे.
  • ढांस (कोरडा खोकला) थांबत नसल्यास कोडीन गोळी द्यावी.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.