Health Education Icon वसा आरोग्यशिक्षणाचा आरोग्य सेवा
वसा आरोग्यशिक्षणाचा

Drama Message आरोग्यकारक विचारांचा, सवयींचा समाजात प्रसार व्हावा म्हणून आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. हजारो गोळया, औषधे, इंजेक्शनांनी जे काम होत नाही ते साध्या उपायांनी, चांगल्या सवयींनी होऊ शकते. उदाहरणार्थ, दारूच्या व्यसनापासून समाजाची मुक्ती ही लाखो लोकांचे आजार आणि दुःख टाळू शकते. काही देशांमध्ये मांसाहाराचा अतिरेक टाळण्याचे पध्दतशीर प्रयत्न झाले, त्यामुळे हृदयविकाराचे प्रमाण कमी झाले. हे काम अनेक रूग्णालये सुरू करूनही झाले नसते. मच्छरदाणीचा नियमित वापर करायला शिकवणे हे शेकडो लोकांना दरवर्षी मलेरियाच्या गोळया देण्यापेक्षा महत्त्वाचे आहे. दिसायला साध्या, सोप्या गोष्टींचा प्रसार करून सामाजिक आरोग्य कसे वाढू शकते याची ही उदाहरणे आहेत. अशी अगणित उदाहरणे आहेत. म्हणूनच आपण आरोग्यशिक्षण ही महत्त्वाची जबाबदारी समजून जमेल तितके प्रयत्न करीत राहिले पाहिजे. यासाठी सहज होतील अशा प्रयत्नांबरोबरच काही पध्दतशीर काम करणेही आवश्यक असते.

लोक कसे शिकतात?
जगभरच्या अनुभवातून समजलेल्या काही गोष्टी अशा:

childbirth artificial statue लोक एखादी गोष्ट जेव्हा स्वतः करतात, पाहतात तेव्हा शिकणे सहज आणि परिणामकारक होते. केवळ सांगण्याने एवढे काम होत नाही. वर्गातल्याप्रमाणे व्याख्यान देणे हे आरोग्यशिक्षणात फारसे उपयोगाचे नाही. लिहिण्यावाचण्याची अनेक लोकांना सवय नसते व लिखित गोष्टींपेक्षा पाहणे, करणे हीच स्वयंशिक्षणाची पध्दत प्रचलित आहे. अर्थात काही ठिकाणी संवाद किंवा पोस्टर्सचा चांगला उपयोग होऊ शकतो.

