Medicine Law Icon आरोग्य कायदा
बलात्कार

बलात्कार (जबरी संभोग) हा मानवजातीचा कलंक आहे. दुस-या कोठल्याही प्राणिवंशात बलात्कार नाही. सर्वच देशांत – पुढारलेले असोत वा मागासलेले – बलात्कार ही समस्या आहे.

अज्ञान किंवा अल्पवयीन म्हणजे 16 वर्षाखालील मुलीबरोबर संभोग – तिची संमती असो वा नसो – हा बलात्कार ठरतो. 16 वर्षे वयावरील स्त्रीशी संमतीविना संभोग केला तर बलात्कार ठरतो. मात्र बलात्काराच्या घटनेमध्ये इतकी गुंतागुंत असते, की बहुतेक वेळा आरोपी सुटतात व स्त्रिया बळी पडतात. बलात्काराची घटना घडली असल्यास खालील काळजी घेणे आवश्यक आहे. नाहीतर गुन्हेगार कोर्टात निर्दोष सुटण्याची शक्यता असते.

  • त्या स्त्रीचे कपडे, गुप्त अंग, अंगावरचे डाग, इत्यादी सर्वांचा तपासणीत खूप उपयोग असतो. म्हणून हे सर्व स्वच्छ न करता जसेच्या तसे ठेवून वैद्यकीय तपासणीस आणावे. जनुकीय तंत्रज्ञानामुळे स्त्रीच्याअथवा पुरुषाच्या अंगावरचे, कपडयावरचे डाग तपासून बिनतोड पुरावा प्राप्त करता येतो.
  • स्त्रीच्या अंगावरच्या जखमा, ओरखडे हे प्रतिकाराने होतात. ओरखडे व जखमा पुरुषाच्या अंगावरही होतात. याचा सर्वसाधारण अर्थ ‘संमती’ नव्हती असा आहे, हे सर्व तपासणीत व दाखल्यात दिसले पाहिजे.
  • घटनेनंतर लवकरात लवकर, शक्यतो त्याच दिवशी तपासणी होणे आवश्यक आहे. यानंतर बहुधा कपडे, शरीर यांची स्वच्छता होऊन पुरावा नष्ट होतो. ब-याच वेळा जबरीमुळे गुप्त अवयवावर ‘फाटल्याच्या जखमा’ एवढाच पुरावा शिल्लक राहतो.
  • घटनेनंतर लगेचच तपासल्यास योनिमार्गात वीर्य व शुक्रपेशी आढळतात. वीर्य योनिमार्गाच्या आत अथवा बाहेर सांडण्याचा पुरावा खास तपासणीने सिध्द होऊ शकतो. योनिमार्गातून त्यासाठी काचेच्या पट्टीवर नमुना घेऊन प्रयोगशाळेत पाठवला जातो. स्त्रीच्या किंवा पुरूषाच्या कपडयावरचे डाग वीर्याचे आहेत की नाही याची शहानिशा खास तपासणीत होऊ शकते. यासाठी हे डाग प्रयोगशाळेत पाठवले जातात.
  • बलात्काराच्या घटनेत स्त्रीबरोबर लगेचच पुरुषाची तपासणी आवश्यक असते. दोघांच्याही कपडयावरचे रक्ताचे डाग बराच पुरावा देऊ शकतात (यासाठी तपासणीच्या वेळी कपडे वेगळे सीलबंद केले जातात.) कोर्टात बलात्कार कायदेशीरदृष्टया सिध्द होणे (म्हणजे ‘जबरी’ व लैंगिक संबंध’) हे ब-याच वेळा अवघड असते. अनेक कारणांमुळे बलात्कार होऊनही आरोपी निर्दोष सुटण्याची शक्यता नेहमीच असते. वैद्यकीय तपासणी व पुरावा हा त्यातील खूप महत्त्वाचा भाग आहे.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.