Health Education Icon वसा आरोग्यशिक्षणाचा आरोग्य सेवा
आरोग्यसंवादाच्या सोप्या पध्दती – गटचर्चा, प्रभातफेरी, चित्रकथा
गटचर्चा

गटचर्चा ही आरोग्यसंवादाची एक प्रभावी पध्दत आहे. त्याला फार साधनेही लागत नाहीत.

गटात बोलण्याचा विषय आणि त्यासाठी वापरायची संवादाची पध्दत यांचा मेळ घालता आला पाहिजे. हा मेळ जर जमला नाही तर योग्य परिणाम साधला जाणार नाही. एक उदाहरण घेऊ. संडास वापरण्याची सवय लावण्याकरता स्त्रियांच्या एका गटाशी चर्चा करायची आहे. (किंवा पुरुष गटाशीही) आपण खालीलप्रमाणे आखणी करू शकतो.

5-10 महिलांना/ पुरुषांना एका घरी बोलवायचे. घर निवडताना ते सगळयांना सोईचे असावे. विशेषतः मागासवर्गीय जाती-जमातींच्या मंडळींना तिथे अवघड वाटणार नाही असे बघा. या घरात जर संडासची सोय असेल तर अधिक चांगले. बैठकीची जागा आणि वेळेसंबंधी लोकांना आधीच सूचना द्यावी. बचतगटांनाही आधी कळवावे.

बैठकीच्या सुरुवातीला, उघडयावर संडासला गेल्याने आरोग्याला निर्माण होणा-या धोक्यांविषयी व समस्यांविषयी चर्चा करायची. आपण चर्चेला फक्त सुरुवात करून द्यावी. इतर कोणी यासाठी तयार असेल तर त्यांनाच सुरुवात करू द्यायची. संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतून संडासांबद्दल वाचून दाखवता येईल. हळूहळू इतर लोकही आपल्या समस्यांविषयी बोलायला लागतील आणि चर्चेत भाग घेतील.

जर संडासविषयीचे एखादे चित्र किंवा छोटी प्रतिकृती असेल तर ती या बैठकीत दाखवायला हरकत नाही. गावात जर संडास उपलब्ध असेल तर तो प्रत्यक्ष दाखवताही येईल. संडास कसा बांधायचा आणि त्याची गरज काय हे आपल्याला नीट पटवावे लागेल. चित्रांचा पलट तक्ता वापरूनही हे करता येईल. या संडासाच्या बांधकामात पंचायत काय मदत करू शकते त्याची माहिती देता येईल.

सुरुवातीलाच चर्चेचे काही नियम ठरवायला पाहिजेत. एका वेळी एकीने बोलावे. चर्चा करताना मनापासून आणि लोकांच्या डोळयाला डोळा देऊन बोलले पाहिजे. आपल्याला विषय पटला असेल तरच आपण त्याबद्दल खात्रीने बोलू शकू. प्रत्येकीला बोलायची संधी मिळायला हवी. त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत. काही लोकांकडून चांगल्या सूचना मिळतात.

एखाद्याची टिंगल करणे किंवा रागावणे अशा गोष्टी टाळायला हव्या. लोकशाही पध्दतीने चर्चा व्हायला हवी. लोकांकडूनच उत्तरे येतील असे पहावे.

कठीण किंवा खात्री नसलेले विषय चर्चेला घेतले जाऊ नयेत. आपला मुख्य मुद्दा कळायला आणि वळायलाही सोपा असला पाहिजे.

जर एका बैठकीत विषय संपवता आला नाही तर दुसरी बैठक घेता येईल. लोक उदाहरणाने शिकतात किंवा स्वतः केल्याने अधिक चांगलं शिकतात. निव्वळ चर्चा, तक्ते, घोषणा किंवा गाणी यांचा परिणाम होणार नाही. या गोष्टींचा फक्त मूळ मुद्याला पूरक म्हणून उपयोग होऊ शकतो.

विषय गुंतागुंतीचा असेल तर ते कबूल करावे हे बरे. काही समस्या खूप बिकट असू शकतात. त्याच्यात गुंतलेले निरनिराळे विषय आणि त्यांचा परस्परसंबंध लक्षात घेऊन समस्या सोडवण्याचा विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, जर कोणी म्हणेल की संडासमध्ये वापरायला पुरेसे पाणी नसते तर त्यावर आपण सर्व बाजूंनी विचार करून तोडगा शोधायला हवा. वादविवादाने प्रश्न सुटत नाहीत, चर्चेने सुटतात.

