respiratory icon श्वसनसंस्थेचे नेहमीचे आजार श्वसनसंस्थेचे काही गंभीर आजार
घसादुखी – टॉन्सिलसूज

जंतुदोषापैकी घसासूज व टॉन्सिलसूज या आजारांची कारणे व उपचार बरेचसे सारखे असल्याने हे एकत्र घेतले आहेत.

हे आजार (विशेषतः टॉन्सिलसूज) बहुधा लहान मुलांत जास्त प्रमाणात येतात. परंतु नुसती घसासूज कोणत्याही वयात आढळते. या आजारात घसा, टॉन्सिल लालसर होतात, सुजतात. त्याबरोबर ताप, अंगदुखी, इत्यादी लक्षणे दिसतात.

याबरोबर घसा दुखणे, गिळायला त्रास होणे. मधून मधून कोरडा खोकला येतो. घशात/ टॉन्सिलमध्ये टोचल्यासारखे वाटणे या तक्रारी प्रमुख असतात.

कारणे

विषाणू किंवा जिवाणूमुळे घसादुखी, टॉन्सिलसूज होतात. ब-याच वेळा सर्दी-पडशानंतर हे दुखणे येते. हा आजार सांसर्गिक आहे.
याशिवाय रासायनिक प्रदूषण, वावडे (उदा. विशिष्ट खाद्यतेलामुळे), घशास ताण (खूप बोलणे), इत्यादी कारणांमुळे घसा सुजतो.

रोगनिदान

घसा सुजला तर घशाची पाठभिंत लालसर दिसते. टॉन्सिलच्या गाठी सुजल्या असतील तर त्या नेहमीपेक्षा मोठया दिसतात. गाठींचा पृष्ठभाग लालसर दिसतो.

कधीकधी टॉन्सिलवर पांढरट (पू) ठिपके दिसतात.

घसासूज असो की टॉन्सिलसूज, गळयातल्या रसग्रंथी सुजणे, दुखणे ही बहुतेक वेळा आढळणारी खूण आहे.

कधीकधी एका बाजूच्या टॉन्सिलच्या मागे पू जमून त्या बाजूची सूज मोठी दिसते. अशा आजारात मात्र तज्ज्ञाकडे पाठवणे योग्य ठरेल.

घशाची तपासणी करण्यासाठी जीभ खाली दाबून धरण्यासाठी साधा स्वच्छ चमचा वापरावा. नीट दिसण्यासाठी बॅटरीचा उजेड किंवा सूर्यप्रकाश लागतो.

उपचार
  • गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. गरम दूध-हळद प्यायला द्यावी. या उपायांनी घशाला शेक मिळून लवकर आराम पडतो. ब-याच वेळा केवळ एवढया उपायानेच घसासूज कमी होते. गुळण्या दिवसातून चार-पाच वेळा कराव्यात.
  • लाळ सुटण्यासाठी खडीसाखर, हळद-गूळ गोळी मधून मधून तोंडात ठेवावी.
  • जंतुदोष आटोक्यात आणण्यासाठी ऍमॉक्सी गोळया उपयुक्त आहेत. लहान मुलांना पातळ औषध देणे सोपे पडते. तयार औषध न मिळाल्यास वरील गोळीचे चूर्ण साखरपाणी किंवा मधातून देता येते.
  • ताप व अंगदुखीसाठी ऍस्पिरिन किंवा पॅमाल गोळया द्याव्यात.
आयुर्वेद

टॉन्सिलसुजेवर हळदपूड लावणे हा चांगला उपाय आहे. आपला अंगठा थोडा ओला केल्यास अंगठयास हळद चिकटते. मोठया माणसांना स्वतःच्या अंगठयाने टॉन्सिलवर हळद लावणे सहज शक्य आहे.

लहान मुलांना घशात हळद लावताना मात्र थोडे कौशल्य लागते. यासाठी आपल्या अंगठयावर किंवा ओल्या कापसाच्या बोळयावर हळदपूड घेऊन, मुलाचे तोंड उघडून चटकन हळदपूड टॉन्सिलवर लावावी. बोट चावले जाऊ नये म्हणून एका बोटाने मुलाचा गाल बाहेरून दातांमध्ये दाबून ठेवावा. हळद दोन्ही बाजूला लावावी.

या उपायाने ठणका व सूज कमी होते. हळद लावताना मागच्या पडजिभेस किंवा घशाच्या पाठभिंतीस स्पर्श झाल्यास उलटी होण्याची शक्यता असते, पण त्याने काही बिघडत नाही.

याबरोबरच सकाळ-संध्याकाळ गरम पाण्यात मीठ-हळद मिसळून गुळण्या कराव्यात. याप्रमाणे दोन-तीन दिवस उपाय करावा.

मध-हळद चाटण हा देखील एक चांगला उपाय आहे.

घसादुखीसाठी बाजारू गोळयांऐवजी (उदा. व्हिक्स) अर्धा चमचा जिरे + एक चमचा साखर तोंडात धरल्यास त्याचा रस पाझरून घसादुखी कमी होते. साखर लवकर विरघळते म्हणून आणखी एक-दोन वेळा घ्यायला हरकत नाही. हा उपाय लवकर केल्यास बहुतेकदा घसादुखी इतर काही न करता थांबते. खूप ताप, जास्त आजार असल्यास तज्ज्ञाकडे पाठवावे.

घसादुखीचा त्रास वारंवार होत असल्यास त्याविरुध्द प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संशमनी वटी (गुडुचिघन) 3 गोळया 3 वेळा याप्रमाणे 14 दिवस द्यावे.

होमिओपथी निवड (टॉन्सिल सूज)

आर्सेनिकम, बेलाडोना, कल्केरिया कार्ब, ड्रॉसेरा, फेरम फॉस, हेपार सल्फ, लॅकेसिस, लायकोपोडियम, मर्क्युरी सॉल, फॉस्फोरस, सिलिशिया

होमिओपथी निवड (घसासूज)

नायट्रिक ऍसिड, एपिस, आर्सेनिकम, बेलाडोना, सीना, कॉस्टिकम, फेरम फॉस, हेपार सल्फ, लॅकेसिस, लायकोपोडियम, मर्क्युरी फॉस, मर्क्युरी सॉल, नेट्रम मूर, फॉस्फोरस, फायटोलाका, सिलिशिया

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.