mouth dental icon तोंड व दातांचे आरोग्य पचनसंस्थेचे नेहमीचे आजार
तोंड व दातांचे आरोग्य

Mouth Stomatitis तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. त्यातूनच जंतूंचाही प्रवेश होतो. तोंडाचे आरोग्य हे एकूण आरोग्याच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचे आहे. दात, हिरडया, तोंड यांसाठी खास वैद्यकीय शाखा त्यामुळेच आहे. आपणही यातल्या काही प्राथमिक गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत.

आजुबाजूच्या व्यक्तींकडे बारकाईने लक्ष दिल्यास दात-तोंडाच्या अनेक आजारांशी आपली सहज ओळख होईल. खराब झालेले दात, किडलेले दात, दातावरचे कीटण, सुजलेल्या हिरडया, हिरडयांची झिजून उघडी झालेली दातांची मुळे वगैरे अनेक विकार पाहायला मिळतात. मुलांना देखील दातांचे अनेक आजार असतात. मागच्या पिढीच्या लोकांमध्ये दात-हिरडयांचे आजार मोठया प्रमाणात होते. अनेकांचे साठीच्या आधीच दात पडलेले असायचे. आताच्या पिढीत दात जास्त वर्षे शाबूत राहतात. याचे मुख्य कारण दातांचा ब्रश. ब्रशमुळे दात साफ राहतात, कमी आजार होतात आणि दात जास्त टिकतात.

दाताचा डॉक्टर नसल्यास काही साधी दंतवैद्यकीय तंत्रे शिकून आपण बरेच काम करू शकतो.

  • दातांची, हिरडयांची तपासणी
  • दातांची निगा कशी ठेवायची ते सर्वांना शिकवणे
  • किडलेल्या दातात सिमेंट भरणे
  • कीटण काढणे
  • खूप हलणारा दात काढणे
  • वृध्द माणसांना कवळी बसवून घ्यायला प्रवृत्त करणे

ही कामे अगदी महत्त्वाची आहेत. आपल्यालाही ती नक्की करता येतील, फक्त त्यासाठी थोडे प्रशिक्षण पाहिजे. या प्रकरणात या कामांसाठी लागणारी माहिती आपण बघू या.

उपचार

प्रथम कुंथण्याचे कारण म्हणजे बध्दकोष्ठ बरे करणे महत्त्वाचे. या जखमेवर मूळव्याधीमलम लावून तात्पुरता आराम मिळू शकतो. पण (भूल देऊन) गुदद्वाराचे स्नायूवर्तुळ ढिले केल्यावरच खरा आराम पडतो. यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते.
मूळव्याध व गुदद्वारव्रण दोन्हीमध्ये समान उपचार याप्रमाणे

  • मळ मऊ व सहज होण्यासाठी लिक्वीड पॅराफिनसारख्या रेचकाचा उपयोग त्रास पूर्ण बरा होईपर्यंत करणे.
  • गरम पाणी (आंघोळीला वापरतो तेवढे गरम) एका टबमध्ये घेऊन त्यात बसून शेक घेणे. याऐवजी घमेली किंवा परात चालेल.
  • गुदद्वाराची वेदना कमी करणारे मलम झायलोकेन जेली ही मलविसर्जनाचे आधी व नंतरही लावावे.
नुकताच पडलेला दात

मारामारी, अपघात,इ. प्रसंगात एखादा दात जबडयातून सुटून येतो. हा दात पूर्ण (न मोडलेला) असेल तर आपल्याला परत बसवता येतो. मात्र हे काम लगेच (12 तासांच्या आत) व्हायला पाहिजे. तोपर्यंत दात स्वच्छ करून सांभाळून ठेवावा. यासाठी दात लगेच कोमट पाण्यात घालून ठेवावा. किंवा असा दात रुग्णाने स्वत:च्या तोंडात जिभेखाली धरून ठेवावा. यामुळे तो जिवंत राहतो. त्याला थोडे मांस, अंतस्त्वचा वगैरे चिकटली असेल तर ती तशीच ठेवावी. यामुळे दात परत बसवायला-जुळवायला बरे पडते. दाताची मुळे पूर्वीच्या जागी दाबून बसवून ठेवली की काम झाले. मात्र कधी कधी एवढे करूनही दात आत पक्का होत नाही व तो गळून पडतो. हेच काम दंतवैद्याने केल्यास जास्त चांगले कारण तो मुळे त्यांच्या जागी नीट बसवू शकतो.

