Health Friends Icon आरोग्यमित्र आरोग्य सेवा
छोटी सुरुवात

कोठलीही गोष्ट आपल्यापासून आणि लहान प्रमाणात सुरू करा. एकदम मोठा प्रश्न हाती घेऊ नका. अपयश आल्यावर निराशा येऊ शकते. छोटया छोटया कामांत यश मिळाले की पुढची कामे करायला आत्मविश्वास वाढतो. लोकांनाही प्रचीती येते . क्षयरोगाचा एखादा पेशंट खडखडीत बरा झाला की क्षयरोगाचे इतरही रुग्ण तुमच्याकडे येतील . एखादी गोष्ट यशस्वी झाली की आपोआप ती पसरते

जुन्या गोष्टी आणि परंपरांबद्दल एकदम अनादर दाखवू नका, पण चिकित्सक असा. सर्वच परंपरा चूक असतात असे नाही. त्यांचे स्वत:चे मोल असू शकते. उदा. एखादे अन्न ‘गरम’ पडते की ‘थंड’ याबद्दल लोकांच्या ठाम कल्पना असतात. आयुर्वेद अशा कल्पना उचलून धरतो. तुमच्या दृष्टीने त्यांना महत्त्व नसेल. पण त्या एकदम चूक आहेत असे म्हणणे आणि धिक्कार करणे गैर आहे. लोकांचे ऐकून घ्या , विचार करा, गैरसमज असेल तर हळुवारपणे त्या कल्पनांचा निरास करा.

जगन्नाथाचा रथ

समाजाचे आरोग्य सुधारणे हे म्हटले तर फार मोठे काम आहे. एकटयाचे काम तर ते नाहीच. सगळे त्यात सामील झाले तरच हे काम होईल. एकटयाने काम पार पाडायची सवय चांगली खरी; पण या कामात त्याचा फार उपयोग होणार नाही हे लक्षात ठेवा. एखाद्याला तपासणे किंवा औषधगोळया देणे हे तसे वैद्यकीय स्वरूपाचे काम आहे. पण केवळ तेवढाच आपला उद्देश नाही हे लक्षात घ्यायला हवे.

गावातली स्वच्छता, पाणीयोजना, आरोग्यशिक्षण वगैरे गोष्टी सामूहिक प्रयत्नानेच होऊ शकतात.

रोगप्रतिबंधाकडे लक्ष

Attention Immunization आजा-याला औषधगोळी देणे एवढेच आपले काम नाही. शक्यतो रोग टळावेत यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अनेक आजार सामाजिक पातळीवर टाळण्याचा प्रयत्न करता येतो. उदा. गावात डास फार होत असतील किंवा जंत फार असतील तर प्रतिबंधक उपाय म्हणून परिसर स्वच्छता आवश्यक आहे. अशा वेळी नुसत्या आजाराचा विचार करून चालत नाही. शिवाय सर्वच समस्या टाळणे सोपे नसते. पण जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करा. उद्याचा विचार आज करून ठेवा.

समाज जीवनाची जटिलता

काही समस्या अगदी सोप्या असतात. उदा. विंचू चावल्यावर एखादे औषध लावणे. पण अनेक समस्या जटिल असतात. कुपोषण, वंध्यत्व, क्षयरोग इ. प्रश्न नुसते आरोग्याचे नसतात. त्यात समाजाची मानसिकता, आर्थिक परिस्थिती , शिक्षण, राहणीमान वगैरे इतर प्रश्नही गुंतलेले असतात. कित्येक वेळा समोरची व्यक्ती त्यात असहाय्य असते. हे सर्व समजावून घेऊ या. आपल्या दृष्टीने सोपी असलेली समस्या इतरांना सोपी असेलच असे नाही.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.