Child Health Icon मुलांचे आजार बालकुपोषण
माती खाणे

ही तक्रार मुख्यत: लहान मुलांमध्ये, पण कधीकधी मोठया वयातही आढळते. (विशेषत: गरोदरपणी अनेक स्त्रियांची ही तक्रार असते.) यात माती, भिंतीचा रंग, राख, चुना, खडू, पेन्सिल, इत्यादी एरवी ‘अखाद्य’ असे अनेक पदार्थ येतात. माती खाण्याची तक्रार उद्भवण्याची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे-

  • आहारात लोहक्षाराची कमतरता.
  • दीर्घकाळ निव्वळ स्तनपान व बाळास वरचे अन्न वेळेवर सुरू न करणे.
  • कुठल्याही कारणाने आलेली रक्तपांढरी.
  • काही मानसिक कारण – उदा. दुर्लक्ष झाल्याची भावना मनात बळावणे.

माती खाणे हा विकार सहा ते सात महिन्यांनंतरच्या मुलांमध्ये दिसते. वयाच्या दोन वर्षापुढेही माती खाणे टिकल्यास तपासणी करून घ्यावी.

उपचार

आहारात लोहक्षार व चुनायुक्त पदार्थ असावेत. (पाहा पोषणावरचे प्रकरण) , कॅल्शियम, मुलाला लोहक्षाराच्या गोळया किंवा औषध द्यावे.

माती खाणा-या मुलांना जंतविकार होतो. त्यामुळे त्याला जंताचे औषध द्यावे. रंग़ीत द्रव्ये (उदा. भिंतीचा रंग), इत्यादी पोटात गेल्याने होणारे आजार होऊ शकतात. यासाठी डॉक्टरकडे पाठवावे.

आयुर्वेद

माती खाण्यावर एक उपाय याप्रमाणे : चांगली सोनकाव 15 ग्रॅम + दीड चमचा तूप हे मिश्रण लोखंडी तव्यावर परतून घ्यावे. परतल्यावर हे मिश्रण ठिसूळ बनते. ह्या मिश्रणाच्या मुगाएवढया गोळया तयार करून घ्या. या गोळया मुलांना सकाळी सायंकाळी एकेक अशा तीन आठवडे रोज द्याव्यात. याबरोबर चिमूटभर त्रिफळा चूर्णही द्यावे. या उपायांनी मुलांचे माती खाणे थांबते.

तापाचे झटके

Fever Shocks काही मुलांना तापाबरोबर झटके येतात, डोळे फिरवणे, मुठी आवळणे, इत्यादी लक्षणे दिसतात. या झटक्यांना घाबरून जाऊ नका. मुलाला ताबडतोब कोमट पाण्याने ताप उतरवल्यास झटके थांबतात. याबरोबर पॅमालची गोळी किंवा औषधही द्यावे. मात्र तापाचे कारण काय आहे, हे निश्चित करून उपचार करणे आवश्यक आहे.

ताप (लहान मुलांसाठी) (तक्ता (Table) पहा)

न्यूमोनिया गटातील आजार

Baby Checking न्यूमोनिया हा खालच्या म्हणजे अंतर्गत श्वसनसंस्थेचा – वायुकोशाचा दाह आहे. हा दाह जिवाणू, विषाणू, यामुळे होतो. याशिवाय विषारी हवा (उदा. रॉकेलच्या वाफा) उलटीतून आलेले द्रवपदार्थ श्वसनसंस्थेत घुसणे, इत्यादी कारणांपैकी कशानेही न्यूमोनिया होऊ शकतो.

बाळाचा जन्म होताना काही बाळांच्या बाबतीत गर्भजल किंवा रक्त बाळाच्या श्वसनसंस्थेत ओढले जाऊ शकते. तिथे नंतर जंतुदोष होतो.

एकूण न्यूमोनियाचे मुख्य कारण म्हणजे जंतुदोष होय. जंतुदोषामुळे वायुकोशाचा दाह होऊन त्यास सूज येते. यामुळे तिथले कामकाज बंद पडते. न्यूमोनिया बहुधा एका बाजूच्या फुप्फुसाच्या काही भागातच होतो. (पण तो दोन्ही बाजूंनाही होऊ शकतो) दाह व सूज यांमुळे या भागात वेदना असते. पण लहान मुले ही वेदना सांगू शकत नाहीत. श्वसनसंस्थेचा काही भाग तात्पुरता निकामी झाल्यामुळे इतर भागावर श्वसनाची जास्त जबाबदारी येते. त्यामुळे दम लागतो.

बाल न्यूमोनिया

या आजाराने खूप बाळे दगावतात. बालन्यूमोनिया हा फुप्फुसाच्या एका भागात जंतुदोष झाल्याने होणारा आजार आहे. यात खोकला, ताप, दम लागणे ही मुख्य लक्षणे असतात. लोकभाषेत याला डबा, पोटात येणे अशीही नावे आहेत. बालन्यूमोनियाचे मृत्यू जंतुविरोधी औषध दिल्याने टळतात.

