Ayurveda Icon होमिओपथी कसे काम करते औषध विज्ञान व आयुर्वेद
औषधवर्णन – लक्षणसमूह

निवडक होमिओपथिक औषधांची लक्षणे (मटेरिया मेडिका)

नायट्रिक ऍसिड (ऍसि नाय)

(म्हातारी, सावळया वर्णाची, काटकुळी माणसे, डोळेही काळे, निराश मनोवृत्ती)

उत्सर्जन मार्गाची श्लेष्मल त्वचा, नाक तोंड यांचा आतील भाग येथे दाह, क्षते, सडणे/ लाकडाची ढलपी घुसल्याप्रमाणे वेदना/ कापल्या-फाटल्यासारखे दुखते/ग्रंथींची सूज, पिकणे, किडणे, इ./ सर्वत्र दूषित झाल्याप्रमाणे लक्षणे/डोळयांभोवती पिवळटपणा/गाल लाल/ जिभेवर फोड आणि क्षते/ जिवणीचे कोपरे क्षतग्रस्त/तोंडाला वाईट वास/ हिरडया पांढरट/जिभेवर हिरवट थर/ शिश्नाच्या बोंडीवर व कातडीवर चट्टे / नितळ परंतु वास येणारा स्त्राव/गर्भाशय-मुख आणि ग्रीवेवर मांसवृध्दी/पावलावर पुष्कळ घाम-वास येणारा आणि पिवळट खवल्यासारखी कातडी/क्षते-वाकडीतिकडी/कशीतरीच भरलेली जखम किंवा व्रण/सकाळी घाम/ अंग झडते/वेदना ओढल्यासारख्या/वेदना एकाएकी उद्भवतात आणि तशाच नाहीशा होतात/वाहनातून प्रवास करताना अनेक लक्षणे कमी होतात./ उथळ चट्टे आणि क्षते/ चटकन रक्तस्राव होणारे पण खोल-आरपारसुध्दा/खाताना जबडयात करकर आवाज होतो/ गुदद्वार दुखते/वेदनेमुळे गुदद्वार आवळले जाते/ तेथे चिरा पडतात/ सकाळी फार थकवा जाणवतो/ अंग थरथरते/ अश्रुमार्गाचा व्रण -लासरू/ माती, चुना, खडू अशा गोष्टी खाव्याशा वाटतात/ दूध पचत नाही/ सर्दी-खोकल्याबरोबर पाठ दुखते/ मस आणि चामखिळी/ लाल लघवी, घोडयाच्या मुताप्रमाणे किंवा तीव्र वास येणारी/ डोक्याच्या हाडांचे रोग.

फॉस्फरिक ऍसिड (ऍसि फॉस्फ)

(मुळातली दणकट शरीरप्रकृती परंतु रक्त, पाणी यांच्या कमतरतेने शुष्क झालेले, अति भराभर वाढणारी मुले, मज्जासंस्थागत थकवा, गळाठा, चैतन्यहीनता, खिन्नपणा, अतिसंभोग) आत्यंतिक दुख: किंवा मानसिक किंवा शारीरिक अतिश्रमामुळे मूत्राधिक्य आणि पांढरी लघवी होणे/ संभोगानंतर अतिशय थकवा/ठिसूळ हाडे/ हाडांच्या आवरणाचा दाह/ कुरतडल्याप्रमाणे, फाटल्याप्रमाणे वेदना/ चाकूने खरवडल्याप्रमाणे वेदना/ रोगट हाडातील वेदना जास्त जाणवतात/ अलिप्तपणा/ बोलत नाही/ केस लवकर पांढरे होतात, गळतात/पांढरे, राखाडी जुलाब होतात. मात्र त्याने थकवा जाणवत नाही/ पोट टम्म फुगलेले असते/ छातीत खालच्या बाजूला खाज आल्यासारखे होऊन कोरडा खोकला येतो/क्षते पडून कातडी हाडाला चिकटते/ छातीत धडधडते/ रात्री आणि सकाळी खूप घाम येतो/विचार करवत नाही/भयंकर थकवा आणि गळाठा जाणवतो/ लैंगिक विषयाबद्दल स्वप्ने-ज्यात वीर्यस्खलन होते/ डोळयाच्या पांढ-या भागावर पिवळे ठिपके येतात/ पाळीच्या वेळी यकृतात दुखते/ शरीराच्या अर्ध्या भागाची आगआग होते/ हातपाय थंड पडतात/ शरीरातील स्त्राव गेल्याने, वेदनारहित किंवा नुसती आग होऊन अशक्तपणा येतो/ डोळे काचेसारखे निस्तेज/ रात्री आपोआप जीभ चावली जाते/ वाईट किंवा धक्कादायक बातमीचे दुष्परिणाम.

एपिस मेलिफिका (एपिस)

(विधवा, स्त्रिया, मुले व मुली – मुळात व्यवस्थित पण आता गबाळेपणा)

आग होणा-या गांधी/ डंख मारल्याप्रमाणे वेदना/ पाणीयुक्त सूज- फुप्फुस किंवा इतरत्र/ जलोदर/ मेंदू आवरण किंवा मेंदूचा दाह/ स्त्रियांचे इंद्रियामध्ये रक्ताधिक्य, सूज, झोंबवणा-या वेदना/ उजव्या अंडकोषाची वृध्दी/ डाव्या बाजूच्या छातीत स्नायुगत वेदना आणि खोकला/ मधमाशी वगैरेचे डंख/ पित्ताच्या गाठी/ रात्री असह्य खाज/ चेह-यावर सूज/ घशात टॉन्सिलवर सूज, क्षते/ टाळयावर सूज/ गिळण्याची क्रिया कठीण/ कातडी पांढरट फिक्की, जणू पारदर्शक/ लघवी कमी, पांढरट दुधकट/ सर्वत्र दंशासारख्या आगयुक्त वेदना/ गुंगल्यासारखी झोप आणि त्यात रोगी किंचाळतो/ झापड आणि झोपाळूपणा/ गार पाणी, इत्यादी लावून बरे वाटते/ उबेचा त्रास होतो/ मूल झोपेत बडबडते, किंचाळते, तिरळे पाहते, दात खाते, उशीत जणू डोके खूपसू पाहते/ शरीराची एक बाजू झटके देते तर दुसरी पक्षाघात झाल्याप्रमाणे/ डोके घामाने भिजलेले/ सारखा कामात दिसतो पण अस्वस्थ असतो/ वस्तू पाडतो/ काम सारखे बदलतो/ वेंधळेपणाने वागतो/ बरगडया संपतात तेथील पोटाचा भाग हुळहुळा, नाजूक/ जराही स्पर्श किंवा दाब सहन होत नाही/ थकवा फार, आहे तेथे जमिनीवर पडून रहावे असे वाटते/अवयवांच्यातील ताण वाढतो/डोळयावर, कानामागे, मानेवर डोक्याचे डावे बाजूस ताठपणा किंवा खेच जाणवतो/ डोळे लाल होतात/उजेड सहन होत नाही, पाणी जास्त येते/ छाती, पोट, इत्यादी ठिकाणी घट्ट वाटते, जणू बांधल्याप्रमाणे/रूग्ण हालचाल करण्यास घाबरतो/काहीतरी तुटेल असे त्याला वाटते/तहान कमी असते.

अर्निका मोंटाना (अर्निका/अर्णिका)

(निराश स्त्रिया, मोठाड, लालबुंद, जाडजूड माणसे)

कोणत्याही प्रकारचे दुखणे, जे केव्हातरी झालेल्या इजेशी संबंधित असते/ठेचाळणे, मुरगळणे, इ./ रक्त, रक्तवाहिन्या व रक्तस्राव तसे स्नायूसंबंधी विकार/ विशेषत:वेदना मार लागल्यासारख्या, बाहेरून आत टोचल्यासारख्या/ अंथरूण कडक, कठीण वाटणे/ शरीर हुळहुळे होते/ शरीर दुखते व तेव्हाच अस्वस्थपणा/ सारखी कुस बदलणे/ फक्त चेहरा व डोके गरम, इतर शरीर थंड असा ताप/ छातीत टोचल्याप्रमाणे दुखते – कोरडया खोकल्याने जास्त/हालचालीने जास्त/दाबून धरल्याने बरे वाटते/करपट ढेकरा/(हायड्रोजन सल्फाईड गॅस)/ टायफॉईडचा ताप/ खूप ताप/ दुर्गंधीयुक्त श्वास/ पण रोगी अलिप्त/ काही विचारले तर भानावर येतो, पण परत झोपतो/ गुंगी/ ‘मला काही होत नाही’ म्हणतो.

