bonecells iconअस्थिसंस्थेचे आजार
अस्थिभंग (हाड मोडणे, फ्रॅक्चर)

हाड हा मुळात कठीण आणि मजबूत पदार्थ आहे. उतारवयात, काही आजारात, आणि चुन्याच्या अभावामुळे मात्र हाड नाजूक आणि ठिसूळ होऊन एवढया तेवढया कारणाने मोडते. अपघातामध्ये वेडावाकडा मार लागून हाडे मोडण्याचा संभव असतो. हाड मोडणे म्हणजेच ‘अस्थिभंग’. अस्थिभंगाचे विविध प्रकार आहेत.

  • लहान मुलांची हाडे लवचीक असतात. त्यामुळे ती पूर्ण न मोडता हिरवट फांद्याप्रमाणे केवळ एक बाजूला मोडतात. पूर्ण ताटातूट न झाल्यामुळे तुकडे एकमेकांबरोबर राहतात. असा अस्थिभंग केवळ क्ष-किरणांनी दिसतो व लवकर जुळून येतो. नंतरच्या वयात मात्र हाडे कडक असतात आणि वाळलेल्या काठीप्रमाणे काडकन तुकडे होतात.
  • काहीवेळा ज्या अस्थिभंगामध्ये त्वचेला जखम न होता अस्थिभंग आतल्या आत राहतो. याला केवळ अस्थिभंग असे म्हणावे. ज्यामध्ये हाड तर मोडतेच पण वरच्या त्वचेला व मऊ भागांनाही जखम होते अशा अस्थिभंगास अवघड किंवा वाईट अस्थिभंग असे म्हणावे. हा अवघड अशासाठी, की जखमेत सूक्ष्मजंतू मिसळून पू होणे, सूज येणे, ताप येणे, जखम चरत जाणे वगैरे समस्या निर्माण होतात.
  • ज्या अस्थिभंगात हाडाचे तुकडे खूप होतात त्याला चुरा अस्थिभंग म्हणावे.
अस्थिभंगाची लक्षणे व निदान
  • वेदना – अस्थिभंगामुळे असह्य वेदना होते. ही वेदना अस्थिभंगाच्या जागी होते. वेदनेच्या जागेवरून अस्थिभंग कोठे आहे हे शोधता येते. हालचालीने वेदना वाढते.
  • हालचालीवर बंधने – अस्थिभंगामुळे त्या भागाची हालचाल कमी होते किंवा बंद पडते. हाड तुटल्यामुळे पुढची हालचाल होत नाही. हालचालीमुळे वेदना होत असल्याने ती व्यक्ती तो भाग हालवायला तयार नसते.
  • त्या भागाचा आकार नेहमीपेक्षा वेगळा विचित्र दिसणे – अस्थिभंग होऊन हाडाचे तुकडे वेगवेगळे झाले असतील तर त्या भागाचा आकार नेहमीपेक्षा वेगळा दिसतो. सूज जास्त असेल तर मात्र हा विचित्र आकार लपून जातो.
  • सूज – अस्थिभंगाने अंतर्गत रक्तस्राव होतो. त्यामुळे तो भाग सुजतो.
  • आवाज – अस्थिभंगाच्या जागी हाताने थोडे दाबून पाहिल्यास हाडांचे तुकडे एकमेकांवर घासल्याचा (कडकड वाजल्याचा ) अनुभव येईल.

वेदना, सूज, हालचालींवर बंधन, वेगळा आकार व टोके घासल्याचा आवाज यावरून अस्थिभंगाचे निदान बहुतेक वेळा खात्रीने करता येते. क्ष-किरण चित्रात अधिक माहिती मिळते. अस्थिभंगाची जागा, प्रकार, एकूण नुकसान, तुकडे कोठे आहेत हे सर्व क्ष-किरण चित्रात स्पष्ट कळून येतात. विशिष्ट अस्थिभंग (उदा. कवटी, हाताची बोटे, पाऊल, इ.) नुसत्या तपासणीवरून खात्रीपूर्वक सांगता येत नाही, पण क्ष-किरण चित्रात हे स्पष्ट होते.