हा आजार सहसा पाच वर्षाखालील मुलांमध्ये होतो पण त्यातही विशेष करून पहिल्या दोन वर्षात याचे प्रमाण जास्त असते. मूल कुपोषित असेल तर हा आजार होण्याचा धोका आणि मृत्यूची शक्यताही जास्त असते. गोवराच्या तापानंतर हा आजार होण्याची शक्यताही असते. अपु-या दिवसांच्या किंवा अशक्त मुलांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते. हा आजार साथीचा नसतो. पण थंडी-पावसात या आजाराचे प्रमाण जास्त असते.

रोगनिदान

या आजाराची मुख्य लक्षणे म्हणजे खोकला, ताप व दम लागणे.

नुसता ताप, खोकला (पण दम नाही) असेल तर त्याला बालन्यूमोनिया न म्हणता ताप-खोकला म्हणतात. असे साधे आजार शक्यतो बाह्य श्वसनसंस्थेत (नाक, घसा,) किंवा श्वासनलिकेत जंतुदोष झाल्यामुळे होतात.

ताप, खोकला, दम लागणे या तीन लक्षण-चिन्हांवरून बालन्यूमोनियाचे निदान होऊ शकते. बालन्यूमोनिया सौम्य आहे की गंभीर हे आपण ओळखायला शिकू शकतो. सौम्य आजार असेल तर गावात तुम्ही उपचार करू शकाल. तीव्र आजार असेल तर रुग्णालयात पाठवायला पाहिजे. योग्य उपचाराने मूल वाचू शकते.

दम लागण्याची तपासणी
  • बाळ दर मिनिटास किती वेळा श्वास घेते, हे मोजून दम लागला आहे की नाही ते ठरते.
  • दोन महिन्यांपेक्षा लहान बाळ असेल तर श्वसनगती मिनिटास 60 पेक्षा जास्त असल्यास दोष समजावा.1 वर्षापर्यंतचे बाळ असेल तर मिनिटास 50 पेक्षा जास्त श्वसनगती असल्यास दोष समजावा.

6 महिने ते 1 वर्षापेक्षा मोठया मुलांमध्ये मिनिटाला 40 पेक्षा अधिक श्वसन गती असेल तर दोष समजावा. हे तुम्हाला घडयाळाच्या सेकंद काटयाबरोबर छातीची हालचाल मोजून कळू शकते. यासाठी पूर्ण मिनिटभर श्वसन मोजा. श्वसनाची गती बरीच अनियमित असल्याने पूर्ण मिनिट मोजावेच लागते.

या बरोबरच नाकपुडया फुललेल्या दिसतात, त्वचा, जीभ, ओठ यांवर थोडी निळसर झाक असते. अशा बाळाच्या रक्तात प्राणवायू कमी, कार्बनवायू जास्त म्हणून असे होते.

बालन्यूमोनिया सौम्य आहे की गंभीर ?

ताप, खोकला, दम लागणे या झाल्या न्यूमोनियाबद्दल प्राथमिक गोष्टी. याव्यतिरिक्त खालीलपैकी एखादीही खूण असेल तर आजार जास्त आहे हे निश्चित.

  • श्वास आत घेताना खालची बरगडी आत ओढली जाणे. यासाठी बाळाचा कपडा वर करून पोट-छाती पाहा.
  • श्वास आत घेताना बाळ कण्हत असल्यास.
  • श्वास बाहेर सोडताना शिटीसारखा आवाज येणे.
  • झटके (बाळाचे सौम्य झटके ओळखायला आपल्याला शिकायला पाहिजे).
  • बाळाने अंगावरचे दूध न ओढणे.
  • पोट डांबरलेले असणे/ फुगून येणे.
  • बाळ सतत झोपणे, लवकर जागे न होणे, जागे झाले तर लगेच झोपणे.
  • मूल आधीच कुपोषित असेल तर धोका जास्त असतो.
  • शरीराचे तपमान नेहमीपेक्षा कमी होणे. (बाळाचे अंग गार पडणे) हा बाळ गार पडण्याचा प्रकार दोन महिन्यांपेक्षा लहान मुलात होऊ शकतो, हा तापाच्या उलट आणि धोकादायक प्रकार आहे हे लक्षात घ्या.
उपचार

पेनिसिलीन गटातले औषध किंवा ऍमॉक्सी ताबडतोब सुरू करावे व रुग्णालयात पाठवून द्यावे. उपचार लवकर सुरू झाल्यास हमखास गुण येतो. पण उशीर झाला असल्यास उपचार सुरू करून डॉक्टरकडे पाठवणे चांगले. यात बाळ दगावू शकते म्हणून सर्व प्रयत्न वेळीच करायला पाहिजे.

खोकला मुलांसाठी (तक्ता (Table) पहा)

ताप आणि खोकला-दोन महिन्यापेक्षा मोठे बाळ (तक्ता (Table) पहा)

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.