आर्सेनिकम आल्बम (आर्सेनिकम आर्से)

(निराश मनोवृत्ती, परंतु शांतता नाही, तगमग, भयंकर अस्वस्थपणा, मृत्यूची भीती आणि खात्री)

अचानक थकवा, गळाठा/घालमेल/श्लेष्मल त्वचेची आग, लाली, खवखव/ क्षते पडतात, पण पू होत नाही/पाणकट झोंबणारा स्त्राव/ फिकट चेहरा-प्रेतासारखा/जिभेवर काटे, मध्ये लाल चट्टा/ लालभडक किंवा कोरडी लाकडाच्या रंगाची जीभ/ सर्व उत्सर्जने व स्त्राव करवडणारे, आग करणारे, झोंबणारे/ दम,धाप, नाडी जलद/ क्षीण/अनियमित/ त्वचा कोरडी, पापुद्रयासारखी/ सडण्याकडे प्रवृत्ती/ सडके, नासके पदार्थ पोटात गेल्याने पटकीसदृश विकार.

सर्व लक्षणे मध्यरात्री/ थंडीने/ गार पेय, इत्यादीमुळे वाढतात/ऊब/ उंच उशी झोप लागल्यास बरे वाटते/ भीती/ मृत्यूची भीती काळजी, चिंता/ घालमेल/ पुन:पुन्हा थोडया पाण्याकरता तहान/ फळे, दूध आईस्क्रीम, इत्यादी बाधून दुखणे – पोटाचे/ काळपट उलटी व विष्ठा/ जुलाब/ भयंकर थकवा/ दुर्गंधी/ विविध ठिकाणी आग पण शेकल्याने बरे वाटते/कोंडा/खवले/पापुद्रे, इत्यादी असलेले त्वचारोग/ खाजवल्याने आग/ जास्त रक्त निघते/नियतकालिक आजार/थंडी, थकवा आणि नैराश्यसह सूज/जलोदर किंवा अंग झडणे/ काळी पडत जाणारी क्षते/ क्षतांच्या कडा उंच/अंग सडणे/भाजल्याच्या जखमा

बेलाडोना (बेला)

(रसरशीत, जाडजूड माणसे जेव्हा आजार नसतो तेव्हा अत्यंत हसरी आणि वेधक दिसतात.)

डोळयांच्या बाहुल्या विस्फारलेल्या/घसा कोरडा/डोक्याकडे जाणारी नाडी जोरात उडते/ रोगी गुंगीत/ बडबडणारा/ डोळे चमकदार/भ्रमिष्ट/जीभ लाल, कोरडी, गरम, चिरा पडलेली/लघवी अडलेली/खूप ताप/आकडी येणे/ आवाज बसलेला/ घसा दुखतो/ ढासयुक्त खोकला/ऊन, थंडी, गोवर (जर्मन), टॉन्सिल्स, शीत पेये, इत्यादींमुळे खूप तीव्र लक्षणे/ अनेक तापांची सुरुवात/ एकाएकी उद्भवणारी तशी बंद होणारी लक्षणे/ डोक्यात, मेंदूत रक्ताधिक्य/ उन्माद/ बेभान रोगी उदा. पिसाळलेले कुत्रे चावलेला/ विलक्षण भीतियुक्त आभास/ त्यापासून रोगी पळून जाऊ पाहतो/ त्याला भयंकर प्राणी व चेहरे वगैरे दिसतात/ ठोकेयुक्त डोकेदुखी/ हालचाल, उजेड, आवाज काहीच सहन होत नाही/ चेहरा लाल किंवा फिका/ गिळताना घसा दुखतो/सुजलेला लाल घसा/ उजवीकडे जास्त/ टॉन्सिल्स, इत्यादी गाठी सुजतात/ घशात वळवळ आणि खोकला/ रात्री, संध्याकाळी जास्त/ एकाएकी येणा-या व नाहीशा होणा-या वेदना/विशेषत:ओटीपोटात/रोगी जपून, धक्का बसू न देता पावले टाकतो/ अत्यंत वेदनायुक्त अशा पोटाच्या तक्रारी/ पोटफुगी/हुळहुळेपणा/ सूज आणि खूप ताप/ लट्ठ बायकांच्या पाळीच्या तक्रारी/ भडक लाल रक्तस्राव, अतिस्त्राव मासिक पाळी नसतानासुध्दा होणारे स्त्राव/ गार हवा लागताच सर्दी होणे/ केस कापल्यानेसुध्दा सर्दी होते/ अंतर्गत अवयवांत सूज/ फुगीरपणा/ फाटल्यासारख्या वेदना/ खालून वर जाणा-या वेदना/ स्नायूंमधून उंदीर फिरतो आहे असे वाटते/ शरीराच्या आळोखेपिळोखे देणा-या हालचाली/ एका बाजूचे शरीर लुळे, बधिर/ मानसिक लक्षणांबरोबर अंतर्गत सूज व पू होण्याकडे प्रवृत्ती/ तापात मानसिक लक्षणे/ शुध्द हरपणे/ भ्रम/ नंतर पुरळ, फोड, इत्यादींमुळे येणारे ताप.

ब्रायोनिया (ब्रायो)

(दणकट शरीर, रागीट स्वभाव, निराश आणि काटकुळे शरीर, सांधेदुखी)

कोरडेपणा- श्लेष्मल त्वचांचा/जीभ कोरडी, पांढरी/ मोठया व्यासाची कडक कोरडी विष्ठा/ बध्दकोष्ठ/ चिडका, दु:खी स्वभाव/ सांधे लाल, सुजलेले, धरलेले/ टोचल्यासारखे दुखते/ हालचालीने सर्व लक्षणे वाढतात/ थोडया श्रमाने शक्ती संपते/ डोके, विशेषत:मागील भाग फारच दुखतो/ विविध ठिकाणचे आवरण दाह, विशेषत:फुप्फुसे (न्युमोनिया) अस्थि आवरण दाह/ तसेच संधिवात/ आर्थरायटिस, स्तन दाह, इत्यादी/ पुरळयुक्त तापात मध्येच पुरळ येणे थांबते/ पुरळ मावळते आणि इतर लक्षणे वाढतात/ रागीट/त्रस्त/ चिडका रोगी/ गादीत खोल खोल जात आहोत असे वाटणे/ डोकेदुखी, खाली वाकल्याने वाढणारी/ श्लेष्मल त्वचेचे पापुद्रे सुटतात/कोरड, गार पाणी खूप प्यावेसे वाटते/ कडू उलटया/ गुंगीत धंद्याबद्दल, दिवसातील घटनांबद्दल बडबड/सूज/ जलोदर/ थंड हवामानानंतर उष्ण हवामानाने रोग/ कुठेही धक्का सहन होत नाही/ खोकताना, शिंकताना, हिंडताना हिसका बसला की दुखते/ तसेच आवाज, उजेड, वास , इत्यादी संवेदना तीव्र असल्यास त्रास/ मानेचे स्नायू दुखतात/ खरचटल्याप्रमाणे वेदना/ सर्दी होईल असे वाटत राहते/ कंबर, पाठ दुखते/ चेहरा लाल-निळा/ नाडी कडक व द्रुत/ रात्री 9 वाजता जास्त त्रास/ श्वास आत घेताना विशेष त्रास/ दाबाने, घट्ट बांधल्याने, दुख-या बाजूवर झोपल्यास बरे वाटते/टायफॉईड व त्यासारखे ताप.

कल्केरिया कार्ब (कल्के कार्ब)

(गोरी, फोफशी, घामट माणसे, लट्ठ होणारी, शरीराची वाढ नीट नसणे, टाळूची हाडे न जुळणे, मोठे डोके, मोठे पोट, जरा घट्ट कपडे चालत नाहीत)

पोट कठीण, फुगलेले/आंबट उलटया आणि जळजळ/गोडसर बेडके/ अंगावरून पांढरे पाणी जाते/ उशिरा चालायला लागणारी मुले/ सकाळी फार भूक/ आवाज बसतो पण वेदनारहित घसा/हाडे ग्रंथी यांचे रोग/ दात येतानाचे त्रास/ दूध उलटून पडते/ दह्यासारख्या कवडया होतात/ आंबट उलटया/आंबट वास/ मुले भराभर वाढतात/ पाळी लवकर/ जास्त स्त्राव/पाण्यात काम केल्याने त्रास/गारवा सहन होत नाही/ पाय ओले, जणू ओले पायमोजे घातल्यासारखे वाटते/ पुढे घडणा-या दुर्दैवी घटनेची भीती बाळगून असतो/ आपण वेडे होऊ अशी पक्की धारणा, खिन्न, दु:खी/ टोचल्यासारख्या वेदना/ फाटल्याप्रमाणे वेदना/ संधिवात/ सांध्यांमध्ये टणक गाठी/स्नायूंमध्ये वांब,त्याने बोटे वाकडी होतात/ ग्रंथी, हाडे, दात, इत्यादींचे रोग, हे भाग किडतात/ डोळयांच्या बाहुल्या मोठया होतात/ खोकला, मध्यरात्रीनंतर जास्त-खांदे मागे खेचल्याने कमी/ (जिना, इ.) चढून धाप.

