skin iconत्वचाविकार
पुरळ

herpes त्वचेवर निरनिराळया कारणांमुळे लहानमोठे पुरळ येते. काही पुरळ नुसते पुवाने भरलेले असतात तर काही पातळ द्रवपदार्थाने. बहुतेक वेळा पुरळाबरोबर ताप येतो. पुरळाची कारणे खालीलप्रमाणे

  • कांजिण्या (पूर्वी देवीनेही याचसारखे पुरळ यायचे)
  • गोवराचा आजार
  • नागीण (या आजारात अंगावर एका रेषेत पुरळ येतात)
  • वावडे किंवा ऍलर्जी
  • त्वचेचा जंतुदोष
  • एड्स चा आजार
रोगनिदान

प्रत्येक आजारात पुरळाचा प्रकार वेगवेगळा असतो.

  • पुरळाबरोबर खाज सुटत असेल तर बहुधा वावडे (ऍलर्जी) हेच कारण असते.
  • गोवराचे पुरळ तापाच्या तिस-या-चौथ्या दिवशी येतात. याचे पुरळ लालसर, मोहोरीइतके व शरीरभर सगळीकडे असतात. त्यात पाणी, पू काही नसते. आठवडाभरात हे पुरळ नाहीसे होतात.
  • कांजिण्याचे पुरळ दोन-तीन दिवसांत पुवाने भरतात व नवीन पुरळ एकामागोमाग येत राहतात.
उपचार

पुरळावर उपचार म्हणजे मूळच्या आजारावर उपचार. वावडे किंवा ऍलर्जी असेल तर कोठल्या पदार्थामुळे वावडे आले आहे हे कळले तर जास्त उपयोग होतो. वावडयाचे पुरळ व खाज सीपीएम गोळीने कमी होते. त्वचेचा जंतुदोष असल्यास जंतुविरोधी औषधे (कोझाल) वापरावीत.

नागीण

herpes नागीण हा आजार कांजिण्यांच्या विषाणूंमुळे होतो. कांजिण्या होऊन गेल्यानंतर काही जणांच्या शरीरात हे विषाणू लपून राहतात. अनेक वर्षांनी विषाणू चेतारज्जूतून एखाद्या नसेमार्फत पसरून त्वचेवर फोड निर्माण करतात. नागिणीची तीव्रता वयाबरोबर वाढते. उतार वयात नागीणीचा जास्त त्रास होतो.

रोगनिदान

हे विषाणू चेतातंतूच्या रेषेवर वाढतात. सुरुवातीस त्या चेतातंतूंच्या मार्गावर खूप दुखते. तीन चार दिवसांत तेथील त्वचेवर लालपणा येतो. पाठोपाठ पाण्याने भरलेले दुसरे फोड येतात. हे फोड छोटे छोटे व एकत्र पुंजक्यामध्ये येतात. पाच ते सहा दिवसांत वर खपली धरून वाळू लागतात. फोड गेले की दुखणे बहुधा थांबते. पण काही वेळा पुढेही काही महिन्यांपर्यंत दुखरेपणा टिकतो.

सामान्यपणे हा आजार बरगडयांमधील चेतातंतूंच्या रेषेवर दिसतो. कधीकधी चेहरा किंवा हातांमधील चेतांवरही परिणाम दिसतो. शरीराच्या एकाच बाजूला बहुतेक करून आजार होतो. शरीराची मध्यरेषा ओलांडून फोड पुढे जात नाहीत.

नागीण हा त्रासदायक आजार आहे. पण फारसे गंभीर परिणाम सहसा होत नाहीत. जर डोळयात फोड आले तर मात्र दृष्टी जाऊ शकते.

नागिणीसाठी उपचार

यावर ‘असायक्लोव्हिर’ हे गुणकारी औषध आहे. पुळया उमटल्याच्या दिवशी हे लगेच सुरु केले तर पुरळ लवकर बरे होतात. पण नंतर जी आग होत राहते ती कमी होत नाही. या गोळया महाग आहेत. याचे मलमही मिळते.

याबरोबरच रुग्णाला धीर द्यावा, आणि गैरसमजुती दूर कराव्यात. दुखीसाठी ऍस्पिरिन किंवा पॅमाल द्यावे. हा आजार काही दिवसांत आपोआप बरा होतो. नंतर तीव्र वेदना होतच राहिली तर संबंधित नस मारून टाकण्याचा उपचार करावा लागतो. त्यासाठी तज्ज्ञाला दाखवावे.

चिखल्या

mud चिखल्या हा आजार सहसा पावसाळयात शेतीत काम करणा-यांना होतो. याची सुरुवात पावलाच्या सुजेने होते (बहुधा दोन्ही पाय सुजतात). त्याचबरोबर खाज सुटणे, नंतर पुळया होणे व त्या फुटून जखमा तयार होणे या क्रमाने आजार वाढत जातो. या पुळया अर्थातच सूक्ष्मजंतूंमुळे होतात.

रोगनिदान
  • उपचाराच्या काळात 8 ते 15 दिवस पाय कोरडे ठेवणे महत्त्वाचे आहे. यासाठी विश्रांती घ्यावी किंवा प्लॅस्टिकची पिशवी बांधून काम करावे.
  • तोंडाने कोझाल व ऍस्पिरिनच्या गोळया द्याव्यात.
  • जखमा असतील तर जंतुनाशक मलम किंवा लिंबाच्या पाल्याचा रस लावल्याने चिखल्या ब-या होतात.

प्रतिबंधक उपाय म्हणून ‘गमबूट’ म्हणजे उंच पायाचे बूट वापरणे चांगले; पण अनेकांच्या दृष्टीने हा उपाय खर्चीक वाटेल.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.