  • प्रत्येक माणूस उपलब्ध- समोर असलेल्या माहिती / अनुभवातून स्वतःची कल्पना तयार करतो. ब-याचवेळा प्रत्येकाची कल्पना थोडीथोडी वेगळी होऊ शकते. ही प्रक्रिया समजणे आणि त्यात मदत करणे हे आपले मुख्य काम आहे. उदाहरणार्थ, आम्ही एका मुलींच्या वर्गात मासिक पाळीबद्दल माहिती देण्याचा कार्यक्रम ठेवला. सर्वांना गोल बसवून प्रत्येकीला एका चिठ्ठीत हवी असलेली माहिती लिहून ठेवायला सांगितले. या सर्व चिठ्ठया गोळा केल्या. मग सर्वांचे प्रश्न जमा करून चर्चा केली. यातून झाले असे की प्रत्येकीच्या मनात काही प्रश्न, उत्सुकता तयार झाली व शिकण्याची प्रक्रिया चालू झाली. त्यामुळे सर्वांनीच यात उत्साहाने भाग घेतला. नवी माहिती कळल्यामुळे प्रत्येकीला वेगळेच समाधान झाले. हेच केवळ भाषण केले असते तर मनाने त्या सामील झाल्या नसत्या. केवळ ऐकून घेतले असते. शिकण्याचा हा निखारा फुंकर घालून चेतवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. सुरुवात इथून करा.- अमूर्त, अस्पष्ट कल्पना समजणे अवघड असते. लोकांना समजायला सोप्या व चित्रमय कल्पनांचा वापर करा. उदाहरणार्थ, बालमृत्युदर समजावून सांगणे फार अवघड. पण एखाद्या घरात झालेल्या बाळाचा मृत्यू ही घटना केंद्रस्थानी ठेवून बालमृत्यूंच्या कारणांची चर्चा करणे सोपे असते. दुसरे उदाहरण पहा : समजा आपण जुलाबांच्या कारणांची चर्चा करीत आहोत. यात कोठल्या लक्षणांमागे कोणता आजार आहे असे सांगण्यापेक्षा अमुक एकाला ही लक्षणे, म्हणून त्याला हा आजार असे चित्र चांगले समजते, लक्षात राहते. काही गोष्टी त्यांनी पाहिलेल्या नसतात, त्याची कल्पना येऊ शकत नाही. उदाहरणार्थ, मलेरियाचे जंतू प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय नुसत्या शब्दांवर विश्वास बसत नाही. ‘हिमोग्लोबिन’ या शब्दापेक्षा रक्ताचा लालपणा लवकर समजतो.
  • cartoon health education शब्दापेक्षा डोळयांनी पाहून चांगले समजते. शब्द ऐकणे, वाचणे यापेक्षा चित्र पाहणे हे अनेकपटींनी चांगले माध्यम आहे. शक्य तिथे त्याचा वापर करा. पण त्यासाठी साधी, सोपी चित्रे वापरा. अनेक चित्रे लोकांना समजत नाहीत किंवा त्यातून चुकीचा, वेगवेगळा अर्थ निघू शकतो. लोकांना सहज समजतील, गैरसमज होणार नाहीत अशा चित्रकलेला कौशल्य लागते. चित्रांबरोबर पारदर्शिका , प्रतिकृती वगैरेंचाही चांगला उपयोग होतो.
  • गुंतागुंतीची किंवा मोठी आकडेवारी देण्याचा मोह टाळावा. आकडेवारी द्यायची तर त्यांना समजतील अशा पध्द्तींनी दिली पाहिजे. उदा. भारताच्या लोकसंख्येत दरवर्षी किती वाढ होते हे सांगण्यापेक्षा आपल्या गावात किती नवीन जन्म होतात हे सांगणे बरे. काही ठिकाणी लोकांना टक्केवारीपेक्षा आणेवारीची भाषा चांगली समजते. आकडेवारीची सवय असलेल्या लोकांना जे सहज समजते ते इतरांना समजेल अशी अपेक्षा बाळगू नये.
  • Drama Message आपण खूप तज्ज्ञ आहोत असे भासवण्याचे टाळा- आपल्या ज्ञानाची, कौशल्याची प्रचिती आपल्या वागण्यातून आपोआप सहज दिसली पाहिजे, आपण एखाद्या विषयाचे तज्ज्ञ आहोत असे भासवून आरोग्यशिक्षणाचे काम सोपे होते असे नाही. उलट लोक मनाने लांब सरकतात. नम्रता बाळगणे हेच जास्त कामाचे. तसेच फार अवघड तांत्रिक शब्द वापरण्याचे टाळावे. व्यवहारातले सोपे शब्द वापरावेत. न समजणारा एकही शब्द वापरू नये. समजेनासे शब्द कानावर आले की लोक अडखळतात व त्यांचे लक्ष उडून जाते. शक्यतोवर त्यांना तुमच्या कार्यक्रमात सामील करून घ्या. त्यांना हाताने गोष्टी करून पाहू द्या. चुका करत शिकू द्या. लोक स्वतः चुका करून शिकतात तेव्हाच खरे शिकतात. चुकायला वाव ठेवायला पाहिजे. चुकांची भीती घालू नका. लहान मुलांच्या बाबतीतही हेच शिक्षणाचे सूत्र आहे.