सीना

(लहान मुले- चिडचिडी, सारखी कडेवर बसणारी, न हसणारी)

पचनाचे रोग/श्वसन संस्थेचे आजार/ आक्रस्ताळेपणा, वस्तू फेकणे, डोके आपटून घेणे, इत्यादी/ मुले माती, कोळसा, घाण, इत्यादी खातात/ जंत होतात/ त्याने आकडी येते/ अंग कडक होते/ घशापासून पोटापर्यंत गुडगुड आवाज येतो/ मुले नाक कोरतात/ चेहरा निस्तेज दिसतो/ झोपेत मुले दाताचा कटकट आवाज करतात/ दचकून उठतात/ रडतात/ हातापायांना झोपेत झटके येतात/ मळ पांढरट पातळ/ अतोनात चिडकेपणा/ मागितलेली वस्तू फेकून देतात/ रडतच राहतात/ जुलाब/ भूक जास्त किंवा कमी/ खा-खा सुटते/ डांग्या खोकल्यासारखा खोकला/ लघवीवर ताबा नसतो/ लघवी पांढुरकी/ खूप चढ-उतार होणारा ताप.

कॉस्टिकम (कॉस्टि)

(घट्ट स्नायू, परंतु पिवळट रक्तविहीन त्वचा, श्वसन व मूत्रमार्गाचे विकार) श्वसनेंद्रियाची श्लेष्मल त्वचा/ पक्षाघात/लुळेपणा/ विशेषत:चेहरा, घसा आणि मूत्राशय/ खोकला, पोकळीत खोकल्यासारखा आवाज/ श्वासनलिकेत प्रत्येक वेळी खोकताना वेदना आणि हुळहुळेपणा/ चेह-याच्या एका बाजूस पक्षाघात/ घशाचे स्नायू काम करीत नाहीत, विशेषत:बोलताना/ रात्रीचे वेळी आणि शिंकताना-खोकताना, नाक शिंकरताना लघवी होऊन जाते/ रात्री आंबूस वासाचा घाम येतो/ आराम वाटेल अशा अवस्थेत झोपताच येत नाही/ सारखी चुळबूळ होते/ ज्या भागावर झोपावे तो भाग दुखरा, हुळहुळा होतो/ सांध्यात आणि हाडात दुखते/ भोवळ आल्याप्रमाणे शक्तिपात होतो/ सायंकाळी लक्षणे वाढतात/ असह्य अस्वस्थपणा येतो/ हृदयाभोवती घाबरेपणा जाणवतो/ खोकताना कल्ल्यात दुखते आणि लघवी होते/ पक्षाघात झालेले अवयव ताठ असतात/ हातपाय वाकविणारे स्नायू आकुंचित होतात/ पोट मोठे असणारी, सारखी पडणारी मुले/ मुले फार उशिरा चालण्यास शिकतात/ कफ भागांची आग/ विशेषत:क्षते झोंबतात/ मस विशेषत:नाक व भुवयांवर/ उभे राहून शौचास अधिक सहजपणे होते/ उबेने एकंदरीत फार बरे वाटते.

चामोमिला/कॅमोमिला (चामो)

(गुटगुटीत मुले, रडकी, दुखणं सहन न करणारी)

लहान मुले/चिडकी/ अत्यंत चिडकी/ लहान मुलांसारखी चिडणारी माणसे/ अधिरी, किरकिरी, अस्वस्थ, गरम (तापयुक्त) रोगी/ आंबट उलटया/ हिरवे जुलाब/ लक्षणे तीव्र विष्ठेस सडक्या अंगाचा वास/ कोरडा खोकला/ घरघरयुक्त खोकला, कफाचा आवाज येणारा/ ढास, विशेषत:मध्यरात्री जास्त/ एक गाल गरम, दुसरा फिक्कट गार/ मुलांचे ताप/ आकडी येते/ फणफणणारे ताप/ दंतोद्भवाच्या तक्रारी/ जंतांचा त्रास/ मूल उचलून घेऊन त्यास सरळ हिंडविल्यासच गप्प बसते, एरवी फार फार रडते/ तळपायांची आग/ तापात रोगी पाय बाहेर काढून ठेवतो/ तीव्र वेदनायुक्त ज्ञानतंतूंचे दुखणे, उदा. दातदुखी, इत्यादी/ उत्सर्जनामुळे (विष्ठा, घाम, ढेकर, इ.) वेदना, तगमग वाढते/ वेदनेबरोबर तहान, उष्मा/ गुंगीत कण्हणे आणि दचकणे.

ड्रॉसेरा

गुदमरून टाकणारा, एकामागे एक येणारा खोकला/ डांग्या खोकला/ खोकल्याने नाकातून रक्त/ घशात व टाळयाला खरवडल्यासारखे वाटते/ घसा खडबडीत होतो/ पिवळा श्लेष्म पडतो/ घसा बसून जाड आवाज/ लाळ व शेंबूड वगैरे स्त्राव पातळ/ कोरडा, कुऱ्हाडीच्या घावाचे आवाजाचा कडक खोकला/ अंगावर काटा/ चेहरा गरम/हात थंड/तहान नसते/ खोकला येऊन शेवटी उलटी होते/ सांधे कुरतडल्यासारखे दुखतात/ दंश झाल्याप्रमाणे वेदना/वांब/हाडात वेदना, विश्रांतीने वाढतात/अंथरूण कडक असल्याप्रमाणे अंग दुखते/ श्वासनलिकेचा तीव्र दाह/ हातापायात झटके/ नंतर गुंगी/ रोग्याला खोकल्याने विश्रांतीच मिळत नाही/ आंबट पदार्थ नकोसे वाटतात आणि बाधतातही/हिवतापासारखा ताप/ छातीत दुखते/ मळमळ खोकला येताना बरगडयांना ऊब आणि आधार दिल्याने बरे वाटते/ जुना पण किरकोळ खोकला/ अर्श-नाकातील किंवा इतरत्र/ आपण फार दिवस टिकत नाही असे पेशंटला वाटते/ शरीर नाजूक आणि बारीक वाटते/ थोडयाशा कारणानेही सर्व संपेल अशी धारणा/ ल्हासे, तीळ, मस, चामखीळ, अर्श किंवा अशा काहीही निरुपयोगी वाढी शरीरावर कोठेही/अशी ठाम कल्पना, की शरीर काचेचे आहे, आत बेडकासारखा आवाज करणारा प्राणी आहे/ संगीताने रडू येते/ हातपाय कापतात/ स्पर्श खपत नाही.

फेरम मेट

(अशक्त, नाजूक, भित्री माणसे, लाल चेहरा, रक्ताधिक्य असलेली माणसे, रक्त कमी असणा-या स्त्रिया)

रक्त डोक्याकडे अधिक/ नीला भरलेल्या/क्षीण बारीक नाडी/ धाप लागते/ छाती दडपल्यासारखी वाटते/ घोळणा फुटतो/भूक लागत नाही/ गॅसेस/पातळ शौचास होते/खाण्यानंतर पोट फुगते/ आवाज बसलेला/फेसयुक्त श्लेष्मा/ रक्तयुक्त श्लेष्मा/ थुंकीत रक्त/क्विनाईनचे दुष्परिणाम/ प्रत्येक लहानसहान विरोधी घटनेमुळे राग किंवा विषण्णता येते/ एकटेपणा, विश्रांती घेऊन पडून राहिल्याने बरे वाटते/ दिवसा हातापायात गोळे येतात/ संधिवात/ नीलावृध्दी म्हणजे नीलांच्या जाळयामध्ये रक्त साकळते/ नीला लवचिक असतात/ मासिक पाळी लवकर येते/ स्त्राव जास्त होतो/ वंध्यत्व/ गालावर गोल डाग पडतात/ थंड, दमट हवेचा फार त्रास होतो/ भयंकर संतापणारी माणसे.

