/tantrika tantra icon मानसिक आरोग्य आणि आजार चेतासंस्थेचे आजार (मज्जासंस्था)
बालवयातल्या मानसिक समस्या

सुमारे पाच-दहा टक्के मुलांच्या बाबतीत मानसिक समस्या असतात, परंतु पालक याबद्दल तक्रार घेऊन येतीलच असे नाही. याचे एक कारण म्हणजे या समस्या लक्षात येणे आणि त्याबद्दल सल्ला घेण्याइतकी सवड काढणे आवश्यक आहे. पालक तक्रारी घेऊन येतात त्या तीन प्रकारच्या असतात.

  • वयाच्या मानाने अयोग्य वागणूक : उदा. दहा वर्षाच्या मुलाने अंथरूणात लघवी करणे, इ.
  • शारीरिक, मानसिक अक्षमता : उदा. शाळेत ‘ढ’ राहणे, वयाच्या हिशेबाप्रमाणे काम, जबाबदारी नीट न पार पाडणे. उदा. आठ वर्षाच्या मुलाने साधी कपबशी इकडून तिकडे नेताना फोडणे, हातात वस्तू नीट न धरणे, गरजेपेक्षा अधिक शारीरिक हालचाली करणे, कमी स्मरणशक्ती, कमी समज, इ.
  • वाईट वागणूक : चोरी, खोटे बोलणे, सतत मारामारीची तक्रार, इतरांशी सतत भांडण, इत्यादी. वेळीच काळजी घेतली नाही तर अशी मुले गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असते.
कारणे

या प्रकारच्या तक्रारींची कारणमीमांसा मोठी आणि गुंतागुंतीची आहे, पण खालीलप्रमाणे त्यांची वर्गवारी करता येईल.

  • जीवशास्त्रीय कारणे – आनुवंशिकता, मूकबधिरता, निरनिराळे आजार, मतिमंदपणा, इ. यापैकी ऑटिझमबद्दल वेगळया प्रकरणात माहिती दिलेली आहे.
  • मुलाची मानसिक कारणे – पालकांशी किंवा आईवडिलांशी न जमणे, घरातली भांडणे, भावंडांशी संघर्ष, इ.
  • कौटुंबिक, सामाजिक कारणे – अवास्तव कडक शिस्त, प्रेमाचा ओलावा नसणे किंवा अतिलाड, गरिबी, अतिश्रीमंती, आजूबाजूचे विशिष्ट वातावरण, इत्यादी.
  • बालवयात लैंगिक शोषण – विशेषत: कौटुंबिक सदस्यांकडून.
बालवयातील काही ठळक मानसिक समस्या
  • उदासीन मूल (सहा वर्षापर्यंत) : असे मूल उदास, अलिप्त असते. इतर मुलांच्या मानाने त्याची चळवळ कमी असते. मतिमंदता, शारीरिक आजार, असमर्थता (उदा. कुपोषण, क्षय, इ.), भावनिक कारणांपैकी एखादे कारण यामागे असू शकेल. लवकरात लवकर मानसिक डॉक्टरकडून तपासून घेऊन पुढची काळजी घ्यायला पाहिजे.
  • अतिचळवळे मूल (सहा वर्षापर्यंत) : अशी मुले खूप हालचाल करीत असतात, स्वस्थ बसत नाहीत आणि हातातल्या कोठल्याही गोष्टीवर त्यांचे लक्ष फारसे स्थिर नसते. सतत अस्थिर मन, कोठलीही गोष्ट धडपडीशिवाय येत नाही अशी त्यांची स्थिती असते. यामागेही मतिमंदता, मेंदूला इजा किंवा भावनिक अस्थिरता यांपैकी काही कारणे असू शकतील.
  • अचानक श्वास रोखून धरणे व निश्चल होणे : काही मुले (विशेषतः तीन वर्षापर्यंतची) अचानक श्वास रोखून धरतात व निश्चल होतात. यामागे सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न असतो. कुटुंबीयांकडून आपणाकडे दुर्लक्ष होत असण्याची मुलाची भावना यामागे असू शकते.
  • अंथरुणात लघवी करणे (6 ते 15 वर्षे) : सामान्यपणे तीन वर्षापर्यंत मुलाला लघवीवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र जमते. अनेक कारणांमुळे मूल तीन वर्षानंतरही अंथरुणात लघवी करते. असे नेहमीच होत असेल तर त्यामागे मूत्रसंस्थेचे आजार किंवा मानसिक कारणे असू शकतात. मानसिक कारणांत असुरक्षितता, लक्ष वेधून घेण्याची इच्छा, रात्री बाहेर लघवीस जाण्याची भीती (अंधार), इत्यादी कारणे असतात. रात्री झोपताना खूप पाणी पिण्याची सवय यामागे असू शकते. कारणे समजल्यानंतर उपचार करता येतील. कारणे समजावून घेऊन आवश्यक तर तज्ज्ञाकडे पाठवा. यासाठी होमिओपथिक उपचार उपयुक्त ठरतात.
  • बालवयातील रोगभ्रम : काही मुले अनेक मानसिक कारणांमुळे शारीरिक आजाराच्या तक्रारी करतात. या जाणूनबुजून केलेल्या नसून नकळत ‘वापरलेल्या’ तक्रारी असतात. यांत सतत डोके दुखणे, पोटदुखी, झटके, थरकाप, इत्यादी माहीत असलेली लक्षणे येतात. याचा निर्णय वैद्यकीय तपासणीनंतरच शक्य आहे. त्याच्या मागचे कारण मानसिक आहे अशी शहानिशा झाल्यावर उपचारासाठी मदत करता येईल.
सदोष व्यक्तिमत्त्वाचे विविध प्रकार

