Personal Health Icon वैयक्तिक आरोग्य आरोग्य सेवा
मानसिक आरोग्य

मानसिक ताण, चिडचिडेपणा, सतत चिंता, इत्यादी कारणांमुळे मानसिक असंतुलन आणि शारीरिक तक्रारी उद्भवतात. जठरव्रण, आतडेदाह, इत्यादी आजारांमागे काही प्रमाणात मानसिक कारणपरंपरा असते.

मानसिक आरोग्य हे सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीवर ब-याच प्रमाणात अवलंबून असते. पण काही प्रमाणात प्रत्येक व्यक्ती मानसिक आरोग्यासाठी प्रयत्न करू शकते. योग्य मनोभूमिका, योग्य विश्रांती , करमणूक, खेळ, इत्यादींमुळे मानसिक आरोग्य राखायला मदत होते.

व्यसने नकोत!

अति चहा पिणे, तंबाखू, धूम्रपान, दारू व इतर अंमली पदार्थ (उदा. गर्द) हे आरोग्याला हमखास घातक आहेत. तंबाखूमुळे तोंडातील कर्करोग होतो, धूम्रपानामुळे आम्लता, श्वासनलिकादाह व कर्करोग होतात. दारूमुळे चेतासंस्थेचे व यकृताचे आजार होतात असे सिध्द झाले आहे. या शारीरिक परिणामांबरोबरच अनावश्यक खर्चही होत असतो. दारूमुळे तर अनेक संसार उद्ध्वस्त होतात. स्त्रियांना व मुलांना उपासमार, मारहाण सोसावी लागते. दारुमुळे गुन्हे, अपघातांचे प्रमाण वाढते. या व्यसनांमुळे वैयक्तिक (व सार्वजनिक) आरोग्याला धोका आहे.

यौगिक शुध्दिक्रिया

वमन, विरेचन, नस्य, बस्ती, रक्तमोक्षण ही आयुर्वेदीय पंचकर्मे आहेत. यापैकी वमन, विरेचन (कोठा साफ करणे), नस्य ही स्वतः नेहमी करण्यासारखी तंत्रे आहेत.

योगशास्त्रातही शुध्दिक्रिया आहेत. त्या योगशिक्षकाकडून शिकणे आवश्यक आहे. या शुध्दिक्रियांनी शरीराची आंतरशुध्दी होऊन शरीर योगमार्गासाठी जास्त अनुकूल होते. आरोग्यासाठी या शुध्दिक्रिया फार उपयुक्त आहेत. उड्डियान, नौली, त्राटक, वमन, धौति, भस्त्रिका इ. प्रकार यात येतात.

नियमित मलविसर्जन

रोजच्या रोज, वेळच्या वेळी (सकाळी) मलविसर्जन होणे हे आरोग्यासाठी आणि उत्साहासाठी अनिवार्य आहे. लहानपणापासून याची सवय लावावी लागते. मलविसर्जन एक-दोन मिनिटांत समाधानकारक होत असेल तर चांगले. कुंथणे, मल आत अर्धवट राहणे, कुजट कुबट वास येणे, दिवसातून दोन-तीन वेळा होणे किंवा दोन-तीन दिवसातून एकदा होणे ह्या तक्रारींची योग्य दखल घ्यावी. काही लोकांचा कोठा जड असतो. त्यांनी झोपताना त्रिफळा चूर्णासारखे सारक चूर्ण किंवा बहाव्याचा मगज वापरावा. आहाराचे नियम पाळले की बहुधा औषधाशिवाय मलविसर्जन सुरळीत होते.

अमिबा आणि जंतविकार या दोन कारणांमुळे मलविसर्जनाच्या सवयी बिघडतात. ब-याच वेळा या विकारात जाणवण्यासारखा त्रास नसतो. पण या तक्रारींची दखल घेणे आवश्यक असते.

शरीर-वेगांना अडवू नये, मल, मूत्र, शिंका, पोटातला वायू या शरीराबाहेर पडणा-या स्वाभाविक प्रवृत्ती आहेत. त्या बाहेर पडण्याची सूचना आपल्याला मिळते, त्यांना अडवू नये. तसे केल्यास शरीरात हळूहळू निरनिराळया तक्रारी निर्माण होतात.

मलविसर्जनानंतरची स्वच्छता

Cleanliness आपल्या देशात शौचानंतर पाण्याने स्वच्छता करण्याची पध्दत रूढ झाली आहे.

काही समाजात मलविसर्जनानंतर दगड किंवा झाडाची पाने वापरण्याची पध्दत आहे. ही कोरडी पध्दत अगदी शास्त्रीय आणि योग्य आहे. पाण्याची टंचाई असेल तिथे अशी पध्दत चांगली आहेच. विशेषकरून खड्डा प्रकारच्या संडासात ही पध्दत अगदी चांगली चालू शकते.

अशी कोरडी पध्दत टाकून पाणी वापरण्याची पध्दत काही समाजांनी सुरू केली आहे. मात्र हातांची स्वच्छता नीट न राहिल्यास पोटाचे आजार वाढण्याचा संभव असतो. हल्ली ब-याच इंग्रजी बैठकीच्या संडासात (कमोड) पाणी किंवा कागद उपलब्ध असतो. कागद वापरणे हीही एक चांगली पध्दत आहे. यासाठी वेगळा कागद असलेला बरा. संडासांमध्ये नळाचे पाणी असेल तर ‘जेट’ पाण्याचा फवारा वापरता येतो. जेट फवा-यामुळे स्वच्छता चांगली होते व हाताचा वापर करावा लागत नाही.

मलविसर्जनानंतर पाण्याने हात धुताना साबण किंवा राख वापरून हात स्वच्छ करावेत. असे केले नाही तर मळाचा सूक्ष्म भाग हातावर राहू शकतो. यातून जंतुसंसर्गाची मोठी शक्यता असते. ज्या व्यक्तींना हगवण, कावीळ, विषमज्वर, कॉलरा, जंत, इत्यादी आजार आहेत त्यांच्यापासून या मार्गाने आजार पसरण्याची दाट शक्यता असते. संसर्गाचे हे चक्र थांबवण्यासाठी शौचानंतर व जेवणाआधी हात धुणे आवश्यक आहे.

मासिक पाळी आणि स्वच्छता

मासिक पाळीत अमंगल, अस्वच्छ असे काही नसते. होणारा रक्तस्त्राव टिपून घेण्यासाठी घडी उपयुक्त असते. जुन्या स्वच्छ कापडाच्या घडया किंवा कापूस घातलेल्या सछिद्र घडया वापरून स्वच्छता पाळता येते. मात्र कपडा वापरताना तो स्वच्छ धुतलेला व उन्हात वाळवलेला असावा. अस्वच्छ कपडे वापरल्यास जंतुदोष होऊ शकतो.

दुकानात तयार घडया (सॅनिटरी नॅपकिन) मिळतात. त्या निर्जंतुक असतात. मात्र नंतरचे कचरा व्यवस्थापन एक समस्याच असते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.