ग्लोनाईन (ग्लोना)

रक्ताधिक्य डोक्यात/ धमन्या गच्च भरून वहिल्याने डोक्यात हृदयाचे ठोके समजतात/ तसे डोके दुखत नाही/ डोके मोठे झाल्यासारखे वाटते/ बेशुध्द होऊन पडतो/ छातीत धडधड होणे आणि डोक्यात रक्ताधिक्य होणे असे आळीपाळीने होते/ चेहरा गरम वाटतो तेव्हा फिकट पडतो/ उष्माघात/ हृदयाची आत्यंतिक धडधड/ कानशिलाच्या नाडया दिसतात/ शिरा तट्ट फुगतात/ हाताला दोरीसारख्या लागतात/ डोळे लालभडक/ मोठे वेडयासारखे दिसतात/ बाहुल्या विस्फारलेल्या आणि वर फिरलेल्या/ वेदनारहित धडधड शरीरभर होते/ उष्णतेच्या लाटा वरवर जातात/ विचारांचा गोंधळ/ आपण कुठे आहोत तेच कळत नाही/ रोजचे रस्ते अनोळखी वाटतात/ घर फार दूर आहे अशी भावना/ मेंदूत लाटा आल्यासारखे, हेलकावल्यासारखे वाटते.

हेपार सल्फ (हेपार)

(मंद, सुस्त, नरम शरीराची माणसे, ग्रंथीरोग)

क्षते/चिघळणा-या जखमा/श्लेष्मल, त्वचा दाह/क्षताभोवती बारीक पुटकुळया/थंडी फार वाजते/थंडीने लक्षणे बळावतात/ उबेने बरे वाटते (उन्हाळयात स्वेटर घालणारी माणसे)/घशात माशाचे हाड अडकल्याप्रमाणे वेदना/ क्षुल्लक जखमा वगैरे पिकतात, चिडतात, दुखतात/ स्त्रावाला घाण वास/ स्पर्श बिलकूल सहन होत नाही/ कपडयाचा स्पर्शही असह्य होतो/ आंबूस वासाचे हिरवट जुलाब/ जोर लावूनच शौचास होते/ हातावरचे पांघरूण काढले तरी खोकला/ गारवा अजिबात सहन होत नाही/ संधिवातात सांधे दुखतात, गरम होतात, लाली, मुरगळल्यासारखे दुखतात/ कुठेही लाकडाची ढलपी घुसावी अशी वेदना/ आत्यंतिक हुळहुळेपणा.

लॅकेसिस (लॅके)

(काळया डोळयांच्या, अत्यंत हळव्या, बडबडया स्त्रिया, मासिक पाळी जाण्याच्या वेळीचे स्त्रियांचे रोग)

धडधड, घाम सुटणे, हवेत बसावे असे वाटणे/ कातडीखाली रक्तस्राव, त्याने निळे चट्टे/फिकट चेहरा/ लाल, काळी चिराळलेली जीभ/ जीभ बाहेर काढल्यास थरथरते/ जीभ लाल, चकचकीत, गुळगुळीत/ तोंडात लाल छाले/ आग, हुळहुळेपणा/ काळे, कोळशाच्या काडयाप्रमाणे स्त्राव/ दुर्गंधी/निळी-काळी क्षते/विलक्षण दुखरेपणा/हुळहुळणे/ घशाला स्पर्श होताच खोकला, ढास/अंग सडते/ फोड, गळवे होतात/ अशक्त, अनियमित नाडी/ आकडी येते/ भयंकर बडबड, बोलतच राहणे/ सकाळी झोपेनंतर गळाठा, थकवा/ न झोपल्यास बरे वाटते/ सर्व लक्षणे झोपेनंतर जास्त/ आवंढा गिळताना घशात फार दुखते/ घशाला कुठेही स्पर्श सहन होत नाही/ गर्भाशयाला थोडासुध्दा दाब सहन होत नाही/ पोटात कसेसेच वाटते/ कमरेवरही घट्ट वाटते/ पाळी थोडी आणि थोडे दिवस/ गर्भाशय, बीजांडकोष दुखतात/ रक्तस्राव झाल्याने बरे वाटते/ रात्री एकाएकी श्वास अडकून जाग येते/ श्वासनलिका जणू बंद/ नडगीची हाडे दुखतात/ पाळी जाण्याचे वेळी जास्त रक्तस्राव आणि क्लेष/ उष्णतेच्या लाटांवर लाटा आल्यासारखी भावना/ कोठेही दाब म्हणून सहन होत नाही/ कॅन्सरच्या भयानक वेदना, भाला घुसल्याप्रमाणे.

लायकोपोडियम (लायको)

(अत्यंत हुशार परंतु दुर्बल माणसे, शरीराचा वरचा भाग काटकुळा व पोट मात्र मोठे)

ओल्या पिकणा-या जखमा आणि चर्मरोग/पुरळ/जाड खपल्या/रक्तस्राव सहज दुर्गंधी/ कातडीची लक्षणे-ऊब आणि खाजविल्याने जास्त/ जलद नाडी/ लघवीमध्ये विटेच्या भुग्याप्रमाणे तांबडी खर/चेहरा फिकट राखी/थोडया श्रमाने घाम/नाकातून करवडणारे स्त्राव/राखट किंवा दाट पिवळे बेडके/ सावकाश खंगण्याकडे रोग्याची प्रवृत्ती/ संध्याकाळी 4 ते 8 जास्त त्रास/ रोगलक्षणे उजवीकडून डावीकडे जातात/ ढेकरा येतात/ त्याने पोटाला लागलेली तडस फारशी कमी होत नाही/ पोटात गुडगुड आवाज चालूच असतो/थोडया अन्नाने पोट भरते/ पाठदुखी लघवी झाल्यानंतर कमी होते/लालसर असलेली लघवी/ श्वसनाचे रोग असल्यास नाकपुडयांची श्वासाबरोबर पंख्याप्रमाणे हालचाल/ ओढल्यासारख्या, फाटल्यासारख्या वेदना, रात्री व विश्रांती घेताना जास्त/ हातापायांत मुंग्या/अतिशय थकवा/ हातपाय आखडतात/ हातपाय अनैच्छिकपणे उडतात/ हालचाल केल्याने बरे वाटते, पण रोग्याची प्रवृत्ती बसून राहण्याकडे असते/नपुंसकत्व किंवा संभोग इच्छेचा अतिरेक/ अत्यार्तव/ न्यूमोनियामध्ये घाम, त्यात नाकपुडया हालतात/ छातीत कफ/ कमरेभोवती पट्टा आहे असा भास/ कपडयाचा स्पर्शही सहन होत नाही/ लघवी करावी असे वाटते, पण होत नाही/ तेव्हाच बध्दकोष्ठता/ नाडीचे ठोके डोक्यात जाणवतात/ पोटातून डोक्यात गरम गरम होते मोकळया हवेत बरे वाटते/ गरम पेयाने बरे वाटते/ दमट हवेचा त्रास/ घरापासून दूर जाताच बध्दकोष्ठ/ अन्न गिळताच पोटातून परत येते/ तीव्र वासाचा फार त्रास/.

मर्क्युरी कॉरो (मर्क कॉर)

(पुरुषांची दुखणी)
करवडणे/ चरत जाणा-या जखमा असणे/ करवडणारे स्त्राव/ अस्तर उती सडणे/ आवेत रक्त, श्लेष्मा व वेठयुक्त वेदना/ कापल्यासारख्या व जळजळणा-या वेदना/ दंशाप्रमाणे घशात वेदना/ आवाज बसतो/ओठ सुजलेले,काळे/ हिरडया सुजलेल्या, मऊ पडलेल्या/ घसा लाल भडक/ जठर फार संवेदनाशील, फुगलेले/ लघवीत अल्युमेन, आग/ पाठीवर झोपून गुढघे वर घेऊन रुग्ण पडून राहतो, तेव्हा घाम, विशेषत: कपाळावर/ सर्वत्र जलधिक्याची सूज/ हालचालीत थंडी वाजते/ रोगी खिन्न, उदासीन, दुर्बल, रात्री आंबट, स्निग्ध (मसालेयुक्त) अन्न खाल्ल्याने, हालचालीने जास्त त्रास/ न्याहरीने, स्थिर पडून राहिल्याने बरे वाटते/ तोंडात छाले, क्षते/ टॉन्सिल्स/ चरणारी क्षते/ यकृत विकार (दाह)/ आव/ मूत्राशयदाह/ गनोऱ्हिया/ ब्राईटस डिसीझ/ शँकर (व्रण)/ एकंदरित दाह व सूज, गाठी येणे, इत्यादी करता / लाळ खारट लागते/ हिरवे जुलाब, रक्ताच्या कवडया/ वेठ आणि वेग/ सिफिलिस/ स्तन आणि स्तनाग्रे यांची सूज आणि वेदना/वृषणाची सूज, विशेषत: गनोऱ्हिया दाबल्यानंतर.