अस्थिभंगावर उपचार केल्यानंतरही क्ष किरण चित्र काढून हाडे नीट बसली आहेत की नाही, ते कळते.

उपचार – प्रथमोपचार

हाड किंवा सांधा यांना इजा झाल्यावर काही वैदू किंवा हाडवैद्य लोक चोळून देतात. ही पध्दत घातक असून त्यामुळे रक्तस्राव वाढतो व जास्त नुकसान होते. चोळण्यामुळे फायदा काही नसतो.

अस्थिभंग झालेला अवयव (हात, पाय किंवा बोटे, इ.) हालचाल न करता स्थिर ठेवणे हे महत्त्वाचे असते. याने खूप फायदे होतात. एक म्हणजे वेदना थांबते. दुसरे म्हणजे हाडांच्या तुकडयांच्या हालचालीने तिथल्या शिरा, नसा, स्नायू किंवा इतर भाग यांचे नुकसान होण्याचे टळते. तिसरे म्हणजे रक्त गोठण्याची प्रक्रिया लवकर होऊन पुढील रक्तस्राव थांबतो. हालचाल थांबवण्याची पध्दत अस्थिभंगाच्या जागेवर अवलंबून असते हे आपण प्रत्येक प्रकारामध्ये वेगळे पाहू या.

दुसरा प्रथमोपचार म्हणजे अस्वस्थता, भीती, वेदना कमी करण्यासाठी गुंगीचे औषध देणे. अफूपासून तयार केलेले मॉर्फिनचे इंजेक्शन यावर वेदनाशामक म्हणून चांगले असते. मात्र हे इंजेक्शन डॉक्टरांकडेच उपलब्ध असते. तेथे जाईपर्यंत उशीर लागणार असेल तर वेदनाशामक गोळी द्यावी.

रुग्णालयातले उपचार

bone plaster तुटलेले तुकडे एकमेकांशी जुळवून स्थिर ठेवणे हे अस्थिभंगाच्या उपचाराचे मुख्य सूत्र आहे. खिळे, पट्टया, सळया, प्लॅस्टर हे सर्व याचसाठी असते. हाड जुळायला साधारणपणे सहा आठवडे लागतात.

रुग्णालयात क्ष-किरण तपासणी करून, तात्पुरती भूल देऊन हाडे बाहेरून किंवा ऑपरेशन करून बसवतात. काही हाडे खिळे व पट्टी मारून बसवता येतात. याला नंतर प्लॅस्टर करावे लागत नाही. काही अस्थिभंगासाठी हाडे जुळवून प्लॅस्टर करतात. प्लॅस्टरमुळे ठेवलेल्या अवस्थेत हाडे स्थिर राहून सांधली जातात. काही ठिकाणी प्लॅस्टर घालणेही शक्य नसते. यासाठी लांब पट्टया किंवा सळया लावून हाडे स्थिर ठेवली जातात.

अस्थिभंगामुळे काहीवेळा आत असलेल्या अवयवांनाही धक्का लागतो. उदा. कवटीला मार बसल्यावर मेंदूला इजा होणे, छातीच्या फासळया तुटल्यावर फुप्फुसांना इजा होणे, कंबरेच्या हाडांबरोबर लघवीची पिशवी फुटणे, इ. त्या त्या अवयवाच्या हानीप्रमाणे निदान व इलाज करावा लागतो.

अस्थिभंगामुळे झालेल्या तुकडयांमध्ये रक्तवाहिनी किंवा चेतारज्जू (नस) दाबली गेल्यास पुढील संबंधित भागात नाडी न लागणे किंवा बधिरता वा लुळेपणा जाणवण्याची शक्यता असते. अशा वेळी ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक असते. दंडाच्या अस्थिभंगासाठी हे विशेष महत्त्वाचे आहे.

ग्रामीण भागात हाडवैद्य आढळतात. काहीजण थोडयाफार माहितीवर उपचार करतात. ब-याच वेळा त्यांचा गुण येतो. काही वेळा नुकसानही होते. ही कला तपासून त्यात कायकाय सुधारणा करता येतील हे पाहणे महत्त्वाचे आहे. पण नुसते हाड जुळणे हे महत्त्वाचे नाही. ते नीट जुळणे व अवयवाचे कामकाज ठीक होणे महत्त्वाचे आहे. काही अस्थिभंग गावपातळीवर दुरुस्त होणे अवघड आहे हे सांगायला पाहिजे.