वर दिलेले गंभीर किंवा साधारण मनोविकाराचे इतर ठळक प्रकार आहेत. याशिवाय अनेक प्रकारचे व्यक्तिमत्त्वाचे दोष आढळतात. यांतले बरेच प्रकार आपण आजूबाजूच्या लोकांमध्ये पाहत असतो. यात उपचार करावाच असे फारसे काही नसते. किरकोळ गोष्ट व स्वभावाचा दोष म्हणून आपण ते सोडूनही देतो. यातले बरेच पैलू सौम्य स्वरूपात सर्रास आढळतात, फक्त ते जास्त तीव्रतेने आढळले तरच त्याला आपण दोष मानतो. यांतले काही प्रकार आता आपण पाहू या.

संशयग्रस्त स्वभाव

आजूबाजूच्या लोकांवर अविश्वास, सतत संशयीपणा, कोणीतरी आपल्यावर कटकारस्थान करीत आहे अशी खात्री, ही या प्रकाराची वैशिष्टये असतात. अशा पूर्वग्रहदूषित व्यक्ती कोणाशीही दिलखुलासपणे वागू शकत नाहीत.

अंतर्मुख स्वभाव

या प्रकारच्या व्यक्तींचे इतरांशी संबंध जुळणे अगदी कठीण असते. अशा व्यक्ती एकलकोंडया, हातचे राखून बोलणा-या, एकमार्गी, छंदिष्ट आणि थंड वाटतात. यांचे निर्णय पक्के नसतात, पण या प्रकारात संशयग्रस्तता नसते.

आत्मकेंद्री स्वभाव

या व्यक्तींना स्वतःबद्दल अवास्तव अभिमान असतो व स्वतःच्या सामर्थ्याबद्दल अवास्तव कल्पना असतात. सर्वांचे लक्ष आपल्याकडे असावे असा त्यांचा प्रयत्न असतो. जेव्हा स्वतःबद्दलच्या मोठेपणाच्या भावनेला इतरांकडून धक्का बसतो तेव्हा या व्यक्तींचे राग-द्वेष, दुबळेपणा, न्यूनगंड, लाज, इत्यादी गोष्टी उफाळून येतात. कधीकधी या व्यक्तींची प्रवृत्ती समाजविरोधी असते.