मर्क्युरी सॉल (मर्क सॉल)

स्त्राव/क्षते/पू/ दुर्गंधी/ बुळबुळीतपणा/ उतींचा नाश होऊन स्त्राव वाढतो/ जणू उतीच द्रवीभूत होतात/ करवडणारे स्त्राव, हिरवा पू/ श्वास, शरीर दुर्गंधीयुक्त/ त्वचा घाणेरडी, तेलकट, पिवळट, क्षतेयुक्त/ क्षतांच्या कडा बाहेर वळलेल्या/ तांबडे चट्टे/ पुळया, पुटकुळया/ दात ढिले/ हिरडया सुजलेल्या/ लाळ सुटते/ जीभ पांढुरकी, बुळबुळीत, सुजलेली/ दातांचा ठसा उमटलेली/ग्रंथी सुजलेल्या/हिरवट पांढरा योनिस्त्राव किंवा कोणत्याही श्लेष्मल त्वचेतून स्त्राव/थरथर/ हाडे दुखतात/ प्रचंड थकवा, गळाठा/हुळहुळेपणा/ स्पर्श केल्याने वेदना वाढतात, विशेषत:दात, हिरडया, इ. ठिकाणी/तोंड ओले, बुळबुळीत/ तहान फार/ दर पाळीच्या वेळी काळजीग्रस्त होते/ लाल जीभ, त्यावर काळे डाग पडतात/ आग, खारट चव/ दात आंबल्यासारखे वाटतात/ पांढरे पाणी जाते/अंगाला रात्री जास्त खाज/ वेदनारहित क्षते/ त्यातून शेंबडासारखा पू/ विशेषत:डोक्यावर/ शिश्नाच्या बोंडावरील कातडयावर क्षते, उथळ, पसरट / पोटात आग, मुरडा/ शौचास होईल असे वाटत राहते/ शौचास होताना थंडी भरून येते/ आव होते/उजव्या बाजूवर झोपून त्रास / यकृत व आतडी दुखतात/रात्री हाडामध्ये वेदना, खुपल्यासारख्या/ घाम जास्त, परंतु घाम आल्याने बरे मुळीच वाटत नाही/ सांधे सुजतात, पण त्यात गार वाटते/ कातडी कोरडी आणि खाज/ अवयवात सहज बधिरता येते/पडून राहून बरे वाटते / सिफिलीस व इतर गुप्तरोगांमध्ये उपयुक्त/ नाकातून रक्त येते/ दाह होऊन पिकण्यापर्यंतच्या सर्व अवस्थांमध्ये उपयुक्त.

नेट्रम मूर (नेट मूर)

(रक्त कमी, मानसिक त्रास, सगळे ठीक असूनही सुकत जाणारे)

नीट बरा न झालेला मलेरिया/ सकाळी 10ते 11 वाजता थंडी भरते/ मलेरिया (जुना)/ यकृत आणि प्लीहेमध्ये रक्ताधिक्य/ सकर्व्ही/ रक्तस्राव/ क्षते/ पुरळ/ करवडणारे, झोंबणारे स्त्राव/ ग्रंथी सुजतात/टोचल्यासारख्या वेदना/डावा गाल लाल/ तेलकट चेहरा, निस्तेज/ जिवणीभोवती मोत्यांसारखे दिसणारे पुरळ (तापानंतर)/ जिभेवर फोड/ जीभ कोरडी, कडक/नाडी अनियमित, थांबते-सुरू होते अशी, विशेषत:डाव्या बाजूस झोपल्याने/ पित्तासारख्या लाल मोठया गांधी/ अंग झडते/ क्विनाईनचे दुष्परिणाम/ दमट ओल्या प्रदेशातील रोग/ भयंकर शोष/ तहान भागत नाही/चटकन थकवा/ हालचालीने हातापायात जणू मांस वेगळे होत आहे अशा वेदना/ खिन्न, दु:खी, उदास, रडवा, सांत्वनाचा उलटा परिणाम/ चिडचिड/ रागाचे दुष्परिणाम/ बडबडी मुले/ अशक्तपणा, ऍनिमिया/ उन्माद वायु/ उन्हाळी तक्रारी/ पांढरा प्रदर (करवडणारा) श्लेष्मल त्वचादाह/ बध्दकोष्ठता/ जन्मत:च असणा-या विकृती/स्नायू आखडलेले असतात/ऊब, उष्णता यांचा त्रास/न खाता राहिल्याने, मोकळया हवेत राहिल्याने बरे वाटते/ डोके फुटेल असे वाटणारी डोकेदुखी/मानेत, छातीत ठोके जाणवतात/ बोचते/उष्ण वाटते/लाल चेहरा/ मळमळ, उलटया, पाळीच्या आधी, पाळीत आणि नंतरही किंवा ताप असताना/नंतर घाम आल्याने हळूहळू बरे वाटते/ ओठ कोरडे, सुरकुतलेले/ वरचा ओठ सुजलेला/जिवणीभोवती कातडी फुटलेली/पाव खाणे नकोसे वाटते(जो आधी तिला आवडत असे)/गळा, मान यांभोवती मुलांचे अंग झडते/ गुदद्वार आवळल्यासारखे, मळ बाहेर पडताना चिरते/ शौचास जाणे कठिण, रक्त आणि हुळहुळेपणा, वेदना आणि दाह, मलोत्सर्जनानंतर हातापायांची व इतरही स्नायूंची फडफड/ रात्री उद्भवणा-या वेदना/श्वास घेता येत नाही/एक बाजू जणू लुळी/अंथरुणात असतानाच सकाळी थकवा वाटू लागतो/ डोके, छाती पोट येथे रक्ताधिक्य, तर पाय गार, शरीर गार, कपडे घालावे असे वाटते/ तापानंतर अशक्तपणाने दृष्टिमांद्य/ जठरात दडपल्याप्रमाणे दुखते/मळमळते/ शक्ती गेल्यासारखी होते/ ‘जीवनशक्ती’च कमी झाल्याने सारखी थंडी वाजते/ तळहात गरम आणि घामेजलेले/ लक्षणे सकाळी आणि रात्री जास्त होतात/ चोर आल्याची स्वप्ने पडून ती इतकी खरी भासतात, की जागा होऊन दिवे लावून घर तपासून पाहतो/ शाळकरी मुलामुलींची डोकेदुखी (कल्के फॉस पहा.)

नक्स व्होमिका (नक्स)

(काटकुळी, चिडकी, काळजीखोर माणसं, आजारांमुळे निराश व भांडकुदळ)

भयंकर आकडी/दातखीळ/धनुर्वाताची कमान, पण असे होत असताना विचारशक्ती ठीक राहते, किंचित उत्तेजनाने पुन:पुन:आकडी येते/ आंबट श्लेष्मा उलटीत पडतो/ कोरडया ओका-या/ जठर भागात तडस, विशेषत:जेवणानंतर/ तास-दोन तासांनी शौचाला लागली आहे अशी भावना, पुन:पुन:खोटी/ घशात खरवडल्यासारखे होऊन खोकला, दमवून टाकणारा/ लघवी लागल्यासारखे पुन:पुन:वाटते/ मूत्राशयाच्या टोकाशी आग/ लैंगिक उत्तेजन चटकन होते/ पाळीच्या वेळी मळमळते, थंडी वाजते, घेरी येते, पाळी लवकर आणि स्त्राव जास्त/ नाक रात्री कोरडे आणि चोंदलेले/ दिवसा पाणी वाहते, शिंका/ जीभ पांढरी/ पोटात गॅस/ मूळव्याध/ रक्तस्राव होत नाही/ भांडकुदळ स्वभाव/ चिडकेपणा/ मारामा-या होतात/ खिन्नपणा/ खाल्ल्यानंतर छातीत धडधडते/ सकाळी उठल्यावर जास्त त्रास अंग दुखते/ रात्रीच्या जेवणानंतर चक्कर, अशक्तपणा, पण संवेदनाक्षमता आणि जागरुकता वाढलेली/ परत झोप, दोन-तीन तासांनंतर, त्यातून जागे झाल्यानंतर थकवा, गळाठा/ बौध्दिक कामाची भीती, तिटकारा, ते झेपत नाही/ काळजीपूर्वक राहणारा, पांढरपेशा, बैठे काम करणारा माणूस असतो/ पचनाचे विकार/ बध्दकोष्ठता/ शौचास जाऊन आल्यावर परत जावे असे वाटते, समाधान होत नाही/ खोकला संध्याकाळी जास्त, आडवे झाल्याने वाढतो/ छातीत खरखर/ खरवडल्यासारखे होते/ हुळहुळेपणा येतो/ पहाटे तीन वाजता विचारांच्या काहुराने जाग/ संध्याकाळी झोप येते/ रात्री येत नाही/ कालबध्द लक्षणे/ उच्चभ्रू समाजातील खाणेपिणे, राहणे यांचे दुष्परिणाम (टेन्शन्स’).