बदल हा नेहमीच सावकाश होतो. पण प्रत्येक समाजात नवीन कल्पना स्वीकारणारे लोक असतातच. आपण त्यांना प्रोत्साहन द्यावे. कधीकधी नवीन पिढी नव्या कल्पना लवकर स्वीकारते. जुन्या पध्दतींची सवय असल्यामुळे त्या सोडून नवीन पध्दती स्वीकारणे ब-याचदा अवघड जातं. नवीन पध्दतींशी जुळवून घेताना काही तडजोड करावी लागते.

कायकाय चर्चा झाली आणि काय ठरले याचा शेवटी आढावा घेणे जरूरीचे आहे.

प्रभातफेरी

Poster Morning walk प्रभातफेरी हा एक शाळेतल्या मुलांच्या मदतीने पार पाडता येणारा, आरोग्याची माहिती देणारा एक उपक्रम आहे.

 • शाळेतली मुले उद्याचे नागरिक असतात. त्यांच्यात आरोग्याची जाणीव निर्माण झाली तर त्याचा फायदा पुढच्या अनेक पिढयांना होईल.
 • प्रभातफेरीमधून मुलांकडून या ना त्या पध्दतीने ही माहिती घरोघर पोचणारच.
 • मुले आनंदाने हे काम करतात आणि त्यामुळे पालकांना हा संदेश अधिक पटतो.
 • फारसा खर्च न करता केवळ प्रभातफेरीतून आपण आरोग्याविषयी बरीच माहिती देऊ शकतो.

शाळकरी मुलांना योग्य असा आरोग्याचा विषय निवडा, आजारांचा विषय शक्यतो नको. उदाहरणार्थ, निरोध किंवा क्षयरोग, एड्स, कुटुंबनियोजन असे विषय नकोत, मात्र धूम्रपानाचे दुष्परिणाम हा चालेल. तसेच विषय समजायला सोपा असावा, किचकट नको. स्वच्छता, पोषण, बालमजुरी, इ. विषय चांगले.

योग्य दिवस निवडताना शिक्षकांचा सल्ला घ्या. परीक्षेचे दिवस टाळा. सहसा यासाठी स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन निवडतात. जर तशीच काही महत्त्वाची घटना घडली असेल, (उदाहरणार्थ, मलेरियाची किंवा अतिसाराची साथ) तर इतर दिवशीही प्रभातफेरी काढायला हरकत नाही.

शिक्षक आणि मुलामुलींच्या मदतीने सूचना फलक आणि घोषणा तयार करा. याकरता लागणारे साहित्य शाळेत मिळू शकेल.

एकाच विषयावर तीन-चार वेगवेगळे फलक तयार करा. समजा, मलेरियाचा प्रतिबंध हा विषय असेल तर त्यावर ताप, उपचार, गप्पी मासे, परसबाग, फवारा मारणे असे फलक होऊ शकतात.

फेरीच्या एक दिवस आधी शिक्षक-मुला-मुलींची चर्चा बैठक घ्या. त्यात त्यांना या विषयाचे महत्त्व पटवून द्या. तसेच कोणता संदेश पोचवायचा हे चर्चेतून सांगा.

विशेष सूचना

Health Education Poster फक्त सकाळचाच वेळ वापरा आणि अभ्यासात व्यत्यय येणार नाही ही काळजी घ्या.

 • गावातील मुख्य रस्त्यांवरून फेरी न्या. खूप लांब फेरी नको.
 • फेरी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नसून वाईट आरोग्य पध्दतींच्या विरुध्द आहे हे लक्षात ठेवा.
 • परीक्षेचे दिवस टाळा. आरोग्यदिनासारख्या विशेष दिनाचा वापर करता येईल.
 • मुलांना खूप वेळ उन्हात बसवू नका. काही मुलांना यामुळे चक्कर येते. त्याने इतर समस्या निर्माण होतील.
 • पाहुण्यांकरता मुलांना फार वेळ तिष्ठत ठेवू नका. शक्यतो सभा नकोच.
 • ब-याच मुलांना फेरीनंतर भूक लागते हे लक्षात ठेवा, यासाठी खाऊची सोय करा. यासाठी केळी-पेरु इ. फळे चांगली.
चित्रकथा

या घटकात आपण जंतांचा विषय आरोग्यशिक्षणासाठी घेणार आहोत. यासाठी आजूबाजूच्या प्रत्यक्ष जीवनात घडलेल्या गोष्टी नाव बदलून वापरता येतात. एक अशीच साधी जंत-कथा खाली रचलेली आहे.

