Personal Health Icon वैयक्तिक आरोग्य आरोग्य सेवा
वैयक्तिक आरोग्य

Uncleanness Diarrhoea प्रत्येक व्यक्तिच्या स्वतःच्या जीवनावर आजूबाजूच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा प्रभाव असतो. तरीही वैयक्तिक पातळीवर अनेक गोष्टी सांभाळता येतात आणि या सर्वांचे मिळून वैयक्तिक आरोग्य बनते. इथे काही सामान्य नियमांची माहिती दिली आहे.

झोप

Sleep Dreams वयाप्रमाणे झोपेची गरज बदलते. लहान मूल दिवसारात्री अनेक तास झोपते. याउलट वृध्द माणसांची झोप कमी असते. वयाच्या मानाने पुरेशी शांत झोप लागणे आवश्यक आहे. आरोग्याचे एक लक्षण म्हणजे 6-8तास शांत झोप आणि झोपून उठल्यावर प्रसन्नता वाटणे.

रात्री जास्त जागणे, दिवसा उशिरा उठणे यामुळे पचनसंस्थेचे चक्र बिघडते. रात्रीचे जेवण उशिरा झाले तर सकाळी जडपणा राहतो हे आपल्या अनुभवाचे आहे. संध्याकाळी सातच्या सुमारास हलके जेवण घेऊन लवकर झोपून पहाटे उठणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे. दुपारच्या झोपेने आळस येतो. त्यामुळे निदान तरूण वयात तरी दुपारची झोप टाळणे आवश्यक आहे. मात्र प्रौढ वयात दुपारी 5-10 मिनिटांची डुलकी घेणे फायद्याचे असते. त्याने मनावरचा तणाव कमी होतो. झोपेत स्वप्न पडणे हे नैसर्गिक आहे. पण स्वप्नांमध्ये नेहमी भीती वाटणे, ओरडून उठणे, अशांत झोप हा त्रास असेल तर योग्य उपचार करणे आवश्यक आहे

व्यायाम

Exercise बैठया कामाच्या सर्व व्यक्तींना व्यायाम आवश्यक आहे. वयाबरोबरही व्यायामाचे प्रकार – प्रमाण बदलणे आवश्यक आहे. आजार असतील तर त्या प्रमाणे व्यायामाचा साधक बाधक विचार करायला पाहिजे. हलके व्यायाम म्हणजे लांब अंतर चालणे. (5-6 कि.मी.); सायकल संथ चालवणे, इत्यादी. उतारवयात असे व्यायाम चांगले मानवतात.

बैठया कामाच्या व्यक्तींना रोज 10-15 मिनिटे तरी घाम येईपर्यंत व्यायाम आवश्यक आहे. सूर्यनमस्कार, सायकल चालवणे, धावणे, दंडबैठका यापैकी व्यायाम निवडता येईल. व्यायामशास्त्रावर या पुस्तकात स्वतंत्र प्रकरण दिले आहे. पचनसंस्थेसाठी देखील खास व्यायाम आहेत.गरोदर व प्रसूत झालेल्या स्त्रियांसाठी काही वेगळे व्यायाम आवश्यक असतात. आरोग्यरक्षणासाठी आणि काही रोगनिवारणासाठीही व्यायामाचे महत्त्व निश्चित आहे.

व्यायाम हा शक्यतो पोट रिकामे असताना केला पाहिजे. विशेषकरून कष्टाचा व्यायाम करताना ही काळजी घ्यावी. भरल्यापोटी व्यायाम करणे हे आरोग्याला त्रासदायक असते. भोजनानंतर निदान 2-3 तास. जोरदार व्यायाम करू नये. दीर्घ श्वसन करणे आरोग्याला उपकारक असते. रोज निदान 5-10 मिनिटे तरी दीर्घश्वसन करावे.

पादत्राणे

Footwear पायात योग्य पादत्राण घालणे पावलांसाठी संरक्षण म्हणून आवश्यक तर आहेच, शिवाय काही जंतांचा प्रसारही पायांतून होऊ शकतो.

मोजे व बूट वापरणे चांगले. पण उष्ण देशात बुटांचा वापर कमीच होतो. घामामुळे बुटांना व मोज्यांना दुर्गंध येतो. यासाठी रोज धुतलेले मोजे वापरणे आवश्यक आहे. चिखलात काम करतांना प्लास्टिकचे गमबूट वापरणे चांगले.

पायांना भेगा पडण्याची तक्रार आपल्या देशात पुष्कळ आढळते. बूट वापरणे यावर सर्वोत्तम उपाय आहे.

दात घासणे

Teeth Brushing दातांच्या फटीत अन्नकण अडकून व दातांवर अन्नाचा सूक्ष्म थर जमून जंतूंची वाढ होते. त्यामुळे दात लवकर किडतात. जंतूंमुळे तोंडाला दुर्गंधी येते आणि हिरडया सुजतात. हे टाळण्यासाठी प्रत्येक जेवणानंतर खळखळून चूळ भरावी. याचबरोबर दात, हिरडया चोळून धुणे आवश्यक असते. सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना दात साफ करणे आवश्यक आहे. दात घासण्यासाठी फक्त ब्रश किंवा दातवण काडी (चावून धागे मोकळे झालेली) पुरते. टूथपेस्टची उपयुक्तता मर्यादित आहे. पेस्ट नसल्यास नुसता ब्रश पुरतो.

गोड चवीच्या टूथपेस्टपेक्षा कडू, तुरट, तिखट, खारट चवीची मंजने दातावरचे चिकट आवरण सहज काढतात. यासाठी साधी राख किंवा कोळशाची पूडही चालते.

Teeth Brushing दातांच्या फटी साफ करण्यासाठी मात्र ब्रश किंवा दातवण लागते. बाभूळ, कडूनिंब यांच्या काडया दातवणासाठी सर्रास वापरल्या जातात. ही चांगली पध्दत आहे.

मिश्रीने मात्र दातावर किटण चढते. आरोग्याच्या दृष्टीने मिश्रीचा वापर चुकीचा आहे. ब्रश वापरण्याची पध्दत महत्त्वाची आहे. ब्रश आडवा न चालवता ‘खाली-वर’ फिरवला पाहिजे म्हणजे फटी स्वच्छ होतील.

हिरडया बोटाने चोळणेही दात घासण्याइतकेच महत्त्वाचे आहे. हिरडया चोळण्याने तिथला रक्तप्रवाह सुधारतो

नखे कापणे

Nail Cutter वेळोवेळी नखे कापणे हे मुख्यतः पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. वाढलेल्या नखांच्या खोबणीत मळ, जंतांची अंडी, माती, इत्यादी पदार्थ साठतात. यातून स्वतःला व इतरांना संसर्ग होत राहतो. दर 2-3 आठवडयांनी हातापायाची नखे काढावीत. लहान मुलांना नखे काढायची सवय लावावी.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.