फॉस्फोरस (फॉस्फ)

(उंच, काटकुळी, गोरी, लाल वर्णाची, अशक्त असली तरी चटपटीत, संवेदनाशील, क्षयी प्रवृत्तीची माणसे)

रक्तस्राव, कातडीखाली निळे चट्टे/ कामातून गेल्याची भावना/ चेहरा फिकट/ डोळे खोल/ खप्पड चेहरा/ चेहरा ओढलेला/ जीभ कोरडी/ सुजलेली/ जबडयाची हाडे वाजतात/ विशेषत:खालचा जबडा/ जिभेवर काळा, पांढरा, लाल, पिवळा, करडा थर मध्यावर/ जुलाब होण्याची जुनाट सवय/ न पचलेले अन्न पडते/ आवाज बसतो/ कोरडा खोकला/ चिवट बेडका/ श्वासोच्छ्वास कष्टपूर्ण/ धाप लागते/ छाती दडपते/ फुप्फुसामध्ये पू/ ताप येतो जातो/ कावीळ, रोगी झडतो, खंगतो, रात्री घाम/ किरकोळ जखमातून फार रक्तस्राव- न थांबणारा/ डाव्या बाजूवर रात्री झोपल्यास चिंतायुक्त तगमग/ भ्रम, रोगी स्वत:शीच बडबडतो/ रोज संध्याकाळी ताप, हुडहुडी भरते,तहान नसते, अंत जड, दुखरे, अशक्तपणा/ पोट रिकामे वाटते/ फ-यांच्या मध्ये (पाठीत) जळजळ/ मध्यरात्रीपूर्वी आणि डाव्या बाजूवर झोपल्यावर लक्षणे वाढतात/ मेंदूत जणू आग, ठोके पडतात, दुखते, घुसल्यासारखे वाटते/ गार पाणी प्यायल्यास ते पोटात जाऊन शरीराच्या तापमानास येताच उलटी/ वेदनारहित, न पचलेल्या अन्नाचे वेदनारहित जुलाब, त्याबरोबर रात्री तहान लागते/ बध्दकोष्ठात लांब, कडक, कोरडी विष्ठा, बाहेर पडताना त्रास होतो/ घशात दुखते म्हणून बोलता येत नाही/ खोकल्याने छाती दुखते, वरून दाबून धरल्याने बरे वाटते/ कोरडा, घशात गुदगुल्या होऊन खोकला, संध्याकाळी जास्त/ छातीत घट्ट वाटते/ खोकताना सर्व अंग कापते/ फक्त उजव्या कुशीवरच झोपता येते/खोकला संध्याकाळी आणि रात्री जास्त येतो/ उबदार ठिकाणाहून थंडीत गेल्यास खोकला जास्त येतो / सर्व लक्षणे मध्यरात्रीपूर्वी आणि वादळी हवेत वाढतात/ सर्दी चटकन होते/अंग दुखते/ शरीरात, हातापायांत (विशेषत:तळहातांची) आग/ एखाद्या ठिकाणी शरीरात रक्ताचे जणू उधाण येते/ खाल्ल्याने लक्षणे कमी होतात/ मात्र खाताना उद्भवतात/ मार लागल्याने ग्रंथी सुजतात/ मुडदूस/ खाल्लेले अन्न तोंडात परत येते/ मासिक पाळी लवकर, जास्त काळ आणि जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो/ जुलाबात जणू गुदद्वार उघडेच आहे असे वाटते/ भीती, प्रत्येक कोप-यातून काहीतरी वळवळत बाहेर येत आहे अशी भावना/ संधिप्रकाशात खिन्नता/ वेगवेगळे आभास/ जीभ गुळगुळीत/ शरीरातील पोकळयांमध्ये गारपणा जाणवतो.

फायटोलाका (फायटो)

(काटकुळी माणसे, अजून बारीक होतात, सांधेदुखी)

ग्रंथीसंस्थादाह/पिकणे, क्षते पडणे/ (विशेषत:घशात)/तंतुमय उते/ संधिवाताचा दाह आणि सूज/ अस्थिआवरणे, श्लेष्मल उती येथे दाह, क्षते, झोंबल्यासारख्या वेदना/ घसा लालभडक, कोरडा, आतून गडद काळपट, अस्तरासारखी वाढ/ आवंढा गिळल्याने दोन्ही कानांतून भयंकर वेदना/ जिभेवर पांढरट थर/ दोन्ही बाजूंना फोड/ शेंडा लालबुंद/ टॉन्सिल्स सुजलेल्या, घाण साचलेल्या/ स्तनग्रंथी दडस, घट्ट, सुजलेल्या, गाठीगाठीयुक्त/ स्तनाग्रावर चिरा/ त्यातून झोंबणारा स्त्राव/ स्तनांमध्ये गळवे, क्षते आणि छिद्रे/ स्नायू आंबलेले/ मनस्थिती उदासीन, अलिप्त/ रात्री वेदना वाढतात/ सिफिलीसचा पहिला चट्टा/ डोक्यात गजकर्ण/कोंडायुक्त चर्मरोग आणि क्षते.

पोडोफायलम (पोडो)

(पित्तकर प्रकृती, पोटाच्या तक्रारी)

पोट भरल्यासारखे वाटते आणि दुखते/ यकृत भाग दुखतो/ स्पर्श सहन होत नाही/ सकाळी हिरवे आंबूस वासाचे जुलाब, गळल्यासारखे होते, घेरी येते, जुलाबानंतर पोट रिकामे वाटते/ पोटात कधी जुलाबाआधी मुरडा जाणवतो/ जिभेवर पांढरा थर/ चव वाईट/ चिकट, लाल, पिवळे, पातळ जुलाब/ मातकट जुलाब/पांढरे जुलाब/ काविळीत लाळ जास्त सुटते/ आपण मरणार असे रोग्यास वाटते/ आपल्याला गंभीर आजार झाला आहे अशी भावना/ सकाळी डोके दुखते/ दुपारी फार झोप येते/ पहाटे 2 ते 4 या काळात लक्षणे वाढतात/ संध्याकाळी आणि शेकाने, उबेने बरे वाटते/ यकृत रोगात उपयुक्त/ डोके गरम/ उशीवर इकडून तिकडे रुग्ण डोके हलवीत राहतो/ कण्हणारे रोगी/ दंतोद्भवाच्या वेळी झोपेत दात खातो/ जुलाबाने जठराशी खड्डा पडल्यासारखे वाटते/ ओटीपोटातून सर्व काही खाली पडून जाणार असे वाटते/ गुदद्वाराची आगआग होते/ पित्त, मळमळ, घेरी,पित्ताच्या उलटया आणि जुलाब/ शौचास जाऊन आल्यानंतर घेरी/ प्रत्येक वेळी शौचास गेल्यावर ‘अंग बाहेर पडते’, तसेच शिंकणे, खोकला येणे, इत्यादींमुळेसुध्दा अंग बाहेर पडते.