निरनिराळे अस्थिभंग

various fracture उतारवयातील मनगटाजवळचा अस्थिभंग, गळपट्टीचा अस्थिभंग, बरगडीचा अस्थिभंग, पायाची बोटे, इत्यादींचे अस्थिभंग उपचार करायला त्या मानाने सोपे असतात. कारण यात हाडांची जुळणी अगदी अचूक झाली नाही तरी चालते. या अस्थिभंगात फार विकृती येत नाही. तरीही अस्थितज्ञास दाखवावे.

कोपरापासून मनगटापर्यंत आणि गुडघ्यापासून घोटयापर्यंत दुनळी हाडे असतात. त्यांपैकी नुसते एक तुटले तर दुस-या हाडाच्या बरोबर ते सरळ राहते व तुकडे एकमेकांसमोर नीट राहतात. म्हणून दुनळीपैकी एका हाडाचे अस्थिभंग उपचारास सोपे असतात. दुनळीपैकी दोन्ही हाडे तुटली असतील तर उपचार गुंतागुंतीचे असतात.

कवटी, दंड, मांडी, कंबर,मणके, हाताची बोटे, हाताचा तळवा, मनगट, खांदा, खुबा, , इत्यादी जागचे अस्थिभंग उपचार करायला अवघड असतात; कारण तुटलेले तुकडे एकत्र ठेवणे अवघड असते. म्हणून या प्रकारांसाठी ताबडतोब तज्ज्ञाकडे जाणे आवश्यक आहे.

काही महत्त्वाचे अस्थिभंग

कवटी फुटणे

skull burst अपघातात किंवा मारामारीत काही वेळा डोक्याला खोक पडते. मात्र कवटी क्वचित फुटते. फुटलेला भाग हाताच्या बोटाने दाबून ‘दबल्यामुळे’ कळतो. कधीकधी या हाडाचे तुकडे जखमेत पसरतात किंवा आतला मेंदूही दिसतो. कवटीला मार लागला आहे असे वाटत असेल तर ताबडतोब रुग्णालयात नेणे आवश्यक आहे.

खांद्याचे आडवे हाड तुटणे

shoulder bone break पडताना ब-याच वेळा आधारासाठी हात जमिनीवर येतो. या हातावर शरीराचा भार एकदम आल्यामुळे खांद्याचे (गळपट्टीचे) आडवे हाड तुटते. हा अस्थिभंग समजायला व उपचार करायला सर्वात सोपा आहे. ज्या ठिकाणी हाड मोडले आहे तेथे सूज व दुखरेपणा येतो व टोके एकमेकांपासून अलग दिसतात. हात उचलता येत नाही.

याला सुमारे तीन-चार आठवडे कडबोळे पध्दतीने पट्टी किंवा कपडा बांधून ताण दिला,

जबडयाचे हाड तुटणे

खालचा किंवा वरचा जबडा तुटणे हे बहुधा अपघातातच होते. दातांची खालची व वरची ओळ (दंतरेषा) तपासून त्यात काही खाली-वर बदल दिसतो का ते पहा. यातून अस्थिभंग कळून येतो. हे अस्थिभंग त्रासदायक असतात. तारेने हाडाचे तुकडे एकत्र बांधून यावर उपचार केला जातो. यानंतर सहा आठवडे द्रवपदार्थावरच राहावे लागते आणि बोलता येत नाही.