एखादा दात अर्धवट तुटला असेल तर त्यावर कृत्रिम टोप चढवणे चांगले. यामुळे त्याची झीज टळते. याला ‘क्राऊनिंग’/(मुगुट) असे नाव आहे.

हलणारा दात
  • उतारवयात दाताचे आयुष्य संपल्याने, जंतुदोषामुळे किंवा त्याला मार लागल्याने मुळे जबडयातून सैल होतात. यामुळे दात हलायला लागतो.
  • मार लागल्याने दात हलू शकतो. थोडा हलत असल्यास बहुधा काही दिवसांनंतर आतली फट व जखम भरून येते. यामुळे दात पुन: पक्का होतो. मात्र खूप हलत असल्यास दात पडून जाईल.
  • जंतुदोष किंवा जुना झाल्याने दात हलत असेल तर तो परत पक्का होत नाही. असा दात पडून जाईल.
  • कधीकधी दाताला मार लागल्याने आत मुळाला मार बसून तो तुटू शकतो. अशा वेळी दातावर दबाव आला की तो दुखतो, पण दात हलेलच असे नाही. हे दुखणे थांबले नाही तर दंतवैद्याला दाखवावे. कदाचित हा दात काढून टाकावा लागतो. दाताचे मूळ तुटले आहे की नाही हे त्यावर चमच्यासारखी वस्तू वाजवून आवाजाने कळते. याला थोडा अनुभव लागतो. इतर चांगल्या दातांच्या खणखणीत आवाजाशी तुलना केल्यास फरक स्पष्ट जाणवतो.
दात उपटणे – घरगुती पध्दत

दंतवैद्याच्या सेवा फारशा नसल्यामुळे दात उपटण्यासाठी एक सोपी पध्दत प्रचलित आहे. थोडया मजबूत दो-याचा दुहेरी फास दाताच्या बुडाशी अडकवून दमदार झटका दिल्यास हलणारा दात समूळ निघून येतो. खूप हलणारा दात असा काढल्यावर फारसा रक्तस्राव होत नाही. जे काही थोडे रक्त येते ते कापसाच्या बोळयाच्या दाबाने लगेच थांबते. या पध्दतीने दात निघू शकेल की नाही याचा अंदाज आधी घ्यावा. दात थोडाच हलत असेल तर हे तंत्र वापरु नये.

दात उपटणे – वैद्यकीय पध्दत

खूप हलणारे दात (म्हातारपणात किंवा दुधाचे दात) आपल्याला चिमटयाने काढता येतात. कोठल्याही दाताला वापरता येईल असा एक चिमटा मिळतो, तो वापरून थोडा झटका देऊन दात काढता येतो. याला थोडा अनुभव लागतो आणि दंतवैद्याबरोबर 10-15 दिवस काम करून हे शिकता येईल.

जबडयाला भूल देणे हे मात्र जरा कौशल्याचे काम आहे. यासाठी 1% झायलोकेन हे इंजेक्शन जबडयाच्या शेवटी कोनात देतात. इथे जरा जास्त अनुभव व निरीक्षण लागते. भूल दिल्यावर मात्र दात काढताना दुखत नाही. हे काम वैद्यकीय तंत्रज्ञ किंवा दाताच्या डॉक्टरने केलेले चांगले.

दात काढताना कधी कधी मूळ तुटून आत राहते. असे तुटके मूळ शस्त्रक्रियेनेच काढावे लागते. दात निघाल्यावर त्याची मुळे शाबूत आहेत की नाही हे दात तपासून ठरवतात.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.