blood institute diseases icon रक्ताभिसरण संस्थेचे आजार रक्तसंस्थेचे आजार
नीलावृध्दी

Blue Growth काही जणांच्या पायावरच्या नीला (शिरा) सुजलेल्या दिसतात. निरोगी अवस्थेत नीला फुगल्या तर सरळ असतात. नीलांमध्ये रक्त वर चढत जाण्यासाठी झडपा असतात. झडपा निकामी झाल्या, की रक्त वर चढत नाही. रक्त पायांमध्ये साठून राहते आणि नीलांना सूज आणि वळणे येतात. ज्यांना सतत उभे राहून काम करावे लागते (उदा. चौकातला वाहतूक पोलीस) अशांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते.

नीलावृध्दीच्या पहिल्या अवस्थेत पाय जडावणे, मंद दुखणे, इत्यादी लक्षणे दिसतात. नंतर रक्त साकळून जखमा तयार होतात व या जखमा लवकर ब-या होत नाहीत.

नीलावृध्दी हा चिवट आजार आहे. पहिल्या अवस्थेत उपचार केले तर तो आटोक्यात राहू शकतो.

होमिओपथी निवड

आर्सेनिकम, कल्केरिया कार्ब, फेरम फॉस, लॅकेसिस, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर

प्राथमिक अवस्थेतले उपचार
  • झोपताना पायथ्याची बाजू अर्धा-एक फूट उंच करायला सांगा. म्हणजे पायातले रक्त शरीरात उतरेल.
  • पायांना घोटयापासून मांडीपर्यंत वर कापडाची किंवा इलॅस्टिकची पट्टी ताणून बांधून नीला रिकाम्या ठेवणे. विशेषतः झोपताना याचा वापर करावाच. दिवसाही पट्टी वापरल्यास नीला मोकळया राहण्यास मदत होते.
  • ‘उभे’ काम टाळून पायांच्या हालचालीचे काम केल्यास नीला रिकाम्या राहायला मदत होते.
रक्ताभिसरण संस्थेची तपासणी

Blood Pressure Checkup रक्ताभिसरण संस्था मुख्यतः (अ) हृदय व (ब)रक्तवाहिन्यांचे जाळे अशी विभागता येईल. हृदयाचे आजार व रक्तवाहिन्यांचे आजार थोडे वेगवेगळे असतात. मात्र एकात दोष निर्माण झाला तर बहुधा दुस-यावर थोडाफार परिणाम होतोच. रक्ताभिसरण संस्थेची तपासणी पुढीलप्रमाणे करतात.

नाडी

नाडीचा वेग (साधारण 70 कमी अधिक 10), रक्तदाब (साधारण 120-70 कमी अधिक 20) याबाबत आपण सर्वसाधारण तपासणीच्या वेळी पाहिले आहे.

नाडीवर बोट ठेवून दाबून रक्तवाहिनी कडक झाली आहे का हेही पाहता येते. वयाप्रमाणे रक्तवाहिन्या कडक होत जातात. यामुळे रक्तदाबही वाढत जातो. नाडी जर तरूण वयात कडक वाटत असेल तर मात्र रक्तदाबाचा आजार संभवतो.

पटकी किंवा रक्तस्राव झाल्यास शरीरातील पाण्याचा साठा किंवा रक्ताचे माप कमी होते. नाडी 100 पेक्षाही जास्त वेगाने चालते. यात रक्तदाब कमी होतो. ही अवस्था जास्तच गंभीर असेल तर नाडी मोजता येत नाही. आधुनिक वैद्यकशास्त्रात या अवस्थेस ‘शॉक’ असे म्हणतात. पण मराठीत मात्र याला आपण ‘घात’ असे म्हणू या.

हृदयविकाराचा झटका आला असेल तर नाडी वेगाने किंवा अनियमित चालते.

शरीरावरील नीला

आपल्या अंगावर रक्तवाहक ‘शिरा’ (नीला) दिसतात त्या मुख्यतः पाऊल व हातावर. कृश चरबीरहित शरीर असेल तर या शिरा जास्त दिसतात. व्यायामाने अंग पिळदार झाले असल्यास देखील अशा शिरा दिसतात.

मात्र काही वेळा ही कारणे नसून देखील नीला फुगलेल्या व मोठया दिसतात. पोट, छाती, मांडया, दंड या नेहमी शिरा न दिसणा-या भागावरही शिरा दिसू लागल्या तर आजार संभवतो. म्हणजे या नीलांमधला रक्तप्रवाह तुंबून राहिला आहे असा निष्कर्ष काढता येईल. ज्या नीलांना अडथळा येईल त्या फुगतील. अशा निळसर फुगलेल्या नीलांवरून आतील प्रवाहात कोठेतरी अडथळा असू शकतो. किंवा यावरून हृदय रक्त वर नीट खेचत नाही हे अनुमान काढता येते. हा अडथळा लवकर दूर झाला नाही तर त्या त्या भागांत पाणी जमून सूज येते. उदा. पायातील नीला तुंबली असल्यास त्या पायाला सूज येते.

हृदय

छातीच्या मध्यरेषेच्या डाव्या बाजूला हृदय असते. हृदय छातीच्या पिंज-याच्या फासळयांना लागूनच आत असते. जर शरीरावर चरबी फार नसेल तर त्याची हालचाल डोळयांना दिसते. चरबी फार असेल तर मात्र ही हालचाल वरून दिसत नाही. जेव्हा हृदयात दोष उत्पन्न होऊन ते रक्त ढकलण्याचा जास्त प्रयत्न करू लागते तेव्हा ती हालचाल वर दिसते. ही हालचाल नाडीच्या प्रत्येक ठोक्यासरशी दिसून येते. आपला हात हृदयावर ठेवूनसुध्दा ही हालचाल कळू शकते. तातडीच्या प्रथमोपचाराच्या वेळी हे तपासावे लागते.

आवाजनळी हृदयावर लावली तर नाडीच्या ठोक्यागणिक ‘लब – डप’ असा डबल आवाज ऐकू येतो. हृदयाच्या झडपांमध्ये दोष निर्माण झाला, की या आवाजाची पध्दत बदलते. यामुळे मध्येमध्ये ठोक्यागणिक ‘थरथर’ ऐकू येते. हृदयातल्या रक्ताच्या प्रवाहात उलटसुलट गती निर्माण झाल्यामुळे ही थरथर होते. आवाजनळी नसेल तर छातीला नुसता कान लावूनही लब- डप चा नेहमीचा आवाज किंवा थरथर ऐकू येते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.