एक नेहमीची कथा

 • लहानगा राजू धावत पळत आईकडे पळत आला. त्याला आईने रस्त्यावर शी करायला बसवले होते. तो इतका घाबरला होता की चड्डी देखील रस्त्यावरच टाकून पळत आला.
 • आईपण घाबरून गेली. हातातले काम सोडून तिने तसेच राजूला जवळ घेतले. अरे झाले तरी काय? राजू इतका घाबरला होता की त्याच्या तोंडातून ‘साप’ एवढाच शब्द मधून मधून निघत होता. 3/4 वर्षाच्या राजूला दुसरे काही सुचतच नव्हते.
 • राजूचा थोरला भाऊ संदीप पाचवीत होता. त्याची शाळा सुटल्यामुळे मागोमाग तोही आला. राजूला रडताना आणि ‘साप साप’ म्हणताना ऐकून तोही आईबरोबर रस्त्यावर पळाला.
 • जवळ आल्यावर राजूने आपल्या ‘शी’ कडे बोट दाखवले. तिथे काहीतरी वळवळत होते. संदीप हसून ओरडला ‘अरे हा साप नाही येडया, जंत आहे जंत. तो तुझ्या पोटातून पडलाय. तो चावत नाही, घाबरू नको. मला पण मधून मधून जंत पडतात. त्यानी काही होत नाही.’ राजू-संदीपच्या आईला हसू आवरेना. तिने राजूची शी धुतली. आणि चड्डी घालून त्याला घरी आणले.
 • तेवढयात गावातले डुक्कर तेथे डुरकत आले आणि त्याने घाण खाऊन टाकली.
 • राजू घरी पोट दुखते म्हणून रडतच होता. खरे म्हणजे गेला महिनाभर त्याची तक्रार होतीच. जेवण पण नीट खात नव्हता. संदीपची तब्बेत पण फार चांगली नव्हती, पण वयाने मोठा असल्याने त्याचे एवढे अडत नव्हते.
 • संध्याकाळी आई राजू-संदीपला घेऊन गावातल्या नर्सताईकडे गेली. (गाव छोटा असल्याने डॉक्टर कुठून असणार?) सुमनताई म्हणजे नर्सताई हुशार होत्या. त्यांनी राजू-संदीपला ‘अलबेंडा’ ची गोळी दिली. समजावून सांगितले.
 • राजू विचारतो, माझ्या पोटात साप कसा गेला? सुमनताईने सगळयांना बसवून घेतले. आरोग्यशिक्षणाचे पुस्तक काढून त्यातले जंतांचे चक्र दाखवले.
 • संदीपला पटेना की मातीतल्या जंतांच्या बारीक अंडयांमुळे एवढे मोठे जंत कसे होतील? मुळात ही अंडी डोळयाला दिसतातच कोठे? मग सुमनताईने आणखी एकदा नीट समजावून सांगितले. मग संदीपला व त्याच्या आईला तरी पटले.
 • संदीपच्या आईला एवढे उमजले की वारंवार जंत झाल्याने संदीपची आणि राजूची भूक कमी झालीय, पोट दुखते, आणि तब्येत पण चांगली नाही. आम्ही यांना एवढे खाऊ घालतो, ही पोरे अशी बारकी का राहतात? हाच प्रश्न तिला पडायचा.
 • पण उपाय काय? गावात सगळीकडे मुले रस्त्यावर हागायला बसतात. मोठे लोक हागणदारीत जातात. स्त्रियांची हागणदारी वेगळी. काय करायचे तरी काय?
 • एक दिवस गावात प्राथमिक आरोग्य केंद्राचे कदम डॉक्टर आले. त्यांनी प्राथमिक शाळेतल्या आणि अंगणवाडीतल्या सर्व मुलामुलींना जंताची गोळी दिली. सर्व मुलांनी ती लगेचच खाल्ली. अंगणवाडीत जंताच्या गोळया नव्हत्या म्हणून बाटलीतले औषध दिले. औषध गोड असल्याने कोणाची तक्रार नव्हती. सगळया पोराबाळांनी औषध पिऊन घेतले.
 • 2/3दिवसांत आश्चर्य झाले. सगळया गावात जंतांचा सडा पडला. जिथे तिथे वळवळणारे जंत. जाणा-या येणा-याला किळस भरली. लोक उडया मारत चालू लागले.
 • दुपारी पंचायतीत गमतीत जंताचा विषय निघाला. आधी मंडळींनी हासून घेतले. प्रत्येकाला आपला लहानपणीचा ‘जंत’ आठवला.
 • एक गुरुजी तिथे होते. त्यांनी जंतांचे 3-4 प्रकार सांगितले. काही जंत बारीक असतात. त्यामुळे ढुंगणाला कंड-खाज येते. काही जंत लांबलचक असतात, ते मांसाद्वारा पोटात शिरतात.
 • सगळयात वाईट म्हणजे मुलाने एक भाकरी खाल्ली तर त्यातली चतकोर जंतच मटकावतात. हे तर फारच वाईट. आधीच गरिबी, त्यात जंतांचा त्रास.
 • प्रकरण गंभीर होत चालले. ग्रामसेवक आनंदा भोसले फार पूर्वीपासून संडास योजनेसाठी प्रयत्न करत होते. पण कोणी दाद देत नव्हते.
 • चर्चा खूप रंगली. शेवटी सर्वांनी जमेल तसे संडास करून घ्यायचे ठरले. सर्व मुलाबाळांना 2/3 महिन्यांनी परत एकदा जंतांचे औषध द्यायचे ठरले. नखे कापण्याची मोहीम ठरली. संडास नंतर व जेवणाआधी साबणाने हात धुण्याची गरज सर्वांना पटवली पाहिजे.
 • आता तर प्रभातफेरीच काढावी लागेल.
 • साप बरा – तो चावला तर एखाद्यालाच चावतो. जंत मात्र सर्वांना होतात. एवढासा जीव पण हैराण करतो. पोटात तो वळवळतो हे ऐकूनच ओकारी येते.