पल्सेटिला (पल्से)

(विशेषत:स्त्रिया, हळवा स्वभाव, नाजूक, आकर्षक रूप)

गोरी, फिकट माणसे/ मवाळ माणसे/ श्लेष्मल त्वचेचा दाह/ हिरवट स्त्राव/ स्त्राव निरुपद्रवी, म्हणजे त्याने आग, करवडणे असे आणखी काही होत नाही/ नीला सुजतात/ रक्त साकळते/ डोळे, कान इत्यादींचा दाह, त्यातूनही निरुपद्रवी स्त्राव/ जोरदार वर जाणा-या वेदना/ कानात दडे बसतात/ ऐकू कमी येते/ लैंगिक इंद्रियांत सूज, दोन्ही लिंगांत / पाळीच्या तक्रारी, जड, दाबयुक्त वेदना, गर्भाशयात, कमरेत जणू दगड ठेवला आहे असे वाटते/ सांध्याच्या आवरणांचा दाह, सूज/ जीभ कोरडी/ त्यावर चिकट श्लेष्मा/ रक्त न येणारी मूळव्याध/ चिकट मळ/ रडकेपणा/ अति खाण्याचा, जड अन्नाचा त्रास/ सारखी थंडी वाजते, उबदार खोलीतसुध्दा/ वेदना चंचल/ लक्षणे बदलणारी/ तोंडात कोरडेपणा, पण तहान मात्र नसते/ कशालाच चव लागत नाही, जणू ती संवेदनाच जाते/ अति वेदना, कळा/ अस्वस्थ वाटते/ तडफडायला लावणा-या वेदना/ पाळी उशिरा येते, कमी स्त्राव/सौम्य, रडका स्वभाव/ किरकोळ कारणाने रडू येते, लक्षणे सांगतानासुध्दा रडे आवरत नाही/ डव्या बाजूवर झोपल्यावर छातीतील वेदना वाढतात.

हस टॉक्स

(सांधेदुखीचा आजार, ओलावा बाधतो)

त्वचेवर इसबसदृश पुरळ/ डोळयाच्या बाह्य अस्तराचा दाह/ तंतुमय किंवा अस्तर उती यांचा दाह/ संधिवात/ टायफॉईडमध्ये बडबड, गुंगी, नकळत जुलाब, चॉकलेटी रंगाचे, जीभ चिरलेली, टोकाला लाल त्रिकोण/ जंतुजन्य फोड, पुटकुळया, पूयुक्त लस वाहते/ पित्ताच्या गाठी अंगावर उठतात/ भिजणे, लचकणे, इत्यादींमुळे होणारा त्रास/ लक्षणे विश्रांती घेण्याच्या वेळी वाढतात/हालचालीने कमी होतात/ सारखे या कुशीवरून त्या कुशीवर वळावे अशी इच्छा होते पण त्याने वेदना होतात/ दमट हवेचा त्रास होतो/ तापात सकाळी घाम येऊन बरे वाटते/ ताप चढ-उतार होणारे असतात/ हृदयगत दोषामुळे डावा हात दुखतो/ हात पांघरुणाबाहेर काढताच खोकला येतो/ जिवणीच्या कोप-यात क्षते, पिकणारी/ गुप्तांगाभोवती क्षोभ, खाज/ मासिक स्त्रावाने स्त्रीचे बाह्य जननेंद्रिय दुखते (चावल्याप्रमाणे) हातापायात लुळेपणा किंवा धरल्यासारखे होते/ मुंग्या येणे आणि बधिरता/ शेकाने, गरम पाण्याने स्नान केल्याने बरे वाटते, विशेषत:’आखडलेल्या’ अवयवांना आराम मिळतो.

सेपिया

(वैतागलेल्या, थकलेल्या स्त्रिया, स्त्रियांचे जननेंद्रियाचे रोग, घरातल्या माणसांचा राग)

गर्भारपण, बाळंतपण, इत्यादी वेळचे आणि नंतरचे उपद्रव/ पचनसंस्था हळूहळू निकामी होते/ यकृत मंदावते/ पोटात जडपणा आणि दाब जाणवतो/ सकाळी मळमळ , खाल्ल्याने बरे वाटते/ यकृतात भरल्यासारखे, टोचल्यासारखे/ यकृतस्त्राव विकृत/ गर्भाशय दुखते/ ओटीपोटातील अवयव योनिमार्गातून बाहेर पडतील असे वाटते/ पाय एकावर एक टाकून बसण्याकडे प्रवृत्ती/ थोडा गडद काळपट स्त्राव मासिक पाळी येण्यापूर्वी होतो/कातडीवर लाल, करडे डाग/ पोपटी, पिवळा, मातकट चेहरा/ मऊ अवयव सूजयुक्त/ ओठांवर पुरळ/ जीभ कोरडी, पांढरट मुखदुर्गंधी/ गढूळ, मातकट लघवी, लालसर खर/ योनीमध्ये कोरडेपणा, स्पर्शाने दुखते/ न भरून येणारी क्षते/ अन्न पचन होताना छातीत धडधड/ त्रासिक आणि उदासीन कंटाळा/ अंगाची वेदना फार जाणवते/ अंगाची उष्णता जणू गरम पाणी पडले असावे अशी/ पण शारीरिक ऊब कमी पडते/ उबदार खोलीत थंडी वाजते/ नाकावर खोगिराच्या आकाराचे पिवळे डाग/ अंगावरून पाणी जाते-पिवळट दुधासारखे/ पूयुक्त दुर्गंधी/ करवडणारे स्त्राव/ दंश झाल्याप्रमाणे वेदना विविध ठिकाणी/ ओले झाल्याने घे-या येतात/ शेवटी नाक वाहू लागून सर्दी/ कोरडा खोकला/ जोरदार व्यायाम केल्यावर तात्कालिक बरे वाटते, पण पुन्हा सर्व त्रास सुरू होतात/ रात्रंदिवस हातापायात झटके जाणवतात, अस्वस्थता आणि तगमग जाणवते, रोगी सारखी हालचाल करतो/ जठरभागात ठोके जाणवतात/ पोट सुटलेल्या माता/ गर्भार्पणाच्या तक्रारीत पाळी दबली गेल्या कारणाने उद्भवणारी लक्षणे/ डाव्या बीजांड कोशामध्ये दाह, सूज, तणाव/ जाणारायेणारा ताप, ज्यात फक्त थंडी भरताना तहान लागते/ कंटाळा आणि औदासीन्य, विशेषत:कुटुंबासंबंधी बाबींमध्ये/ कामधंद्यातही स्वारस्य वाटत नाही.

सिलिशिया (सिलि)

(निराश, चिडखोर स्वभाव, कोरडी त्वचा, गौरवर्ण, ग्रंथीरोग, मोठे पोट, कमकुवत घोटे, संवेदनाश्रम माणसे, घाम खूप, थंडी फार वाजते, पण उकाडयाचाही त्रास होतो, पचन नीट नसल्याने कुपोषण, हाडांची वाढ नीट होत नाही)

मुडदुससारखे रोग/ जखमा पिकण्याकडे प्रवृत्ती/ टाळू भरत नाही/ पिवळा, दाट दुर्गंधीयुक्त स्त्राव वाहतो/ क्षते पडतात, त्यात टोचणारी वेदना/ आग होते/ घाम आंबट, दुर्गंधीयुक्त/घाम थांबवल्यामुळेही तक्रारी उद्भवतात/ रोग प्रतिबंधक लस टोचल्याने होणारा त्रास/ खूप तहान/ थंडी फार वाजते/ डोक्यावरचे आच्छादन काढल्यास त्रास होतो/ रोग जुनाट होण्याकडे प्रवृत्ती/ पाण्याची चव वाईट लागते/ पाळीच्या वेळी जास्त स्त्राव होतो/अंग गार पडते/ सारखी सर्दी होते/ कान फुटतात/ अश्रुग्रंथीस्त्राव वाढतो/ अशक्तपणा वाटून झोप येते/ अंग झडते/ मज्जातंतुगत थकवा/ गळवे होतात/ खोलवर जाणारी नळी तयार होऊन त्यातून पू/ हाडांचा दाह व कीड लागणे/ डोकेदुखी मानेत सुरू होऊन मस्तकावर येऊन उजव्या डोळयावर स्थिरावते/ रोज डोके दुखते/ वारा लागून डोके दुखते/ मळ अत्यंत दुर्गंधीयुक्त/ गुदद्वारातून बाहेर येऊन परत आत निघून जातो/ डोके मोठे होते/ कवटीच्या हाडात फटी/ टाळू न भरणे, मणका वाकडा होणे असे अस्थिगत रोग/ जखमा खोलावत जाण्याकडे प्रवृत्ती/पू पातळ/ सुजलेल्या स्तनग्रंथीला खाज/ एकाएकी पेशीजाल सुजणे/ वेदना आणि हुळहुळेपणा/ केसांत आणि नाकाच्या टोकावर पुरळ.

