Yoga Icon आरोग्यासाठी योगशास्त्र व्यायाम आणि खेळ
आरोग्यासाठी योगशास्त्र
योग म्हणजे काय?

Yoga योगशास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे. योग म्हणजे जीव व ईश्वर यांचा संयोग. पतंजली ऋषीने योगशास्त्र सूत्ररुपाने मांडली आहे. यात योगाची पुढीलप्रमाणे व्याख्या दिली आहे: योग: चित्तवृत्ती निरोध: (चित्तवृत्तींना निर्विकार करणे म्हणजे योग.) तरंग नसलेल्या एखाद्या शांत सरोवराप्रमाणे मन निर्विकार करणे म्हणजे योग. आपल्या मनात जागेपणी व झोपेतही सतत तरंग उठत असतात. मन सतत हिंडत फिरत असते. मन निर्विकार करण्यासाठी पतंजलीने अनेक पाय-या व साधने सांगितली आहेत म्हणूनच योगशास्त्र मुख्यत: मानसिक आहे, शारीरिक नाही.

म्हणून योग म्हणजे केवळ योगासने नाही. योगासने ही केवळ एक पूर्वतयारी आहे. शरीर हट्टाने काबूत आणणे, त्यानंतर मन काबूत आणणे याचा हठयोग म्हणता येईल. योगशास्त्रात आठ अंगे-पाय-या आहेत. म्हणून त्याला अष्टांगयोगही म्हणतात.

भारतात सुरु झालेली योगपरंपरा आता जगात अनेक देशांमध्ये पोचली आहे. पण सध्या त्यातला शारीरिक भागच जास्त पसरला आहे. योगशास्त्र शिकवणा-या हजारो शाखा व प्रशिक्षकांकडून वेगवेगळा योग शिकवला जातो. प्रकार काही असले तरी योगशास्त्र मुख्यत: मानसिक आहे, केवळ शारीरिक नाही हे लक्षात असावे.

तसेच योग म्हणजे व्यायाम नाही. योगशास्त्राचा उद्देश शरीर व मन शुध्द व भक्कम करणे हा आहे. व्यायाम आणि योगातला फरक आपण नंतर पाहणारच आहोत.

अष्टांगयोग

यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान आणि धारणा, समाधि ही योगांची आठ उपांगे आहेत. यांची थोडक्यात माहीती खाली दिली आहे.

यम

अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे) ब्रह्मचर्य, अपरिग्रह (वस्तूंचा संग्रह न करणे) हे पाच यम आहेत. योगी व्यक्तीसाठी हे पाचही आवश्यक आहेत. संसारी व्यक्तीसाठी ब्रह्मचर्य (मैथुनक्रिया मनाने किंवा शरीराने न करणे) आणि अपरिग्रह हे मर्यादित महत्त्वाचे आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय ही तर जीवनाची चिरंतन मूल्ये आहेत. बहुतेक धर्मपरंपरांमध्ये ही तत्त्वे आहेत. अशा आचरणामुळे व्यक्तीची मानसिक उन्नती होते.

नियम
  • शौच (स्वच्छता) म्हणजे स्वत:च्या शरीराबद्दल वैराग्य व इतरांशी संसर्ग न करण्याची प्रवृत्ती.
  • संतोष, म्हणजे आनंद. हा आनंद स्वत:तून निर्माण व्हावा लागतो, बाहेरील वस्तूंवर तो अवलंबून नसतो.
  • स्वाध्याय, तप; म्हणजे आध्यात्मिक अभ्यास व साधना आणि ईश्वर-प्रणिधान ही समाधीची पूर्वतयारी आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.