आता ही झाली आपली कथा. थोडी खरी, थोडी रंगवलेली. आता त्याची चित्रकथा कशी करायची ते बघू या.

आता त्याची चित्रकथा

गावातल्या शाळेत चित्रकलेचे कांबळे सर होते. त्यांना भारी उत्साह, नाहीतरी त्यांना काही तरी विषय पाहिजेच होता. अंगणवाडी सेविका मंगलताई, सुमनताई, ग्रामसेवक भोसले वगैरे मंडळी त्यांच्याकडे बसली. कथा सांगितली व लिहून काढली. दुस-या दिवशी कांबळे सरांनी मोठाल्या 20 कागदांवर मस्त चित्रे काढली. काही चित्रांसाठी त्यांना नर्सताईकडून परत समजून घ्यावे लागले. ती चित्रे बघून सगळयांची हसून पुरेवाट झाली. चित्रांवर नंबर टाकले होते. तेवढयात शेख सर आले. त्यांचा विषय मराठीचा. चित्रे पाहून त्यांना स्फुरण आले. या बैठकीतच त्यांना सर्व चित्रे क्रमाने दाखवून अस्सल ग्रामीण बोलीत कथा सांगितली. सगळयांना हा प्रकार आवडला. जंतांवर आता खरे औषध सापडले होते.

दुस-या दिवशी तिसरीच्या वर्गात रंगीत तालीम झाली. सगळया पोरांना हसू आवरेना. आजूबाजूचे शिक्षक काय झाले म्हणून बघायला आले. हळूहळू हप्त्याभरात जंताची चित्रकथा सर्व वर्गात फिरून आली. अंगणवाडीत देखील प्रयोग झाला. 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत मुद्दाम ही चित्रकथा ठेवण्यात आली. शेख सरांचे धावते वर्णन होतेच.

मग काय उशीर, जास्तीत जास्त संडास बांधायचा ठरावच ग्रामसभेत मंजूर झाला.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.