स्ट्रॅमोनियम (स्ट्रॅमो)

(मुले, युवक, इत्यादी रक्ताधिक्य असलेल्यांचे औषध, भ्रम उन्माद, आकडी येणे, कोरिया, अंगात येणे, मज्जातंतूंचा क्षीभि, त्याबरोबर भीती, निसटून जाण्याचा प्रयत्न, शरीरातून होणारे स्त्राव व उत्सर्जन बंद)

अंगावर लालभडक पुरळ/ डोळे वटारलेले/चेहरा सुजलेला/वेडसरपणा जाणवतो/भीती दिसते/ तोंडातून लाळ गळते/ घसा कोरडा/ आकडी येते/ हातापायाची, शरीराची सारखी हालचाल/ पाण्याची भीती/ चमकणारी, डोळे दिपवणारी वस्तू दिसताच लक्षणे उद्भवतात/ आलटून पालटून अत्यानंद आणि दु:खीपणा/ अंधार एकटेपण, चमकणा-या वस्तू, स्पर्श, गिळण्याचा प्रयत्न हे सहन होत नाही/ गोवर, कांजण्यासारख्या रोगांत उठू लागणारे पुरळ/ दबल्यास अनेक लक्षणे उद्भवतात/ डांग्या खोकला/ नुकतेच जागे झालेले मूल दिसेल त्या वस्तूला घाबरते/ निसटून जाण्याचा प्रयत्न करते/ थंडी भरते तेव्हा डोके गरम/ पांघरूण हवे असते/ लाल चेहरा/गार पाय/हातपाय थरथरतात/ अवयव शरीरावेगळे झाल्याचा भास/ जागृत व शुध्दीत असतो, पण अंग कडक/ बहुतेक रोगावस्था वेदनाविरहित असतात/ बेहोशीत घोरण्याचे आवाज/ फार घाम/ लघवी गढूळ, किरमिजी, जाड लघवी/ प्रमाण अतिशय कमी/ दूध जास्त प्रमाणात येते/ झटक्यामुळे डोके उशीवरून वर उचलले जाते/ मासिक पाळीचा स्त्राव खूप/ रक्ताच्या गाठी जातात.

सल्फर

(काटकुळी, क्षयी प्रकृती, प्रकृतीत खूप बदल घडवून आणण्याची क्षमता, खूप विकार उद्भवतात, पण मुख्यत:परिणाम चर्मरोग होण्यात होतो)

खाज सुटते/ खाजवल्याने खूप बरे वाटते/फोड, पुळया, पुरळ असे उभारणारे चर्मरोग/ मूळव्याध/ ग्रंथी सुजतात, पिकतात/ डोळे . फुप्फुसे, मूत्रवाहक नलिका, गुदाशय, इत्यादी ठिकाणी लक्षणे/ दाह आणि सूज/ फिकट किंवा लालसर चेहरा/ किरकोळ जखमा पिकतात/ फोड, पुटकुळया येतात/ कातडीला घडी पडते तेथे पुरळ/ कातडी चिडते, क्षते पडतात, त्यातून रक्तस्राव, दुर्गंधी/ छातीत धडधडते, काळजी वाटते, नाडी जोरात आणि जलद चालते/ अंग झडते/ थरकाप होतो/ खांदे पडलेले, पोक काढून चालतो/ झटक्यात भूक लागते, शक्तिहीनता येते/ रात्री पुन्हा पुन्हा जाग/ सकाळी थकवा/ फार गार, कोरडी पावले, कधीकधी पायाची आत्यंतिक आग, डोक्याच्या वर टाळूची आग/ उभे राहणे ही सर्वात कठीण अवस्था वाटते/ उष्णता, ऊब आणि आंघोळ यांचा त्रास होतो/ पहाटे जोरात शौचास लागते, धावत- पळत संडास गाठावा लागतो/ उत्सर्जन मार्गाचा तेथून होणा-या स्त्रावांमुळेच दाह, योनिमार्गात इतकी आग की, स्थिर राहणे कठीण/ अंथरुणात गुदमरायला होते/ खिडक्या-दारे उघडी हवी असतात/ तळपाय उघडे टाकायला हवे असतात/ छातीत अशक्तपणा जाणवतो, विशेषत:आडवे पडल्यानंतर, संध्याकाळी/ खाज येणारा भाग खाजवीतच आणि रात्री मात्र जाग/ काळजीपूर्वक शोधलेली औषधे लागू पडत नाहीत/ चिडखोरपणा/ भांडकुदळपणा आणि विलक्षण भास/ सकाळी कपाळ दुखते/ आकडी, मिरगी, फेफरे यांचे कारण सापडत नाही/ अतिशय भूक लागते/ वीर्यपात होऊन चिडचिडेपणा वाढतो/ लघवीत यीस्ट जाते/ तरूण मुलींमधे दृष्टिमांद्य/ अशक्तपणा/ भूक न लागणे/ बध्दकोष्ठ होणे/ कडक कोरडे, घट्टे पडलेले हात/ जीवघेण्या वेदना/ वेदना गुदाशयाकडे जातात/ सकाळी काहीही खाववत नाही.

थूजा

(काळी-सावळी, घट्टमुट्ट माणसे, मस आणि चामखिळी, फणसासारखी खरबरीत कातडी)

त्वचा आणि श्लेष्मल त्वचा येथून करवडणारे स्त्राव/ घामाचे तेलकट, पिवळट डाग कपडयावर पडतात/ एकंदर ‘नको ती वाढ’ शरीरावर होते/ भडक, पिवळी विष्ठा/ जीभ सुजलेली, टोक लालभडक आणि हुळहुळेपणा/ खाल्ल्याने खोकला येतो/ ऊब व मोकळी हवा याने एकंदरच बरे वाटते/ सर्व प्रकारच्या प्रमेह रोगात पिवळे, हिरवे, जाड स्त्राव/ पोटात जिवंत प्राणी आहे अशी ठाम भावना/ जुलाब आणि आवाज होऊन वारा सरतो/ पोटात गडगडते/ शरीराच्या वरच्या भागातील स्नायू उडतात/ हातपाय आणि सांधे यांत दंशसदृश वेदना/ हातापायांत मुंग्या आणि बधिरता/ हालचाल नकोशी वाटते/ शरीरात एका बाजूकडील तक्रारी/ उघडया भागावर घाम, कपडे असलेला भाग कोरडा/ अंथरुणाच्या उबेने त्रास वाढतात/ बोटाच्या टोकांना आलेली सूज आणि लाली/ गुदद्वारापाशी भगेंद्र/ जिभेखाली जलग्रंथी वृध्दी/ पुन्हा-पुन्हा शौचास लागून पोट दुखते.

कोलोसिंथ

(रागीट, चिडखोरपणा, आक्रस्ताळी)

पोटात प्रचंड कळ/पोट दुमडून रोगी खाली वाकतो/तगमग, सारखे या कुशीवरून त्या कुशीवर वळणे/ दुखणे दबल्यावर बरे वाटते/ खाल्ल्यामुळे दु:ख अजून वाढते/ उलटया/ जुलाब/ डाव्या बाजूला डोके वळवल्यास चक्कर येते, मांडीतून कळ येते/ सायटिका/ संपूर्ण पायभर चमका निघतात/ डाव्या बाजूला जास्त त्रास.

कोलोसिंथ

डायस्कोरिया
(पचनशक्ती क्षीण, तरुण किंवा म्हातारे)

जेवल्यावर पोट फुगते/ विशेषत:जास्त चहा पिणा-यांचे आजार/ पोटात भयंकर दुखते/ मागे झुकल्यामुळे बरे वाटते/ निश्चित वेळाने येणा-या कळा, आतडी कुणी जोरात पिळत आहेत असे वाटते/ स्वप्नदोष/ नखुरडी होण्याची सवय.

कोलोसिंथ

मॅग्नेशियम फॉस्फोरिकम (मॅग फॉस)
(किरकोळ, बारकुडी तब्येत, निराशा, काळसर त्वचा)

उजव्या बाजूंची दुखणी/ कापल्याप्रमाणे होणा-या तीव्र वेदना येतात आणि जातात.

कोलोसिंथ

हिमॅमेलीस व्हर्जिनिका
शरीराच्या सर्व मुखांमधून रक्तस्राव, जखमांमधून रक्तस्राव, टोचणा-या वेदना, थंडी बाधते, अंगावर कायम शिरशिरी/ हळवे शरीर सांधेदुखी- हाडातील व स्नायूतील/ जुन्या जखमांचे परिणाम/ डोळयाला जखमेमुळे सूज/ नाकातून रक्त, मोठा रक्तस्राव- परंतु त्यामुळे डोकेदुखी कमी पडते/ खोकल्यातूनही रक्त पडते, रक्ती मूळव्याध/ खूप रक्त पडते/ काळसर रक्त/ पोटाला हात लाववत नाही/ सर्व दुखणी मासिक पाळीत वाढतात/ रक्तस्रावांमुळे होणारे सर्व विकार.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.