  • शिकण्या-शिकवण्याचा प्रसंग आनंदाचा , उल्हासाचा झाला पाहिजे. ज्यात करमणूक, आनंद, उल्हास आहे अशा गोष्टींशी लोक समरस होऊन त्या स्मरणात ठेवतात. कोठल्याही प्रकारे त्यांचा अपमान होईल, पीडा होईल असे प्रसंग टाळलेच पाहिजेत.शिकण्यात आत्मसन्मान वाढतो, आनंद वाढतो असे दिसले तर ते लवकर सामील होतील.
  • व्यवहारातले दाखले द्या : जीवनाशी संबंध असलेल्या विषयांशी ते लवकर एकरूप होतात. दूरच्या गोष्टी टाळा. त्यांच्या मनात तुमच्या सांगण्यावरून काही प्रतिमा- चित्रे निर्माण झाली पाहिजेत, ती त्यांच्या जीवनात अनुभवायला मिळत असतील तरच तुमच्या तारा जुळतील.
  • योग्य संधीची वाट पहा- वाटेल तेव्हा आरोग्यशिक्षण करून फारसा उपयोग होत नाही. त्यासाठी योग्य संधीची गरज असते किंवा ती निर्माण करावी लागते. मन:स्थितीप्रमाणे लोक प्रतिसाद देतील. उदाहरणार्थ साप चावला असेल तर आधी प्रथमोपचार करा. धोका टळल्यानंतर सर्पदंशाबद्दल जास्त माहिती सांगा. गर्भनिरोधकाबद्दल सांगायचे तर त्यालाही योग्य संधी साधायला हवी. त्या आजाराच्या वेळी माणूस ऐकण्याच्या मनःस्थितीत आहे की नाही हे पाहून त्या आजारासंबंधी प्रबोधन करा. एखादी साथ असेल त्या वेळी साथनियंत्रक उपाय/ माहिती चांगले समजतात. इतरवेळी त्याकडे लोक लक्षही देणार नाहीत.
  • health day लोकांकडून शिकण्याची तयारी ठेवा – लोकांकडून शिकण्यासारखे बरेच काही असते, फक्त त्यांना अनुभव सांगायला पुरेशी संधी, वेळ , जागा द्या. वैद्यकशास्त्रात लोकांनी भरपूर भर घातली आहे. विशेषतः प्राथमिक आरोग्यसेवांच्या बाबतीत तर ते अनेक चांगल्या सूचना करू शकतात. बाळांचे पोषण चांगले कसे करता येईल हे आयांना विचारा, त्या कितीतरी कल्पना सांगतील, अडचणी सोडवतील. एकदा आम्ही वर्गात सांगितले की विंचू चावल्यावर जी वेदना होते त्यावर आपल्याकडे फारसे चांगले औषध निघालेले नाही. यावर वर्गात अनेकांनी अनेक व्यावहारिक उपाय सांगितले. त्यांतले एक दोन आम्ही नंतर वापरून पाहिले, गुणही आला. अनेक पुस्तके वाचूनही याबद्दल शोध लागला नव्हता तो सहज चर्चेत सापडला.
  • आधी केले मग सांगितले – नुसता कोरडा उपदेश करू नका, स्वतः ते आचरणात आणा मग इतरांना सांगा. चांगल्या सवयी लावून घेणे (व्यायाम, स्वच्छता इ.)किंवा वाईट सवयी टाकणे (धूम्रपान, दारू इ.) या दोन्ही बाबतींत आपले वर्तन स्वच्छ पाहिजे. तरच तुमच्या शब्दांना वजन येईल . याबाबतीत जेवढा प्रामाणिकपणा दाखवाल तेवढेच तुमच्या शब्दांचे महत्त्व आहे. सुरुवात स्वतःपासूनच करा.
  • संदेश लाखमोलाचे, पण सांगण्याची पध्दतही तशीच पाहिजे – तुम्ही सांगताय ती माहिती फार मोलाची असेल. पण ती समजेल अशा पध्दतीने सांगितली गेली नाही तर फारसा उपयोग होणार नाही. सांगण्याच्या पध्दतीवर – संवाद कौशल्यावर बरेच अवलंबून असते, त्याशिवाय यश मिळणार नाही.
शिकवू नका, शिकायला मदत करा

इतर कोणी शिकवण्यापेक्षा स्वतः शिकणे महत्त्वाचे असते. त्यांना या शिकण्यात आपण मदत करायची असते. नुसती माहिती देण्याने काम होत नाही. समाज सतत शिकत असतो. त्या प्रक्रियेत सामील व्हा. नुसती माहिती देणे किंवा घोषणांचा प्रसार करणे याने काम होत नाही. आपला उद्देश लोकांनी माहिती, कौशल्ये, मनोवृत्ती आत्मसात करणे हा आहे. केवळ घोषणांचा पाऊस पाडणे म्हणजे आरोग्यशिक्षण नाही हे लक्षात ठेवा.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.