समाजविघातक किंवा दुष्ट स्वभाव

हा प्रकार जास्त प्रमाणात पुरुषांमध्ये आढळतो. याची सुरुवात पौगंडावस्थेपासूनच होते. खोटे बोलणे, चोरी, मारामारी, मोठयांचा अनादर, आक्रमक लैंगिक प्रवृत्ती (उदा. बलात्कार), व्यसने, इतरांच्या हक्कांची पायमल्ली करणे, इत्यादी गोष्टी त्यांच्या अंगवळणी पडलेल्या असतात. असे वर्तन खूप वर्षे टिकून राहते. यातूनच गुन्हेगारी प्रवृत्तीकडे कल होतो. या व्यक्तींची मानसिक अवस्था (‘मूड’) ब-याच वेळा बिघडते. यांचे मित्र, जोडीदार (पती-पत्नी) यांच्याशी स्थिर संबंध तयार होत नाहीत. अशी प्रवृत्ती असणारी मुले शाळेतून लवकर बाहेर पडतात. पण तरीही अशा मुलांना सुधारणे शक्य असते. मात्र घरची गरिबी, आईबापांची भांडणे, अस्थिर कौटुंबिक वातावरण आणि सामाजिक अन्यायामुळे मात्र अशा प्रवृत्ती वाढतात.

परावलंबी स्वभाव

या व्यक्ती न्यूनगंड बाळगणा-या, स्वतःचे सामर्थ्य कमी लेखणा-या, इतरांना चटकन शरण जाणा-या आणि महत्त्वाचे निर्णय स्वतःऐवजी इतरांवर सोपविणा-या असतात. सतत मित्रमंडळींच्या शोधात असलेल्या या व्यक्ती, बुज-या व लाजाळू असतात.

हटवादी स्वभाव

या प्रकारच्या लोकांची विशेष खूण म्हणजे सतत किरकोळ गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्यावर अडून राहणे. असे लोक कामाचे व्यापक स्वरूप लक्षात न घेता त्यातल्या बारीकसारीक तपशीलांवर, कायदेकानूंवर अकारण आग्रह धरून ठेवतात. तसेच त्याप्रमाणे इतरांनी वागले पाहिजे असा या माणसांचा हेका असतो. अशी माणसे स्वतः नीटनेटकी, बारीकसारीक तपशिलासह विचार करणारी, नीतिवादी आणि खरेखोटयाबद्दल चिकित्सक असतात. अशा स्वभावामुळे त्यांची व्यावहारिक प्रगती कमी होते. यामुळे त्यांना मानसिक क्लेश भोगावे लागतात.

अंगात येणे

हा विशेषकरून स्त्रियांचा मनोविकार आहे. पण त्यामानाने हा इतका क्षणिक भाग असतो, की इतर वेळी त्याचा सहसा मागमूस नसतो. त्यांचे इतर वागणे-बोलणे सर्वसामान्य असते. ‘अंगात येणे’ ही एक आपसूक येणारी संरक्षक प्रतिक्रिया आहे. अनेक स्त्रिया आयुष्यात सतत पडती दुय्यम बाजू घेतात. घरात वारंवार बोलणी खाऊन, मार खाऊन त्या दु:खीकष्टी असतात. या स्त्रियांनी यापासून थोडा वेळ तरी सुटण्याचा आणि मोठेपणा मिळवण्यासाठी नकळत वापरलेला हा मार्ग आहे. क्षणभर का होईना ‘देवत्व’ प्राप्त होते. यामुळे आजूबाजूंच्या लोकांचा तिने न्यायनिवाडा करणे, आदेश देणे, शिक्षा सांगणे, प्रायश्चित्त सांगणे या गोष्टी इतर लोकही त्या-क्षणी स्वीकारतात. एकदा याचा फायदा होतो हे कळल्यावर नकळत या प्रकाराची पुनरावृत्ती होत जाते. पण अशा वेळी कधीकधी इतरांकडून त्या व्यक्तीला मारझोडही होते हे वेगळेच. आदिवासी, ग्रामीण, दरिद्री समाजात अंगात येण्याचे प्रमाण खूप असते. त्या मानाने सुखी-समाधानी समाजात त्याचे प्रमाण नगण्य असते. बरेच पुरुष रोजच्या कटकटीतून सुटण्यासाठी दारू पितात व घडीभर वेगळया पातळीवर जगण्याचा प्रयत्न करतात. तसेच स्त्रियांच्या बाबतीत ही एक नकळत वेगळया पातळीवर जगण्याची ‘सुटका’ असते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.