दंडाचे हाड

shoulder bones दंडाचे हाड बहुधा खालच्या बाजूला मोडते. हाडाचे दोन तुकडे झाले असतील तर त्यांची टोके वेगवेगळी होतात. यामुळे दंडाचा आकार विचित्र दिसतो. या अस्थिभंगाचा विशेष धोका म्हणजे हाताची मुख्य रक्तवाहिनी कधीकधी यात अडकते. असे झाले तर रक्तप्रवाह बंद पडून अर्ध्या पाऊण तासात संपूर्ण हात कायमचा निर्जीव होतो. म्हणून या अस्थिभंगात मनगटाजवळची नाडी चालू आहे किंवा नाही हे तपासणे आवश्यक आहे. प्रथमोपचार करून पट्टीने गळयात अडकवणे अस्थिरोग तज्ञाकडून दंड व कोपर यांच्यासाठी प्लास्टरची पन्हळ करून पट्टीने गळयात अडकवणे हाच यावर चांगला उपाय आहे.

हाताची दुनळी हाडे

दुनळीपैकी एक किंवा दोन्ही हाडे मोडू शकतात. दुनळीचे वरचे टोक, खालचे टोक किंवा मध्ये कुठेही अस्थिभंग होऊ शकतो. यांपैकी एक हाड मध्ये मोडले असेल तर दुस-या हाडाचा आयता आधार असल्यामुळे फार अलग होत नाहीत. उपचारात याचा फायदा होतो. दोन्ही हाडे मोडल्यास मात्र उपचार करणे जास्त अवघड होते.

खुब्याचा अस्थिभंग
joint fracture
russian bone treatment

वृध्दापकाळात हाडे ठिसूळ झालेली असतात. थोडयाशा मारानेही ती मोडतात. खुबा म्हणजे मांडीचे हाड कमरेच्या हाडात गुंतवलेला उखळी सांधा. यातील मांडीच्या हाडाला एक तिरपे टोक व त्यावर चेंडूसारखा भाग असतो. या सांध्यावर जाड पडदे असतात (सांधेकोश). मांडीच्या हाडाचा हा फांदीसारखा भाग सांध्यात किंवा सांध्याबाहेर तुटतो. अगदी किरकोळ कारण -घसरणे याला पुरते. कधीकधी पुरेसे कारण नसतानाही हा भाग तुटतो. हा अस्थिभंग झाला असेल तर उताण्या अवस्थेत मोडलेल्या बाजूचे पाऊल पूर्ण बाहेर किंवा अर्धवट तिरके पडून राहते. त्या पायाची हालचाल होऊ शकत नाही.

यामुळे रुग्ण पूर्णपणे अंथरुणाला खिळून जातो. उठून बसणे, कुशीवर वळणे एवढया साध्या शारीरिक हालचालीही रुग्ण करू शकत नाही. अंथरुणावर टेकलेले भाग सडून तिथे व्रण तयार होतात. हळूहळू त्यातून सर्व शरीरातच जंतुदोषाची लागण होते. पडून राहिल्याने श्वसनसंस्था, पचनसंस्था, इत्यादींमध्ये अनेक आजार निर्माण होतात. विशेष धोका म्हणजे श्वसनसंस्थेत न्यूमोनिया होतो. पूर्वी हा अस्थिभंग झाल्यावर चार-सहा महिन्यांत मृत्यू येण्याची उदाहरणे अगदी सर्रास होती. ग्रामीण भागात अजूनही अशी काही स्थिती आहेच. या अस्थिभंगावर आता मात्र अगदी चांगल्या शस्त्रक्रिया होतात.

रुग्णाची शारीरिक परिस्थिती ठीक असेल तर शस्त्रक्रियेने दोन-चार दिवसांतच रुग्ण हालचाल करू शकतो, पायावर भार देऊ शकतो. या शस्त्रक्रियेने रुग्ण जवळजवळ पहिल्यासारखा कार्यक्षम होतो. या शस्त्रक्रियेत अस्थिभंग झाल्यानंतर तो नैसर्गिक पध्दतीने जुळण्याची वाट न पाहता तुटलेला भाग खिळे, पट्टी, इत्यादींच्या साहाय्याने जोडला जातो. आवश्यक तर हाडाचे चेंडूसारखे टोक काढून तिथे कृत्रिम भाग बसवला जातो. यामुळे दोन चार दिवसांत खुब्याचे काम पहिल्यासारखे होते. अगदी ऐंशीतल्या वयाच्या वृध्दांनाही याचा चांगला उपयोग होतो.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.